Wednesday, 19 February 2025

प्रगटदिन - पूर्वसंध्या...

 || श्री स्वामी समर्थ ||



गेले दोन तीन महिने खूप प्रयत्न केले पण शेगाव चे ट्रेन बुकिंग मिळत नव्हते . कुणी शेगाव ला जाऊन आलेले समजले मनात यायचे  महाराज प्रत्येकाला बोलवत आहेत पण आपल्याला नाही . पण हा लटका रुसवा असायचा .पण म्हणतात ना सोच बदलो . मग मी असा विचार केला कि माझ्या घरात आहेत कि महाराज , ते नक्की बोलावतील शेगाव ला पण तोवर आपण परायण करुया . 

सासूबाई ( कै. ) उषाताई आपटे ह्यांनी माझ्या हातात श्री गजानन विजय पोथी ठेवली त्याला ह्या नोव्हेंबर मध्ये 25 वर्ष पूर्ण होत आहेत. गेले 25 वर्ष मी आणि महाराज आमची अगदी गट्टी जमली आहे. दोघानाही एकमेकांशिवाय करमत नाही ह्याची पदोपदी प्रचीती त्यांनी मला दिली आहे. खूप लाड केले आहेत त्यांनी माझे आणि प्रत्येक वेळी माझ्या मागे खंबीर उभेही राहिले आहेत . अनेकदा आयुष्यातील निर्णय चुकले, कधी कोलमडून पडले पण महाराजांनी हात हातात घेऊन पुन्हा उभे केले. 

25 वर्षाचा काळ सोपा नव्हता पण अशक्यही नव्हता कारण अर्थात महाराजांचे आयुष्यात झालेले पदार्पण . त्यांच्या अस्तित्वाची ग्वाही क्षणोक्षणी त्यांनी दिली . मला कधीच एकटे वाटू दिले नाही आणि एकटे सोडलेही नाही. अक्षरशः महाराजांच्या जीवावर माझ्या उड्या हे मी अनुभवले.  म्हणूनच ह्या सर्वाची पोच म्हणून मनात सहज विचार आला शेगाव ला जाण्याचा योग येयील तेव्हा जाऊच पण तोपर्यंत रोज १ असे २१ दिवस अखंड २१ अध्यायाचे एक अखंड पारायण करुया . महाराजांच्या समोर उभी राहिले आणि विनंती केली पारायण रुपी  सेवा करायची इच्छा आहे, हि इच्छा मनात येणे हि सुद्धा तुमचीच कृपा आहे हि सेवा माझ्याकडून करून घ्या आणि 30 जानेवारीला  वाचायला सुरवात केली आज २१ वे पारायण त्यांच्या कृपेने पूर्ण झाले.


स्वयपाकघर , रोजची कामे ह्या सर्वाची व्यवस्थित आखणी केली , मनात धाकधूक होती पण दृढ निश्चय केला आणि वाचनास आरंभ केला. पारायण करत असताना  अधून मधून अनेक आठवणी दाटून येत असल्यामुळे डोळे भरून येत होते . पण दारावरची बेल वाजली नाही कि कुठलाही अडथळा फोन मध्ये आला नाही. अधून मधून लक्ष चक्क उडत होते . पण तरीही ह्या मनाला दटावून परत वाचत असे. 

गेले २१ दिवस मी वेगळ्याच विश्वात होते . संपूर्ण शेगाव डोळ्यासमोर सतत उभे होते . आजवर शेगाव च्या केलेल्या सगळ्या  यात्रा अगदी जश्याच्या तश्या दिसत होत्या . 25 वर्षात भेटत गेलेली लोक , त्यांचे अनुभव ऐकून मन आणि विश्वास वृद्धिंगत झाला होता . जास्तीत जास्त यात्रा मी गोगटे काकांच्या सोबत केल्या आम्ही ७५ जण असू आणि तो माहोल एकदम अध्यात्मिक असे. भाऊंची शेगाव ला नेहमी भेट होत असे. भाऊ म्हणजे ज्ञानाचे अनुभवांचे एक विद्यापीठ होते . आयुष्यात ह्या सर्व व्यक्तीं ज्या  मी महाराज स्वरूपच मानते त्यांची भेट होणे  हि महाराजांची कृपाच आहे. 

आज मन खूप भारावले आहे. शब्द सुचत नाहीत तरी काहीतरी खरडते आहे. अनेकदा आपले व्यक्तिगत सेवेचे अध्यात्मिक अनुभव प्रचीती आपण कुठेच कुठल्याही माध्यमातून व्यक्त करूच शकत नाहीत इतके अनमोल , असामान्य अद्भुत असतात . ते फक्त डोळे मिटून अनुभवायचे आणि मनाच्या एका खास कप्प्यात ठेवून जायचे . 

सर्व पारायणे करत असताना रोज महाराज मला नवनवीन अनुभूती देत होते , माझ्यातील चुकांचे दर्शन सुद्धा त्यांनीच दिले  हे आवर्जून सांगावेसे वाटते . एखाद्या प्रसंगात किंवा व्यक्तीशी आपण किती चुकीचे वागलो हे आठवून सुद्धा दडपण येत असे. मनाला त्रास होत असे पण त्यासाठी महाराजांची आणि त्या व्यक्तीची सुद्धा क्षमा मागून मी पुढे वाचत असे.  अध्यात्म हे सगळ्यात आधी आपला कायापालट करते . पारायण म्हणजे सिंहावलोकन जे केल्याने कमीपणा येत नाही तर महाराजांच्या एक पाऊल समीप जाण्याचा अनुभव मिळतो जो मी अनुभवला . आपल्यातील चुका सुधारण्याची संधी मिळते ती सेवेतून . निरपेक्षपणे आणि त्रयस्थ पणे  जेव्हा आपण आपल्याच जीवनाकडे बघतो तेव्हा आपली स्वतःची सुद्धा नव्याने आपल्या शी ओळख होते . झालेल्या चुका स्वीकारून पुढे जाणे ह्याला सुद्धा धैर्य लागते ते मी पदोपदी दाखवले आणि महाराजांच्या अधिकच निकट जात असल्याचा अनुभव मला मिळत गेला. 

आपले जीवन साकारण्यासाठी त्याला आकार देण्यासाठी असंख्य व्यक्तींचे हातभार लागतात . आज ह्या निम्मित्ताने मी त्यांची ऋणी आहे. महाराजांनी आमच्या वास्तूत प्रगट दिन आणि इतर पूजा आमच्या सर्वांकडून करून घेतल्या त्या सर्वांचा एक चलत चित्रपट जणू डोळ्यासमोरून तरळून जात होता. ह्या पारायण रुपी सेवेत गेली २१ दिवस मला अलौकिक अनुभूती , मनाची शांतता आणि जीवनाकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन लाभला. 

प्रत्येक दिवशी एक पारायण करत असताना माझ्यासमोर पोथी जणू नव्याने उलगडत होती. एखादा शब्द वाक्य रचना प्रसंग जणू आज पहिल्यांदा वाचल्या सारखेच भासत होते . त्यावर मनन चिंतन करताना आपण त्यातून काय घेतले पाहिजे हेही अगदी नव्याने समजत होते . एखादा संकल्प करायला आणि तो पूर्णत्वाला न्यायला त्यांची कृपा लागते . माझ्या सारख्या व्यक्तीचे हे काम निश्चित नाही . रोज अगदी ठरलेल्या वेळी महाराज मला आणून बसवत असत आणि तनमन धन एकत्र करून मी वाचत असे. पोथीमधील पितांबर शिंप्या पासून सर्व भक्त गण आणि त्यांच्या साठी महाराजांनी केलेल्या लीला अक्षरशः समोर दिसू लागल्या . 

शेगाव संस्थान , समाधी मंदिर , गादी , प्रसादालय , बंकट सदन , अश्या सर्व ठिकाणी मनसोक्त मनाची भटकंती चालू होती . पहाटे महाराजांच्या स्नानाच्या वेळीचे सनईचे सूर , सकाळी ११ वाजता सर्व मंदिरातून केली जाणारी आरती , शेजारती , विडा सर्व काही डोळे भरून पाहत होते . अनेकदा हा शेजारतीचा विडा खाण्याचे भाग्य सुद्धा मला लाभले आहे . भास्कर पाटील ह्यांचा मळा असो कि कोंडोलीचा  वठलेला आम्रवृक्ष असो , गणू ने उडवलेले धोंडे असो कि जानकी रामाचे चिंचवणे असो सर्व काही अनुभवले. 

महाराजांच्या नुसत्या एका कटाक्षासाठी जीवन भर तळमळत राहिलेले भक्तगण त्यांची यादी न संपणारी आहे. प्रत्यक्ष्यात ज्यांनी महाराजांना पहिले अनुभवले असेल ते किती बरे भाग्यवान असतील. अनेकांना महाराजांच्या सेवेची संधी मिळून सुद्धा त्याचे सोने करता आले नाही उदा. विठोबा घाटोळ. आपल्याला महाराज नाही व्हायचे आहे तर भक्त सेवेकरी व्हायचे आहे.  

गेले 21 दिवस हे  माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस होते , अंतर्बाह्य अनुभूती ह्यालाच म्हणत असावेत नाही का? आपण हा संकल्प पूर्ण करू शकलो ह्यावर अजूनही माझा विश्वास बसलेला नाही.  रोज पारायण पूर्ण झाले कि मी आरती आणि खडीसाखरेचा नेवेद्य ठेवत असे . आज खडीसाखर ठेवली आणि नतमस्तक झाले. डोळ्यातून एक अश्रू नाही , सद्गदित झाले, डोळे मिटले आणि शेगाव ला गेले . महाराजांना म्हंटले माझ्याकडून आपण आज हि सेवा करून घेतली आणि ओंजळीभरून आनंद दिलात . आमरण माझ्याकडून आपली सेवा व्हावी आणि अविरत लेखन व्हावे हेच मागणे आहे आता . 

प्रत्येक गोष्ट कारणाशिवाय घडत नाही , गेल्या २१ दिवसात माझ्यातील त्रुटी मला उमजल्या आणि त्यासाठीच केला होता हा अट्टाहास असाच चांगला अर्थ मी त्यातून काढला आहे. अनेकदा आपण आपल्याच विश्वात इतके रमतो कि नव्याने थांबून मागे वळून आपल्याच आयुष्याकडे बघण्यासाठी आपल्याला वेळ नसतो , तो मला सर्वार्थाने मिळाला. 

आज मी प्रचंड खुश आहे , महाराजांचा प्रगट दिन काय करू आणि काय नको असे झाले आहे. एक परिपूर्ण जीवन जगले आहे , श्री गजानन विजय हि कादंबरी नाही , त्यात महाराजांचे अस्तित्व आहे आणि मनापासून संपूर्ण श्रद्धेने पोथीचे वाचन केले तर त्यांचे  अस्तित्व जाणवल्या शिवाय राहणार नाही . प्रत्येक अध्याय आपल्याला काहीतरी देत आहे आपल्याला घेता आले पाहिजे , काहीच शाश्वत राहत नाही पण महाराजांची सेवा , भक्ती आणि त्यांचे आपल्या भक्तांवर असलेले प्रेम हे अमर्याद शाश्वत आहे.  

आपण केलेली सेवा त्याची वाच्यता कुठे करू नये तरीही आज अंतर्बाह्य अविस्मरणीय अनुभव आपल्या सर्वांसमोर ठेवावासा वाटला , आपल्याला भक्त तयार करायचे आहेत आपणही त्यांच्या नामाची प्रचार धुरा सांभाळत आहोत . आपले आयुष्य सुखमय झाले तसेच इतरांचे सुद्धा व्हावे ह्या उद्दात्त हेतूने आपल्यासमोर ठेवलेले हे अनुभव आणि लेखन प्रपंच . महाराजांची सेवा हि आयुष्यात लाभलेली एक सुवर्संधी आहे. जन्मोजन्मीच्या पुण्याची पोच पावती म्हणजेच श्री गजानन विजय हा ग्रंथ हाती येणे असे मला वाटते. प्रत्येकाने त्याचे सोने केले पाहिजे . 

सुख आणि दुक्ख हा ऊन पावसाचा खेळ आहे पण ह्यातूनही महाराजांच्या सेवेत सदैव राहून त्यांचे चिंतन करत आयुष्य व्यतीत करणारा आणि सुखाच्या दुक्खाच्याही पलीकडे जावून सर्वांसाठी जगणारा भक्त महाराजांच्या निकट असतो .

मला कुणाचा राग येतो , प्रचंड मत्सर वाटतो ह्या सर्वाचे मूळ नक्की कुठे आहे. महाराजांच्या सेवेने ते मूळ उखडून टाकता आले पाहिजे . उठ सुठ राग यायला झालेय तरी काय . सर्व तुमच्या मनासारखे होणार नाही. आहात तरी कोण तुम्ही ? एका वाळूच्या कणा इतके अस्तित्व आपले. आपल्या इच्छा त्यांच्या इच्छेत विलीन करून जगणे हाच खरा परमार्थ आहे. सारखे आपले मी मी मी . हिच मी ची भिंत गळून पडण्यासाठी साधना नामस्मरण आवश्यक आहे. 

माझ्या जीवनाला महाराजांच्या अस्तित्वाचा  परीस स्पर्श झाला आणि माझे जीवन कृतार्थ झाले. आत बाहेर मागण्यासारखे काहीच उरले नाही . जे आहे ते त्यांच्या इच्छेने आणि होईल तेही त्यांच्याच इच्छेने ह्यावरील विश्वास दिवसागणिक दृढ होत आहे. एखादी गोष्ट नाही झाली तर तेही आपल्या भल्यासाठी . आपली सेवा परम भक्त होण्यासाठी झाली पाहिजे . 

प्रपंच करताना त्याला अध्यात्माची जोड दिली तर जीवनाची गोडी वाढते आणि जीवन परिपूर्ण होते हा मूलमंत्र गजानन विजय ह्या ग्रंथात दासगणू महाराजांनी दिला आहे. अध्यात्म समजणे सोपे नाही , अविश्रांत मेहनत , निरपेक्ष मन आणि त्यातून दरवळत जाणारा भक्तीचा सुगंध त्यांच्या चरणाशी नेणारच . 

मी गेलो ऐसे मानू नका , भक्तीत अंतर करू नका हे वचन देणारे आपले महाराज आपल्यातच आहेत आणि सदैव राहणार आहेत . गजानन विजय मधील भक्तांची मांदियाळी आपलयाला  पोथी वाचताना भेटत जाते. १२ वर्ष कोरड्या असलेल्या विहिरीला  जेव्हा महाराजांनी जलमय केली तेव्हा भक्तीपंथाचा मळा फुलविन असे सांगून महाराजांच्या सेवेत आजन्म राहिलेला भास्कर पाटील असो अथवा गणू जवर्या. कुणाकडून काय आणि किती शिकावे. 

आमरण वारी घडो आणि सदैव त्यांचे चिंतन राहो. “ मी गेलो ऐसे मानू नका , भक्तीत अंतर ठेवू नका “ हि त्यांचीच ग्वाही आहे . आपल्या भक्तांना श्री गजानन विजय हा ग्रंथ नव्हे तर शिदोरी आयुष्य आनंदाने जगण्यासाठी पुरेशी आहे. 

महाराजांचा तो अनमोल आशीर्वाद आहे. कृतार्थ वाटत आहे . कुडीमध्ये प्राण आहे तोवर सेवा करून घ्या हि त्यांच्या चरणी विनंती , अजून मागण्यासारखे काही नाही .

श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या सर्वाना शुभेछ्या. सर्व भक्तांवर महाराजांची कृपा सदैव बरसत राहूदे . आजन्म वारी घडो सदैव तुमचे चिंतन राहो हेच मागणे आहे.

गजानना गजानना सांभाळ आपल्या भक्त जना 

गजानना गजानना शेगावीच्या गजानना

गुरुकृपा हेच जीवन आहे. 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230




  


Thursday, 6 February 2025

मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक

 || श्री स्वामी समर्थ ||


सकाळीच एका मुलाची पत्रिका बघताना तो म्हणाला . माझे आणि तिचे ब्रेकअप झाले आहे . ठीक आहे पण आयुष्यभर मी रडत बसणार नाही . विचार जुळले नाहीत , एकमेकांना समजून घ्यायची क्षमताच उरली नाही मग पुढे अखंड आयुष्य कटकटी करत जगण्यापेक्षा वेगळे झालेले बरे . अर्थात हे सर्व विवाहाच्या आधी झाले तेही बरेच म्हणायचे . काही दिवस लागतील आठवणींच्या धुक्यातून बाहेर यायला पण मी येयीन आणि पुन्हा आयुष्य जगायला सुरवात करीन. मला इतके कौतुक वाटले त्याचे . मी म्हंटले विवाह योग लवकरच आहे तुझा काळजी नको होईल सर्व चांगले मनासारखे . 

आजची दुसरी पत्रिका वडील घेवून आलेले . मुलाचा प्रेमभंग आणि मुलगा व्यसनाच्या गर्तेत . वडील हवालदिल झाले होते. अहो हाता तोंडाशी आलेली मुले असे करायला लागली तर आम्ही आईवडिलांनी काय करायचे . आयुष्याच्या संध्याकाळी काय काय बघायला लागणार आहे ह्या चिंतेत . मुलीने नकार दिला त्याला सोडून गेली कारण काहीही असो पण त्याला हे सहन झाले नाही . मानसिक धक्का आणि त्यातून हाती आलेला मदिरेचा प्याला. आज चार वर्ष झाली म्हणाले. 

बघा ह्या दोन मुलांच्या गोष्टी आहेत ज्यात साम्य एक कि दोघांचाही प्रेमभंग पण पहिला सावरला , नुसता सावरला नाही तर त्यातून नवीन आयुष्याला सामोरा गेला . पण दुसरा दुर्दैवाने ते करू शकला नाही . तिच्या आठवणी , एकत्र घालवलेले क्षण सर्व काही कवटाळून जगू पाहतोय आणि तेही सहन होत नाही म्हणून बेधुंद होवून जगण्यासाठी नशेचा आधार घेतोय .

चंद्र मनाचा कारक . मनाने ठरवले तर काहीच अशक्य नाहीय . फक्त ते ठरवायचे आहे दुर्दम्य इच्छाशक्ती हवी आणि ती उपासनेतून मिळते . आयुष्य कधीच कुणा एकासाठी थांबत नसते. व्यक्ती कायमची निघून गेली तरी देवाने दुखवटा १३ दिवसाचा ठेवला आहे . पुढे आपले जीवन जगावेच लागते , मधेच पूर्णविराम देता येत नाही . 

एखादी व्यक्ती सोडून गेली पण आज उभे आयुष्य कष्ट करून खस्ता खावून वेळेस पोटाला चिमटा घेवून आणि आपल्या इच्छांची होळी करून तुमचे भविष्य घडवण्यासाठी उभ्या असलेल्या आपल्या जन्मदात्यांचा तरी विचार करा. कोण ती कालची मुलगी येते आणि जीवनाचे वाळवंट करून जाते . एका क्षणात होत्याचे नव्हते होते इतके कमकुवत मन आहे का तुमचे ? असेल तर त्यातूनहि ते भक्कम करण्यासाठी उपासनेची कास धरा , ज्या जगात काहीच अशक्य नाही . 

असे काहीही ह्या जगात नाही कि त्यासाठी आपण आपले आयुष्य पणाला लावावे तेही आपल्या कुटुंबाचा विचार न करता. प्रेम हि एक कोमल भावना आहे ज्याला समजली तो जीव देणार नाही आणि घेणारही नाही .अनेकदा आकर्षण आणि प्रेम ह्यात सुद्धा गल्लत होते . पत्रिकेतील चंद्र शुक्राचा अभ्यास म्हणूनच खूप महत्वाचा ठरतो. नको त्या गर्तेत ढकलणारा राहू आणि तिथेच दीर्घकाल ठेवणारा शनी . एखाद्याने आपल्या मजेसाठी प्रेम केले , फुलपाखरासारखे आज एकीवर उद्या दुसरीवर आणि समोरच्याने त्यावर जीव ओवाळून टाकला तर दोष नक्की कुणाचा ? शेवटी आपणच आपल्या मनाला पर्यायाने आपल्या स्वतःला सावरायचे असते ...तेही वेळीच .

आज चंद्र रोहिणी ह्या चंद्राच्याच नक्षत्रात आहे. 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230