Thursday, 6 February 2025

मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक

 || श्री स्वामी समर्थ ||


सकाळीच एका मुलाची पत्रिका बघताना तो म्हणाला . माझे आणि तिचे ब्रेकअप झाले आहे . ठीक आहे पण आयुष्यभर मी रडत बसणार नाही . विचार जुळले नाहीत , एकमेकांना समजून घ्यायची क्षमताच उरली नाही मग पुढे अखंड आयुष्य कटकटी करत जगण्यापेक्षा वेगळे झालेले बरे . अर्थात हे सर्व विवाहाच्या आधी झाले तेही बरेच म्हणायचे . काही दिवस लागतील आठवणींच्या धुक्यातून बाहेर यायला पण मी येयीन आणि पुन्हा आयुष्य जगायला सुरवात करीन. मला इतके कौतुक वाटले त्याचे . मी म्हंटले विवाह योग लवकरच आहे तुझा काळजी नको होईल सर्व चांगले मनासारखे . 

आजची दुसरी पत्रिका वडील घेवून आलेले . मुलाचा प्रेमभंग आणि मुलगा व्यसनाच्या गर्तेत . वडील हवालदिल झाले होते. अहो हाता तोंडाशी आलेली मुले असे करायला लागली तर आम्ही आईवडिलांनी काय करायचे . आयुष्याच्या संध्याकाळी काय काय बघायला लागणार आहे ह्या चिंतेत . मुलीने नकार दिला त्याला सोडून गेली कारण काहीही असो पण त्याला हे सहन झाले नाही . मानसिक धक्का आणि त्यातून हाती आलेला मदिरेचा प्याला. आज चार वर्ष झाली म्हणाले. 

बघा ह्या दोन मुलांच्या गोष्टी आहेत ज्यात साम्य एक कि दोघांचाही प्रेमभंग पण पहिला सावरला , नुसता सावरला नाही तर त्यातून नवीन आयुष्याला सामोरा गेला . पण दुसरा दुर्दैवाने ते करू शकला नाही . तिच्या आठवणी , एकत्र घालवलेले क्षण सर्व काही कवटाळून जगू पाहतोय आणि तेही सहन होत नाही म्हणून बेधुंद होवून जगण्यासाठी नशेचा आधार घेतोय .

चंद्र मनाचा कारक . मनाने ठरवले तर काहीच अशक्य नाहीय . फक्त ते ठरवायचे आहे दुर्दम्य इच्छाशक्ती हवी आणि ती उपासनेतून मिळते . आयुष्य कधीच कुणा एकासाठी थांबत नसते. व्यक्ती कायमची निघून गेली तरी देवाने दुखवटा १३ दिवसाचा ठेवला आहे . पुढे आपले जीवन जगावेच लागते , मधेच पूर्णविराम देता येत नाही . 

एखादी व्यक्ती सोडून गेली पण आज उभे आयुष्य कष्ट करून खस्ता खावून वेळेस पोटाला चिमटा घेवून आणि आपल्या इच्छांची होळी करून तुमचे भविष्य घडवण्यासाठी उभ्या असलेल्या आपल्या जन्मदात्यांचा तरी विचार करा. कोण ती कालची मुलगी येते आणि जीवनाचे वाळवंट करून जाते . एका क्षणात होत्याचे नव्हते होते इतके कमकुवत मन आहे का तुमचे ? असेल तर त्यातूनहि ते भक्कम करण्यासाठी उपासनेची कास धरा , ज्या जगात काहीच अशक्य नाही . 

असे काहीही ह्या जगात नाही कि त्यासाठी आपण आपले आयुष्य पणाला लावावे तेही आपल्या कुटुंबाचा विचार न करता. प्रेम हि एक कोमल भावना आहे ज्याला समजली तो जीव देणार नाही आणि घेणारही नाही .अनेकदा आकर्षण आणि प्रेम ह्यात सुद्धा गल्लत होते . पत्रिकेतील चंद्र शुक्राचा अभ्यास म्हणूनच खूप महत्वाचा ठरतो. नको त्या गर्तेत ढकलणारा राहू आणि तिथेच दीर्घकाल ठेवणारा शनी . एखाद्याने आपल्या मजेसाठी प्रेम केले , फुलपाखरासारखे आज एकीवर उद्या दुसरीवर आणि समोरच्याने त्यावर जीव ओवाळून टाकला तर दोष नक्की कुणाचा ? शेवटी आपणच आपल्या मनाला पर्यायाने आपल्या स्वतःला सावरायचे असते ...तेही वेळीच .

आज चंद्र रोहिणी ह्या चंद्राच्याच नक्षत्रात आहे. 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

 


No comments:

Post a Comment