Wednesday, 4 November 2020

मकर राशीतील गुरुचे संक्रमण 2020

 || श्री स्वामी समर्थ ||


जीवनात गुरूला अनन्यसाधारण महत्व आहे. गुरु हा विद्या , शिक्षण , संतती ,विवाह , भाग्य , अध्यात्म ह्या सर्व गोष्टींचा कारक ग्रह आहे. गुरूंचा आशीर्वाद असेल तर हि जीवनरूपी नैया आनंदाने पार होते. 

देवगुरु बृहस्पती २० नोव्हेंबर २०२० रोजी ,आपल्या स्वतःच्या धनु राशीतून मकर राशीत जात आहेत जिथे त्यांचे वास्तव्य २० नोव्हेंबर २०२१ पर्यंत असेल. २० नोव्हेंबर पासून ६ जानेवारी पर्यंत गुरुचे गोचर उत्तराषाढा नक्षत्रातून होईल .उत्तराषाढा नक्षत्र रविचे नक्षत्र आहे आणि रवी गुरु मित्रही आहेत .६ जानेवारीपासून ते ४ मार्च पर्यंत गुरुमहाराज श्रवण नक्षत्रातून गोचर करतील . श्रवण हे चंद्राचे नक्षत्र आहे ,गुरु आणि चंद्रही मित्र आहेत . ४ मार्च पासून २० नोव्हेंबर पर्यंत मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रातून गुरुचे भ्रमण असेल . गुरु आणि मंगळ मित्र आहेत .

५ एप्रिल २०२१ ते १४ सप्टेंबर २०२१ पर्यंत गुरुचे भ्रमण कुंभेतून होईल.  १८ जून २०२१ ते १९ ऑक्टोबर २०२१ ह्या काळात गुरु वक्री असेल. १९ ऑक्टोबर २०२१ रोजी गुरु मार्गी होईल. १४ सप्टेंबर २०२१ ते २० नोव्हेंबर २०२१ पर्यंत गुरु महाराज मकरेत असतील. ५ एप्रिल २०२१ ते १४ सप्टेंबर २१२१ पर्यंत गुरु अतिचार गतीने कुंभेत जातील.  मकर राशीत गुरु निचीचा असतो. गुरु जवळजवळ १२ वर्षांत १२ राशीतील आपले भ्रमण पूर्ण करतात तर शनी महाराज १२ राशीतील आपल्या भ्रमणास जवळजवळ 30 वर्षाचा काळ घेतात .

गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह एका राशीत जवळजवळ २० वर्षांनी येतात. ज्योतिष शास्त्रातील हे दोन्ही मोठे ग्रह आहेत त्यामुळे त्यांची एका राशीतील युती महत्वपूर्ण आहे. गुरु ज्ञानाचा तर शनी कर्माचा कारक आहे. मकर राशी हि शनीची रास असून ती पृथ्वीतत्वाची रास आहे. तसेच अर्थ त्रिकोणातील एक महत्वाची रास आहे .मकर राशी हि आपल्या जीवनातील भौतिक सुखे दाखवते तसेच ती अर्थ त्रिकोणातील एक प्रमुख रास आहे कारण ती पत्रिकेतील कर्म भाव म्हणजे दशमस्थानात येते . मकर रास अध्यात्माशी निगडीत नाही आणि गुरु हा अध्यात्माचा , धार्मिकतेचा ग्रह आहे. मकर रास भौतिक गोष्टींशी निगडीत आहे ती अलौकिक गोष्टी दर्शवत नाही तसेच अर्थार्जनाशी निगडीत असल्याने गुरूच्या अध्यात्मिकतेला इथे वाव नाही म्हणून गुरु ह्या राशीत निचीचा आहे. आयुष्यात पैसा आणि नावलौकिक मिळवणे ह्या पलीकडेही अनेक गोष्टी आहेत .नुसते अर्थार्जन करणे हा आयुष्याचा एकमेव उद्देश असू नये हे गुरुमहाराज दाखवतात. मकर रास हि शनीची रास असून नैसर्गिक कुंडलीत दशमात येते. कर्म ,मेहनत केल्याशिवाय शनी महाराज काहीच देणार नाहीत . गुरु म्हणजे आशावाद .इथे गुरुमहाराज प्रत्येक गोष्टीत परिश्रम करूनच यश देतील. अनैतिक मार्गाने धनप्राप्त करण्याचा प्रयास केला तर मात्र नुकसान होईल. 

गुरु हा मकर राशीत निचीचा आहे पण शनी मकर राशीत म्हणजेच  स्वतःच्या राशीत असल्याने गुरूचा नीचभंग राजयोग होत आहे. अश्या योगात गुरु जरी शुभ ग्रह असला तरी त्याची शुभ फळे हि संघर्षा नंतर मिळतात .

गुरु ज्ञान देणारा ग्रह आहे . गुरु आदर्शवाद ,आशावाद दर्शवतो तर शनी न्यायी ,कठोर ग्रह आहे. शनी संघर्ष दर्शवतो. गुरुचे आदर्शवाद , ज्ञान , उदारता शनी घेतो तसेच शनीचे वास्तववाद ,न्यायी वृत्ती गुरु घेतो . अश्याप्रकारे ह्या विपरीत राजयोगात काही प्रमाणत दोन्ही ग्रह एकमेकांचे गुण घेतात . गुरु व्यावहारिक होतो तर शनी थोडा मृदू होईल. ह्या युतीचा परिणाम १२ राशींवर होणार ह्यात दुमत नाही. जेव्हा हे २ ग्रह युतीत येतील म्हणजे १६ डिसेंबर ते 29 डिसेंबर ह्या काळात मोठ्या घटनांची बदलांची नांदी होयील. ह्या काळात ते १ अंशाच्या युतीत राहतील. तब्येतीची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. खालील गोचर फलादेश लग्नाप्रमाणे पाहावा.

मेष लग्नासाठी  हे गोचर दशमात होत असल्याने नोकरी मध्ये प्रगती होईल. उच्च पद मिळू शकते . गुरुची ५ वी दृष्टी कुटुंब स्थानावर आहे त्यामुळे कुटुंबात वृद्धी होईल. गुरूची दृष्टी हि अमृततुल्य असल्याने ज्या स्थानाकडे बघेल तिथे शुभ परिणाम मिळतील. गुरु  ७ व्या दृष्टीने चतुर्थ स्थानाकडे बघत आहे त्यामुळे नवीन घर , गाडी , घरातील मंगल  शुभ कार्यास चांगला काळ आहे. ६ व्या स्थानावर ९ वी दृष्टी असल्याने पैशाचा विनियोग सावधपणे करणे आवश्यक आहे. 

वृषभ लग्नासाठी गुरु ९ व्या स्थानातून गोचर करेल. नैसर्गिक कुंडलीत गुरूची धनु राशी ९ व्या स्थानातच येते.शुक्राच्या लग्नाला शनी योगकारक असल्यामुळे भाग्य वृद्धी होईल. भाग्येश भाग्यात आल्याने भाग्यकारक होईल. भाग्यातून ५ वी दृष्टी लग्नस्थानावर येयील तिथे राहुसुद्धा आहे . राहूवर गुरूची दृष्टी असल्याने राहूचे अशुभ परिणाम कमी होण्यास मदत होयील. गुरूसारख्या शुभ ग्रहाच्या दृष्टीने मानसिकता सुधारेल.  गुरूची ७ वी दृष्टी ३ र्या स्थानावर असल्याने भावंडांचे सुख ,प्रवास होतील. ९ वी दृष्टी ५ व्या स्थानावर असल्याने शिक्षणात यश , मुलांकडून सुखद समाचार ,मुलांचे सुख मिळेल . आपल्या वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यायला लागेल तसेच परदेशातून काहीतरी चांगली बातमी मिळेल. 

मिथुन लग्नासाठी हे गोचर अष्टम स्थानातून होणार आहे. ८ वे स्थान म्हणजे मनस्ताप .ह्या स्थानातून गुरूसारख्या शुभ ग्रहाचे गोचर चांगले मानत नाहीत .शनी जरी इथे मजबूत स्वगृही असला तरी आयुष्यात कसोटीचे प्रसंग हे गोचर घेवून येयील हे नक्की. अचानक लाभ सुद्धा होतील. पण हे लाभ काहीतरी दुक्ख देवून होतात. गुरूची ५ वी दृष्टी व्यय भावावर असल्याने अचानक , अनपेक्षित खर्च उद्भवतील. मोठा खर्च करणार असाल तार विचारपूर्वक केला पाहिजे. ७ वी दृष्टी कुटुंब स्थानावर असल्याने कुटुंबासाठीही खर्च होईल. ९ वी दृष्टी चतुर्थ स्थानावर असल्याने घरात शुभ घटना घडतील.

कर्क लग्नाला गुरु गोचर सप्तम स्थानातून होत आहे. येथे असलेल्या गुरूची दृष्टी लग्नस्थानावर आहे .त्यामुळे चिंता , स्वास्थ्य ह्यात नक्कीच सुधारणा होयील. लग्न करण्यास इच्छुक असणार्यांसाठी हे गोचर विवाह बंधानासाठी उत्तम आहे. गुरुचे गोचर जेव्हा प्रथम किंवा सप्तम स्थानातून होते तेव्हा विवाहासाठी ते अनुकूल असते. कर्क लग्नाला गुरु हा षष्ठेश असून सप्तमात गोचर करत असल्याने पती / पत्नी च्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक असेल.

परंतु गुरूचा निचभंग होत असल्याने परिस्थिती तितकी बिघडणार नाही. सप्तमातून गुरु ५ व्या दृष्टीने लाभ स्थानाकडे बघत आहे त्यामुळे मित्रांकडून ,जवळच्या व्यक्तींकडून लाभ होतील. लग्नावर दृष्टी असल्याने प्रकृती चांगली आणि ९ वी दृष्टी तृतीय स्थानावर असल्याने भावंड सुख ,जवळचे प्रवास घडतील.

सिंह लग्नासाठी हे गोचर षष्ठस्थानातून होत आहे. गुरु ह्या स्थानात असतो त्या स्थानाची हानी करतो तसेच शुभ ग्रह ६ ८ १२ ह्या त्रिक स्थानातून शुभ फळे देत नाही. षष्ठ स्थान हे रोग ,ऋण,शत्रू स्थान असल्याने ह्या शत्रू वाढतील, स्वास्थ्यासंबंधी काळजी निर्माण होईल तसेच कर्ज वाढतील. परंतु इथे शनी पण आहे आणि पापग्रह इथे शुभ फलदायी होतात त्यामुळे गुरूने समस्या आणल्या तरी शनी त्याचे निदान ,उपाय पण करेल.  ६ व्या स्थानातून गोचर करणारा गुरु सिंह लग्नासाठी पंचमेश आणि अष्टमेश असल्याने तब्येत जपावी लागेल तसेच मुलांसंबंधी काळजी वाढेल.

कन्या लग्नासाठी गुरुचे गोचर पंचम स्थानातून होईल. पंचम स्थानातून आपण प्रेम प्रणय ,विद्या संतती पाहतो .मुलांकडून चांगली बातमी , शिक्षणासाठी उत्तम काळ.५ वा भाव मंत्र दर्शवतो त्यामुळे गुरूचा जप अत्यंत चांगली फळे देयील. 

तूळ लग्नाला गुरुचे गोचर चतुर्थ स्थानातून होयील. तूळ लग्नाला गुरु तृतीयेश आणि षष्ठेश आहे. चतुर्थ स्थानावरून आई , वाहन , वस्तू चे सौख्य पहिले जाते. तृतीय स्थानावरून लहान जवळचे प्रवास , भावंडांचे सुख पहिले जातात. शनी चतुर्थात स्वतःच्याच घरात आहेत. राहू आणि केतू चतुर्थातील शनी गुरूशी अनुक्रमे नवपंचम आणि लाभ योग करत आहेत . घरातील एखाद्या व्यक्तीचे आजारपण येण्याची शक्यता आहे आणि मार्गही निघेल . आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गुरु महाराजांची ५ वी दृष्टी अष्टमावर, ७वि दशम स्थानावर तसेच ९ वी दृष्टी व्यय स्थानावर. अष्टम स्थानावरील दृष्टी अनपेक्षित धनयोग दर्शवते. इन्शुरन्स , विम्यावरून मिळणारे पैसे , शेअर मार्केट जिथून कमी श्रमात पैसे मिळतात ह्या माध्यामातून पैसा मिळेल.

दशम स्थान कर्म स्थान आहे. गुरूच्या ७ व्या दृष्टीमुळे नोकरी व्यवसायात मिश्र स्वरूपातील फळे मिळतील. व्ययस्थानावर ९वि दृष्टी आहे. अनपेक्षित खर्च होवू शकतात.आर्थिक नुकसान होवू नये ह्यासाठी काळजी घ्यावी. शनी तूळ लग्नाला राजयोगकारक ग्रह असल्याने शनी गुरूच्या अशुभ फळांची तीव्रता कमी करेल..शिक्षणात अडथळे निर्माण होतील ह्यासाठी अभ्यासात अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. २० नोव्हेंबर ते ५ एप्रिल ह्या काळात परिश्रम करायला लागतील. 

वृश्चिक लग्नाला गुरु गोचरीने तृतीय स्थानातून भ्रमण करत आहे . वृश्चिक लग्नाला गुरु द्वितीयेश आणि पंचमेश आहे. पंचम दृष्टी सप्तमावर आहे. सप्तमस्थान हे जोडीदाराचे स्थान आहे तिथे राहूही आहे .त्यामुळे गुरु आणि राहू हा दृष्टी नवपंचम योग आहे. गुरूच्या दृष्टीने राहूच्या अशुभ फळात न्यूनता येयील. थोडासा तणाव राहील .गुरूची ७ वी दृष्टी भाग्य स्थानावर आहे. संमिश्र फळे मिळतील यशापयशाचा खेळ होईल. भाग्योदय होईल पण विलंबाने. ९ वि दृष्टी लाभावर आहे. सर्व इच्छा पूर्ण होईल .

धनु लग्नाला गुरु चे गोचर कुटुंब स्थानातून होणार आहे. गुरु लग्नेश आणि चतुर्थेश असून कुटुंब स्थानात असणार आहे. द्वितीय भाव आपल्या कुटुंब ,कौटुंबिक संपत्ती आणि धनाचा आहे. गुरूची ५ वी दृष्टी षष्ठ स्थानावर असल्याने मित्रांचे महत्व समजेल,शत्रुता कमी होईल , आजार ,चिंता कमी होतील. कर्ज कमी करण्यासाठी कष्ट वाढवण्याकडे कल होईल. अष्टमस्थानावर ७ वी दृष्टी असल्याने मनातील भय कमी होईल. ९ व्या दृष्टी कर्म भावावर असल्याने नोकरी , व्यवसाय ह्यात शुभ परिणाम दिसतील. पदोन्नती होयील. नवीन व्यवसाय किंवा नवीन नोकरी मिळण्यास चांगला काळ असेल. 

मकर लग्नाला गुरु चे गोचर लग्नातून होत आहे. गुरु व्यय आणि तृतीत स्थानाचे अधिपती आहेत . परदेशी जाण्याचे स्वप्न पाहणार्यांचे स्वप्न पूर्ण होईल. गुरूची पंचम दृष्टी पंचमावर आहे. पंचमात राहू आहे त्याचे अशुभ परिणाम कमी करेल. शिक्षणात यश मिळेल पण अधिक श्रम करावे लागतील कारण गुरु नीचभंग आहे, सप्तम दृष्टी सप्तमस्थानावर आहे. जोडीदार आणि व्यवसाय ह्यावर विपरीत परिणाम करेल. संकटे येतील आणि मार्गही निघेल. कुटुंब अखेरच्या क्षणी पाठीमागे उभे राहील. भाग्यावर ९ वी दृष्टी आहे. भाग्य साथ देयील. घरापासून दूर जावे लागेल. परदेशगमनाचे योग येतील आणि त्यातून लाभ होईल. 

कुंभ लग्नाला गुरुचे गोचर भ्रमण हे व्यय स्थानातून होत आहे. कुंभ लग्नाला गुरु द्वितीय आणि लाभ स्थानाचा अधिपती आहे. गुरूची पंचम दृष्टी चतुर्थ स्थानावर ,षष्ठस्थानावर आणि  अष्टमस्थानावर आहे. चतुर्थावरून आपण आई , वाहन , वास्तू सौख्य पाहतो . गुरूची दृष्टी घराचे सुख वाढवेल ,तसेच गुरु व्ययात असल्याने खर्च वाढेल. सध्या राहू हा कुंभ लग्नाला चतुर्थात गोचर करत आहे. गुरूची शुभदृष्टी राहूवर असल्याने त्याचे अशुभ परिणाम कमी करण्यास मदत होयील. शनी आपल्या स्वतःच्या मकर राशीत आहेत तसेच कुंभ लग्न हेही शानिचेच आहे. कुंभ राशी हि अध्यात्माकडे झुकणारी राशी आहे. त्यामुळे व्ययातील म्हणजेच मोक्ष स्थानातील गुरु शनी युती आणि दशमातील केतू  अध्यात्माची गोडी वाढवेल. खर्चही होतील. षष्ठ स्थानावरील गुरूची दृष्टी कर्ज मिळवून देयील तसेच शत्रू परास्त होतील. थोडक्यात संमिश्र फळे मिळतील. अष्टमावर दृष्टी असल्याने अचानक धनलाभ देयील. शेअर मार्केट ई क्षेत्रातील लोकांना आकस्मिक धनलाभ मिळवून देयील.

मीन लग्नाला गुरुचे गोचर लाभ स्थानातून होत आहे. मीन लग्नाला गुरु लग्नेश आणि दशमेश आहे. गुरुचे गोचर लाभातून उत्तमच असते. गुरूचा निचभंग होत आहे आणि शनीही लाभतच आहे. 

आर्थिक लाभ होतील . मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. संघर्षानंतर ह्या लाभाचा आनंद घेता येयील.मानसिक स्थिती दोलायमान असेल त्याची थोडी खबरदारी घ्यावी अन्यथा हे गोचर चांगलेच आहे. लाभस्थानातून गुरूची पंचम दृष्टी तृतीय स्थानावर आहे. तृतीय स्थानातून लहान भावंडे, जवळचे प्रवास पाहिले जातात. ह्या स्थानाच्या सर्व गोष्टी लाभ होईल , भावंडांशी संबंध सुधारतील आणि प्रवास आनंद देतील. सप्तम दृष्टी पंचमावर आहे. शिक्षणातील अडथळे दूर होतील. अभ्यासात मेहनत करावी लागेल . अपत्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची इच्छा पूर्ण होईल. पंचामावरून आपण इष्टदेव पाहतो. ९ वी दृष्टी सप्तमावर असल्याने जोडीदारासोबत वाद होतील आणि प्रेमही होयील अशी संमिश्र फळे मिळतील. वाद होतील पण एक पाऊल मागे घ्यायला लागेल. जो नियम घरात तोच व्यवसायात . विसंवाद टाळणे हिताचे ठरेल.

कुठल्याही लग्नाला गुरुचे हे गोचर त्रासदायक जात असल्यास ,विष्णूसहस्त्र नाम म्हंटले तर मार्ग मिळतो. मनाच्या शांततेसाठी योगासने, ध्यानधारणा करणे हितावह होयील.

गुरु आणि शनी ह्यांचे गोचर भ्रमण आणि त्याचे प्रत्येक लग्नावर होणारे परिणाम आपण अभ्यासले पण त्याचसोबत लग्नकुंडली मधली ग्रहांची स्थिती ,चालू असलेली महादशा ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार आणि अभ्यास आपल्याला योग्य फलादेश देयील, त्यामुळे फक्त गोचर पाहून भविष्य वर्तवणे चुकीचे ठरू शकते.

शुभं भवतु

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर द्या.

Antarnad18@gmail.com


#antarnad18#planets#saturnjupitorconjunction#jupitor#nichbhangrajyog#satun#

#अंतर्नाद#गुरुशनी#नीचभंगराजयोग#गोचरभ्रमण






 



1 comment: