Thursday, 12 November 2020

दीपोत्सव

 || श्री स्वामी समर्थ ||




दिन दिन दिवाळी , गाई म्हशी ओवाळी

गाई म्हशी कुणाच्या ? लक्ष्मणाच्या , लक्ष्मण कुणाचा ?

पूर्वीच्या काळी दिवाळी जवळ आली कि खेड्यातून घराघरातून अश्या गाण्यांचे सूर कानी पडत असत .लहान मुले टाळ्या पिटत गाणी म्हणत दिवाळीचे स्वागत करत असत .

अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारा आपला सर्वात मोठा सण म्हणजे “ दिवाळी ”. भारतीय संस्कृतीत सणांना विशेष महत्व आहे आणि प्रत्येक सण काहीतरी मुल्ये शिकवणारा असतो ,आपल्या आयुष्याशी जवळीक साधणारा असतो. दिवाळी सारखा मोठा सण तर जगभरात नुसते भारतीयच नाही तर सर्वच  आनंदाने , उत्चाहाने साजरा करतात तेव्हा जातीपाती ,भेदभाव ,उच्चनीच , लहानथोर, गरीब श्रीमंत ह्या आपणच निर्माण केलेल्या भिंती किती तकलादू ,आभासी असतात ते समजते.  


प्रत्येक जण आपापल्या परीने दिवाळीचे स्वागत करतो. आबालवृद्ध सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद फुलवणारी आणि नवचैतन्य देणारी दिवाळी ह्या वर्षी सुद्धा आपल्या साठी नक्कीच खास आहे आणि म्हणूनच तितक्याच जोशात तिचे स्वागत करायचे आहे. गेल्या कित्येक दशकात दिवाळीचे स्वरूप सुद्धा बदलले आहे. स्वरूप बदलले तरी दिवाळी साजरी करण्याचा जोश ,भावना ,आनंद तसूभरही कमी नाही . पूर्वी लाडू ,चकल्या ,कडबोळी ,करंज्या हे खास दिवाळीसाठी बनवले जाणारे पदार्थ आज १२ महिने सर्वत्र मिळतात आणि घरोघरी केलेही जातात त्यामुळे आता त्याची उत्कंठा कमी झाली आहे. पर्यावरणातील समतोल बिघडत चालल्यामुळे आणि महागाई मुळे कित्येक वर्षात फटाक्यांचे प्रमाणही कमी होते आहे .

नरकचतुर्दशी च्या दिवशी अभ्यंग स्नान करून दिवाळीची सुरवात होते. पहाटेचा सुखद गारवा असतो . लहानपणी आम्ही अगदी पहाटे ४ वाजता उठायचो. आई उटणे तेल लावून ओवाळत असे आणि मग ऊनऊन पाण्याने मस्त अंघोळी करून नवीन कपडे घालून देवदर्शन करणे हा रिवाज आजवर पाळत आहोत. देवांची साग्रसंगीत पूजा करून फराळ करणे ह्यातील मजा शब्दात नाही सांगता येणार. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव.
घराबाहेर मोठ्या दिमाखात उभा असलेला आकाशकंदील , घराबाहेरील सुशोभित रांगोळी , पणत्या दिवाळीच्या उत्चाहाला चार चांद लावतात.

मंडळी , ह्या वर्षी संपूर्ण जगावर कोविडचे संकट आहे. जगभरात लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत , अनेकांच्या नोकर्यांवर गदा आली आहे, कित्येकांचे उत्पन्न कमी झाले आहे . पुढे सगळेच अनिश्चित आहे तरीही दिवाळीचा सण जवळ आल्यामुळे प्रत्येकजण हे कोविड चे संकट क्षणभर विसरून कात टाकल्याप्रमाणे दिवाळीच्या स्वागतासाठी सज्ज होताना पाहून मन भरून येते. शेवटी आपली काळजी त्या परमेश्वराला आणि तोच आपल्याला ह्या सर्वातून सुखरूप बाहेर काढून आपले जनजीवन पूर्ववत करेल ह्या आशेवर आपण सर्व आहोत .त्या ईश्वरावर आपली अखंड श्रद्धा आहे आणि तीच आपल्याला ह्यातून पुढे नेणार ह्यात दुमत नाही.


ह्यावर्षी दिवाळीवर कोविड चे संकट आहे पण तरीही उत्चाहाला , आनंदाला कुठेच ओहोटी लागलेली नाही. घरोघरी कागदी कंदील लागत आहेत , मातीच्या पणत्यांनी घरे , व्हरांडे सुशोभित होत आहेत . हा दिव्यांचा लखलखाट आपल्यात निश्चित आशावाद , नवीन उमेद निर्माण करेल ह्यात शंकाच नाही. 


आज कोविड चे संकट पूर्णपणे टळले नाही त्यामुळे एकमेकांच्या घरी जावून शुभेछ्या देण्याचे शक्यतो टाळावे. आज तंत्रज्ञानाने आपल्याला whastapp , email , video call , अशी अनेक माध्यमे संपर्कासाठी दिले आहेत त्याचा उपयोग करावा म्हणजे हा संसर्ग होणे टळेल. तसेच ह्यावर्षी अनेक घरातून दिवाळीही नाही . आपण आपल्यासाठी नेहमीच काहीतरी घेत असतो आणि पुढेही आयुष्यभर घेणारच आहोत . पण कोविड च्या संकटांनी घेरलेल्या कुटुंबाला आपण जर फराळ किंवा अन्य उटणे ,उपयुक्त वस्तू देवून मदत केली तर ते आपले दुक्ख क्षणभरासाठी का होईना विसरून जातील . कोविड मुळे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत . अश्यां लोकांमध्ये आशावाद निर्माण करण्यासाठी आपणच त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. घेण्यापेक्षा देण्यात किती मोठा आनंद असतो ते ह्या कृतीतून आपल्यालाही समजेल.

मंडळी , ह्या कोविड च्या संकटात आपापल्या घरात राहूनच आपापल्या कुटुंबियांसमवेतच दिवाळी साजरी करायची आहे. एकमेकांच्या सहवासाने नाती समृद्ध होतील आणि भावनिक बंध सुद्धा घट्ट होतील. प्रत्येकाने दिवाळीचा आनंद घ्या आणि इतरानाही घेवू द्या, हाच संदेश देण्यासाठी हा लेखनप्रपंच . जगरहाटी चालूच राहणार आहे आणि अर्थचक्रही पूर्वीसारखे फिरणार आहे अगदी पूर्वीपेक्षा अधिक सक्षम होणार आहे हा विश्वास मनी बाळगूया . दिवाळीचा सण मनात आशावाद निर्माण करणार आहे ,जीवन प्रकाशमान करणार आहे . आपण सर्वच एक मोकळा श्वास नक्कीच घेणार आहोत , आयुष्य पूर्वीसारखे होणार आहे पण तोवर निष्काळजीपणे वागून चालणार नाही हेही तितकेच महत्वाचे आहे ,पटतंय ना ?

आपल्या सर्वाना हि दिवाळी सुखाची , भरभराटीची , आनंदाचे सौख्याचे क्षण वृद्धिंगत करणारी , माणुसकीची मुल्ये जपायला शिकवणारी , मनातील इच्छा पूर्ण करणारी, उत्तम आयुआरोग्य प्रदान करणारी , आयुष्य जगायला आणि जगवायला शिकवणारी , नाती वृद्धिंगत करणारी आणि माणसाने माणसाशी माणसासारखेच वागले पाहिजे हे शिकवणारी जाऊदे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना .


अस्मिता

antarnad18@gmail.com    

 



 




No comments:

Post a Comment