Thursday, 10 February 2022

सखा

 || श्री स्वामी समर्थ ||

आयुष्याच्या प्रवासातील खरा सोबती 


आयुष्यात मित्रांना अनन्य साधारण असे  महत्वाचे स्थान आहे. एकही मित्र नाही असा माणूसच विरळा. अगदी लहानपणापासून ते आयुष्याच्या अखेर पर्यंत प्रत्येक वळणावर आपल्याला कुणीना कुणी भेटतच असते. काही लोक नुसतेच ओळखीचे राहतात तर काहींशी आपले बंध चटकन जुळतात ते कायमचेच . मनाच्या खोल एका खास कप्प्यात त्यांची जागा असते . पण हि मैत्री वृद्धिंगत होण्यासाठी दोन्हीकडून अथक पर्यंत करावे लागतात तरच ती टिकते ,लोणच्यासारखी मुरते नाहीतर हे प्रेमाचे उमाळे एखाद्या लाटेसारखे विरून जातात . आजकाल आपण फार स्ट्रेसफुल जीवन जगतो . कुणीतरी आपले जवळचे जिथे आपण काहीही बिनधास्त बोलू शकतो असे नाते लागतेच . एखाद्याशी आपली वेवलेंथ जुळली तर अनेक विषयांवर चर्चा आणि संवाद घडू लागतो. सगळ्यांशी आपले नाते जुळणे कठीण कारण व्यक्ती तितक्या प्रकृती. 

मैत्री आणि मित्र हि ईश्वरी देणगी आहे. जीवाभावाचे मित्र असणे ह्यालाही भाग्य लागते . बरेचदा आपण मैत्रीचा हात पुढे करूनही समोरून तितका प्रतिसाद येत नाही आणि एखादी चांगली मैत्री होताहोता राहते. बरेचदा मित्र मैत्रिणींचा मधूनच एखादा फोन मेसेज आला कि जीवाला अगदी गार गार वाटते. 

मैत्रीला बंधन नसते ...ती मुद्दामून करावी लागत नाही तर ती अपोआप होत जाते...एकमेकांना भेटावेसे वाटू लागते आपण काहीतरी कुणालातरी मिस करतोय ह्या भावनेतून पुन्हा पुन्हा भेटी होत जातात आणि ती फुलत बहरत जाते. कधीकधी ह्याचे रुपांतर प्रेमात होऊन नातेही बदलते . आपला जोडीदार जेव्हा आपला सखा असतो तेव्हा संसार खर्या अर्थाने फुलतो. 

आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या वयोगटाचेहि  मित्र असतात  कारण मैत्रीला वयाची अट कधीच नसते . मी तुझ्यासाठी आहे हि भावना व्यक्त करायला कधीतरी हलकासा कटाक्ष ,शब्द किंवा स्पर्श सुद्धा पुरेसा असतो. चांगले मित्र मिळायलाही पूर्वसंचीत लागते ,कधी ते मिळून आपल्याला टिकवता येत नाहीत . अशी लोक नेहमी समांतर जाताना दिसतात .त्यांच्यात मैत्री कधीच फुलत नाही ...

मैत्री हि एक भावना आहे ,कधीतरी आपण कुणाशीच व्यक्त होऊ शकत नाही  त्या भावना आपल्या मित्राजवळ व्यक्त करू शकतो ...जिथे सगळा अहंकार लोप पावतो , अडसर ठेवून बोलण्यासारखे काहीही नसते, कुठल्याही विषयावर मुक्त चर्चा होऊ शकते ,वयाच्या ,श्रीमंतीच्या कसल्याही भिंती नसतात  तिथे हेवा वाटावी अशी मैत्री होते ...मैत्रीला सुद्धा समर्पण लागते . एखाद्याने मैत्रीचा हात पुढे केला तर तो स्वीकारायला सुद्धा नशीब लागते हेही तितकेच खरे . 

मैत्री हि अत्यंत कोमल भावना आहे. मैत्री निरागस असते .आपल्या मित्राला आपल्या मनातील भावना न बोलताच समजतात इतके उच्च स्थान मैत्रीला आपल्या जीवनात आहे किबहुना असायला हवे. नुसतेच खा प्या मजा करा आणि आपापल्या घरी जा ह्यात मैत्री कुठेच नसते. असे क्षणाचे सोबती होण्यात खरी गम्मत नाहीच . एकमेकांच्या सुख दुख्खात समर्पित होऊन एकमेकांच्या आयुष्याला पूरक ठरणारी मैत्री करायला आपल्यालाही त्यात तसेच योगदान द्यायला लागते . नाहीतर अग म्हणू कि अहो ह्यात जीवनाचा प्रवास संपेल आणि मैत्री होता होता राहूनच जायील.  कामात प्रचंड व्यस्त असताना त्यातूनही वेळ काढून  आपल्या मित्राला जेव्हा फोन करतो तिथे खर्या मैत्रीचा सुगंध असतो. मैत्रीच काय कुठलेही नाते  कुणावर लादता येत नाही ते मनापासून बहरावे लागते . मैत्री हि एक निरपेक्ष निर्मळ भावना आणि मनाचे पवित्र बंधन आहे. न सांगताच समोरच्याच्या मनातले समजते तेव्हा तिथे मैत्रीचा सुगंध दरवळतो.

माझ्या आयुष्यात असंख्य मित्र मैत्रिणींचा गोड किलबिलाट आहे आणि त्यांच्या सोबत माझा जीवनप्रवास आनंदाने सरत आहे. सगळ्यात बेस्ट फ्रेंड म्हणजे महाराज आणि त्यांच्या माझ्या जीवनातील अस्तित्वामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त झाला आहे. आज अश्याच एका जिवलग मैत्रिणीचा वाढदिवस आहे म्हणून तिला हा ब्लॉग समर्पित ...

मैत्रीचा ठेवा हा अनमोल असतो तो आपले जीवन खर्या अर्थाने समृद्ध करत असतो....त्याचा योग्य मान ठेवता आला पाहिजे. जिथे खर्या अर्थाने अहंकार गळून पडतो तिचे खर्या शाश्वत मैत्रीचा उगम होताना दिसतो. 

सौ अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

फेसबुक पेज : @yashasweejyotish










1 comment:

  1. Asmita ...I m truly blessed having you in my life 🌹.. someone is giving their precious time for you ...that's truly amazing feeling ! ...u r my best buddy ...can chat with u on any topic ...that's d flawless bond we sharing ...Love you ❤️

    ReplyDelete