|| श्री स्वामी समर्थ ||
भक्तांच्या तनमनावर अधिराज्य गाजवणारे ,भक्तांचा जणू श्वास असणारे शेगावनिवासी संत शिरोमणी श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा हा खरच दृष्ट लागण्यासारखा असतो. महाराजांचे गज , अश्व त्यांना मानवंदना देतात .लाखो भक्त डोळ्यात प्राण आणून ह्या भक्तीरसाचा अविष्कार अनुभवतात. सकाळी 11 वाजताच्या आरतीचा सर्वत्र होणारा घंटानाद महाराजांच्या अणुरेणूतील वर्चस्वाची ग्वाही देत असतो. हा घंटानाद चंद्रभागेच्या तीरावर टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण आसमंत दुमदुमवून टाकणाऱ्या आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी धाव घेणाऱ्या वारकर्यांच्या असीम श्रद्धेची आठवण करून देणारा असतो . म्हणूनच कि काय शेगाव सुद्धा पंढरपूर झाल्याचा भास होत राहतो.
महाराजांची पालखी आणि दुतर्फा देहभान विसरून महाराजांच्या नावाचा जल्लोष करणारा वारकरी समुदाय , लेझीम , टाळ मृदुंग आणि त्यावर थिरकणारी त्यांची पावले ,ह्या भक्तिरसाची गोडी चाखण्यासाठी जमलेला प्रचंड जनसमुदाय ,सर्वच शब्दांच्या पलीकडे आहे. हे नेत्रसुखद दृश्य डोळे भरून पाहायचे आणि जन्मभरासाठी मनाच्या खास कप्प्यात साठवून ठेवायचे. शेगावला चराचरात महाराजांचे अस्तित्व जाणवते ते ह्याचमुळे. महाराजांच्या समोर समाधीत उभे राहिले कि शब्द फुटत नाही, हृदयातून हुंकार फुटतो आणि डोळ्यातून त्या आनंद भेटीचे आनंदाश्रू वाहू लागतात . आयुष्याचे सार्थक करणारा हा क्षण शब्दांकित करणारी लेखणी होणे नाही .हे नेत्र सुख केवळ अनुभवायचे आणि त्यात समरसून जायचे .
महाराजांच्या असंख्य लीलांचे वर्णन परमभक्त दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ह्या रसाळ ग्रंथात केले आहे. हा ग्रंथ म्हणजे आपल्याला आयुष्यभर पुरणारी शिदोरी आहे. ह्या पवित्र ग्रंथातील प्रत्येक ओवीत शब्दात महाराज स्वतः अधिष्टीत आहेत . संतानी समाजसुधारण्या साठी मनुष्य धर्म स्वीकारला आणि अनेक लीला केल्या . धर्माचे आचरण कसे करावे आणि ते करताकरताच मोक्षाच्या मार्गावर कसे मार्गस्थ व्हावे ह्याचे धडे गिरवण्यासाठीच तर अध्यात्म आहे. आपल्या आत्म्याचा प्रवास हा मोक्ष मिळवण्यासाठीच असतो . ज्याने धर्म अर्थ काम उपभोगले आहेत त्यांचा प्रवास मोक्षाच्या मार्गावर अविरत होतोच .
उपासना हा ह्या प्रवासातील सर्वात महत्वाचा टप्पा असतो जिथे आपल्याला अध्यात्माची ओळख होण्यास सुरवात होते. अध्यात्मातील प्रवास प्रचंड खडतर आहे . उपासना आपल्याला षडरीपुं पासून परावृत्त होण्यास मदत करते . जेव्हा आपण मोह वासना ह्यापासून दूर राहून मनोनिग्रह करून आपल्या चित्तवृत्ती एकवटून समर्पण करतो तेव्हा कुठे आपल्याला मार्ग दिसू लागतो. उपासना आपल्याला आपलीच नव्याने ओळख करून देते . आपली कर्म हळूहळू शुद्ध होण्यास प्रारंभ होतो आणि तोच क्षण आपल्यासाठी अत्युच्च आनंदाचा असतो . जेव्हा मला समोर असलेले गुलाबजाम खायचे आहेत पण मी ते खाणार नाही हा ताबा मनावर मिळवता येतो तेव्हा समजावे आपण काहीतरी मिळवण्यास ,प्राप्त करण्यास पात्र ठरत आहोत. पावलापावलावर उपासक असतात आणि पावलापावलावर ते मोहात फसत असतात . प्रारब्ध शुद्ध होण्यास आधी चित्त शुद्धीही होणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच उपासना नक्की कश्यासाठी आपण करत आहोत हेच मुळात समजणे आवश्यक आहे. मी चुकत आहे हे मान्य करणे आणि परमेश्वरा ह्यातून मला बाहेर यायचे आहे तू मला मदत कर हि भावना जपणे हे त्याहून महत्वाचे आहे. उपासना करणे आणि उपासक होणे हे शिव धनुष्य पेलण्याइतकेच कठीण आहे .
मुळातच उपासना कश्यासाठी आवश्यक आहे आणि मला उपासनेची का गरज आहे हे समजले पाहिजे . काहीच जमत नाही किंवा बराच मोकळा वेळ आहे त्याचे काय करायचे ते समजत नाही म्हणून उपासना असे असू नये.
उपासना हि मनाच्या खोल गाभ्यातून आली तरच ती आपल्याला आपल्या अराध्यापर्यंत नेऊ शकते. उपासनेचे फळ सुद्धा अनन्यसाधारण आहे .हि एक तपश्चर्याच आहे आणि त्यात सातत्य लागते ,भक्तीचा परमोच्च बिंदू लागतो ,ध्यास लागतो, तळमळ लागते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समर्पणाची भावना लागते . उपासना हि सकाम नसावी तर ती निष्काम असावी. काहीतरी उद्देशाने केलेली उपासना फोल ठरते . भौतिक गोष्टींच्या लालचेने भक्ताने कधीच उपासना करू नये किबहुना त्याची गरजच नाही. महाराजांना आपल्याला कधी काय द्यायचे आहे ते माहित आहे आणि वेळ आली कि ते देतातच त्यासाठी त्यांच्यासमोर सतत हे द्या ते द्या करून याचना करायची गरजच नाही. न मागता मिळालेलं फळ हे सर्वांग सुंदर असते. आपल्यात आणि महाराजांमध्ये व्यवहार कश्याला. आपले तर जन्मांतराचे नाते आहे आणि प्रत्येक जन्मात आपण त्यांच्या अधिक समीप जात आहोत मग मागायचे तरी कश्याला आणि का? ह्यावर विचार होणे आवश्यक आहेच .
हे सर्व कितीही खरे असले तरी आपण सामन्य आहोत आणि बरेचदा आपण आपल्या आयुष्यातील दुक्ख , संकटांनी गर्भगळीत होतो आणि महाराजांकडे याचना करतो. काहीही मागायचे नाही हे समजायला सुद्धा अध्यात्म मार्गातील थोडा प्रवास होणे आवश्यक आहे. जसजसा हा प्रवास पुढे जातो तसे त्यांच्यावरची श्रद्धा दृढ होत जाते आणि मग ते नेतील तिथे आणि करतील ते.
काय मागायचे आणि किती मागायचे हे म्हणजे अग्नीत तुपाची धार . डोळे मिटले तरी महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर आली कि समर्पित झाल्याचा भाव जागृत होतो. थोडक्यात देहभान विसरून सर्वस्व अर्पण करावे लागते तरच तो उत्तम उपासक होऊ शकतो. एखादी गोष्ट करताना महाराजांचा धाक असेल तर आपल्या हातून चुकीचे काहीच घडणार नाही नाहीतर असंख्य शेगाव पंढरपूर अक्कलकोट शिर्डी च्या वार्या करूनही आपण कोरडे पाषाणच राहतो . 12 वर्षे कोरडी विहीर महाराजांनी क्षणात जलमय केली आणि त्याच क्षणी भास्कराला भक्तीचा पाझर फुटला . अगदी असाच क्षण आपल्या आयुष्यात येतो आणि आपले आयुष्य भक्तीरसाने ओथंबून जाते ..एका वेगळ्या वाटेवर आपली आनंद यात्रा खर्या अर्थाने सुरु होते . सिद्धीविनायका चे दर्शन घ्यायला हजारो भक्त रोज येत आहेत पण त्यातील आपले खरे भक्त कोण हे तो सिद्धी विनायकच जाणो.
उपासनेमुळे अध्यात्मिकतेचे बीज रोवले जाते आणि आपला नवीन प्रवास सुरु होतो. आपल्या महाराजांची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे ,असे किती लोकांना प्राप्त झाले असेल ? आपण खरच भाग्यवान आहोत . मेवा खाण्यासाठी मात्र सेवा करू नये. भक्तीचा अलौकिक अविष्कार भक्ताला साधक करू शकतो आणि साधनेतून घडते ती साधना . नित्य उपासनेने साधक एका क्षणी महाराजांचा परमभक्त कधी होतो ते त्याचे त्यालाही समजत नाही कारण त्यावेळी भक्त त्या शक्तीत विलीन झालेला असतो.
परमभक्त होण्याची धडपडत करत राहणे हेच भक्ताकडून अपेक्षित आहे. महाराजांनी आखून दिलेल्या मार्गावर चालत राहणे आणि उपासनेने दृढ चालत राहणे हे आपले कर्तव्य आहे. हे पारमार्थिक अलौकिक सुखाचे क्षण दुर्मिळ असतात त्यातही भक्त मनापासून अतीव श्रद्धेने भजन गात असतो ..
संत एकनाथ म्हणतात
हरतील पापे भजन ते सोपे ..हरतील पापे जन्मांतरीची ..
भजन भावे ध्याऊ , भजन ते गाऊ.
मी गेलो ऐसे मानू नका , भक्तीत अंतर ठेऊ नका ..हे वचन आपल्या लाडक्या भक्तांना देणाऱ्या महाराजांच्या स्वागताची जय्यत तयारी लेकी सुनांनी घरोघरी केली आहे. साधुसंत येती घर तोची दिवाळी दसरा ...महाराजांची कृपादृष्टी तुम्हा आम्हा सर्वांवर सदैव असुदे आणि त्यांच्या कृपाछत्राखाली आपले आयुष्य सुकर होवूदे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क ; 8104639230
फेसबुक पेज : @yashaswee jyotish
No comments:
Post a Comment