Friday, 1 April 2022

गुरुतत्वाचा अविष्कार

 || श्री स्वामी समर्थ ||



जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे सार्थ आहे. समाज सुधारण्यासाठी संतानी जन्म घेतला आणि मानव जातीला मानवतेचा संदेश देण्याचे महान कार्य केले. गुढी पाडव्याच्या दुसर्या दिवशी चैत्र शुद्ध द्वितीय , अक्कलकोट निवासी समर्थ  सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती आहे. स्वामी समर्थांचा प्रगट दिन घरोघरी स्वामीभक्त मोठ्या प्रेमाने ,भक्तिभावाने साजरा करतात . प्रत्येक जण त्यांच्या सेवेत रममाण होतो. महाराजांचे अस्तित्व चराचरात आहे. महाराजांसाठी काय करू आणि काय नको असे प्रत्येक भक्ताला वाटत असते आणि म्हणूनच म्हंटले आहे साधुसंत येती घर तोची दिवाळी दसरा . महाराजांचे आगमन घरोघरी होणार ह्यात शंकाच नाही . आपल्या लेकी सुनांनी त्यांच्यासाठी केलेली जय्यत तयारी आणि त्यांच्या आवडीचे सर्व पदार्थ चाखून  महाराज नक्कीच तृप्ततेची ढेकर देतील आणि आशीर्वादांची बरसात सुद्धा करतील. 

माणसांनी माणसाशी माणसा सारखे वागावे हा संदेश देणारी हि संतांची मांदियाळी मग स्वामी समर्थ असोत , शेगावचे श्री गजानन महाराज  किंवा शिर्डीचे साईबाबा असोत  तत्व एकच आहे आणि ते म्हणजे “ गुरुतत्व “. हे आपले सर्व अध्यात्मिक गुरुजन आपल्याला खूप काही देत असतात ,आपण किती घेतो हे आपले प्रारब्ध आहे.

गुरुविणा जीवन दिशाहीन आहे. गुरु आपल्या आयुष्याला आकार देतात , दिशा देतात , चांगल्या वाईटातील फरक दृष्टीस आणून देतात , कसे वागावे ह्याचा आदर्श घालून देतात , आपल्याला जे दिसत नाही ते पाहण्याची दिव्या दृष्टी देतात . सुख दुक्खाच्या पलीकडे जाणारा भक्त हा खर्या अर्थाने महाराजांच्या समीप जातो. सगळ्यात मुख्य म्हणजे जगण्याची उमेद प्रेरणा हि अध्यात्माची खरी देणगीच म्हणायला हवी . जिथे सगळा अंधकार असतो तिथेच स्वामींचे राज्य सुरु होते. आता सगळे संपले असे म्हणतो तिथेच सूर्योदय होताना दिसतो , चराचर सृष्टी नवचैतन्या ने पुन्हा उभारी घेते .कात टाकून  फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्याचे समर्थ बहाल करणारे अध्यात्मच आहे.

अध्यात्म आपल्याला जगायचे कसे ते शिकवते . जगण्याचा मूलमंत्र देते . जीवन म्हणजे आशा  निराशेचा खेळ आहे. ह्या खेळात आपल्याला जिंकायचेच आहे हे सांगणारे अध्यात्म आहे. मुळात हा मार्गच खूप खडतर आहे. क्षणाक्षणाला इथे परीक्षा असतात . महाराज भक्तांना सहज काहीच देणार नाहीत , अंत बघतील पण जेव्हा देतील तेव्हा सार जग पाहत राहील असे देतील. ह्या आनंदाच्या शिखरावर पोहोचायला अनेक नागमोडी वळणे पार करायला लागतात ,कधी कडेलोट सुद्धा होवू शकतो.  बावनकशी सोन्यासारखा भक्त त्यांच्या परीक्षेत उजळून निघतो आणि स्वमिमय होऊन जातो. 


खर्या स्वामीं भक्तांना त्यांच्याहि आधी त्यांच्या हातातील सोटा दिसला पाहिजे म्हणजे चुका , वाईट कर्म हातून घडणारच नाही. अध्यात्म समजणे तितकेसे सोपे नाही. इथे आत्मपरीक्षणाची आणि समर्पणाची गरज आहे. आजकाल वस्त्राप्रमाणे गुरूसुद्धा बदलले जातात . मुळात गुरुतत्व समजले पाहिजे आणि ते समजले तर सर्व गुरु एकाच आहेत फक्त त्यांची रूपे अनेक आहेत ह्याची सत्यता पटेल.  निस्सीम श्रद्धा असेल तर गुरूंच्या वरचा विश्वास अबाधित राहतोच. आपल्या गुरूंचे रूप हे निर्गुण नसून सगुण आहे ह्याची ग्वाही जसजशी भक्ती वाढत जाते तशी मिळत जाते . 

आजच्या युगात अमुक एखाद्या प्रापंचिक सुखाच्या लालसेने आपण देवाची आराधना करतो. एका दृष्टीने हे खरही आहे कारण संकट समयी आपल्याला परमेश्वराचाच आधार वाटतो पण मग अश्या देवाला सौख्याच्या क्षणात विसरून कसे चालेल .म्हणूनच फक्त आपल्याला हवे तेव्हा देवदेव न करता सतत त्यांच्याच नामात , चिंतनात आपण राहिलो तर आयुष्य समृद्धतेकडे वाटचाल करेल ह्यात संदेह नाही. त्यांच्याच इच्छेत आपली इच्छा विलीन करणे हे सहज सोपे नाही . पण गुरु जे करतील ते आपल्या भल्यासाठी हे एकदा मनात पक्के झाले कि मग सतत काही न काही मागणेही कमी होऊ लागते. 

सद्गुरूंची आपल्या आयुष्यात भेट हा एक अनमोल क्षण असतो. ज्यांना योग्य गुरु मिळाले ते भाग्यवान म्हंटले पाहिजेत.

एकदा सद्गुरुप्राप्ती झाली कि आपण आपले उरतच नाही . गुरुतत्व समजले कि त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर आपण आपल्याही नकळत मार्गस्त होतो. गुरूंच्या आयुष्यातील असण्याने उच्च कोटीची अध्यात्मिक अनुभूती येते . चांगल्याची कास धरून वाईट गोष्टीना आपोआपच तिलांजली मिळते, स्वतःच्या अंतर्मनात डोकवायची आणि स्वतःच्याच चुका शोधायची बुद्धी होते. वाईट कर्म नष्ट होतात . थोडक्यात आपला भाग्योदय होतो. 

महाराजांमुळे आपल्या आयुष्यात कात टाकल्याप्रमाणे बदल होतो .ज्योतिषाच्या संज्ञेत गुरु हा आकाश तत्वाचा ग्रह आहे. सर्वावर छत्र धरणारा , कृपा करणारा. गुरुसेवा करताना भक्ताचा दंभ गळून पडतो कारण त्याशिवाय महाराजांची कृपा होणे कठीण . अध्यात्मात अहंकार उपयोगाचा नाही . महाराज आणि आपण ह्यामध्ये हि अहंकाराची मोठी भिंत उभी आहे . सतत आपण मी पारायण केले मी सेवेसाठी गेलो , मी नामस्मरण गेले ,मी हे केले आणि मी ते केले. प्रत्येक वाक्याची सुरवात मी पासून आणि शेवटही मीच. हीच तर इथे मोठी मेख आहे. मी केले म्हणण्यापेक्षा महाराजांनी सेवेची संधी दिली त्यांनी माझ्याकडून सेवा करून घेतली असे जेव्हा आपण म्हणायला लागू तो दिवस खरा .सर्व श्रेय त्यांना देऊन मोकळे होणारा भक्त महाराजांच्या समीप जातो . असा भक्त सुख आणि दुखाच्याही परे जातो. मी मी म्हणणारे कोरडे पाषाण राहतात . महाराजांना  भक्ती भावाचे अभ्यंग स्नान घालणे अभिप्रेत आहे . महाराजांचे देऊळ आपल्या हृदयात असले तर त्यात वाईट विचारांना जागाच उरणार नाही. 

हे विश्वाची माझे घर ह्या उक्तीप्रमाणे चराचर व्यापून उरलेले हे गुरुतत्व आपल्याला काय देऊ पाहते आहे आणि आपण काय घ्यायचे आहे हे समजले कि आपली जीवनरूपी नय्या पार झालीच म्हणून समजा . ज्या दिवशी आपण सन्मार्गाने नीतीने जगू , कुणालाही त्रास देणार नाही, निंदा करणार नाही, सचोटीने लक्ष्मी घरी आणू आणि आपल्या कुठल्याही कृतीने महाराजांना आपल्याला त्यांचा भक्त म्हणण्याची लाज वाटेल  अशी कृती न घडू देणे ह्याची मनोमन जाणीव ठेवु त्या क्षणी दुधात साखर  विरघळावी तसे आपण ह्या गुरुतत्वात विरघळून जाऊ. 

गुरु तत्व आणि परंपरा आपल्याला जपायची आहेच पण हा वारसा आपल्या पुढील पिढीला देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. 

आपल्या प्रत्येक कृतीवर त्यांचे लक्ष आहे ह्याचे भान सुटता कामा नये. आपला विठोबा घाटोळ होऊ न देणे ह्याची डोळ्यात तेल घालून काळजी घेतली पाहिजे. कुठल्याही भौतिक सुखाच्या लालसेने केलेली गुरुसेवा फोल ठरेल. अपेक्षाविराहित सेवा आयुष्यात आनंदाला भरती आणेल. कुठल्या क्षणी काय वाढून ठेवले असते हे आपल्याला माहित नसते त्यामुळे कुठल्याही स्थितीत सामंजस्य आणि लव्हाळ्या सारखे जगणे नक्कीच लाभदायक ठरेल.

आयुष्यातील सद्गुरूंचे अस्तित्व सुद्धा खूप आनंददायी आहे, त्यामुळे नीतीने सन्मार्गाने वागणे , आपल्या मनात चांगल्या विचारांची ज्योत सदैव प्रज्वलित ठेवणे , श्रद्धायुक्त अंतकरणाने समर्पणाची भावना ठेऊन महाराजांच्या समोर नतमस्तक होणे हे आपले परम कर्तव्य आहे . 

महाराजंचे परमभक्त होणे हीच खरी “ गुरुदक्षिणा “ आहे .पण ते सहज खचितच नाही त्यासाठी अनेक अग्निदिव्यातून जावे लागते , महाराज  प्रत्येक क्षणी परीक्षा पाहतात , इथे सोळा आणे खरा भक्तीभाव लागतो , कुठलीही भेसळ चालत नाही. पण ह्या सगळ्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघालेला भक्त महाराजांच्या कृपेने  निर्लेप होऊन मोक्षपदाला जातो ह्यात दुमत नाही . 

आपला जन्म का झाला आपण मनुष्य देहच का धारण केला, अमुक एक कुळात का जन्माला आलो , आपली कर्तव्ये काय ,ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अध्यात्मिक प्रवासात मिळत जातात . 

“ आपण परोपकाराची आणि संसाराची न्याय कर्मे निस्वार्थी बुद्धीने करून ती ईश्वराला अर्पण करावी हाच खरा कर्मयोग आहे “  हे गीतेतील कर्मयोग जाणणारे आणि त्यानुसार आचरण करणारे खरे कर्मयोगी श्री रामचंद्र वेलणकर ह्यांचे विचार हृदयाला स्पर्शून जाणारे आहेत . प्रत्येकाने ह्यावर मनन चिंतन करावे.

आपली रोजची पूजाअर्चा , जपजाप्य हे दैनंदिन व्यवहारातील आपल्या कृतीतून दिसले पाहिजे. प्रत्यक्ष व्यवहारात वागताना त्याची अनुभूती स्वतःला आणि इतरानाही होत असेल तर आपण गुरुतत्व खर्या अर्थाने समजलो आणि जगलो असे म्हणायला हरकत नाही. 

अध्यात्मिक व्यक्तींना प्रापंचिक अडचणी नसतात असे नाही किबहुना अधिकच असतात पण ते आपला अध्यात्मिक मार्ग सोडत नाहीत. सर्वस्व महाराजांवर सोपवून निर्धास्त राहतात . माझी चिंता आता तो वाहणार आहे हा भाव मनात धरून आपले नित्य कर्म करत राहतात . स्वामी समर्थांनी भक्तांना “ जो अनन्य भावे माझी सेवा करेल त्याचा योगक्षेम मी चालवीन “  अशी ग्वाही दिली आहे तर शेगावचे संत शिरोमणी श्री गजानन महाराजांनी भक्तांना  “ मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर ठेवु नका “ हे वचन दिले आहे. 

सद्गुरुप्राप्ती होणे हा परमोच्च आनंद आहे जो अनुभवायचा असतो.  त्यांच्याकडे काय मागायचे ? ज्याने जन्माला घातले आहे त्याला सगळच माहित आहे त्यामुळे वेळ आली कि आपल्याला ते देणारच मग मागण्याचा प्रश्नच येत नाही .  चैत्र शुद्ध द्वितीया  स्वामी समर्थ ह्यांची जयंती . गुरुतत्त्वाचा अविष्कार मी प्रत्येक क्षणी अनुभवते आहे म्हणूनच ह्या दिवसाचे औचित्य साधून महाराजांच्या सेवेत  अधिकाधिक भक्त रुजू व्हावेत आणि ह्या भक्तिरसात देहभान विसरून रममाण व्हावेत ह्या उदात्त  उद्देशाने केलेला हा लेखनप्रपंच विनम्रतेने महाराजांच्या चरणी ठेवत आहे. 

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा 

शेवटचा दिस गोड व्हावा , याजसाठी केला होता अट्टाहास 

सौ. अस्मिता दीक्षित 

समुपदेशनासाठी संपर्क : 8104639230
ब्लॉग : antarnad18.blogspot.com
फेसबुक पेज : @yashasweejyotish



 









         










No comments:

Post a Comment