Saturday, 30 April 2022

प्रसिद्धी परान्मुख

 || श्री स्वामी समर्थ ||


कुठल्याही क्षेत्रात काम करताना जसजशी आपली प्रगती होत जाते तसे जनमानसातील वावर वाढतो .  कालांतराने आपली प्रतिभा , व्यक्तिमत्व लोकांच्या  आकर्षणाचा विषय ठरतो . आपली मते , विचार ह्यांना फोलो करणारा ,त्यापासून प्रेरणा घेणारा किबहुना प्रभावित झालेला असा एक विशिष्ठ वर्ग तयार होतो. 

ह्या सर्वामुळे अनेकांची जीवन शैली सुद्धा बदलून जाते. लोकांमधील सततचा  वावर ,सन्मान, आदरसत्कार ह्या सर्व गोष्टी भाग्याने आपल्याला मिळतात पण त्यातूनही निर्लेप पणे बाहेर यऊन  सगळ्या रंगात न्हावून सुद्धा रंग माझा वेगळा  हि मनाची स्थिती जर आपल्याला साधता आली तर खरे. अध्यात्मिक किंवा त्याच्याशी निगडीत असणार्या क्षेत्रातील लोकांनी तर ह्याबाबत अत्यंत सावध राहिले पाहिजे कारण हे सर्व वैयक्तिक साधनेच्या मार्गातील अडथळे आहेत . खरे साधक ह्यापासून निश्चितच परे राहण्याचा प्रयत्न करतील . मानसन्मान , हारतुरे , पहिली खुर्ची पाहिजे, माझे भाषण ठेवले नाही , मला स्टेजवर बोलावले नाही , माझ्या नावाचा उल्लेख नाही , मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ , माझ्यासारखा मीच ह्या सर्व गोष्टीमुळे आपल्या साधनेच्या मार्गाला खीळ बसते . आपण आपल्या मूळ मार्गावरून भरकटत जातो आणि त्याचा परिणाम म्हणजे महाराजांच्या पासून दूर जातो जे  खर्या भक्ताला परवडणारे नाहीच नाही.  ह्या सर्व क्षणिक गोष्टी आहेत ,आपल्या इप्सितापासून दूर नेणाऱ्या आणि आपली मुळची प्रतिभा कुठेतरी हरवून टाकणार्या आहेत . ह्या गर्तेत अडकलेली व्यक्ती बाहेर येण्याचा मार्गच जणू विसरून जाते म्हणून पहिल्याच पायरीवर खडबडून जाग आली तर बरे . 

आजकालच्या प्रगतीशील जगात स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवावे लागते हे जरे खरे असले तरी त्यात मीपणा नसावा इतकेच सुचवायचे आहे . प्रसिद्धीच्या झोतात राहणे म्हणजे  इतरांना कमी लेखणे नक्कीच नाही आणि नेमके हेच होते . माझ्या आधी कुणी झालाच नाही आणि पुढे येणार्यांना मीच एक काय तो मार्गदर्शक हि भावना विषण्ण करणारी आहे. मोठमोठ्या व्यक्तींची सुद्धा ह्यातून सुटका नाही . आपल्याला प्रसिद्धी कश्याला हवी आहे ? सहज मिळाली आहे कि मी त्याचसाठी प्रयत्नशील आहे . प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून मिरवण्यात मला खरच समाधान मिळत आहे कि मी माझ्या गुरूंपासून दुरावतो आहे. प्रत्यक्ष सद्गुरू सुद्धा प्रसिद्धीच्या झोतात राहणे पसंत करत नाहीत तर मग मी का ह्यासाठी अट्टाहास करतोय ....खरच मला आत्मपरीक्षणाची गरज आहे का? हे सगळे प्रश्न आपल्याला पडायला हवेत आणि त्याची अत्यंत खरी उत्तरे शोधण्याचा प्रयत्नही करायला हवा . बघा काय काय हाती लागतंय .

ज्ञान हे आपल्या लेखन शैलीद्वारे किंवा संभाषणा च्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करणारे असावे पण त्यात कुठेही मी पणाचा लवलेश नसावा कारण आपल्याही आधी कित्येक येऊन गेले आहेत आणि पुढेही येणार आहेत .  आधीच्या लोकांपासून आपण खूप काही शिकलो आहोत आणि पुढेही शिकत राहणार आहोत तेव्हा आपण एक विद्यार्थी राहणे हे उत्तम. आपल्या मिळवलेल्या ज्ञानाचा कुठल्याही परिस्थितीत अहंकार येऊ देऊ नये. कारण अहंकाराचा वारा न लागो हे संतानी म्हंटलेच आहे. महाराज देतात तसे काढूनही घेतात म्हणून जे दिले आहे ते त्यांचे आहे आपले त्यात काहीच नाही हा भाव ठेवला तर मग मिळालेला मानसन्मान ,हारतुरे प्रसिद्धी हि त्यांची आहे ,त्यांच्यामुळे ती आपल्याला मिळालेली आहे ह्याचा विसर पडत नाही किबहुना विसर पडला नाहीच पाहिजे . आपले जे काही आहे ते सर्वस्व त्यांच्या चरणाशी ठेवले तर ह्यातून निर्लेप पणे बाहेर येणे आपल्याला जमेल.  


श्री गजानन विजय ग्रंथ हा मोलाचा ठेवा भक्तांच्या हाती श्री दासगणू महाराजांनी सुपूर्द केला आहे त्यातून आपल्याला शिकण्यासारखे खूप आहे. पाटील बंधूनी महाराजांवर  उसाच्या दांडक्यांनी प्रहार केले पण महाराज तसूभर सुद्धा हलले नाहीत . त्यांनी त्याच उसाच्या मोळीचा  रस आपल्याच हाताने काढून त्यांची तृषा भागवली.  अध्यात्म आणि इतर अनेक क्षेत्रात प्रचंड विद्वत्ता आणि ज्ञान असलेले अनेक लोक आहेत ज्यांचे नाव कुठेही नाही. आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून ते समाजाची सेवा करत आहेत ,मार्गदर्शन करत आहेत .पण कुठेही जाहिरात नाही , बोलबाला नाही .प्रसिद्धीच्या झोतात राहिले म्हणजेच ज्ञानी आहोत असे नसते.  ज्ञान वाहते निर्मळ जलासारखे असेल तर ते दुसर्याला प्रगतीपथावर नेते , पण अहंकार मिश्रित ज्ञानाचा दर्प पुन्हा एकदा शून्याकडे प्रवास करणार असतो.  ज्ञानी माणूस मुक्त हस्ताने आपल्याकडील ज्ञान देत राहील . पण अहंकार आला तर मग अश्या व्यक्ती समोरच्याचा हुद्दा , मानसन्मान , माझा कुठे उदोउदो होत आहे हे पाहतील आणि तिथेच ओढल्या जातील. 

प्रचंड मोठ्या परीक्षा आहेत ह्या आणि त्यातून पार होणे हे अग्निदिव्यच आहे. महाराजांनी  सांगितलेले आहेच अग्नीत तुपाची धार . अहंकाराला वारा देणारे अनेक प्रसंग , व्यक्तीही भेटत जातात आणि  हेच आपले परीक्षेचे क्षण असतात . म्हणूनच श्री गजानन विजय  ह्या ग्रंथात जसे परमभक्त बंकटलाल आहेत तसेच विठोबा घाटोळ सुद्धा आहेत . कुठल्या मार्गाने जायचे ते ज्याचे त्याने ठरवायचे. भक्तांना महाराजांच्या आधी त्यांच्या हातातातील सोटा दिसला पाहिजे . 


एका दवाखान्यात मी एका नातेवाईकांना पाहायला गेले होते तो प्रसंग आठवला. तिथे तेथील एक आया फार धुसफुसत होती तेव्हा दुसरीने तिला सांगितले कि त्या पेशंटने कितीही वेळा बोलावले तरी आपण गेले पाहिजे . इथे पेशंट आहेत त्यांची सेवा करणे आपले काम आहे आणि त्यावरच आपली नोकरी रोजीरोटी अवलंबून आहे. 


अशिक्षित असणारी हि सामान्य व्यक्ती सुद्धा किती लाख मोलाचे बोल बोलून गेली. एखाद्याकडे ज्ञान आहे मान्य पण ते घ्यायलाच कुणी आले नाही तर काय उपयोग ? एखादा उत्तम वक्ता आहे पण त्याचे व्याख्यान ऐकायलाच कुणी नसेल तर ? सुज्ञास  सांगणे न लगे.  आपल्या भाषेवर आपले प्रभुत्व असावे पण त्याला अहंकाराची मी पणाची झालर नसावी . 

मोठ्या समुदायापुढे स्टेज वर गाणारा गायका पेक्षा कदाचित रस्त्यावरील फाटक्या कपड्यातील गाणार्या व्यक्तीचा सूर अधिक पक्का असू शकतो पण फक्त त्याचे भाग्य त्याला साथ देत नाही म्हणून तो मोठ्या स्टेज पर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणूनच जो स्टेज वर पोहोचला आहे त्याने आपल्याला जे प्राप्त झाले आहे त्याचा मान  राखावा आणि अहंकार येवू देऊ नये. माझ्यासारखा मीच बाकीचे मूर्ख असे समजू नये. 


भल्या भल्यांची झोप उडवणारे आणि मदमस्त आणि अहंकाराला वेसण घालून जागीच बसवून ठेवणारे , दंडाधिकारी शनी महाराज राशी परिवर्तन करत आहेत . शनी कडे न्याय आहे ते कधीच कुणावर अन्याय करणार नाहीत .  विद्या विनयेन शोभते . आपल्याकडे आहे ते देत राहणे . महाराजानाही निष्काम भक्ती आवडते . 

जरा चार लोक स्तुती करायला लागले कि आपले विमान लगेच आकाशात गेलेच म्हणून समजा .  शनी महाराज आता वायुतत्वाच्या राशीतच आहेत आणि पुढे ते पुन्हा पृथ्वी तत्वाच्या राशीत येणार आहेत . घनिष्ठ नक्षत्रातील हा शनी खरच अहंकार  वाढवेल कारण कुंभ (वायु+बुद्धी) +शनी (वायु) +मंगळ (अहं).  कधी ते आपले विमान आकाशात नेतील आणि अहंकाराचा दर्प आला तर कधी जमिनीवर आणतील समजणार सुद्धा नाही. सावधान . 

प्रसिद्धीच्या मागे न लागता आपली स्वतःची साधना वाढवण्याकडे अधिक कल असला पाहिजे , काय वाटते ?म्हणूनच  शनी महाराजांना आपला मित्र बनवा . पत्रिकेतील शनी समजला तर आयुष्य कसे जगायचे ते समजेल. म्हणूनच प्रसिद्धी परान्मुख राहणे आणि स्वतःच्या आत्म्याचा प्रवास ओळखणे , महाराजांच्या सेवेत राहणे सर्वार्थाने उत्तम. प्रसिद्धी परान्मुख असा भक्त महाराजांच्या अधिक समीप जातो.

ओम शं  शनैश्चराय नमः

श्री स्वामी समर्थ 

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

 












No comments:

Post a Comment