|| श्री स्वामी समर्थ ||
प्रत्येक जण आपापल्या कोषात जगत असतो. रोज असंख्य माणसे भेटतात आपल्याला काही प्रत्यक्ष तर काही विविध सोशल माध्यमातून . त्यातील प्रत्येक जण आपल्या बद्दल वेगवेगळा विचार करत असतो आणि आपणही . प्रत्येकाचे नाते आपल्याशी वेगवेगळे त्यामुळे भावनाही वेगवेगळ्या . एखादी व्यक्ती क्षणात आपलीशी होते तर अनेकदा समांतर रेषांसारखे आपण दोघे असतो .
नव्याने ओळख झालेली व्यक्ती सुद्धा आपल्या हृदयाचा आपल्याही नकळत ठाव घेते , आपल्या विचारांवर मनावर हाबी होते. अनेक युगांची ओळख असल्यासारखे वागणे आपल्याही नकळत होते . आवडणार्या लोकांना आपण क्षणात आपलेसे करतो पण ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी आपण कसेही वागलो तरी आपण आवडत नाहीच , प्रत्येकाला आपण आवडलो पाहिजे हा अट्टाहास करणेच मुळात चूक .
आपण आयुष्यात सगळ्यांना एकाच वेळी सुखी नाही करू शकत . कुणाच्या तरी मनासारखे वागलो कि दुसरा दुखावतो आणि ह्याला अंत नाही . कुणी आपल्याला वाईट म्हंटले म्हणून आपण वाईट झालो नाही आणि चांगले म्हंटले म्हणून चांगलेही झालो नाही . आपण आहोत तिथेच आणि तसेच आहोत . कुणासाठी का बदलायचे आपण ? आपण आहोत तसेच छान आहोत कि . जेव्हा दुसर्यांना आवडण्यासाठी आपण जगतो तेव्हा आपण स्वतःपासून सुद्धा दूर जातो . आपण जसे आहोत तसे स्वीकारून मैत्रीचा खरा हात पुढे करणारे आपल्या समीप येतात तेही कायमचे . त्यांनासाठीच कदाचित “ जिवलगा “ हि सज्ञा वापरत असू .
आपल्या स्वतःच्या कोषात बेधुंद पणे आपल्या पद्धतीने आयुष्य जगण्याची नजाकत वेगळीच असते आणि एक दिवस अपेक्षा विरहित निर्लेप प्रेम करणारी आणि आपल्याला तसेच्या तसे स्वीकारणारी व्यक्ती जेव्हा मैत्रीचा हात पुढे करते तेव्हा आपण अक्षरशः निशब्द होतो. तुम्हाला काय वाटते ? नक्की कळवा.
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment