Thursday, 5 April 2018

स्वरांजली

॥ श्री स्वामी समर्थ॥

एक हृद्य आठवण

स्वरांजली

मंडळी नमस्कार,
                   अभिजात संगीताची आवड असलेल्या आणि आपल्या सुरेल गाण्याने गायन क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवून रसिकांची मनापासून दाद मिळवलेल्या,  कुटुंबवत्सल  अत्यंत साधे सोपे अगदी तुमच्या आमच्यासारखे जीवन जगणाऱ्या , आपल्या गाण्यावर प्रचंड निष्ठा असलेल्या पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांच्या शिष्या सौ. पद्मजाताई फेणाणी जोगळेकर यांच्याशी दिलखुलास गप्पा झाल्या, त्यातील त्यांचे काही विचार आपल्यासमोर मांडण्यासाठी हा लेखनप्रपंच.
                    "अस्मिता अग चहा घेशील कि सरबत ,ऊन खूपच आहे बाहेर " ..हा त्यांचा सहज सुंदर आवाज कानावर पडला तेव्हा वाटले , सर्वोच्च असा "पद्मश्री" पुरस्कार मिळालेल्या ताई ह्याच का? क्षणार्धात समोरच्या व्यक्तीस आपलेसे करून अगदी मोकळेपणाने दिलखुलास गप्पा मारताना मनात आले ह्यांच्यात तर " so called celebrity  status " शोधूनही सापडणार नाही. आपल्या विनम्रतेने , सहज सुंदर शैलीने समोरच्याला अगदी क्षणार्धार्त आपलेसे करण्याची त्यांची शैली वाखाणण्याजोगी आहे.

              प्रत्येक कार्यक्रम ,मैफल करताना ती शिस्तबद्ध झाली पाहिजे ह्याकडे त्यांचे जातीने लक्ष असते. रसिक श्रोतेगण आणि गायकाचे सूर जुळणे म्हणजे जणू दुग्धशर्करा योगच ह्याबाबत त्या म्हणतात प्रत्येक वेळी मी त्या नात्यात  परमेश्वराचे अस्तित्व अनुभवते ....

गगन सदन तेजोमय , केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली अश्या असंख्य गाण्यामधून आपल्याला भेटत राहिलेल्या पद्मजाताई म्हणाल्या आपल्या गाण्यासाठी सूर ताल ह्याचे ज्ञान तर हवेच पण त्यात असायला हवी ती एकरूपता , तन्मयता. गायक जेव्हा स्वतःला विसरून गाण्याशी एकरूप होवून तन्मयतेने आपली कला सादर करतो तेव्हा त्याला अमृताचे स्वरूप प्रदान होते आणि तेव्हाच ते रसिकांच्या मनाचा ठाव घेवू शकते . परमेश्वराचे अस्तित्व अबाधित आहेच पण त्याच्यावरील श्रद्धा ,विश्वास तुम्हाला जगायला बळ देते.

               संगीत हे एक "Passion " असलेल्या पद्मजाताईनी आज माझ्या ब्लॉग साठी आवर्जून कौतुकाने आपला वेळ दिला ह्याबद्दल मी पामर काय बोलणार , तुमच्या प्रेमाने आयुष्यभरासाठी मला बांधून ठेवलत  इतकच म्हणेन. आयुष्यातील एका नाजूक वळणावर तुमच्या " निशंक हो निर्भय हो मना रे...." ह्या स्वामिभक्तीने ओथंबलेल्या स्वरांनी मला पुनर्जीवन दिले आहे .  हा तारक मंत्र आपल्या वाणीमधून ऐकताना खरोखरच अक्कलकोट स्वामी समर्थ  मूर्तिमंत डोळ्यासमोर उभे राहतात इतकी आर्तता आपल्या आवाजात आहे.  आपलेपणा , जिव्हाळा आणि आदरातिथ्य यांनी ओथंबलेली हि गप्पांची मैफल संपूच नये असे वाटत होते. सर्वच भावना शब्दांकित करता येत नाहीत पण तरीही ताईच्या रूपाने आज मला माझ्या पाठीवर मोठ्या बहिणीची शाबासकीची थाप मिळाली ...कृतकृत्य झाले ...स्वामी समर्थ..