॥ श्री स्वामी समर्थ॥
![]() |
चेतन एका मनोरुग्णास भोजन देताना |
प्रवास एका वेगळ्या वाटेवरचा....
मंडळी,
साधारणपणे शिक्षण पूर्ण झाले कि नोकरी ,पुढे त्यात जरा स्थैर्य
आले कि दोनाचे चार हात म्हणजे लग्न आणि संसार..हुशश..झाली एकदाची जीवनाची इतीपुर्तता
.असे चाकोरीबध्द जीवन जगणारा तरुणवर्ग आपल्याला परिचित आहे. पण आज आपण अश्या एका
तरुणाचा परिचय करून घेणार आहोत कि ज्याने आयुष्यात आपली वेगळी वाट निवडली आहे आणि
त्यावर त्याचा अविरत प्रवास सुरु आहे .
समाजासाठी आणि स्वतःच्या समाधानासाठी काहीतरी वेगळे करू
पाहणाऱ्या “चेतन अशोक पाटील “ह्या संवेदनाशील पण धाडसी तरुणाचे कार्य स्तुत्य तर
आहेच पण इतराना प्रेरणा देणारेहि आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या चेतनने रस्त्यावरील
निराधार मनोरुग्णांसाठी काम करण्याचे ठरवले .मुंबई विद्यापीठातून २००४ साली पदवी घेतल्यावर
त्याने वेगवेगळ्या NGO बरोबर काम करण्यास सुरवात केली. अशी वेगळी वाट , जी नक्कीच
सोप्पी नाही , निवडावी असे वाटण्याचे कारण सांगताना चेतन म्हणाला कि त्याच्या कॉलेज मध्ये त्याचा एक
मित्र मनोरुग्ण होता आणि त्याच्याबरोबर तो NGO मध्ये जात असे. त्त्याच्याबरोबर कॅरम
खेळणे ,त्याच्याबरोबर संवाद साधणे हे करत असताना त्याने ह्या आजाराचा बराच अभ्यास
केला त्यातूनच त्याला ह्या लोकांसाठी आपणही काहीतरी करावे हि भावना जागृत झाली. चेतनने
अनेक सामाजिक संस्था ,NGO मध्ये काम केले आहे.
ह्या मनोरुग्णांबद्दल चेतन कळवळून बोलत होता. आपण रस्त्यावर
अनेक स्त्री पुरुष बघत असतो .मळकट कपडे ,घाणेरडे केस कित्येक दिवसात अंगाला पाणी न
लागल्यामुळे शरीराला येणारी दुर्गंधी ,स्वतःच्याच विश्वात वावरणारे आपल्याच कोशात
स्वतःला बंद करून घेतलेल्या ह्या लोकांचे भावविश्वच जणू कोलमडलेले असते .स्वताशीच
कधी हसताना तर रडताना आपण त्यांना पाहतो तर कधी गटारातील पाणी पिताना रस्त्यावरील
केराच्या टोपलीतील अन्न खातानाही आपण पाहतो. त्यांचा मानसिक तोल ढळलेला असतो जणू त्यांची
वास्तव जगताशी सर्व बंधने तुटलेली असतात .
त्यांच्या अस्तित्वाशी कुणालाही काहीच पडलेली नसते, चालत्या
बोलत्या प्रेतवत अवस्थेत कित्येक वर्ष ते असेच राहतात.
चेतन रस्त्यांवरती फिरून अश्या
मनोरुग्णांचा शोध घेत राहतो आणि असा एखादा रुग्ण मिळाला कि त्यांला घरी केलेले
स्वतः बनवलेले जेवण घेवून जातो. साधारणपणे रोज त्याच जागेवर किंवा आसपासच हा रुग्ण
त्याला रोज दिसतो .रोज जेवण देणाऱ्या माणसांची त्यांना हळूहळू ओळख पटते आणि
त्यांच्याबद्दल विश्वास वाटू लागतो .काही दिवसांनी मग जवळच्या NGO मध्ये किंवा
तत्सम सेवाभावी संस्थेमध्ये त्याची सोय केली जाते. तेथील डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग
यांनी घेतलेल्या काळजीमुळे तसेच योग्य ते
औषधोपचार ह्याना ते प्रतिसाद देवू लागतात . त्यातील अनेकांना शारीरिक आजारही
झालेले असतात . काही काळाने हा मनोरुग्ण उपचारांना प्रतिसाद देवू लागल्यावर हळूहळू
संवाद साधू लागतो आणि मग अगदी स्वतःच्या घरचा पत्ताही त्याला सांगता येतो .NGO त्याच्या
नातेवाईकांना कळवून त्याला त्यांच्या सुपूर्द करतात.
ह्या आजाराबद्दल बोलताना चेतन पुढे म्हणाला कि हा आजार कुणालाही होऊ शकतो.
"Schizophrenia" म्हणजेच मानसिक आजार हा अंदाजे २५ ह्या वयोगटाच्या पुढेच आढळतो.लहान मुलांमध्ये ह्या आजाराचे प्रमाण आढळत नाही .मेंदूमधे "chemical imbalance"झाल्यामुळे प्रामुख्याने हा आजार बळावतो.असे आजार एखाद्या गोष्टीचा मनावर झालेला खोल परिणाम,स्ट्रेस,विलक्षण दडपण,घरातील अस्थिर वातावरण तर कधीकधी अनुवांशिक अश्या अनेक कारणांमुळे होऊ शकतात. असे रुग्ण एकदम शांत होतात तर कधी स्वतःशीच बडबड करतात. आपल्याला कुणीतरी मारणार आहे असे त्यांना भास होत राहतात .हि एक मनाची अवस्था आहे आणि अश्याप्रकारची लक्षणे आपल्यातील जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तींमध्ये दिसली तर त्यांना वेडे न ठरवता त्यांना समजून घेवून वेळीच त्यांच्यावर योग्य उपचार केले तर त्यांचे आयुष्य वाचू शकते.कारण एकदा वेळ गेली तर असे रुग्ण घरातून निघून जाण्याची शक्यता असते आणि त्याचा परिणाम पुढे त्यांच्याच नाही तर संपूर्ण कुटुंबावरही होतोच. अश्या रुग्णांसाठी कुठल्या उपचार पद्धती आहेत का ह्यावर चेतन म्हणाला कि नक्कीच आहेत आणि NGO रुग्णांवर सर्वतोपरी उपचार करतेच. रुग्ण बरे होवून घरी गेल्यावरही त्यांच्या सर्व औषधांचा खर्चही NGO करतात कारण बरेचदा रुग्णांचे कुटुंबीय अनेक कारणांनी हा खर्च करण्यास असमर्थ असतात .
हा आजार पूर्ण बरा होवून घरी गेलेल्या रुग्णांचे प्रमाण चांगलेच आहे हे सांगताना त्याने सांगितले कि बिहार मधील एक रुग्ण घरातून पळून गेला होता पण NGO च्या मदतीने पूर्ण बरा होवून स्वतःच्या सख्या बहिणीच्या लग्नाच्या अगदी आदल्याच दिवशी घरी पोचला तेव्हा घरच्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता ,संपूर्ण गाव त्यास भेटायला आणि आनंद साजरा करायला आले होते.
आज चेतन रोज १० ते १२ मनोरुग्णांना स्वतःच्या हाताने बनवून
जेवण देत आहे .त्याच्या घरूनही त्याला ह्या कार्यासाठी प्रोत्चाहन मिळाले आहे तसेच
ज्यांना शक्य असेल ती मंडळी तांदूळ, डाळ, Biscuits अश्या प्रकारची मदत करत आहेत .
नोव्हेंबर २०१६ मध्ये चेतनने ह्या कार्यातील पुढचे पाऊल उचलत “प्रकाश फौंडेशन “ ह्या स्वतःच्या NGO ची स्थापना केली आहे. सध्यातरी स्वतःच्या
उत्पन्नातून तसेच समाजातील अनेकांकडून ह्या कार्यात धान्य, फळे, biscuits ई.
गोष्टींची मदत मिळत असल्याने हे कार्य घरूनच होत आहे. परंतु लवकरच ह्या उपक्रमास
मूर्त स्वरूप येण्यासाठी कायम स्वरूपी जागा घेऊन तिथे १०-१२ रुग्णांची सोय होईल तसेच
त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर ई सर्व गोष्टींसाठी लागणारी शासनाची मदत आणि
आर्थिक पाठबळ ह्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
अगदी आपल्यासारखेच आपल्यातलेच काहीजण, जे काही कारणामुळे आपले सर्वस्व हरवून बसले असले आहेत, त्यांची सेवाशुश्रुषा करुन त्यांना पुनश्च जीवन संजीवनी मिळवून देण्याचे जगावेगळे कार्य करत असणाऱ्या चेतन समोर मीच काय आपण सर्वच नतमस्तक व्हाल यात शंकाच नाही. प्रपंच, त्यातील भौतिक सुखे ,मोठ्या पगाराच्या नोकऱ्या, ऐशोआराम ह्या सर्व सुखांवर स्वखुशीने तुळशीपत्र ठेवून ह्या मनोरुग्णांसाठी आयुष्य खर्ची करण्याचा निर्णय खचितच कौतुकास्पद आहे. मी NGO मध्ये काम केले आहे हे Certificate मिळवण्यासाठी काम करणारे अनेक आहेत .पण निस्वार्थीपणे स्वतःला ह्या कार्यात झोकून देणारे असंख्य चेतन तयार होणे हि काळाची खरी गरज आहे.
आपले अनुभव सांगताना चेतन सांगतो हे रुग्ण बरे झाल्यावर
स्वतःच्या घरचा पत्ता सांगू शकतात आणि जेव्हा त्यांच्या कुटुंबाशी त्यांची पुन्हा
गाठभेट होते तो क्षण खरोखरच इतका आनंदाचा असतो कि तो शब्दांकित करता येणे केवळ
अशक्य आहे ,तो फक्त अनुभवायचा असतो. चेतनला ह्या कार्यांत मनापासून समाधान मिळत
आहे. पण आज ह्या मनोरुग्णांसाठी असलेल्या NGO आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या
डॉक्टरांची संख्या त्या मानाने खूपच कमी आहे हि खंत त्याने बोलून दाखवली. मुळातच हा आजार मनात वाढत असताना कौटुंबिक
स्थरावर आप्तस्वकीयांनी अश्या व्यक्तींकडे दुर्लक्ष न करता त्यांना समजून घेवून
ह्यातून बाहेर पडण्यास मदत करावी आणि सामाजिक स्थरावरही एक सामाजिक बांधिलकी
म्हणून अश्या लोकांशी तुसडेपणाने न वागता त्यांना मदत करावी असे आवाहन करताना
त्याने सांगितले कि असे मनोरुग्ण आढळल्यास जवळच्या NGO किंवा तत्सम संस्थेत सूचना
द्यावी जेणेकरून त्यांची पुढील व्यवस्था तिथे होवू शकेल .
मानसिक आजार हि समस्या गंभीर आहे पण हा आजार पूर्ण बरा होणार आहे आणि
ह्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून
सर्वांनी आपल्या परीने त्यात योगदान देण्याची गरज आहे.
मंडळी, एखादी संकल्पना , मग ती कुठलीही असो ,त्याचा ध्यास
घेवून ,त्याचा पाठपुरावा करून ती प्रत्यक्षात उतरवणे हि सोप्पी गोष्ट खचितच नाही.
चेतनने हे जगावेगळ्या कार्याचे शिवधनुष्य लीलया पेलले आहे ,त्याला ह्या कार्यात हा
लेख वाचणाऱ्या प्रत्येका कडून सर्वार्थाने मदत व्हावी तसेच त्याच्या “प्रकाश
फौंडेशन “ ह्या संस्थेची संस्मरणीय वाटचाल व्हावी हीच स्वामीचरणी प्रार्थना.
आपल्यापैकी कुणालाही कसल्याही प्रकारे ह्या कार्यास हातभार लावायचा असेल तर येथे संपर्क साधा.
Chetan Patil
Prakash Foundation
Contact : prakashfoundation2016@gmail.com
Follow :
facebook.com/prakash-foundation
ह्या लेखाचे अभिप्राय
पाठवण्यासाठी