Sunday, 1 April 2018

"Speechless........"

 ॥ श्री स्वामी समर्थ॥
श्री रमेश वामन डोंगरे

  

           मंडळी ,
                   आपण राहत असलेला परिसर , आपले शहर स्वच्छ , सुंदर असावे असे सर्वाना वाटते पण खरच तसे ते आहे का ? आज मुंबई शहरातील अस्वच्छता हि दिवसागणिक गंभीर होत जाणारी बाब म्हंटले तर वावगे ठरू नये. पान तंबाखू खावून रस्त्यावर थुंकणे आणि रस्त्यात कचरा फेकणे ह्या गोष्टी तर मुंबईकरांसाठी नवीन राहिल्या नाहीत. सरकारने स्वच्छतेसाठी काहीतरी ठोस उपाय करायला हवेत हे जरी खरे असले तरी अशी अपेक्षा करताना त्याची सुरवात आपल्या स्वतःपासुनही करायला हवी. आज ह्यासाठी अनेक NGO, सामाजिक संस्था कार्य करत आहेत.

      आज "अंतर्नाद " मध्ये  मूकपणाने म्हणजेच " Speechless" राहून ह्या कार्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या  " श्री. रमेश वामन डोंगरे " ह्यांचा परिचय करून घेवूया. TIFR मध्ये Dental  Technician विभागात काम केलेल्या डोंगरे काकांनी २०११ पासून ह्या कार्यात आपले अमूल्य योगदान दिले आहे.  ह्या कार्याची प्रेरणा किंवा हा विचार मनात कसा आला ह्याला प्रतुत्तर देताना काका म्हणाले कि "ध्वनी प्रदूषण आणि आपण " हि मराठी विज्ञान परिषदेची पुस्तके वाचनात आली आणि ती वाचल्यावर आपणही ह्या कार्यात एक सामाजीक बांधिलकी म्हणून भाग घ्यावा असे मनोमनी वाटू लागले .

 तशी इच्छा जेव्हा त्यांनी आपल्या पत्नीपाशी बोलून दाखवली तेव्हा त्यांनी त्यांच्या कार्यास पाठींबा तर दिलाच पण आपण हे कार्य मूकपणाने, म्हणजे न बोलता करावे..कार्य करताना कुणालाही तू हे कर ते कर असे सांगू नये ,असे सुचवले. काकांनी त्वरित सुभाषितांचे फलक तयार करून घेतले आणि ते गळ्यात घालून ते रेल्वे स्थानक तसेच रस्त्यांवरही  फिरू लागले. " Antitobacco ,Anti Noise Pollution " ह्या साठी अनेक सूचना ह्या फलकांवर लिहिलेल्या आहेत. गेली ३ वर्षापासून " Organ Donation म्हणजेच देहदान , नेत्रदान " ह्या साठी ते प्रचार करत आहेत.

वरील माहिती अंतर्भूत असणारे काही "Paper Incerts " सुद्धा त्यांनी स्वखर्चाने वाटले आहेत . काका सांगतात आजार झालाय म्हणून रस्त्यावर थुंकणारे लोक हे २% आहेत पण तंबाखू खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्ती आहे आणि त्यापासूनच आजार पसरत आहेत.
ह्या कार्यात काकांना काही प्रमाणत सुरवातीला टीकेलाही सामोरे जावे लागले पण नंतर हळूहळू जनजागृती हि होतेय असे सांगून ते म्हणाले "हि व्यक्तीचांगले काम करत आहे "असेही शब्द कानावर पडू लागले.  त्यांच्या कुटुंबाने पूर्ण सहकार्य केल्यामुळे वयाच्या ६८ वर्षातही ते आपले हे समाज जागृतीचे काम रोज एक तास कमीतकमी वेळ देवून अव्याहतपणे करत आहेत.

 ह्या कार्याला असंख्य हात लागण्याची गरज तर आहेत , तसेच "मी रस्त्यावर थुंकणार नाही ,कचरा टाकणार नाही " हे प्रत्येकाने मनापासूनही ठरवणे अत्यंत गरजेचे आहे हे सांगताना , ह्या सर्व गोष्टींसाठी आजही समाजात उदासीनताच दिसून येते आहे ह्याची खंत वाटते असेही त्यांनी सांगितले .

     अत्यंत निष्ठेने स्वतःला ह्या कार्यात झोकून दिलेल्या काकांनी "माझ्या कुडीत ताकद आहे तोवर हे काम मी अव्याहतपणे करतच राहणार आहे हे" सांगताना आजच्या तरुण पिढीने हि धुरा पेलण्यास मोठ्या संखेने पुढे यावे असे आवाहन हि केले. 

              खरच हे कार्य अमुक एक माणसाचे नसून आपल्यातील प्रत्येकाचे आहे  आणि हे आपल्याला स्वतः पासून सुरवात करूनच करायचे आहे.  परदेशी प्रवास करून आलेली आपल्यातील मंडळी तिथली स्वच्छता आणि त्यासाठी तेथे असलेले कडक नियम , याबद्दल अगदी उत्फूर्त पणे बोलताना दिसतात . पण मग आपल्याकडे आपल्या देशामध्ये हे का होत नाही ? आपलाही परिसर स्वच्छ, सुंदर ,दुर्गंधी मुक्त ,प्रदूषण मुक्त असावा असे खरच वाटत असेल तर " केल्याने होत आहे ,आधी केलेची पाहिजे .." ह्या युक्तीला धरून आपल्या स्वतःपासूनच ह्या कार्याची सुरवात करुया.
              


                           मंडळी , डोंगरे काकांचा हा उपक्रम आणि त्याबद्दलची माहिती ऐकून मी तर खरच "Speechless"  झाले आहे....

अभिप्रायासाठी:
https://www.facebook.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A6-350841195427839/?ref=bookmarks