Sunday, 6 May 2018

सिंहद्वार अर्थात वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार


 ॥ श्री स्वामी समर्थ॥


 



मंडळी ,
     
       प्रत्येक वास्तूला प्रवेशद्वार असते ,ज्याला आपण घराचा दरवाजा म्हणतो, त्याला वास्तुशास्त्रात अनन्यसाधारण महत्व आहे. शास्त्रात ह्याला “सिंहद्वार “ असेही संबोधले आहे. आज त्याबद्दल काही अधिक माहिती जाणून घेवूया.....

       पूर्वीच्या काळी गावातील घरांना प्रशस्त दरवाजे असायचे. घराला मागील बाजूसही दरवाजा असायचा तेथून मग घरातल्या बायका आणि गडी माणसे यांची ये जा मागील बाजूस असलेल्या विहिरीवरील पाणी काढण्यास , वाळवणे घालण्यास होत असे.

       
हल्लीच्या काळात मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये मुळात वास्तुच मिळणे कठीण झाले आहे त्यात मनासारखी वास्तू मिळणे त्याहून कठीण. सर्वसाधारणपणे वास्तू शास्त्राच्या सर्व नियमांचे पालन इच्छा असूनही करू शकत नाही .आता शहरांमध्ये असलेल्या घरांना एकच दरवाजा बघायला मिळतो. बैठे स्वतःचे घर असेल तर क्वचित मागील बाजूस दरवाजा असतो.

       
ज्याप्रमाणे आपण घरात मुख्य दरवाज्यातून प्रवेश करतो ,त्याचप्रमाणे घरात येणारी चांगली वाईट ऊर्जा (Energy) सुद्धा ह्याच दरवाज्यातून आत येत असते. घरात नकारात्मक ऊर्जा आली तर त्याचे परिणाम नुसत्या वास्तुवरच नाही तर तिथे राहणाऱ्या व्यक्तींवर त्यांच्या आरोग्यावरही झालेले दिसून येतात.

        उत्तरेपासून ते पुर्वेपर्यंत कुठेही वास्तूचे प्रवेशद्वार असेल तर त्यातून सकारत्मक ऊर्जा प्रवाहित होते असे शास्त्र सांगते. वास्तूशास्त्राप्रमाणे वास्तूचे प्रवेशद्वार हे पूर्व पश्चिम असावे कि उत्तर दक्षिण हा ह्या लेखाचा विषय नाही आणि मी वास्तू तज्ञ हि नाही. मला रोजच्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी नजरेस दिसतात त्याच बद्दल माझे अनुभव मी इथे कथन करणार आहे.

       
घर कसेही असो लहान अथवा मोठे पण घराचे प्रवेशद्वार किंवा मुख्य दरवाजा ह्याबद्दल आपल्यात जागरूकता यावी यासाठी हा लेखन प्रपंच. घराचा दरवाजा सुबक आणि सुशोभित असेल तर घरात येणाऱ्या व्यक्तीस घरात येतानाच प्रसन्न वाटते. घराच्या मुख्य दरवाज्यावर घरमालकाच्या नावाची सुबक अक्षरातील पाटी असावी ,हयात नसलेल्या व्यक्तीचे नाव घरावर असू नये .घराच्या दरवाज्याची चौकट पूर्ण लाकडाची असावी, कारण लाकूड हे उर्जेचे संतुलन राखते. त्यामुळे लाकडाच्या चौकटीतून अधिकाधिक सकारात्मक ऊर्जा घरात येण्यास मदत होते. पण हल्ली अनेक घराच्या चौकटीसाठी संगमरवर हि वापरण्यात येते. घराचा दरवाजा लाकडाचा असावा आणि त्याला कुठलाही भडक रंग न देता शांत रंगांचा उपयोग करावा . दरवाज्यावर रंगांचे फोफडे नसावेत तसेच रंग, दरवाजा फुगलेला नसावा. घरास उंबरठा असणे अतिमहत्वाचे आहे. 
         
      उंबरठा हे आपल्या घराच्या मर्यादेचे प्रतिक आहे . घरात आपलेपणा असतो तर  उंबरठ्याबाहेर बाह्य जग सुरु होते हेच जणू उंबरठा सूचित करत असावा. नवीन घर घेताना घरास उंबरठा आहे कि नाही हे अवश्य पाहावे आणि नसल्यास तो करून घ्यावा तसेच घराचा दरवाजा आतील बाजूस उघडणारा असावा. त्यात तो उजवीकडून डावीकडे उघडणारा असेल तर अतिउत्तम . आजकाल शहरांमध्ये सुरक्षा अतिशय महत्वाची असल्यामुळे घराला बाहेरून एक दरवाजा ज्याला आपण safty door म्हणतो जे बाहेरील बाजूस उघडणारे असते .हे वास्तुशास्त्रास धरून नसले तरी आपल्याला स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही.  

         घराच्या मुख्य दरवाज्याच्या आतल्या बाजूस कालनिर्णय तत्सम वेळ दर्शवणारी कॅलेंडर तसेच कोपऱ्यात केरसुणी ठेवू नये.  घरात येताना उंबरठा ओलांडून घरात यावे ,कित्येक लोक चपला घालूनच उबरठ्यावर उभे राहून एकतर बोलत तरी असतात नाहीतर उंबरठ्यावर चप्पल,बूट घालून पाय ठेवून येतात.घराच्या आतील बाजूस वरती , गणपतीची ,सद्गुरूंच्या फोटोंची फ्रेम पहायला मिळते ,ती सुद्धा दुभंगलेल्या अवस्थेत. अश्या घरात लक्ष्मी आणि आनंद किती काळ टिकत असेल यावर वेगळे भाष्य न करणेच योग्य.

       
 घरावर बाहेरील बाजूस अनेक देवी देवतांचे फोटो किंवा दक्षिण दिशेस दरवाजा असेल तर पंचमुखी हनुमानाचा फोटो पहायला मिळतो. पण ते वेळोवेळी पुसून चांगल्या स्थितीत ठेवणे हे आपलेच काम नाही का? त्याचबरोबर घराच्या दरवाज्यावर दोन्ही बाजूस असणारी तोरणे किंवा दरवाज्यावरील देवांच्या फोटोंवर असणारे विविध decorative दिवे पाहायला मिळतात. हे सर्व जर माफक प्रमाणात आणि सुस्थितीत असेल तर ते खरोखरच सुशोभित दिसते पण उगीच आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन मांडल्यासारखे तिथे भरमसाट गोष्टींची चुकीच्या पद्धतीने केलेली मांडणी ,रचना भडक दिसू शकते. त्यापेक्षा घराचा दरवाजा नीटनेटका, दाराबाहेर सुबक रांगोळी असेल तर घरात येणाऱ्या व्यक्तीस अधिक प्रसन्न वाटेल.

         
घराचा दरवाज्यावर दिवाळीला लावलेले अनेक देवतांचे स्टीकर किंवा तत्सम गोष्टी कालांतराने अर्धवट फाटलेल्या अवस्थेत राहतात त्या पूर्णपणे काढून टाकल्या पाहिजेत तसेच गुढी पाडवा किंवा इतर सणांच्या दिवशी घराच्या दरवाज्यावर लावलेले फुलांचे तोरण, आंब्याचा डहाळा पुढे कित्येक दिवस तसाच असतो . आपण रोज पूजा करताना आदल्या दिवशीची देवावर वाहिलेली फुले काढून ठेवतो आणि त्यालाच “ निर्माल्य” म्हणतो . त्याचप्रमाणे दरवाज्यावरील हे फुलांचे तोरण सुद्धा वेळीच काढून टाकले पाहिजे. घराच्या उंबरठ्यावर तसेच घराबाहेर लहानशी पण सुबक रंगसंगती असलेली रांगोळी काढावी. पूर्वीच्या काळी गावातील घराबाहेर जमीन शेणाने सारवलेली असायची. घरात सरपटणारे प्राणी किडामुंगी ,सर्प येवू नयेत म्हणून घराबाहेर पूर्वीच्या स्त्रिया रांगोळी काढत जेणेकरून ह्या प्राण्यांचा घरात प्रवेश होवू नये. त्याचबरोबर रांगोळी काढल्यामुळे लक्ष्मीचे घरात आगमन होते. प्रत्येक शुभकार्याच्या सुरवातीला गुरुजीही चौरांगाभोवती प्रथम रांगोळीच काढतात हे आपणास माहीतच आहे. दिवाळी, पाडवा, अश्या सणांना तर आवर्जून घरातील स्त्रिया घराबाहेर रांगोळी काढतात.

         
घराच्या दरवाजा जितका सुबक ठेवणे गरजेचे आहे त्याचबरोबर घराचा दरवाजा लावताना आणि उघडताना त्याचा कमीत कमी आवाज होणेही तितकेच गरजेचे आहे. बरेच वेळा घरातील येणारी किंवा जाणारी व्यक्ती रागाच्या भरात जोरात दरवाजा लावते. कालांतराने आपला राग शांत होतो पण वास्तुदोष मात्र नक्कीच निर्माण होतो आणि तोही कायमचा, तसेच दरवाज्यात आलेल्या कुणावरही बोलता बोलता त्याच्या तोंडावर दरवाजा लावणे ह्यासारखे दुसरे पाप नाही कारण परमेश्वर कुणाच्याही रुपात आपल्या वास्तूत प्रवेश करत असतो आणि तो आपल्या हाडामासाच्या माणसातच आहे. त्याला ओळखण्याची कुवत आपल्या पामारांमध्ये नाही त्यामुळे घरातील मूर्तीपूजा जितकी सद्भावनेने कराल तितक्याच प्रेमाने घरात येणाऱ्या प्रत्येकाचे आनंदाने स्वागत करावे तरच हि वास्तुदेवता प्रसन्न होईल,नाहीतर सर्व व्यर्थ आहे. घराच्या दरवाज्यात उभे राहून आतबाहेर गप्पा मारणे आणि तेही नको त्या विषयावर हेही वर्ज करावे कारण त्यामुळे वास्तुच्या प्रवेशद्वारावरच नकारात्मक ऊर्जा तयार होवून दोष निर्माण होतो. पुढे हीच  नकारात्मक ऊर्जा घरात येते आणि परिणामी कालांतराने घरातील व्यक्तीस मोठे आजारपण, पैशाचा ओघ कमी होणे ह्या गोष्टींची प्रचीती अनुभवयास मिळते. सुख दुखःच्या गोष्टी घरात बसून जरूर कराव्यात पण घराचा उंबरठा हे शिळोप्याच्या गप्पा मारण्याचे ठिकाण नक्कीच नाही.
           
            मंडळी, ह्या लेखात आज वास्तूच्या प्रवेशद्वाराबद्दल लिहिताना आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो “शनी शिंगणापूर” चा ,जिथे कुठेही घराला दरवाजे दिसणार नाहीत. कुठेही चोरी किंवा तत्सम घटना घडत नाहीत इतकी शनी महाराजांची कृपा तिथे आहे.

            पूर्वीच्या काळी घरात येणाऱ्या व्यक्तीस काहीही कारणाने उशीर झाला तर ती लवकर  यावी म्हणून घरातील स्त्रिया उंबरठ्यावर भांडे उपडे घालत असत किंवा घरातील मुख्य दरवाज्यास कोयंडात लोखंडी कालथा घालून ठेवत असत, जेणेकरून घराबाहेर गेलेली व्यक्ती घरी लवकर परतावी.
मुंबई पुण्यासारख्या शहरातून अगदी वास्तुशास्त्राप्रमाणे आपली वास्तू मिळणे भाग्याचेच लक्षण आहे. आपण नेहमी ऐकतो , “ माझे घर ५०० -१००० square feet चे आहे ” , खर सांगायचे तर आपल्याला राहायला ३ बाय ६ इतकीच जागा लागते उरलेल्या जागेत असतो तो आपला अहंकार ,दुर्दैवाने आपल्या घराच्या क्षेत्रफळ पाहून आपल्याशी हितसंबंध जोडणारे so called हितचिंतक बरेच असतात,  असे आपल्या घरात तर प्रवेश करतील पण आपल्या हृदयात प्रवेश करू शकणार नाहीत, असो.            
             

          
           
            मंडळी , आपले राहते घर मग ते पूर्व पश्चिम ,उत्तर दक्षिण कसेही असावे घरात आनंद ,लक्ष्मी, मांगल्य आणणारे प्रवेशद्वार अबाधित, सुबक , आकर्षक ,प्रसन्न असेल त्याचबरोबर घरातील देवपूजा , सकाळ संध्याकाळ घरात केलेला घंटानाद, स्वछ्यता, घरात वेळोवेळी पाळले जाणारे कुलाचार, घरातील आनंदी वातावरण तसेच घरात येणाऱ्या प्रत्येकाचे आनंदाने केलेले स्वागत आपली वास्तूच काय तर आपले संपूर्ण जीवन आनंदाने उजळून टाकेल यात शंकाच नाही.

अभिप्रायासाठी संपर्क साधा खाली दिलेल्या संकेत स्थळावर

antarnad18@gmail.com

https://www.facebook.com/antarnad18/