Wednesday, 9 May 2018

जपास उत्तम "श्वासांची माळ”


                        ॥ श्री स्वामी समर्थ॥






      मंडळी,

           आपण रोजची देवपूजा करत असतो. पूजा झाल्यावर अनेक जण नामस्मरण किंवा जप करतात. नामस्मरणास अध्यात्मात अनन्यसाधारण महत्व आहे. देवपूजा ,धूप दीप ,नेवैद्य हे घर समजले तर नामस्मरण हे घराचे छप्पर आहे.
          
           अमुक एका देवतेच्या जपासाठी अमुक एक माळ घावी असे वाचनात आहे. एखाद्या ग्रहाचा जसे शनी महाराजांचा जप जो शास्त्रात २३,००० सांगितला आहे तो करायचा असेल तर प्रथम संकल्प सोडून मग जपास प्रारंभ करून तो विशिष्ट संख्येचा जप ठराविक काळात करता येतो. संकल्पित जप अर्थातच मोजायला हवा अश्यावेळी आपल्याला माळ घ्यावी लागते.
     
           मार्गशीर्ष महिन्यात किंवा चैत्रात ,नवरात्रीत अनेक जण आपल्या कुलस्वामिनीचा जप करतात. श्री गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्थी पर्यंत सुद्धा श्री गणेशाची आराधना करण्यासाठी गजाननाचा जप केला जातो. अधिक महिना, श्रावण आणि कार्तिकातही आपल्या आराध्याचे नामस्मरण करताना अनेकांना आपण पाहतो. काहीजण रोज नित्य नियमाने त्यांनी ठरवलेला जप एकमुक्त एकभुक्त राहून करतात.

           आजकाल whatsapp सारख्या माध्यमातून संघटीत होवून आपल्या सद्गुरूंच्या सेवेत १२ कोटी वगैरे संख्येचे सामुहिक पद्धतीने नामस्मरण केले जाते. प्रत्येकाने रोज केलेला जप तिथे लिहायचा . चांगले आहे त्यामुळे आपला जप अनायासे होत राहतो. नाम लिहूनहि गुरुचरणी अर्पण करणारेही अनेक भक्त आहेत . शेवटी हा सर्व प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे आणि माध्यमापेक्षा भाव महत्वाचा.

           जप करण्यासाठी कुठली माळ घ्यावी हा प्रश्न सर्वसाधारणपणे विचारला जातो. आपल्या आवडी प्रमाणे जपाची माळ आपण घेवू शकतो. जप करण्यास रुद्राक्षांची , कमलककडीची, तुळशीची, रक्तचंदनाची, स्फटिकाची , मोत्याची अश्या अनेक प्रकारच्या माळा वापरल्या जातात.

           लक्ष्मीचा जप करायचा असेल तर स्फटिकाची, गुरुंचा किंवा शंकराचा जप करायचा असेल तर रुद्राक्षाची माळ घ्यावी हे आपल्याला जाणकार तसेच गुरुजीही सांगतात. हे सर्व प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे जरूर करावे. तसेच आम्हाला आता “ सुवैर किंवा सुतक “ आहे. मग आम्ही जप कसा करायचा? असाही संभ्रम अनेकांना पडलेला असतो.
        
           मंडळी, अगदी सुरवातीला जेव्हा आपण नामस्मरणाला सुरवात करतो त्यावेळी मुळातच आपली बैठक नसते. जप करताना झोप येते. स्वयपाक घरात सुनबाई भाजीत जास्ती तर नाही ना मीठ घालत, दरवाज्यात कोण आलाय ,कुणाचे कुरियर आलाय ह्या सर्वांकडे आपले लक्ष असते , अहो हा मनुष्य स्वभाव आहे, म्हणून तर परमार्थ इतका कठीण म्हंटले आहे.  तर सर्वप्रथम आपण ह्या देवतेचा जप करतो तो जप एका कागदावर निट लिहून त्याची पूजा करावी .

           ज्या माळेने जप करणार त्याचे शुद्धीकरण केले पाहिजे ,त्याला दुधाचा अभिषेक करून मग साध्या पाण्याचा करून त्यास स्वछ्य निट पुसून धूप दीप गंध फुले अक्षता अगरबत्ती निरंजन ओवाळून त्यास मनोभावे नमस्कार करून मगच जपास प्रारंभ करावा .जप करण्यापूर्वी घरातील मोठ्या मंडळीस नमस्कार करून तसेच ज्या देवतेचा जप करत असू त्यास आपण हा जप का करत आहोत हे विषद करून मगच जप सुरु करावा. ज्या देवतेचा किंवा देवाचा जप करतो त्या देवावर आपली संपूर्ण श्रद्धा असली पाहिजे, म्हणजे तो जप करताना आपल्या मनास आनंद प्राप्त होतो. कालांतराने आपल्यावर त्या देवतेचा ,जिचा जप करत असतो, त्याची कृपा होवून फलश्रुती मिळू लागते . 
      
            हळूहळू आपले मन जपामुळे एकाग्र होवू लागते, प्रपंचापासून थोडी थोडी विरक्ती येवू लागते आणि मग एकदा का ह्या नामस्मरणाची गोडी लागली कि मग काय विचारता , ब्रम्हानंदी टाळी लागते जणू आणि मन आपोआप शांत होते. मनाची हि अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा जपास कुठलीच माळ घ्यायची गरजच उरत नाही . नाम आणि देवता आपल्या श्वासावर जणू विसावते आणि म्हणूनच त्यानंतर जपास जर माळच घ्यायची झाली तर ती फक्त“ श्वासाची माळ ” घ्यायची म्हणजेच श्वासागणिक जप झाला पाहिजे. नामातून लागते ती समाधी आणि समाधी अवस्थेतून मिळते ते पराकोटीचे समाधान.

            मंडळी ,जप करताना म्हणूनच ह्या “ श्वासाची माळ “ .मग सुवैर असो अथवा सुतक आपण श्वास घ्यायचे थांबवतो का? नाही ना? प्रत्येक श्वासागणिक जप झाला पाहिजे पण आपण आपले कुठलेही नित्य कर्म करत असू ,अगदी भांडी घासताना , कपड्यांच्या घड्या घालताना , प्रवासात , काहीही काम करताना जसा श्वास चालू असतो त्याच प्रमाणे आपले नामस्मरण सुद्धा चालू असले पाहिजे. हे कठीण वाटेल पण अशक्य नक्कीच नाही. ह्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी होतात .आपण कमी बोलून जास्ती विचार करायला लागतो , राग शांत होतो, मनाची एकाग्रता आणि परिपक्वता वाढते. आपल्या तोंडूनही कुणास वाईट बोलले जात नाही, मन शांत होते आणि नामाकडे कल वाढू लागतो. 

मनात मग सतत एकच विचार रुंजी घालू लागतो... “ हेची दान देगा देवा ,तुझा विसर न व्हावा ...”


अभिप्रायासाठी संपर्क करा खालील link वरती

antarnad18@gmail.com
https://www.facebook.com/antarnad18/