Sunday, 1 May 2022

सखा

 || श्री स्वामी समर्थ ||



एकदा माणूस आपला म्हंटला कि त्याच्या चांगल्या वाईट गुणांसकट तो स्वीकारता आला पाहिजे. आपण आपल्याकडून मनाची सगळी द्वारे खुले करून मैत्रीचा हात पुढे करतो .पण समोरच्याचे गणित काहीतरी वेगळेच असते. त्याला आपल्या इतकीच मैत्रीची कळकळ असतेच असे नाही. कालांतराने आपल्याला त्यातील अनेक गोष्टी जाणवू लागतात आणि तिथेच आपल्या नात्याला जणू सुरुंग लागतो . लपवा छपवी , अर्धसत्य , सहज सांगता येणारी एखादी गोष्ट न सांगणे ह्या गोष्टींचा प्रत्यय आला कि माणूस मनातून उतरत जातो आणि एकदा उतरला कि काहीही झाले तरी पुन्हा तो जागा घेऊ शकत नाही. ज्या नात्यात आपण प्रेम आणि ओलावा जपला ते क्षणांत शुष्क होऊन जातो .

अंतर ठेऊन वागणारे कधीच आपले नसतात . नात्यांमध्ये असलेला दिलखुलासपणा , मोकळेपणा म्हणजेच मैत्री अशी साधी सुटसुटीत व्याख्या मला रुचते पटते. बरेच वेळा आपणच ह्या सगळ्याला कारणीभूत असतो हेही विचारांती पटते. आज कामाशिवाय लोक आपल्याला जवळ करत नाहीत हे अनुभव सगळ्यांनाच रोज येत असतील मग खूप अपेक्षा समोरच्या व्यक्तीकडून ठेवणे हे चूकच आहे . प्रत्येक जण आपल्या निकट येयीलच असे नाही , आपल्याकडून आपण समोरच्याला ज्या पातळीला स्वीकारतो त्याच सारखे समोरचा स्वीकारेल असेही नाही.

थोडक्यात काय तर अनेक अपेक्षांनी आपण हि मैत्रीची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच चुकत जातो. समोरची व्यक्ती आपल्या मैत्रीकडे कुठल्या दृष्टीने बघत आहे हे समजून न घेता आपण त्याला आपल्या अगदी जवळचा मित्र किंवा मैत्रीण मानायला लागतो ह्यात त्याची काहीच चूक नाही . आणि मग हे भावनिक नाते जे फक्त आपल्याच पुरते असते ते आपल्याला त्रासदायक होते , अपेक्षाभंगाचे दुक्ख पदरात टाकते .

ह्या सगळ्याचे मूळ अर्थातच वाजवी पेक्षा केलेल्या अपेक्षा आणि भावनिक गुंतवणूक . सगळेच आपले खास मित्र होऊ शकत नाहीत .अनेकदा खास मित्र आहेत असे वाटणारे लोक फक्त ओळखीचे ह्याच श्रेणीत राहतात , असतात फक्त ते आपल्याला कळायला उशीर होतो इतकेच. निखळ मैत्री मिळायलाही भाग्य लागते .आजकालच्या काळात ती मिळणे दुरापास्त झाले आहे. जीवाला जीव देणारे , आपले म्हणणारे असे मित्र मैत्रिणी लाभले आहेत त्यांनी त्या नात्याला प्रेमाचे खतपाणी घाला आणि त्याची जपणूक करा . कारण अमुल्य ,अनमोल असा मैत्रीचा ठेवा तुम्हाला मिळाला आहे , खरच तुम्ही खूप भाग्यवान आहात .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment