|| श्री स्वामी समर्थ ||
अक्षय तृतीया . साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त . वऱ्हाड प्रांतात ह्या सणाला अनन्यसाधारण असे महत्व आहे कारण ह्याच दिवशी संत शिरोमणी शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांनी लीला करून आपल्या भक्तांना अध्यात्माचे धडे दिले आहेत . गजानन विजय हा ग्रंथ म्हणजे जीवन कसे जगावे ह्याचे बाळकडू पाजणारा महान ग्रंथ आहे.
गजानन महाराज योगी सत्पुरुष होते . लहान मुलांमध्ये महाराज खूप रमत असत. एकदा महाराजांनी मुलांना चिलीम पेटविण्यासाठी जानकीराम सोनार ह्याजकडून विस्तव आणण्यास सांगितला . जानकीरामाने त्यांची मागणी धुडकावून लावलीच वरती ह्या थोर संत महात्म्याला नको नको ते बोल लावले. तद्पश्च्यात महाराजांनी केलेल्या लीला सर्वश्रुत आहेतच .
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ह्य उक्तीला धरून समाजहितासाठी , समाज प्रबोधन करून जीवन कसे जगावे , समृद्ध करावे ह्यासाठी संतानी मनुष्य देह धारण केला आणि त्यासाठीच अनेक लीला केल्या . वास्तविक ह्या सर्व शक्ती आपल्याला समजण्याच्या पलीकडच्या आहेत . आपल्या अवकलनाच्या पलीकडे असणार्या ह्या सर्व संत विभूतीना माझा साष्टांग दंडवत .
खरतर महाराजांना चिलीम पेटविण्यासाठी विस्तवाची गरजच नव्हती हे मी वेगळे सांगायला नको .बंकट लालाने नुसती काडी चीलीमी समोर धरली आणि चिलीम पेटली. इतकी अद्भुत , अमर्याद शक्ती असणार्या महाराजांनी जानकीराम सोनाराकडून विस्तव आणण्यास का सांगितला असेल हि विचार करण्यासारखी गोष्टी आहे. जानकीरामाचे चिंचोके नासले आणि त्याला एका क्षणात उपरती झाली , अहंकार गळून पडला आणि तोच क्षण त्याचे आयुष्य संपूर्णपणे बदलण्यासाठी कारणीभूत ठरला. क्षणात महाराजांना शरण गेला आणि भक्तिमार्गावर मार्गस्थ झाला आणि त्याच्या आयुष्याचे सोने झाले .
तुम्हा आम्हा सर्वांच्याच आयुष्यात असा एखादा क्षण किंवा प्रसंग येतो ज्यामुळे आपल्यात कात टाकल्याप्रमाणे परिवर्तन होते.
श्री गजानन विजय हा रसाळ ग्रंथ महाराजांच्या लीलांनी ओथंबलेला आहे. योग साधनेने सर्वांगातून काटे काढणे असुदे किंवा एक तपाहूनही अधिक काळ रखरखीत विहीर जलमय करणे असो . अश्या अगणित लीला मनुष्य कल्याणासाठीच त्यांनी केल्या आहेत . त्यांच्या प्रत्येक लीलेत खोल अर्थ दडलेला आहे.
आपले सद्गुरू आपल्या सोबत जन्मोजन्मी आहेतच . ह्या आयुष्यात ते भेटायची वेळ निश्चित असते .ज्या क्षणी ते भेटतात त्यावेळी आपल्याला गुरुकृपा झाल्याचा अनुभव मिळतो. आपल्या निष्ठा त्यांच्या चरणाशी वाहिल्या ,त्यांना सर्वस्व अर्पण केले ,तनमनाने त्यांना शरण गेलो तर त्यांचे अस्तित्व आपल्याला जाणवू लागते .महाराजांचे अस्तित्व चराचरात आहे . महाराजांच्या सेवेत राहिले कि जळी स्थळी सद्गुरूंचे अस्तित्व जाणवू लागते , भास आभास होऊ लागतात , त्यांच्यासाठी काय करू आणि काय नको असे होऊन जाते . जितकी आपली भक्ती सोळा आणे खरी तितके अनुभव प्रचीती येऊ लागते आणि जीवन गुरुमय होऊन जाते. सगळा संसार ,केलेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या चरणी अर्पण केल्याचे धाडस अंगी बाळगले तर आपल्याला अहंकाराचा वाराही लागणार नाही . कारण अहंकार यायला मज पामरा जवळ काही उरतच नाही.
महाराजांना काय अशक्य आहे? आपल्या लीलांनी त्यांना अनेक गोष्टी सहज साध्य करता येत असूनही महाराज जेव्हा त्या आपल्याकडून करवून घेतात तिथेच ते आपल्याला अध्यात्म मार्गातील मोठे धडे देत आहेत हे भक्तांना समजले पाहिजे . कुठल्याही गोष्टीत आपण गुंतत चाललो आणि ती गोष्ट जर आपल्या भल्यासाठी नसेल मग एखादी व्यक्ती असो किंवा कुठलेही भौतिक सुख महाराज अश्या काही लीला करतील कि त्याबाबत आपण अगदीच कोरडे होऊन जाऊ आणि परतीचा मार्ग पत्करू . प्रत्यक्ष गोंदवलेकर महाराजांनीही सांगितले आहे कि माझ्या भक्तांची गाडी लाभ भावात म्हणजे अकराव्या स्थानात थांबायला नकोच ती पुढे मोक्षाकडेच गेली पाहिजे . कुठल्याही मोहात भक्तांनी न पडता मोक्षाची कास धरावी हेच तर त्यांना सुचवायचे नव्हते ना .
मनुष्य जन्म मिळणे हे भाग्यच म्हंटले पाहिजे आणि त्यातही सद्गुरू प्राप्ती होणे हे अहोभाग्य . ज्यांना ते लाभले त्यांनी आपला जन्म त्यांच्याच सेवेत राहून सार्थकी लावला पाहिजे. म्हणजे नेमके करायचे तरी काय ? तर आपले आचार विचार आणि दिनचर्या त्यांच्या नजरेच्या कड्या पहार्यात आहे हे समजावे आणि त्यानुसार वर्तन करावे . भक्तिमार्गात जे शाश्वत सुख आहे ते कश्यातच नाही हे अनुभव घेतल्याशिवाय समजत नाही. नाथ , दत्त संप्रदायातील आज लाखो भक्त आहेत .
महाराज आहेत आणि आहेतच ..त्यांच्या अस्तित्वाला आव्हान करणे म्हणजे मूर्तिमंत मूर्खपणा ठरेल. ..ह्या सर्व शक्तींनी मला उठता बसता प्रचीती दिली आहे . हे सर्व लेखन माझे नाही माझ्या हातात फक्त लेखणी आहे . शब्दसंपदा , विषयाची योजना सर्व त्यांचेच आहे . तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचे काम पण त्यांचेच त्यामुळे अर्थात सर्व श्रेय सुद्धा त्यांचेच . इतका भरभरून निर्मळ आनंद त्यांनी प्रत्येक क्षणी दिला आहे त्यामुळे मागण्यासारखे काहीच उरले नाही. तरीही मी सामान्य माणूस आहे त्यामुळे आज त्यांच्याजवळ इतकच मागीन कि “आमरण वारी घडो , अखेरपर्यंत लेखन घडावे , सदैव तुमचे चिंतन राहो , “. हे हट्ट मात्र त्यांनी ह्या लेकीचे पुरवावेत हि मनापासूनची इच्छा आहे.
भक्ती युक्त अंतकरणाने , श्रद्धेने त्यांना हाक मारली तर हा शेगावीचा राणा धावत येणार ह्यात शंका नसावी . महाराजांची सेवा भौतिक सुखासाठी करूच नये कारण ती फोल ठरेल. अहो ज्यांनी आपल्याला जन्माला घातले त्यांच्याकडे काय मागायचे ? जसा हा जन्म सुद्धा त्यांनीच आपल्याला दिला तसेच ते आपल्याला आयुष्यभर आपली ओंजळ कमी पडेल इतके देतच आहेत आणि देतच राहणार आहेत . कुठलाही कल्प विकल्प मनात ठेऊन सेवा करत राहणे , सतत काहीतरी याचना करत राहणे हे उत्तम भक्ताचे लक्षण नाही. इथे निखळ भक्ती नसून व्यवहार आला आणि महाराजांशी व्यवहार उपयोगाचा नाही .
महाराजांशी आपले टेलीपथी सारखे नाते आहे . मध्ये कुणी एजंट नको . हे नाते अनमोल आहे ते तसेच जपले पाहिजे.
महाराजांची सेवा “ अक्षय आनंद “ मिळवून देणारी आहे . त्यांची सेवा आपल्याला गुरुतत्त्वाचा अविष्कार घडवणारी आहे . त्यांच्या चरणांशी जागा मिळणे हे आपले परम भाग्य आहे आणि म्हणूनच आपले जीवन कृतकृत्य झाले आहे. हा परमानंदाचा ठेवा आणि भक्तीचा सुगंध , अनुभवांचे मोती सर्वत्र लुटत राहूया . हा आनंद निर्भेळ आहे अक्षय आहे , सगळ्यातून मुक्त करणारा आणि मोक्षाकडे नेणारा आहे तो जन्मोजन्मी असाच तुम्हा आम्हा सर्वाना मिळूदे हीच महाराजांच्या चरणी विनम्र प्रार्थना .
महाराजांच्या सेवेतील हा पारमार्थिक परमानंद सर्वांच्या जीवनात “ अक्षय “ राहूदे हीच श्रींच्या चरणी प्रार्थना .
गजानना गजानना सांभाळ आपुल्या भक्तजना |
गजानना गजानना शेगावीच्या गजानना ||
समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज कि जय |
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment