|| श्री स्वामी समर्थ ||
शनी ज्याला समजला त्याला आयुष्याचा खरा अर्थ समजला.
सोमवारी सोमवती अमावस्या आणि शनी जयंती आहे. शनी म्हंटले कि लगेच आपण सतर्क होतो ,साडेसाती तर नाही ना आपल्याला म्हणून चिंतीत होतो. शनीबद्दल आपण इतके वाचतो ,ऐकतो आणि पाहतो पण आपल्यात खरच किती सुधारणा करतो हा मिलिअन डॉलर प्रश्न आहे ? शनी देव आपल्याला खरच समजले आहेत का? हे प्रश्न आपण स्वतःला विचारले तर त्याची उत्तरे मिळतील.
शनी हा अत्यंत न्यायी ग्रह आहे तो कुणाचा मित्रहि नाही आणि शत्रू तर अजिबातच नाही. तो पक्षपाती नाही ,त्याला कुणी गटात सामील करून घेऊही शकणार नाही, तो राजमार्गाने च जाणार . अत्यंत निष्ठावान असा हा शनी न्याय करण्यासाठी दंडाधिकारी म्हणून कार्यरत असतो. जो चुकेल त्याला दंड करणे , शासन करणे हेच त्याचे काम आहे आणि तो ते प्रामाणिक पणे करत असतो . म्हणूनच मकर किंवा कुंभ राशीला साडेसातीचा त्रास होत नाही हे सर्व गैरसमज आहेत हे आता लक्ष्यात आलेच असेल. जो चुकेल मग तो कुठल्याही राशीचा असो त्याला शासन हे होणारच . अहंकारानी मदमस्त झालेल्यांना वठणीवर आणणे हेच त्याचे काम. सध्या शनी धनिष्ठा नक्षत्रातून प्रवास करत आहे आणि तिथेच तो 5 जुन रोजी वक्री होत आहे.
आपल्याला शाळेत मार्क कमी मिळाले कि आईबाबा ओरडायचे , दोन धपाटे सुद्धा घालायचे पण आपण त्यामुळेच अभ्यासाला लागायचो. असेच आपण चुकलो तर आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आणि आपण पुन्हा चुकू नये ह्यासाठी शनी सुद्धा त्याची छडी अधून मधून उगारत असतोच तेही आपल्याच भल्यासाठी.
शांतपणे विचार केला तर रोज आपण कितीवेळा चुकतो हे लक्ष्यात येयील. एखाद्याला गृहीत धरणे , दुट्टपी वागणे ,आपल्या स्वार्थासाठी एखाद्याच्या चांगुलपणाचा फायदा करून घेणे , एखाद्याचे पैसे लुबाडणे , अहंकार , आत्मस्तुती , आत्मप्रौढी ह्या गोष्टी अव्याहत पण चालूच असतात . आपण फेकलेल्या चार दमड्यावर जसे काही समोरच्याची चूल पेटणार आहे अश्याच अविर्भावात आपले वर्तन असते. ह्या जगात कुणाचेही काहीही अडत नाही , ज्याचा त्याचा देव त्याला सांभाळत असतो आणि प्रत्येकाची कर्म त्याच्यासोबत हेही तितकेच खरे.
कायिक वाचिक आणि मानसिक सर्व पापे झाली जी अनेक ती माफ कर गुरुराया हे सुंदर विधान श्री गजानन विजय ह्या ग्रंथात दिलेले आहे. खरच वाचेने मनाने आणि स्पर्शाने सुद्धा कुणाला दुखवू नये. प्रत्येकाला ह्या जगात दुक्ख आहे पण कदाचित त्याचे स्वरूप वेगळे आहे.
अंतर्बाह्य पारदर्शक भक्ती ,मनाने स्वछ्य असणारा निष्कपटी भक्त परमेश्वराला आणि शनीदेवाना सुद्धा आवडतो. मनात एक , पोटात एक आणि ओठावर अजून भलतेच हि वृत्ती शनी अजिबात खपवून घेत नाही . काय असेल ते मोकळेपणाने वागा आणि बोलाही . खरे बोलायचे धाडस ठेवा आणि चूक झालीच तर ती मान्य करायचे मोठे मन आणि धाडस सुद्धा ठेवले पाहिजे. पश्चात्ताप झाला तर परमेश्वर सुद्धा माफ करतो .शनीदेवाना दिखावा बिलकुल आवडत नाही . शनी चतुर्थ श्रेणीचा कारक आहे. दिन दुबळ्यांचा कैवारी आहे . असेल हरी तर देयील खाटल्यावरी हे दिवस गेले आता . आळशी माणसाचे तोंड सुद्धा पाहू नये असे महाराज म्हणतात . शेवटी कष्टाची भाकरीच गोड लागते आणि ती मिळवण्यासाठी उभे राहून उत्तम कर्म करायला लागते. कुणाला फसवून आणलेली लक्ष्मी काय लाभ देणार . दुराचार , निंदा शनीला पसंत नाही. फुकटची दुनियादारी , नीच वृत्तीचे राजकारण केलेत , कारण नसताना एखाद्याच्या मनाशी भावनांशी खेळलात तर शनी कुठे फेकून देयील समजणार पण नाही . कुणाच्याही परिस्थितीला हसू नये कारण आपल्याही आयुष्यात पुढील वळणावर काय वाढून ठेवलय माहित नाही. व्यसनांपासून दूर राहणे उत्तम मग ते कसलेही असो.
शनी खर्याच्या मागे उभे राहणारा आहे . कष्ट करा आणि सन्मानाने जगा हाच शनीचा संदेश आहे. दिनदुबळ्यांना वेठीस धरून त्रास देणे, घरातील वृद्धाना त्रास देणे , नको तिथे हीन दर्ज्याचे राजकारण करणे ह्यासारखी नीच कर्म करणाऱ्याना शनी चौदावे रत्न दाखवल्याशिवाय राहणार नाही .
प्रत्येकाचे आयुष्य सुख दुक्ख वेगवेगळी आहेत. आपण इथे एक पाहुणेच आहोत. जन्म आणि मृत्यू च्या मधील काळात उत्तम कर्म करावे इतके तरी आपल्या हातात नक्कीच आहे आणि ते करतानाच आपली वेळ आली कि इथून आपण पुढील प्रवासाला जाणार आहोत.
आपले बोलणे आणि कृती ह्यात मेळ असणे आवश्यक आहे. शनी ज्याला समजला त्याला आयुष्याचा खरा अर्थ समजला असे म्हंटले तर वावगे ठरू नये. प्रपंच करूनच परमार्थ करायचा आहे. नुसता जप ,उपासतापास आणि व्रते करून काहीही होणार नाही तर त्याला उत्तम कर्माची जोडही हवी. आपली कर्मे हीच आपली खरी ओळख असते.
अनेक गोष्टी मनासारख्या न होणे , एकटेपणा जाणवणे , हातातोंडाशी आलेला घास जाणे , अनेक आजार व्याधींनी शरीर ग्रस्त होणे ह्यासारख्या गोष्टी घडायला लागल्या कि समजून जायचे कि शनीमहाराज आपल्या जवळच कुठेतरी आहेत आणि आपण केलेल्या अनेक चुकांची शिक्षा आपणास देत आहेत . शनी मनाचे खच्चीकरण करतो आणि म्हणूनच भल्याभल्यांचा आवाज त्यांना जागीच बसवून तो बंद करतो. हा क्षण आत्मपरीक्षणाचा असतो .
अनेक आजार हि आपल्या दुष्कृत्यांची फळे आहेत ह्यात दुमत नाही . आपली चुकीची आणि वाईट कर्मे अनेक रोगांच्या रुपात एकामागून एक आपल्या समोर उभी राहतात आणि मी असा नी मी तसा हे दिमाखात मिरवणारे आपण हतबल होतो. मोठा डॉक्टर तर शोधाच पण त्या आधी ह्या आजारांचे मूळ शोधले तर आजार लवकर बरा होईल . हे मूळ म्हणजे आपलीच कर्मे हे होय .
विनम्रता , सचोटी , वृद्धांची सेवा शुश्रुषा , प्रामाणिक पणाने कष्टाने केलेली कामे जे करतात त्यांच्यामागे शनी ढालीसारखा उभा राहतो . उद्या शनैश्चर जयंती आहे. कुठल्याही आणि कितीही चुका असुदेत , विनम्रतेने , मनापासून त्या मान्य करून नतमस्तक होऊन त्याला शरण जावूया , त्याच्या चरणावर समर्पित होवुया. शनिदेव कृपाळू आहेत ते नक्कीच आपल्याला माफ करतील आणि मार्गस्थ करतील....
ओम शं शनैश्चराय नमः
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment