Monday, 8 April 2024

कसे आहेत माझ्या पत्रिकेतील ग्रह ?- भाग 1.

 || श्री स्वामी समर्थ ||

आज ज्योतिष शास्त्राचा अभ्यास जगभर अनेक अभ्यासक करत आहेत , रोज नवनवीन शोध सुद्धा लागत आहेत . आज आपण खूप वाचतो (अनेकदा आपल्याला असलेले ज्ञान हे अर्धवट असते हे आवर्जून सांगावेसे वाटते ), ऐकतो आणि आपली मते त्या वरून तयार करतो. आपली पत्रिका म्हणजे जन्मस्थ आकाशात असलेल्या ग्रहस्थितीचे प्रतिबिंब जे बदलत नाही . आपल्या पत्रिकेत शुक्र इथेच का आणि शनी तिथेच का हा अभ्यासाचा विषय आहे कारण ते आपले पूर्व प्रारब्ध आहे. अतिशय मनापासून जर ज्योतिष शास्त्राचा खोलवर विचार आणि अभ्यास केला तर आपल्या आयुष्यातील अनेक गणिते सुटायला निश्चित मदत होईल. एखादी घटना आयुष्यात का घडली ह्याचा मागोवा घेता येयील किंवा भविष्यात काय घडू शकते आणि कधी त्याचा अंदाज येयील . हा अभ्यास अत्यंत सखोल आहे त्यामुळे वरवरचे वाचन इथे चालणार नाही , ह्यात फलादेश चुकण्याचीच भीती अधिक आहे. पृथ्वीपासून कित्येक मैल दूर असणारे ग्रह मानवी जीवनावर परिणाम करत आहेत इथेच आपण त्या ग्रहांची ताकद ओळखून त्यांना सलाम केला पाहिजे. त्या ग्रहांची बोली शिकलो आणि त्यांचे कारकत्व समजून घेतले तर जीवन सुकर होईल. 


व्यक्ती तितक्या प्रकृती त्याप्रमाणे मिथुन राशीचे ह्या आठवड्यातील भविष्य असे आहे हे सगळ्या मिथुन राशी वाल्यांना लागु होईल का तर अर्थात नाही कारण ते मेदनिय भविष्य आहे . प्रत्येकाचे प्रारब्ध वेगवेगळे आहे. प्रत्येक ग्रहाचे थोडक्यात पण महत्वाचे विवेचन करण्याचा प्रयत्न करत आहे त्याप्रमाणे ग्रह तुमच्या पत्रिकेत कसे आहेत हे तुमचे तुम्हालाच समजेल आणि ज्ञानप्राप्ती सुद्धा होईल. 

रवी हा सृष्टीचा निर्माता आहे .पितृसुखाचा कारक आहे. आयुष्य , अधिकार , राजकारण , रक्तदोष , पित्तविकार ,आरोग्य सोने अग्नी तीर्थयात्रा रवीच्या अमलाखाली येतात . रवीचा अंमल हृदयावर आहे. नेत्र तसेच शरीरातील शिरा ह्यावर रविचा अंमल आहे. रवी सर्व प्राणीमात्रांचा प्राणवायू आहे. शरीरातील शक्ती आणि प्रतिकार शक्तीचा कारक रवी आहे. नितीमत्ता , अलौकिक ,ईश्वरभक्ती , उच्च विचार  , सात्विकता ,अंतर्ज्ञान , अंतर्स्फुर्ती , मनाचा खंबीरपणा ,स्पष्टपणे बोलणे ,तर्कशुद्धता , स्थिर स्वभाव , ध्यानधारणा , धैर्य ह्याचा कारक रवी आहे. 

ग्रहमालिकेतील महत्वाचा पिवळाधमक तारा म्हणजेच  “सूर्य” . सुर्यमालीकेत मध्यभागी सूर्य असून त्याभोवती पृथ्वीसकट सर्व ग्रह फिरत असतात .सूर्य स्थिर असतो आणि पृथ्वी फिरत असते म्हणून आपण सूर्य उगवला , सूर्यास्त झाला असे म्हंटले जाते. सूर्य प्रत्येक राशीत महिनाभर असतो. १४ जानेवारीला सूर्य सर्व राशीत भ्रमण करून म्हणजेच एक संक्रमण करून मकरेत येतो ती मकर संक्रांत .सूर्यामुळे आपल्याला ऋतू आणि दिवस , वार ,वर्ष ह्याचे ज्ञान होते . सूर्याचा अंमल पाठीच्या कण्यावर आहे. सूर्यामुळे आपल्याला सूर्याची रास सिंह असून मेष राशीत तो उच्चीचा आणि तूळ राशीत निचीची फळे देतो. सूर्य आपला आत्मा आहे. सृष्टीमधील सजीवतेचा  कारक सूर्य आहे. विचार करा एक दिवस सूर्योदय झालाच नाही तर? असा हा सूर्य एक तप्त गोळा आहे. सूर्य हा ब्रम्हांडाचा आत्मा आहे.सूर्य म्हणजेच राजा .सूर्य चांगला असेल तर व्यक्ती पराक्रमी असते आणि राजकारणात यश मिळवते.

आपल्या उदय आणि अस्तामुळे एकाच दिवसात ३ भिन्न अवस्था दाखवणारा रवी आपल्याला भिन्न राशीतून प्रवास करत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा सुद्धा दाखवतो. चैत्र वैशाखात रवी नेतून मेषेत येतो त्यावेळी पृथ्वी सूर्याच्या निकट आलेली असते म्हणून आपल्याला असह्य उन्हाळा जाणवतो.काही काळाने रवी मेषेतून वृषभेत आणि पुढे मिथुनेत जातो . कर्केत गेल्यावर जणू असह्य उन्हाळ्याचा त्याला पश्चाताप होवून तो धरती आणि सृष्टी जलमय करतो .पुढील प्रवस्त करत कान्येतून तुलेत आपल्या नीच राशीत येतो तेव्हा सृष्टी आणि निसर्ग सुद्धा  आनंदाने डोलू लागतो.


सूर्याच्या भोवती सर्व ग्रह एका कक्षेत आपापल्या गतीने फिरत असतात ज्याला आपण क्रांतीवृत्त म्हणतो . सूर्याचे अस्तित्व अबाधित आहे आणि म्हणूनच तो राजा आहे. आता हा राजा पत्रिकेत चांगला असेल तर अर्थात राजासारखी राहणी , मानमरातब , सरकारी नोकरी , प्रसिद्धी , MBA चे उत्तम प्रशिक्षण , नेतृत्व , सरकारी यंत्रणा , वडिलांचे सौख्य प्राप्त होते . रवी आत्मकारक आहे आणि रवी पत्रिकेत चांगला असेल तर प्रकृती उत्तम असते अनेक आजार बरे होऊ शकतात . मनोधर्य किंवा मनाची उमेद व्यक्तीकडे असते . सूर्योदय झाला कि उजाडते आणि ते आपण आपल्या डोळ्यानीच पाहतो त्यामुळे आपल्या डोळ्यातील तेज दृष्टीचा कारक सुद्धा रवी आहे. सूर्याची आराधना केली , गायत्री मंत्राची नित्य उपासना केली आणि सूर्याला सकाळी अर्घ्य घातले तर सूर्य बलवान होण्यास मदत होते . रवी हा आत्मविश्वास देणारा ग्रह आहे. तो कमकुवत असेल तर कुठल्याही कार्यात यश येणार नाही किंवा आत्मविश्वासात कमतरता भासते आणि असुरक्षित वाटत राहते .  रवीची ऋण बाजू म्हणजे नको तितका पराकोटीचा अहंकार आणि उद्धटपणा . रवी कमकुवत असलेल्या व्यक्तींची जराशी स्तुती सुद्धा त्यांचा अहंकार फुलवते . ग्रह बलवान असेल तर अश्या खोट्या स्तुतीला कधीच भुलणार नाही तसेच टीकेला पण खिलाडू वृत्तीने घेतील.  पण कमकुवत ग्रह जराश्या स्तुतीने व्यक्तीला हवेत नेयील. 


ज्या घरात चंद्र गेला तिथे तुमच्या emotions, मन , भावना गेल्या हे लक्ष्यात ठेवायचे. चंद्र हा शीतल नैसर्गिक शुभ ग्रह सर्वाना हवाहवासा वाटणारा , कवी मनाला भुरळ पाडणारा आहे . चंद्र हा स्वयंप्रकाशी नाही . सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडतो आणि तोच परावर्तीत होवून पृथ्वीवर येतो ज्याला आपण चांदणे पडलेय असे म्हणतो. म्हणजे चंद्रकिरण हे खर्या अर्थाने सुर्याचेच किरण असतात . चंद्र आणि सूर्य जेव्हा पृथ्वीच्या एकाच बाजूला असतात तेव्हा अमावास्या असते आणि पृथ्वीच्या एका बाजूला सूर्य आणि एका बाजूला चंद्र अशी स्थिती असते त्याला पौर्णिमा म्हणतात . पृथ्वी हि वायुरूप अवस्थेतून घनरूप अवस्थेत येताना सूर्याच्या आकर्षणामुळे तिला एक मोठी भरती आली आणि त्यात तिचा एक मोठा भाग तिच्यापासून वेगळा आला जो तिच्याभोवती फिरत राहिला . अशी चंद्राची जन्मकथा आहे. 

आपल्या पत्रिकेत चंद्र ज्या भावात असतो ती आपली जन्मरास असते. चंद्राच्या जन्माच्या अनेक पौराणिक कथा वाचायला मिळतात. चंद्र हा कृष्णपक्षात क्षीण होत जातो . समुद्राला भरती ओहोटी येते ती चंद्रामुळे हा संदर्भ विष्णू पुराणात आढळतो. समुद्रातील पाणी वास्तविक कमी अधिक होत नाही पण चंद्राच्या आकर्षणामुळे तसे वाटते. चंद्राच्या आकर्षणामुळे पाणी ओढलेले दिसते .

भाऊ नसलेली बहिण चंद्राला भाऊ मानून त्यालाच ओवाळते. कालपुरुषाच्या  कुंडलीत चंद्र हे मूळ मानले आहे आणि इतर ग्रह ह्या शाखा आहेत . जर चंद्राचे इतर ग्रहांशी योग चांगले नसतील तर शुक्र गुरु कितीही चांगले असतील तरी काहीही उपयोग नाही. चंद्र हा स्त्री ग्रह आहे. स्त्री हे एक विलक्षण कोडे आहे. 

विश्वाचा गाडा अखंड चालू ठेवण्याचे महान कार्य देवाने स्त्रीकडे सोपवले आहे. अखंड विश्वात जे जे सुंदर आहे पवित्र आहे, मंगल आहे ते स्त्रीमध्ये आहे .रवी हा आत्म्याचा तर चंद्र मनाचा कारक आहे.

मातेचे सुख चंद्रापासून बघतात . प्रेमळपणा , संपत्ती ,नैराश्य , आनंद , शरीरावरील शिरा , शरीरातील जलतत्व ,कुटुंब प्रेम  ,जलाशय , पर्यटन , नौकाविहार , फळे फुले , चांदी ,पेये , फळांचे रस , तसेच घशाचे आजार , स्वादुपिंड , स्तन , लाळ, दमा ह्यावर चंद्राचा अंमल आहे. विसरणे , मानसिक कमकुवतपणा,मेंदूची क्रिया ,पुरुषाचा उजवा तर स्त्रीचा डावा डोळा , वेड, प्रवासाची आवड , तीर्थयात्रा , विवेक स्त्रीसुलभ लज्जा ,गौरवर्ण,अती चंचलता  चंद्रावरून पहिली जाते.

चंद्र मनाची स्थिती दर्शवतो , वनस्पती , पाणी , खाद्यपदार्थ , आई ह्यावर अंमल करतो. पौर्णिमा आणि अमावस्या प्रमाणे मनाची स्थिती सुद्धा आनंदी आणि दुखी असते. मन किती प्रकारे आणि कश्या प्रकारे सतत बदलत राहते हे चंद्राच्या पत्रिकेतील स्थितीवरून ज्ञात होते . चंद्र चांगला असेल तर व्यक्ती कुठल्याही परीस्थित शांत राहून विचार करेल, वेळ बदलण्याची वाट बघेल पण चंद्र कमकुवत असेल तर जराजराश्या गोष्टीनी सुद्धा सगळे घर डोक्यावर घेईल. एखाद्या वेळी ट्रेन उशिरा आली तर व्यक्ती शांत बसून पेपर वाचेल पण एखादी सतत येरझार्या घालेल , १० वेळा ट्रेन आली का ते डोकावून बघत राहील. चंद्र बिघडला तर कश्यातच रस नसतो , व्यक्ती दिशाहीन आयुष्य जगते . चंद्रमा मनसो जातः म्हंटले आहेच . चंद्र कमकुवत असेल तर व्यक्ती मानसिक विकारांना बळी पडते तसेच व्यसनाच्या आहारी सुद्धा जावू शकते .

आज आपण रवी आणि चंद्र ह्या दोन ग्रहांच्या काही छटा पहिल्या . बघा तुमच्या पत्रिकेत हे दोन ग्रह कसे आहेत ? चंद्र आणि रवी कुठल्या भावात आहेत त्यावर राहू केतू शनी मंगल ह्यांच्या दृष्टी आहे का? चंद्र वृषभ राशीत आणि रवी मेष राशीत उच्च फळे देतो. लहानपणापासून डोळ्यांचे विकार दृष्टीदोष आहे म्हणजे रवी कुठेतरी बिघडला आहे अश्या प्रकारे ह्या दोन ग्रहांचा अभ्यास करा. पुढील लेखात पुढचे दोन ग्रह घेवूया .

क्रमशः 


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

1 comment:

  1. Madam tumche likhan khupch margadarshak astata astrology enthusiastic students sathi . Youtube vr guidance or knowledge share karta aale tr amchyasarkhe anek students na guidance Ani shiknyas Adhik protsahan milel .

    ReplyDelete