|| श्री स्वामी समर्थ ||
शौर्य , धाडस म्हंटले कि मंगळ आलाच . वृषभ राशीतून बुधाच्या मिथुन राशीत मंगळ 13 मार्च रोजी प्रवेश करणार आहे. मंगळ म्हणजे पराक्रम आणि बुध म्हणजे बुद्धी ह्या दोघांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही . मंगळ हा उतावळा आणि अविचारी आहे तर बुध डोक्याने , बुद्धीने काम करणारा . पराक्रमाने यश मिळाले कि मनुष्य बुद्धी वापरणे सोडून देतो . सगळे जग आपल्या मुठ्ठीत आल्याच्या अविर्भावात वावरू लागतो आणि तिथेच त्याची उतरण सुरु होते. बळ अहंकाराला खत पाणी घालतो आणि बुद्धीचा नाश होतो ह्याचे उत्तम उदा म्हणजे रावण . त्याउलट बळ आणि बुद्धी ह्याचा सकारात्मक मेळ आपल्याला श्री हनुमान ह्यांच्यात दिसतो. असो .
गोचर स्वतंत्र फळ कधीच प्रदान करत नाही . जातकाच्या मूळ कुंडलीतील ग्रहस्थिती नुसार गोचर फळ देत असते. ज्या जातकांना मंगळाची दशा , अंतर्दशा आहे त्यांना ह्याचा प्रभाव जाणवेल. मिथुन राशी पत्रिकेत कुठल्या भावात येत आहे त्यानुसार आणि अर्थात लग्नानुसार मंगळाची फळे असणार आहेत .मूळ कुंडलीप्रमाणे गोचरीने राहू आणि शनी ज्या भावात आले असतील त्याप्रमाणे गोचर राहू शनी फळे देतील .
मिथुन राशीत मंगळाचे मृग , राहूचे आर्द्रा आणि गुरुचे पुनर्वसू नक्षत्र येते . मंगळाचे गोचर ह्या तिन्ही नक्षत्रातून होणार आहे .
प्रत्येक ग्रह हा संपूर्णतः शुभ किंवा अशुभ नसतो . शनी सुद्धा आता नक्षत्र परिवर्तन करून राहूच्या शततारका ह्या नक्षत्रात जाणार आहे म्हणजेच गोचरीने आपल्या पत्रिकेत कुंभ राशी कुठल्या भावात आहे हे पाहणे आवश्यक आहे तसेच मूळ पत्रिकेतील शनी आणि राहू ह्यासोबत महादशा , अंतरदशा कुठल्या ग्रहाची आहे हे सर्वात महत्वाचे आहे.
निसर्ग कुंडलीत तिसरे स्थान हे बुधाच्याच मिथुन राशीकडे येते आणि तृतीय भावाचे कारकत्व मंगळाकडे . मंगळ भावंडे , पराक्रम , रक्ताचा , बांधकाम क्षेत्राचा कारक आहे . मिथुन हि वायुतत्वाची राशी आणि मंगळ अग्नीतत्व . मंगळावर कुणाचीही दृष्टी नसल्यामुळे त्याची फळे तो संपूर्णतः देणार आहे . पण काहीही असले तरी हि मंगळाच्या मित्राची राशी नाही त्यामुळे थोडे दडपण हा मंगळ देणारच .
कर्क आणि सिंह लग्नाला मंगळ हा योगकारक ग्रह आहे . कर्क लग्नाला मंगळ गोचरीने व्यय भावात आहे त्यामुळे मुलांसाठी खर्च आणि त्यांची चिंता असू शकते . तसेच दशमेश मंगळ असल्यामुळे कार्यक्षेत्रात अनेक आव्हाने असणार आहेत . व्यय भावातील मंगळ खर्च अधिक करवेल. तृतीय स्थानावर ह्या मंगळाची दृष्टी असल्यामुळे वादविवादापासून दूर राहणे उत्तम .
सिंह लग्नासाठी सुद्धा मंगळ योगकारक आहे आणि उपचय भावात आहे. आर्थिक स्थर हा मंगळ सुधारवेल . तूळ लग्नाला मंगळ मारकेश आहे . तरीही मंगळ अष्टम स्थानातून नवम भावात मंगळ म्हणजे त्यातल्यात्यात बरी स्थिती म्हणायची . दूरचे प्रवास होणे, चुकीचे सल्ले मिळतील आणि संभ्रम निर्माण होयील.
प्रत्येक ग्रहाचे गोचर बघताना लग्न कुठले आहे ते महत्वाचे आहे कारण प्रत्येक लग्नाला त्याची फळे वेगवेगळी मिळणार आहेत . माझ्या पत्रिकेत मंगळ अष्टम भावात आल आहे , माझ्या पत्रिकेत मंगळ चतुर्थात आला आहे असे प्रश्न कृपया विचारू नये कारण त्याची उत्तरे पूर्ण पत्रिका तुमची चालू असणारी दश पाहिल्याशिवाय आणि तुमचा सद्य स्थितीतील प्रश्न काय आहे ह्यावर निर्भर राहतील.
बरेच वेळा गोचर भ्रमणाचा फलादेश आपण अविचाराने करतो किंवा संपूर्ण अभ्यास करून नाही देत जसे लग्नी गुरु आला किंवा तृतीय भावात गुरु आला तर त्याची सप्तम भावावर दृष्टी येयील आणि म्हणून विवाह होयील हे भाकीत फोल ठरू शकते. असे भाकीत केले कि जातक तेच धरून बसतो पण प्रत्यक्ष्यात तसे न घडल्यामुळे त्याचा ज्योतिषी आणि पर्यायाने ह्या शास्त्रावरचा विश्वास डळमळीत होतो. घटना घडवण्याचा संपूर्ण अधिकार महादशा स्वामीला आहे. जातकाची दशा विवाह हि घटना देत आहे का हे नको का प्रथम पाहायला मग गोचर बघा . हे सर्व न बघता गुरु लग्नी आला कि विवाह होणार हे सांगणे योग्य नाही . कितीवेळा गुरुचे गोचर भ्रमण लग्नातून सप्तमातून पंचमातून किंवा सप्तमेश आणि शुक्रावरून सुद्धा होते पण विवाह होत नाही आणि अश्यावेळी ज्योतिषाचा खरा अभ्यास सुरु होतो. गोचर ग्रहांचे परिणाम मूळ पत्रिकेला डावलून नसतात .
अनेकदा ग्रह राशी बदलत नाहीत पण नक्षत्र परिवर्तन करतात जसे शनी कुंभ राशीतच आहे पण धनिष्ठा ह्या नक्षत्रातून शततारका मध्ये परिवर्तन करत आहे आणि मंगळ तर खुद्द रासच बदलत आहे .
शास्त्राच्या अभ्यासकांनी मिथुन राशीतील मंगळाचे परिणाम आपल्या जवळ असणार्या जातकांच्या पत्रिकेतून अभ्यासावेत म्हणजे कुठल्या लग्नाला ह्या मंगळाने काय फळ दिले ते समजेल . त्याचप्रमाणे शनीचे राहूच्या नक्षत्रातील भ्रमण सुद्धा अभ्यासपूर्ण असणार आहे .
संकलन : अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment