Monday, 6 March 2023

लग्न भाव ( महाद्वार )आणि लग्नेश

 || श्री स्वामी समर्थ ||


लग्न भाव ज्याला आपण तनु स्थान म्हणतो ,पत्रिकेतील सर्वात महत्वाचा भाव आहे. जन्माच्या वेळी उदित असणारी राशी , त्या राशीचा स्वामी तसेच लग्ना तील ग्रह ह्या सर्वच एकत्रित परिणाम जातकाची बुद्धी , सोच , शरीर , स्वभावावर होतो . म्हणूनच ह्या स्थानाला महाद्वार म्हंटले आहे ज्यातून चांगल्या वाईट गोष्टी , सद्गुण , वासना अश्या असंख्य गोष्टींचा प्रवेश होत असतो . लग्न म्हणजे तुम्ही स्वतः आणि तुमचा वर्तमान . पंचम भाव आपल्या मागील जन्माचा आरसा असेल तर नवम भाव आपल्या पुढील जन्माचे द्योतक आहे. लग्न भाव म्हणजे जातक स्वतः म्हणून त्यावरून त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण , वेळप्रसंगी कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची वृत्ती , बुद्धी विचार , आशावाद , मनाचा कल , आवडी निवडी , रोग प्रतिकारक शक्ती , सवयी , आयुष्यातील यशापयश , आचरण , नेतृत्व गुण , कर्तुत्व , शौर्य ह्या गोष्टींचे ज्ञान होते .

लग्नातील राशी महत्वाची आहे . लग्नात अग्नी तत्वाची असेल तर व्यक्ती स्वाभिमानी , विपरीत स्थित सुद्धा मार्ग काढणारा , लढणारा आणि काहीतरी मिळवण्याची इच्छा असणारा आणि त्यासाठी प्रयत्नशील राहणारा असतो कारण अग्नीतत्व वरती जाणारे आहे. क्लार्क म्हणून नोकरी मिळाली तर अधिकारी पदासाठी परीक्षा देतील अधिक मेहनत करतील .

लग्नात पृथ्वीत्त्वाच्या राशी म्हणजे वृषभ , कन्या , मकर आल्या तर एखादी गोष्ट धरून ठेवणाऱ्या असतात . मी माझे आणि माझा फायदा .  त्याउलट वायूतत्व असेल तर सोडून देणे ,कारण वायू काश्यालाही चिकटत नाही , बुद्धिमान असतात . लग्नात जलतत्व असेल तर जातक संवेदनशील असतो .

लग्न भावाचे प्रत्येक भावाशी अतूट नाते आहे. कारण हे उर्वरित 11 भाव जातकाच्या आयुष्याशी निगडीत आहेत . लग्न भावाचा अधिपती त्याला आपण “ लग्नेश “ म्हणून संबोधतो . लग्नेश लग्नात असेल तर प्रकृती आणि आत्मविश्वास उत्तम असतो . 

लग्नेश षष्ठ भावात असेल तर स्वतःच्याच चुकीच्या विचारांनी जातक स्वतःचे आजन्म नुकसान करत असतो . लग्नेश त्रिक स्थानात त्रासदायक असतो . लग्नेश व्ययात असेल तर जातक जन्मस्थानापासून दूर जाण्याची शक्यता असते आणि तिथेच त्याचा भाग्योदय सुद्धा होतो .

लग्न भाव अनेक प्रकारे विचारात घेतला जातो जसे पंचमाचे भाग्य म्हणजे लग्न भाव . पंचमापासून लग्न नवम स्थानात येते म्हणून मुलांचे भाग्य तुमची घडवायचे आहे. भाग्याचे पंचम लग्नभाव .

लग्न भाव लग्नेश आणि त्यातील ग्रह बोलके असतात , हा भाव बिघडला तर अपयश , निराशा , पदरी पडते . लग्नेश बलवान असणे अत्यंत आवश्यक असते अन्यथा प्रगतीचे सर्व मार्ग खुंटतात . लग्नातील ग्रहांचे सुद्धा फलादेशात योगदान असतेच . लग्नात शुक्र असेल तर व्यक्ती आनंदी असते , सुंदर दिसणे , गालाला खळी पडून खळखळून मोकळे हसून बोलणे , सकारात्मक विचारसरणी असते . लग्नात शनी असेल तर गालफडे बसलेली असतात , एकंदरीत चेहऱ्यावर निराशा असते . हसायला सुद्धा पैसे पडतील असे किंचित हसतील . लग्नी चंद्र असता चेहरा गोल आणि चेहऱ्यावर आद्रता अधिक असते . लग्नात राहू असता व्यक्तीच्या डोक्यात सदैव विचारांचे काहूर आणि चलबिचल असते, हाव हा राहूचा स्थायीभाव आहे . केतू असेल तर खूप चांगले इंटूशन असते . लग्नी मंगळ असता व्यक्ती लालगोरी पण तापट स्वभावाची जिद्दी , धडाडी असणारी असते . लग्नातील नेप व्यक्तीला गूढ गूढ बनवतो , काय चालले आहे त्यांच्या मनात समजत नाही इतके गूढ व्यक्तिमत्व असते .

लग्नेश कुठल्या नक्षत्रात आहे तसेच कुठल्या नवमांशात आहे हे महत्वाचे आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही . प्रत्येक भाव आणि त्यातील ग्रह ,ग्रहांची नक्षत्र हे सर्वच आपल्या जीवनावर परिणाम करत असतात आणि ह्या सर्वचा एकत्र अभ्यास आपल्याला फलादेशापर्यंत नेत असतो.

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230




No comments:

Post a Comment