|| श्री स्वामी समर्थ ||
महाराजांच्या सेवेत अगदी कालपरवा रुजू झालेला प्रत्येक भक्त प्रचीतीसाठी जणू तळमळत असतो. एखादे पारायण केले, पूजा आर्चा झाली , थोडे नाम घेतले कि महाराज लगेच आपली दखल घेतील किबहुना आपली मनोकामना पूर्ण करतील हि भावना मनात असणे हे निष्काम भक्तीचे लक्षण नाही .
त्यांच्यावरील उत्कट प्रेमाने नाम घेत राहा ,तुम्हाला काही मागायची गरजच राहणार नाही इतके भरभरून सुख तुमच्या ओंजळीत ते टाकतील. गुरुसेवेचे फळ हे आसमंता सारखे आहे . आपल्याला काय झेपेल पेलवेल ते त्यांना माहित आहे आणि आपल्या भक्तीची किती खोली आहे हेही ते जाणतात त्यामुळे काही मागायची गरजच उरत नाही. आपल्या नामस्मरणाची शिदोरी दिवसेगणिक वाढवत नेणे हेच आपल्या हाती आहे.
महाराजांनी प्रचीती द्यावी असे वाटणे म्हणजे महाराजांनी नेमके काय करणे अपेक्षित आहे ? शेवटी प्रचीती प्रचीती म्हणजे तरी काय ? आपल्याला महाराजांचे प्रत्येक क्षणी स्मरण आहे, त्यांच्याविना एकेक क्षण युगा इतकं वाटणे , त्यांच्या नुसत्या स्मरणाने डोळ्यातून अश्रू येणे हे सर्व प्रचीतीपेक्षा वेगळे आहे का? आपण आणि महाराज आता वेगळे राहिलो नाही इतके ते आपल्यात सामावून गेले आहेत आणि हि भावना हीच तर सर्वश्रेष्ठ प्रचीती आहे. महाराजांचे अस्तित्व पदोपदी जाणवत राहणे हीच खरी प्रचीती .
महाराजांच्या सेवेमुळे आपले आयुष्य संपूर्णतः बदलले आहे . मागणे कमी होत आहे आणि देण्यात वाढ होत आहे. आता काहीच नको असे वाटू लागते आणि चित्त त्यांच्या चरणाशी एकाग्र होत आहे. आयुष्यातील संकटाना सामोरे जाण्याची ताकद आणि त्यातून पुन्हा उभे राहून नव्याने काहीतरी करण्याची हिम्मत तेच देतात आपल्याला.
अध्यात्मात “ मी” ला अजिबात स्थान नाही . अहंकाराचा त्याग केल्याशिवाय माऊलींची पाऊले दिसणार नाहीत . अहंकाराचा लवलेश असणारे भक्त आयुष्यभर सेवेत राहिले तरी गुरुकृपेपासून वंचित राहतील. वर्षानुवर्ष महाराजांच्या सेवेत राहून सुद्धा आयुष्यात काहीच बदल का झाला नाही उलट अधोगतीच झाली आहे ,ह्या सगळ्याची उत्तरे आपल्याच जवळ आहेत फक्त अंतर्मुख होऊन आपल्याला ती शोधायची आहेत . नुसती माळ घेतली पोथी वाचली कि अध्यात्म समजत नाही , ह्या अनाकलनीय शक्तीना तनमनधनाने शरण गेलो तर काहीतरी घडेल . मनाच्या गाभ्यातून त्यांना हाक मारली तर ते येणारच येणार , त्यांच्याशी होत जाणारी एकरूपता सच्चीतानंद देणार आणि समाधानाच्या उत्तुंग शिखरावर आपण विराजमान होणार . त्यांचे असणे आणि नसणे जेव्हा एक होते तेव्हा कुठे आपल्याला त्यांचे अस्तित्व जाणवू लागते , त्यांच्यावरील विश्वास वाढतो आणि सेवेतून आनंद मिळतो.
कर्ता करविता वरती बसला आहे आणि सर्व श्रेय त्याचेच आहे. आपण निरंतर त्याच्या भक्तीत राहणे हेच आपले काम. आपण कोण देणारे आणि घेणारे म्हणूनच मी हे केले मी ते केले ह्याचा सर्वार्थाने त्याग केला पाहिजे . कुठल्याही धार्मिक सत्कृत्याचा अहं असू नये अन्यथा सर्व फोल आहे. हा “ मी “ म्हणजे धोक्याची घंटा आहे . ह्या “ मी “ पणामुळेच मनुष्य 84 लक्ष योनीतून फिरत राहून पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो . मोक्षाला जायचे असेल तर स्वतःला ह्या “ मी “ च्या विळख्यातून मुक्त करता आले पाहिजे .
अहंकार कि गुरुकृपा .....हा आपला चॉईस आहे....नाही का ??
आज गुढी पाडव्याच्या शुभ दिनी “ अंतर्नाद “ ह्या ब्लॉग वरती हा 300 वा ब्लॉग लिहित आहे ही गुरुकृपा नाहीतर अजून काय ? सर्व वाचकांचे मनापासून आभार कारण तुमच्या प्रोत्चाहनामुळे मी हि वाटचाल करू शकले . श्री स्वामी समर्थ .
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment