||श्री स्वामी समर्थ ||
गुरुकृपा हा खरा राजयोग आहे पण गुरुकृपा झाली आहे हे ओळखायचे कसे ? गुरुकृपा झाल्यावर आपल्यात अंतर्बाह्य काय परिवर्तन होते ? ह्यावर विचारमंथन आवश्यक आहे. परमेश्वराने आपल्याला ह्या भूमीवर कर्म करायला पाठवलेले आहे आणि पूर्व संचीताप्रमाणे आपल्याला आयुष्य सुद्धा प्रदान केले आहे. आपल्या आयुष्यात आपल्याला सद्गुरू भेटणे हा सुद्धा पूर्व संचीताचाच एक भाग आहे. ह्या जन्माचे संचित हे पुढील जन्माचे पूर्वसंचीत असणार आहे त्यामुळे ह्याजन्मी पूर्व संचित कमी पडले तरी ह्या जन्मीच्या चांगल्या कर्माचा संचय करून ह्या आणि पुढील जन्मासाठी संचित करता येयीलच कि .
महाराजांचा प्रगट दिन , गुरुपौर्णिमा हे दिवस त्यांची आठवण काढायचे नाहीत ती तर क्षणोक्षणी आहेच पण ह्या दिवशी त्यांच्या आशीर्वादाचे धनी होण्यासाठी सेवेत राहायचे आहे इतकेच निदान मला तरी समजते . प्रापंचिक दुक्खापासून कुणीच सुटलेला नाही ती येतच राहणार कधी आर्थिक संकटे तर कधी शारीरिक व्याधी , कधी अपेक्षाभंग ,काहीना काही होतच राहणार पण काहीही झाले तरी नामस्मरण सोडायचे नाही . हे नामच सर्व दुक्खावर रामबाण उपाय आहे . अगदी जालीम औषध म्हणा ना . पण आपण दुनियाभरच्या डॉक्टरांकडे जातो पण नाम मात्र घेत नाही कारण ते तितकेच कठीण आहे. पण एकदा त्याची गोडी लागली कि मग “ आत्मरंगी मन रंगले..” अशीच अवस्था मनाची होऊन जाते.
भौतिक सुखे म्हणजे गुरुकृपा खचितच नाही अर्थात त्याकडे मनुष्याचा अधिक ओढा असतो आणि ते स्वाभाविक आहे. गुरुकृपा म्हणजे आत्मिक समाधान . प्रत्येकाची समाधानाची व्याख्या वेगवेगळी आहे . व्यक्ती तितक्या प्रवृत्ती . कोण कश्यात समाधान मानेल सांगता येत नाही .
आयुष्यात अनेकदा अश्या घटना घडतात कि असे वाटते अरे हे इतके सुख पदरात पडले आहे , माझी खरच पात्रता आहे का हे घ्यायची ? अश्यावेळी महाराजांच्याकडे पाहिले तर बघा ते खुदकन हसत असतात कारण हे सुख त्यांच्याच कृपेने पदरात पडलेले असते . महाराजांचे वचन आहे “ अशक्य हि शक्य करतील स्वामी “ . अनेकदा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज घडून जातात आपल्याही नकळत . कर्ज मिळणे , मनासारखी नोकरी , मनासारखा विवाह होणे अश्या अनेक मनुष्याच्या मनातील इच्छा सहज प्राय होण्यासाठी महाराजांचा वरदहस्त लागतोच लागतो. एखादा दुर्धर आजार गुरुकृपेने सहज बरा होतो तर कधीकधी मोठ्या अपघातातून सुद्धा आपण सहीसलामत बाहेर येतो.
प्रारब्ध भोग हे ज्याचे त्यालाच भोगावे लागतात पण गुरुकृपा असेल तर त्याचा दाह कमी होतो , दुक्ख सहन करायची ते
पेलायची आपली मानसिक ताकद आणि कुवत कित्येक पटीने वाढते.
जेव्हा सर्वत्र अंधार होतो तेव्हा त्यांचे राज्य सुरु होते आणि तिथे अशक्य काहीच नसते. शेवटच्या क्षणाला होत्याचे नव्हते होते , आपली नय्या पार होते आणि तीच गुरुकृपा असते . प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सुद्धा आपले पाय जमिनीवर ठेवणे हीच खरी गुरुकृपा आहे .
सर्व सुखाची साधने पायाशी नसतानाही जो समाधानाच्या उच्च शिखरावर राहतो , आत्मिक आनंद अनुभवतो , ना मोह ना क्लेश , सगळ्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या चरणावर आपले सर्वस्व वाहतो आणि समाधानी राहतो त्यावर “ गुरुकृपेचा “ अखंड वर्षाव होत असतो .
समाधान हे मिळवावे लागते आणि ते मिळाले कि कश्याचीच उणीव भासत नाही . जगाकडे आणि स्वतःच्याही आयुष्याकडे त्रयस्थाच्या नजरेतून पाहण्याचा असामान्य दृष्टीकोण लाभतो हीच गृरुकृपा आहे. ना मोह ना द्वेष कश्याचाही लवलेश मनाला शिवत नाही . गुरुकृपेची अवीट गोडी चाखणारा समाधानाच्या शिखरावर विराजमान होतो. तुम्हा आम्हा सर्वांवर गुरुकृपा अखंड बरसत राहूदे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना .
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment