Monday, 17 July 2023

अधिक मास - अधिकस्य अधिकं फलं

 || श्री स्वामी समर्थ ||



अधिक मासाची महती आपल्या सर्वाना माहिती आहे . ह्या महिन्यातील उपासना साधना ह्यांना अनन्य साधारण महत्व आहे. आपण सगळे ऐकतो वाचतो आजकाल तर सोशल मिडिया आपल्याला इतके प्रगल्भ ज्ञान देत आहे हि चांगलीच गोष्ट आहे पण त्यातील आपण किती आत्मसात करतो हा प्रश्न स्वतःलाच विचारून बघा. मला हे करायचे आहे ते करायचे आहे पण वेळ नाही . ज्यांना करायचे आहे ते करायला सुरवात करतात आणि ज्यांना करायचे नाही ते कारणे सांगतात . पटतंय का?

मी तर माझी साधना कालपासूनच सुरु केली कारण काल गुरूचेच पुनर्वसू नक्षत्र होते. आज तर शनी महाराजांचे सुबगचित्त पुष्य नक्षत्र आहे.  मोक्षाकडे वाटचाल करणारे हे दोन्ही महान ग्रह त्यांना माझा साष्टांग दंडवत . आयुष्यातील अनेक त्रास , संकटे ह्यावर जालीम रामबाण एकमेव उपाय म्हणजे अध्यात्म. नामस्मरण , ग्रंथ वाचन . 


आज धकाधकीचे आयुष्य आरामदायी नाही उलट त्रासदायक आहे. घड्याळ्याच्या काट्यावर जगतोय आपण ,जीवाला कश्याचीही उसंत नाही आहे आपल्या . सकाळी 8 ची लोकल पकडायची घाई आणि आल्यावर शरीरात त्राण नाही इतकी दगदग . पण तरीही आपल्याला जगणे थोडेच सोडून द्यायचे आहे ते सुकर कसे करायचे तर ध्यानधारणा , नामस्मरण. 

कल करे सो आज और आज करे सो अब...असे काहीतरी आहे कारण माझे हिंदी अगाध आहे. असो त्यातील मतितार्थ घ्या .एक क्षण सुद्धा फुकट घालवायचा नाही . स्वतःला विसरून आपल्या गुरुचरणी समर्पित व्हायचे हाच घ्यास मनी घेणे . सगळा संसार त्यांच्यावर सोडून द्या. हे सोन्यासारखे क्षण तुमच आमच आयुष्य सोन्यासारखे करणारे ठरतील ह्यात संदेह नको.

अधिक श्रावण किंवा श्रावण मग मी श्रावणात उपासना करू कि अधिक मासात ...पुरे झाले ते प्रश्न आता ... सुरवात करा .आजचे उद्यावर कश्याला ढकलायचे ...मनापासून करायचे आहे ना? मग मला हि साधना करायची आहे हा विचार मनात येतो तोच आयुष्य बदलणारा सुमुहूर्ताचा क्षण असतो.


आयुष्यातील त्रास , संकटे सगळे बाजूला ठेवा आणि त्या संकटांच्या डोंगरा पेक्षा कित्येक पटीने अधिक महान असणार्या आपल्या सद्गुरूंचे नाम घ्या. त्यांच्या चरणाला घट्ट धरून ठेवा. आणि अधिक मासच कश्याला जोवर जीवात जीव आहे तोवर मिळालेल्या ह्या मनुष्य जन्माचे सार्थक करा. आपल्या गुरुना आपला अभिमान वाटेल असे जीवन घडवा , जीवनाला  अध्यात्माची झालर लागली तर जीवनाला चार चंद लागतील....अनुभव घेवून बघा .


उपासना उपाशी राहून करायच्या नाहीत . आपल्या पोटात पेटलेला महा यज्ञ म्हणजेच भूक त्याला आहुती देणे म्हणजे घास भरवणे हे सर्वाधिक महत्वाचे आहे . भरल्या पोटीच सर्व गोष्टी सुचतात , आपण नाही तर आपले वीतभर पोटच आपल्याला काम करायला लावते .तेव्हा पोटाला तड लावून केलेले अध्यात्म फळ देयील का?  साई बाबांनी सांगितलेले आहे आत्मा तळमळत असेल तर उपासना सुद्धा फळणार नाही . अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही कित्येक वर्ष उपवास करत आहोत मग करा काही हरकत नाही . किती आत्मीयतेने उपासना करता त्याला महत्व आहे. 


उपासना /साधना 

आपल्या कुलस्वामिनीचा जप 

5 शुक्रवार / मंगळवार देवीची ओटी ( पहिल्या 4 घरातील देवघरातील देवीच्या आणि 5 वी जवळच्या मंदिरात जाऊन भरायची ) श्रीफळ, साधा टॉवेल घ्या आता खण कुणी वापरत नाही  तांदूळ , वेणी गजरा , हळद कुंकू , साखर गुळ , डाळिंब ( देवीला आवडते) किंवा कुठलेही फळ घ्या. एका ताटात ठेवुन त्याला हळद कुंकू लावा आणि देवीला गाऱ्हाणे घाला नतमस्तक व्हा. धूप निरांजन नेवैद्य जसे जमेल तसे करा . दुसर्या दिवशी हे सर्व घरात वापरायचे . 5 वी ओटी देवळात जाऊन भरा . 

विष्णूचा जप – ओं नमो भागवते वासुदेवाय / ओं विष्णवे नमः विष्णू सहस्त्रनाम 

हनुमान चालीसा , श्री सुक्त पठन , देवी महात्म 

स्वामी समर्थ किंवा तुमच्या गुरुंचा जप करा. जपासाठी माळ नाही घेतली तर उत्तम जप श्वासागणिक करावा. जप जा गुरूंच्या बद्दलचे प्रेम व्यक्त करण्याचा आणि आपल्या जीवनाचा आधार वाट्याचा मार्ग आहे. काहीतरी मिळवण्यासाठी जप नको.

श्री गजानन विजय ग्रंथ , साई चरित्र , गुरूलीलामृत अश्या धार्मिक ग्रंथांचे नित्य पठण 

महादेवाला अभिषेक , लघुरुद्र , श्री सत्यनारायण पूजा 

अश्या अनेक उपासना पुढील दोन महिन्यात करता येण्या सारख्या आहेत . ज्याला जसे जमेल तसे करावे पण करावे हे महत्वाचे आहे .आपल्या प्रपंचाची घडी नीट बसेल , संकटातून मार्ग सापडतील. मन शांत होयील , ईश्वरचरणी चित्त एकाग्र होयील . अध्यात्म हा जीवनाचा मोठा आधार आहे . 

अध्यात्माची गोडी ज्याला लागली त्याचे जीवन सुफळ संपन्न झाले असे म्हणायला हरकत नाही. 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

 

 


No comments:

Post a Comment