|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार ,
ज्योतिष शास्त्र हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ज्योतिष आपण आपल्या रोजच्या जीवनात जगत असतो . नभातील तारे तारका आपल्याला खूप काही देत असतात . निसर्ग नुसताच रंगाची उधळण करत नाही तर आपले जीवन सुद्धा अनेक रंगांनी आणि अनुभवांनी भरून टाकतो . ज्योतिष शिकायचे असेल तर रोजचे जीवन डोळसपणे जगले पाहिजे .आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अगदी आपल्या जवळच सापडतील तुम्हाला.
शास्त्र अनुभूती देणारे आहे . शास्त्राच्या अभ्यासाने आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावतात , विचार एकसुरी न राहता त्याला योग्य दिशा मिळते , चिंतन मनन करायची सवय लागते .प्रत्येक व्यक्तीमध्ये ग्रहाचा आणि नक्षत्राचा अविष्कार आहे. कुठला ग्रह आपल्याला काय देयील आणि कधी देयील हाच तर अभ्यास आहे . ह्या सर्वांसाठी अजून एक घटक मदत करतो ते म्हणजे “ उपासना “ , अर्थात त्याशिवाय सर्व फोल आहे .
शास्त्राचा अभ्यास सुरु झाला कि आपल्या भोवती सर्व ग्रहांनी फेर धरलाय असाच भास होत रहातो , अभ्यासू दृष्टीकोण तयार होतो . मग सुंदर स्त्री रस्त्यात किंवा प्रवासात दिसली तर लगेच आपले विचार मंथन सुरु होते . हिचा चेहरा सुंदर आहे केशसंभार अप्रतिम मग कुठले लग्न असेल , गालाला खळी पडतेय मग शुक्राचा प्रभाव तर नसेल लग्नावर . एखादा सडपातळ उंच सावळे व्यक्तिमत्व शनीप्रधान असेल का? आपले नातेवाईक , आप्तेष्ट , मित्र सगळ्यांचे चेहरे आणि वृत्ती समोर येतात आणि अभ्यासाला दिशा मिळते. एखादी व्यक्ती कायम गुटगुटीत असेल तर मग लग्नात गुरु आहे का? एखादा पैसा खर्च करत नसेल तर त्याच्या धन स्थानावर शनीची दृष्टी आहे का ? कि धनेश स्थिर राशीत आहे. कारण अश्या लोकांकडे धनाचा संचय करण्याची वृत्ती असते . मंगळ हा उधळपट्टी करणारा ग्रह जर व्यय भावात असेल तर व्यक्ती खर्चिक असते . घुमे किंवा कमी बोलणारे, सगळी लपवा छपवी करणारे वृश्चिक राशीचे असतात ..
एखाद्याचे वाहन , राहते घर सुखासीन असेल तर चतुर्थेश चांगला असणार . चतुर्थात सुद्धा शुभ ग्रह असणार . उत्तम लिखाण आणि व्यासंग असेल तर बुध गुरु शुभ असतील. सतत आरोग्याच्या तक्रारी असतील तर रवी बिघडला असेल का? लग्नात नेप असेल तर व्यक्तिमत्व गूढ गूढ असते . रवी बुध आणि तृतीय स्थान उत्तम वक्ता जन्माला घालतो , गुरु व्यासंगी तर शनी न्यायी बनवतो . दशम स्थानात चंद्रासारखा ग्रह असेल तर व्यक्ती अनेकदा नोकरीत बदल करतेय का? अश्या प्रकारचे ग्रहांचे फलादेश तपासून बघता येतात . एखाद्या मित्राच्या विवाहाला विलंब होत असेल तर मग शनी तिथे कार्यरत आहे का? संतती होत नसेल तर पंचमेश त्रासदायक असेल का . एखादी व्यक्ती हातवारे करून , टाळ्या देवून बोलत असेल तर बुधाचा नक्कीच प्रभाव असणार , वयापेक्षा कमी वयाची दिसत असेल तरीही बुधप्रधान व्यक्ती असणार अशी निरीक्षणे आपण अपोआप करायला लागतो आणि ह्यातूनच शास्त्र उलगडत जाते , अनुभूती मिळाली कि नियम बरोबर आहे ह्याची प्रचीती मिळते . रवी शनी प्रतियोग वडिलांच्या बाबत काहीतरी वेगळेपणा देतो , पितृसुखाची हानी करणारा हा योग आहे . एखादी धार्मिक व्यक्ती असेल तर तिचा गुरु चंद्र शनी केतू कसे असतील , एखादा शेअर मार्केट मध्ये काम करणारा मित्र आहे मग त्याचे पंचमस्थान कसे असेल राहू कुठे असेल अश्याप्रकारे विचार मंथन लगेच सुरु होते . कोण मितभाषी आहे आणि कोण उत्तम वक्ता आहे तर कोण अघळपघळ बोलतय ह्या नोंदी सुरु होतात . शास्त्र शिकायला लागल्यापासून आपण लोकांचा अभ्यास करायला लागतो , त्यांना समजून घ्यायला लागतो . एखाद्या प्रसंगात व्यक्ती अशी का वागली त्याचा शोध घ्यायला लागतो .
अमुक एका काळात सर्वार्थाने भरभराट झाली आणि अमुक एक कालावधी फार सुखाचा गेला नाही . परदेशी जाण्यासाठी विजा कधी मिळाला नाही आणि प्रमोशन कधी मिळाले . विवाह कधी ठरला आणि झाला . आपल्या घरात अनेक धार्मिक कार्य होत आहेत कि नाही ? कि दारात कधी साधी रांगोळी पण नाही . घरात उंची फर्निचर आहे पण कुणी घरी येतच नाही ह्या सर्वावर विचारमंथन सुरु होते आणि आपल्याला आपल्या अनेकविध प्रश्नांची उत्तरे शास्त्राच्या ह्या अभ्यासातून निरीक्षणातून मिळत जातात . म्हणूनच डोळसपणे जगलो तर ज्योतिष तुम्हाला उत्तम समजेल .
प्रत्येक गोष्टीत दुसर्याला दोष देणे बंद केले पाहिजे. चांगले झाले कि आपले आणि वाईट झाले कि दुसर्यामुळे हा मनुष्य स्वभाव आहे . मुले व्यसनी झाली हे तुमचेही प्राक्तन आहे , तुम्ही कुठे कमी पडलात ? एखाद्या मुलाला धाक दाखवून किंवा जबरदस्ती करून जप करून घेता येणार नाही. ईश्वराबद्दल प्रेम श्रद्धा त्याच्या मनात असले तर आणि तरच तो जप करेल तेही स्वताहून . कायम आपल्या आयुष्याची आपण दुसर्याशी तुलना करतो आणि त्यातूनच इर्षा , द्वेष ,मत्सर निर्माण होतो. प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे आहे . आपण आपल्या मार्गाने जाणे उत्तम .
साधे घरात पडलो कुठे खरचटले तरी घरातील व्यक्तींवर त्याचे खापर फोडायचे , कश्याला ? कुठल्यातरी तुमच्या चुकीच्या कर्माची ती शिक्षा आहे त्याचा दोष तुमचाच असतो , इतरांचा असूच शकत नाही .
शांतपणे विचार केला तर आपले आजचे जीवन हे पूर्व आयुष्याचा , जन्माचा आरसा आहे. त्यामुळे इतरांना दोष देणे बंद करा . पूर्व जन्मातील अनेक चांगल्या वाईट कर्मांची शिक्षा वेळ आली कि आपण भोगतोच त्याचा दोष इतरांच्या माथी का ? आणि कश्यासाठी ? कारण आपण आपली चूक मान्यच करत नाही सदैव कुणीतरी बकरा शोधत असतो . संपला विषय . हेच सत्य आहे पण स्वीकारणे अवघड जाते आपल्याला. रोजचे जीवन डोळसपणे जगले तर शास्त्राचे अनेक पदर अलगद उलगडत जातील , निरीक्षणाची सवय लागेल आणि दुसर्याला दोष देण्याच्या वृत्तीला खतपाणी घातले जाणार नाही हे निश्चित . शास्त्र जीवन जगायला दृष्टीकोण देते . निरीक्षणे करता करता ग्रहांशी कधी दोस्ती होईल हे सुद्धा कळणार नाही आणि जीवनप्रवास अधिक आनंदमय होईल, क्षणोक्षणी येणारे अनुभव जीवन समृद्ध करतील .
श्री स्वामी समर्थ
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment