॥ श्री स्वामी समर्थ॥
३ अक्षराचा हा छोटासा शब्द आपल्या संपूर्ण आयुष्यात खूप महत्वाचा असतो. अगदी जन्मापासूनच. लहान मुलाला आई बोलायला शिकवते म्हणजे थोडक्यात त्याच्याशी शब्द ह्या माध्यमातून संवादच
साधायचा प्रयत्न करत असते. कुठेतरी वाचलंय "Communication units people and silence divides" हे तंतोतंत खरय. दोन माणसांमध्ये संवाद होणे हे
त्यांच्या शारीरिक आणि मानसिकतेसाठी खूप गरजेचे असते .संवाद नसेल तिथे कदाचित मग " वाद " निर्माण होत असावेत. मानसोपचार तज्ञ्यही सांगतात मोकळेपणाने बोला ,मनात घुसमटत राहू नका.
प्रत्येक नात्यांमध्ये संवाद गरजेचा असतो तसाच तो प्रत्येक वयाच्या टप्प्यावरही. काही माणसांशी आपण उत्कृष्ठ संवाद साधू शकतो आणि काही माणसांशी आपल्याला तितकीशी जवळीक नाही साधता येत. संवादाचे हि विविध पैलू आहेत .काही माणसे अबोल असतात पण त्यांना बोलते केले तर ती नक्कीच बोलू शकतात हा माझा अनुभव आहे .
"संवाद " हि एक कला आहे . अहो फार दूर कश्याला जायचे , अगदी अर्ध्या तासाच्या प्रवासात सुद्धा आपण शेजारच्या प्रवाश्याशी थोडेफार बोलतोच ज्यांच्या बरोबर आपल्याला खूप मोठा प्रवास करायचा असतो, त्यांच्याशी तर संवाद साधल्याने चांगलेच सूर जुळतात प्रवास सुखकर होतो आणि प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर तर अगदी पिढ्यान पिढ्या ओळख असल्यासारखा फिल घेऊनच आपण घरी परतत असतो. संवाद नसेल तिथे गैरसमज ,अबोला वाढीस लागतो. मनात खूप काही असते पण पहिले मी नाही बोलणार ह्या खोट्या हट्टापाईही, so called Ego मुळे आपण चांगल्या माणसांपासून दुरावतो.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संवाद पाहिजेच ,आपण ती कला आत्मसात केली पाहिजे .मनातल्या मनात घुसमटत राहुन अनेक मानसिक आणि त्या अनुषंगाने येणारे शारीरिक आजारही आपण स्वतःच ओढवून घेत असतो. अगदी सकाळी उठल्यावर चहाचा पहिला घोट घेताना आपल्या सह्चारीणीस "अग चहा अप्रतिम झालाय " असे नुसते म्हटले तरी तिथे तत्क्षणी संवाद सुरु होतो नुसताच संवाद नाही तर त्या दिवसाची सुरवातही आनंददायी होते, पहा बर करून.
"संवाद "आयुष्याचा अविभाज्य भाग आहे . कित्येक घरात आई किंवा वडील कदाचित दोघेही फारच शिस्तीचे किंवा कडक असल्याने मुलांशी त्यांचा पाहिजे तसा संवाद होत नाही. माझा मुलगा ह्यांना घाबरतो आमच्याशी धड बोलत नाही ..ह्या अश्या वाक्यांना आपणच जबाबदार असतो. मग कित्येक वेळा counsellor ची गरज लागते. तुम्हीच का नाही होत त्यांचे counsellor ? शाळेतल्या साध्या ट्रीप ला मला जायचं आहे हेही मुल पालकांना मोकळेपणाने सांगू शकत नाही. मुलांशी संवाद साधल्याने त्यांच्याशी जवळीक तर साधली जातेच पण त्यांच्या आणि आपल्या नात्यामध्ये आत्मविश्वास वाढीस लागतो. पालक आणि मुलांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण होते.अशी मुले आयुष्यात त्यांच्या व्यक्तिगत जीवनात आणि career मधेही उंच भरारी घेताना दिसतात. आजकालच्या तरुण पिढीशी घरातील पालकांचा तसेच समवयस्क भाऊ , काका , मामा यांचा उत्तम संवाद असणे महत्वाचे आहे. बाह्य विश्वात अनेक प्रश्नांना सामोरी जाणारी हि पिढी प्रगल्भ तर आहेच पण विचारीही आहे. खरतर आपल्यालाच त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप असते पण " ह्याला काय कळतंय" किंवा " आता तुमच्याकडूनच अक्कल शिकायची राहिलीय " अश्या विचारांनी आपणच त्यांच्याशी संवाद टाळत असतो.पर्यायाने त्यांना दुरावतो.
आज धकाधकीच्या स्पर्धात्मक जीवनात प्रत्येकाची आयुष्य जगताना पुरती दमछाक होते. दिवसभरच्या दिनचर्येनंतर घरी आल्यावर कसेतरी दोन घास खावून आपण वेळ घालवतो ते Laptop or Mobile मध्ये . घरातील प्रत्येक जण whatsapp वरच जास्ती गुंग झालेला आढळतो. घरातील आपल्या रक्ताच्या कुटुंबाला वेळ न देता आपण गुरफटत चाललो आहोत ते ह्या आभासी जगात . हल्ली तर काय whatsapp वरतीच सगळे ग्रुप असतात नातेवाईकांचा माहेरचे सासरचे शाळेतील मित्र भिशीच्या मैत्रिणी एक ना दोन.पण त्यामुळे आपण घरातील माणसांशी दुरावतो अस नाही का वाटत ? खरतर facebook आणि whatsapp वर शेकडो likes घेणारे ५००० ची मित्र यादी असणारे आपण बरेच वेळा बोलायचे म्हणते तर कुणाशी ह्या प्रश्नावर थांबतो. रात्रीच जेवण एकत्रच झाले पाहिजे आणि त्यात प्रत्येकाने दिवसभरातील गोष्टींचा उल्लेख केला तरी पुष्कळ. आपल्या मुलांनी त्यांच्या आयुष्याचा जोडीदार निवडला तर ते आईवडिलांच्या आधी बाहेरील व्यक्तीस माहित असते. आपल्या मुलांमध्ये आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमध्ये आज एक सशक्त नाते निर्माण होण्याची गरज आहे आणि त्यासाठी "संवाद" हि कला उत्तमपणे जोपासण्याचाही तितकाच प्रामाणिक प्रयत्न झाला पाहिजे. आई मला हि मुलगी आवडते किंवा मला ह्याच course ला जायचे आहे हे जेव्हा मुले मोकळेपणाने घरी सांगतात तेव्हा त्या नात्यात एक अनोखा विश्वास आणि उत्तम संवाद निर्माण झालाय असे समजायला हरकत नाही.
आपल्या आयुष्यातील कुठल्याही चांगली वाईट गोष्टी आपल्या जवळच्या लोकांशी share करून तर बघा किती मोकळ वाटेल ....आपले प्रश्न तर सुटतील पण संवादाने जवळीक वाढेल.एकमेकांबद्दल बोलायच्या ऐवजी एकमेकांशी बोला अस म्हणीन हवे तर. संवाद नसेल तिथे माणसे एकाकी होत जातात. चला तर मग आजपासून ठरवूया मी एक उत्तम संवादी होईन .स्वताःशीही बोलीन आणि इतरांनाही बोलते करीन. नात्यातील मग ते कुटुंबातील असो व मैत्रीतील अनेक पैलू जे तुम्ही आधी कधीच अनुभवले नसतील ते अनुभवायला मिळतील...वृद्धाश्रमात किंवा आपल्या घरातही वयस्कर माणसाना त्यांच्या आयुष्याच्या सायंकाळी काहीच नको असते . त्यांना कुणीतरी त्यांच्या जवळ बसून बोलायला हवे असते ....पटतंय ना? चला तर मग आज अश्या एका आपल्या जवळच्या व्यक्तीस मित्रास कुणीही असो ज्यांच्याशी खूप दिवसात मोकळ्या गप्पा झाल्या नाहीत त्यांच्याशी मनसोक्त गप्पांचा आनंद लुटुया . मित्रानो संवाद हे आपले आनंदी जीवनाचे Tonic आहे त्याचा पुरेपूर उपयोग करून जीवन अधिकाधिक आनंदी करुया.अव्यक्त राहण्यापेक्षा व्यक्त होवून त्याची लज्जत चाखूया.
अस्मिता.
अभिप्रायासाठी संपर्क :
https://www.facebook.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A6-350841195427839
antarnad18@gmail.com