Wednesday, 21 March 2018

अभिप्राय


मंडळी ,

         " संवाद " ह्या माझ्या लेखावर श्री. अभिजित भाटलेकर यांनी त्यांचा अभिप्राय दिलाय आपल्यासाठी इथे पोस्ट करत आहे.  श्री. अभिजित यांनी मला अभिप्राय तर दिलाच पण लेखनासाठीही प्रोत्चाहन दिले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

लेख आवडला... संवाद हे टॉनिक आहे हे एकदम मान्य. पण आज मी जिथे तिथे बघतो की भोवतालचे अनेकजण / जणी तोंडाला येईल ते बोलताना दिसतात. त्यांच्याशी गप्पा मारताना, किंवा नुसतं त्यांचं ऐकतानाही, अक्षरशः जागोजाग ठेचा लागल्याचा अनुभव येतो. लागलीच कळतं की ह्या लोकांनी आजवर पुरेसं ऐकलेलं नाही. नुसते बोलताहेत.  (माझा अपवाद आहे, अनेक वर्षांपासून मी खूप सांभाळून बोलतो... जवळपास अनावश्यक होईल इतके सांभाळून बोलतो..ज्याचा मला काहीसा त्रासही होतो) अविचाराने वापरलेला शब्द हे जगातले सर्वात घातक शस्त्र आहे व विचारपूर्वक वापरलेला मोजका शब्द हे अत्यंत गुणकारी औषधही आहे. शब्द चुकीचा वापरल्याने जगात रक्तपात झालेले आहेत, मानवाचं पराकोटीचं नुकसान झालेलं आहे. 
गेल्या पंचवीस वर्षांत मला अशी काही मोजकी माणसं भेटली, की ज्यांचं कुठलंही बोलणं नीट ऐकावं. रघुराम राजन, अजित रानडे, सुकुमार रंगनाथन (माझे माजी संपादक), अंबरीश मिश्रा, जेरी पिंटो , ज्यो मॅकनॅली, डेव्हिड बर्नेट, सेबॅस्टिओ सालगाडो . यांचं ऐकून मला त्यांचे विषय तारा कळलेच पण हेही कळलं की "कसं" बोलावं. थ्री इडियट्स मधला फरहानायट्रेट  आणि प्रीरॅज्यूलायझेशन हा प्रसंग आठवतोय..? त्याच्या शेवटी रँचो सरांना सांगतो, मैं आपको इंजिनिअरिंग नहीं पढा रहा था, मैं आपको ये पढा राहा था कि "पढाते कैसे है". "शिकणं" शिकवणारा , ऐकणं शिकवणारा क्लास कुठेही नाहीये, तो आपला आपल्यालाच घ्यावा लागतो. म्हणूनच मला हे वाटतं की आधी गप्प राहून ऐकणं महत्वाचं आहे. मध्यंतरी वाचलं होतं,  वी हॅव वन माऊथ अँड टू इयर्स , यूज देम इन दॅट प्रपोर्शन.