Saturday, 24 March 2018

शनी महाराज

॥ श्री स्वामी समर्थ॥

ॐ शं शनैश्चराय नमः


सूर्यमालेतील ग्रहांमध्ये सूर्यापासून ६ व्या स्थानावर असलेल्या शनी महाराजांबद्दल जाणून घेवूया... 

“शनी “ म्हटला कि जनसामान्या मध्ये एक अनामिक भीती दिसून येते. कुठल्याही जातीधर्माचा माणूस असो, श्रीमंत असो अथवा गरीब,  राजा किंवा रंक , शक्तिमान असो वा काडी पहिलवान ,शनी महाराजांची  सर्वांनाच भीती वाटते. बुधाची किंवा मंगळाची साडेसाती सुरु झाली असे आपण कधीच नाही ऐकत. पण शनीची साडेसाती म्हटली कि भल्याभल्यांचे धाबे दणाणते.
शनी हा कठोर न्यायाधीश आहे. शनीची कृपा झाली तर अन्न ,निवारा आणि वस्त्र यांची भ्रांत राहणार नाही. शनी महाराजांजवळ प्रेमळ कृपादृष्टी आहे. शनी पापपुण्याचे मोजमाप करणारा अत्यंत न्यायी ग्रह आहे. त्याच्याजवळ कुठलाही वशिला चालत नाही. पाप केलेत तर शिक्षेवाचून सुटका नाहीच, कधीही नाही.
आज कलीयुगात आपल्याला अनेक लोक खूप वाईट वागताना दिसतात पण तरीही त्यांचे अतिशय उत्तम चाललेले असते ,मग मनात प्रश्न निर्माण होतो कि जगात देव आहे कि नाही ? आम्ही इतक चांगले वागूनही आम्हाला मात्र लगेच शासन होते आणि ह्यांना पहा ...ह्यांची मजा आहे...पण तस काहीच नसत. 
आपण स्त्रिया दळण घेवून गिरणीत जातो तेव्हा काय पाहतो ? गहू जर दळायला लागले असतील तर मग तो भय्या सांगतो कि ज्वारी ,बाजरी यानंतरच मिळेल . कारण सगळ्यांचे गहू दळून संपले कि मग तो दुसर धान्य दळायला घेणार असतो. आपल्याही आयुष्याच तसच आहे. आपण पूर्व जन्मी केलेली पुण्ये असतात न त्याची फळे भोगण्या आधीच आपला तो जन्म संपलेला असतो त्यामुळे  जेव्हा आपण नवीन जन्म घेतो तेव्हा मागील जन्मीची पुण्याची फळे आपणस या जन्मापासूनच चाखावयास मिळतात. पण ह्या मधल्या काळात कदाचित आपण काही पापे किंवा चुकीची कर्महि करत असतो .पण मागील जन्माचे पुण्याचे फळ भोगून संपले (म्हणजे गहू) संपले कि मगच आपला ह्या जन्मीच्या पापाचा धडा (ज्वारी) आपल्यास मिळतो. अशा प्रकारे हा जन्म आणि मृत्यूचा फेरा तसाच चालू राहतो.
पण पापाची शिक्षाही आहेच आहे. विषयांतर झाले थोडेसे पण हे आवश्यकही होतेच.  तात्पर्य असे कि शनी महाराज हि न्यायाची देवता आहे. त्यांच्यासमोर सगळेच सारखे. तसेही देवासमोर आवडता नावडता कुणीही नाही. २००५ ला जेव्हा मुंबईत पाणी आले तेव्हा ते गरीब, श्रीमंत सगळ्यांच्याच घरात घुसले. देवाने कुणालाच नाही सोडले.  आपण पाप ,दुष्कर्म करताना आपल्याला कुणाचीही आठवण येत नाही मात्र जेव्हा त्याची शिक्षा भोगण्याची वेळ येते तेव्हा मात्र ३३ कोटी देव आठवतात आणि मन धास्तावते ,खर ना ? शनीने प्रत्यक्ष गुरुंनाही सोडले नाही ज्याचे वर्णन शानि महात्म्यात आहे. तेव्हा सामान्य माणसाचे काय घेवून बसलात ?
चंद्र हा सर्वात शीघ गतीने जाणारा ग्रह आहे. तो एका राशीत २| दिवस असतो. पण त्याउलट शनी हा अत्यंत धीम्या गतीने चालणारा मंद ग्रह आहे त्यामुळे तो एका राशीत २|| वर्षे वास्तव्य करतो. शनीची स्वतःची राशी मकर आणि कुंभ असून शनी हा तुळा राशीत उच्चीचा असतो तर मेष हि त्याची निचीची राशी आहे. रवी , चंद्र ,मंगळ हे शनीचे शत्रू  मानले आहेत. तसेच राहू,केतू , शुक्र, बुध हे मित्र ग्रह आहेत.
शनी जरा एकलकोंडा , नैराश्यवादी, आळशी , अतिचीकीत्सक, कुठल्याही कामात वेळ लावणारा, खो घालणारा असा आहे. अत्यंत किचकट आणि शोध लावण्याचे काम करणारे विषय शनीला आवडतात 
म्हणूनच इंजिनियरिंग , तत्वज्ञान , तर्कशास्त्र . भूमिती, जमाखर्च, न्याय  हे विषय शनीच्या अमलाखाली येतात .शनीच्या प्रभावाखालील लोक जास्ती बोलत नाहीत, अघळ पघळ तर नाहीच नाही. त्यांचे रोजचे बोलणे हेही अगदी न्यायलयात बोलले जाणारे अगदी वकिली थाटातील असते.  शनीकडे दृढनिश्चय , काटकसरीपणा ,कष्ट , अपमान सहन करून काम करण्याची शक्ती ,संशोधक वृत्ती ,वक्तशीरपणा आहे.
शनीचे रोग हे जुने व चिकट असतात ,ते दीर्घकाळ टिकणारे असतात . कुबड येणे, थंडीताप ,दात किडणे, फुफुसाचे विकार ,क्षय , त्वचेचे विकार, पक्षाघात हे रोग शनीच्या अमलाखाली येतात .
शनी आयुष्यातील अंतिम स्थितीच दर्शवतो. अंतिम स्थिती म्हणजे मृत्यू .शनी कुठल्याही गोष्टीला विलंब लावतो.शनी पत्रिकेत ज्या घरात असेल त्या घराचे म्हणजेच त्या स्थानाने दर्शवलेल्या गोष्टींचे फळ उशीराच मिळते. शनी वैराग्याचाहि कारक आहे.  त्याउलट चंद्र हा प्रेमळ, मायेचा कारक आहे. शनीला माया आवडत नाही ,त्यामुळेच हे फसवे मायाजाल दूर करण्यासाठीच चंद्राला साडेसाती लागते.  अहो शेवटी काय घेवून जाणार आहोत आपण जाताना येथून? काहीच नाही. येतानाही काही बरोबर आणले नाही आणि जातानाही काहीही बरोबर घेवून जाणार नाही. कापडालक्त्ता , दागदागिने, मौल्यवान वस्तू , जमीन जुमला , ऐश्वर्या अहो हे सगळे इथेच ठेवून जायचे आहे आपल्याला. परलोकी काहीच न्यायला परवानगी नाही. इतकच काय तर आपला हा देह हि कुठे शाश्वत आहे. अंतिम स्थितीत आपल्या देहाची चिमुटभर राख होणार आहे  आणि याची जाणीव आपल्याला होण्यासाठीच जणू आपल्याला शनीची साडेसाती येते. मनुष्याने  कुठल्याच मोहजालात अडकू नये यासाठी शनी महाराज त्याला साडेसातीत अंतर्मुख करतात . ह्या ७ वर्षातच आपल्याला आपले आणि परके ह्यांची ओळख होते. मी आहे तुझ्याबरोबर असे म्हणणारे सर्वच आपल्याला सोडून गेलेले असतात आणि त्यालाच सोप्या शब्दात म्हणतात साडेसाती.
दुर्बिणीतून पाहिलात तर शनी शंकराच्या पिंडीसारखा दिसेल. त्याभोवती कडी आहेत. म्हणजेच शनी महाराज बंधनात आहेत . शनीला बंधन योगाचा कारक मानले आहे. शनिवार बर्फ आहे ह्याचा शोध आता लागलं पण पूर्वी आपल्या कड्या तपश्चर्येने ऋषी मुनींनी ते ओळखले होते आणि म्हणूनच शीतपेये ,थंड पदार्थ याचे कारकत्व शनीकडे आहे. शरीरातील हाडे, दात, कान , त्वचा याचेही  कारकत्व शनीकडे आहे. शनीचा रंग काळा आहे. सांधेदुखी, केस गळणे , दात दुखी , वातविकार , अस्थमा, क्षय, उदासीनतेमुळे येणारे आजार ,गुढघे दुखी हे शानिच्या  अमलाखाली येतात.
लोखंड ,जस्त , चामड्याच्या वस्तू बनवणारे, तेलाचा व्यापार किंवा तेलाच्या खाणीत काम करणारे लोक शनीच्या अमलाखाली येतात . जुन्या वस्तू विकणारे, भंगार विकणारे, संशोधन करणारे, सिनेमात खलनायकाच्या भूमिका करणारे , जेलर , राजकारणी लोक शनीच्या अधिपत्याखाली येतात .
शनीचे रत्न “नीलम “ हे आहे. शनी बद्दल जितके लिहावे तितके कमीच आहे तूर्तास इथेच थांबते.

अभिप्रायासाठी संपर्क :
https://www.facebook.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A6-350841195427839

antarnad18@gmail.com