|| श्री स्वामी समर्थ ||
आज गुरूचेच पुनर्वसू नक्षत्र आहे आणि आज आषाढ अमावास्या सुद्धा आहे. आज घरोघरी दीप प्रज्वलित करून त्याचे पूजन होत आहे. आमावास्येला निसर्गाची सुषुम्ना नाडी चालू असते म्हणून आमावस्या प्रापंचिक सुखासाठी नाही तर पारमार्थिक सुखासाठी उपयुक्त आहे . आजचा दिवस नामस्मरणाचा , साधनेचा . सर्वांचे आयुष्य हा दीपोत्सव असाच प्रकाशमान करत राहूदे अजून काय हवे .
आपण सर्वच जण अनेक उपासना करत असतो , ज्याला जशी जमेल तशी पटेल तशी , पण करत असतो . उपासना म्हणजे काय ? तर नुसतच माळ ओढत बसणे तो जप मोजत मी किती जप केला ह्याचे अवडंबर माजवत आपल्याच अहंकाराला खत पाणी घालणे कि धार्मिक ग्रंथांचे वाचन , तीर्थयात्रा करणे . नक्की काय ? आपल्या ह्या असंख्य गोष्टी तून आपण नेमके काय साधायचा किंवा मिळवायचा प्रयत्न करतो किंवा काय होणे आपल्याला अपेक्षित असते ?
उपासना करणारा उपासक असतो आणि तोच दुसर्याला उपासना सांगू शकतो . उपासना हे एक व्रत आहे आणि ते जितके निष्काम असेल तितके अधिक फलदायी असेल . अनेक उपासना करण्यापेक्षा एकाच देवतेची करावी . आपली कुलस्वामिनी आणि कुळाचे दैवत ह्यांचा विसर कधीच पडू देऊ नये. अनेक लोकांना आपले कुल दैवत सुद्धा माहित नसते ते जाणून घ्यावे . इच्छा तिथे मार्ग . आपल्या आराध्याची उपासना करताना समर्पणाची भावना असणे आवश्यक आहे किबहुना तेच सर्वाधिक महत्वाचे आहे . ज्या देवतेची उपासना मग नामस्मरण ग्रंथ वाचन काहीही असो त्याचा अर्थ समजून घेवून करावी तसेच आपण ती नक्की कश्यासाठी करत आहोत ते मनात स्पष्ट असावी . भावना शुद्ध सात्विक असावी .
ज्याची उपासना करतो त्या देवतेवर आपले प्रेम हवे . मग ती कुलस्वामिनी असो अथवा सद्गुरू . देवतेशी एकरूप झाल्याशिवाय उपासनेचे फळ मिळत नाही . ते मिळायला लागणारा अवधी सुद्धा सांगता येत नाही . जितकी आपल्या सेवेतील आर्तता तितका फळ मिळण्याचा अवधी कमी . महाराजांच्या नामाचा जप करत असलात तर त्यांच्यावरती सर्व काही सोडून द्यावे आणि नाम घेत बसावे. “ संतांच्या जे येयील मनी तेच येईल घडोनी “ अश्या आशयाचे वाक्य श्री गजानन विजय ह्या ग्रंथात आहे.
साधनेचे फळ अपरंपार आहे. भक्तीची गणना कधीच करू नये . आई मुलांवर कुठल्याही अपेक्षेने प्रेम करत नाही अगदी तसेच आपल्या गुरूंवर सुद्धा आपले तसेच प्रेम हवे . क्षणोक्षणी त्यांचा ध्यास हवा तरच केलेले जपतप फळणार अन्यथा सर्व व्यर्थ आहे. स्वामिनी सुद्धा भक्तांना सांगितलेले आहे कि “ निःशंक हो निर्भय हो मना रे “ कुठलीही शंका कुशंका घेवून सेवा करू नकोस . संपूर्ण विश्वास ठेवुन सेवेत सर्वस्व अर्पण करणाऱ्या भक्ताचा प्रपंच स्वतः तेच चालवतात . मग मागण्यासारखे काही उरतच नाही .
फक्त फळाच्या किंवा भौतिक सुखाच्या लालसेने किंवा अमुक एका इच्छेसाठी केलेली साधना हि निष्काम नसते . एखादी इच्छा फलद्रूप झाली तर पुढे साधनेत खंड पडतो तसे होऊ नये म्हणून साधना करत राहावी , आपण मनापासून नाम घेत राहावे म्हणजे आपल्या आयुष्याची गाडी पैलतीरी कधी लागते ते आपले आपल्यालाच समजत नाही .
उपासनेत सातत्य हवे , समर्पण हवे . आपल्या भावनेची खोली किती आहे ती वरवरची आहे कि सोळा आणे खरी ते त्यांना बरोबर माहित असते. म्हणूनच मग मी हे करतो ते करतो ,तरी मी अजूनही आहे तिथेच आहे .आयुष्य काकणभर सुद्धा का बदलले नाही ह्याचे कारण आपले आपल्यालाच समजते . पोटात तिळभर माया नाही , प्रेम नाही कसे मिळणार फळ ? आपले आपणच तपासायला हवे . साधनेला सुद्धा अहंकाराची झालर असेल तर कठीण आहे. आपल्याला आयुष्यात मिळालेली सेवेची संधी क्षणभर सुद्धा वाया जाऊ देऊ नये. रोज त्यांचे चिंतन आणि चित्त त्यांच्याच चरणापाशी अशी जेव्हा देहाची आणि मनाची अवस्था होईल तेव्हाच कुठेतरी जीवनात अपेक्षित बदल होताना दिसतील . सहमत ?
साधनेचे अपरंपार फळ चाखण्यासाठी भक्तीची खोली वाढवली पाहिजे ,तुजवीण मज कोण तारी हे भावना असली पाहिजे . संपूर्ण विश्वास आणि तळमळ आपल्याला त्यांच्या जवळ नेणारच नेणार हा विश्वास मनात असणे हेच तर खरे उपासनेचे फळ आहे.
सौ. अस्मिता दीक्षित
8104639230
श्री गुरुदेव दत्त अप्रतिम लेख
ReplyDelete