|| श्री स्वामी समर्थ ||
एकदा श्री कृष्णाच्या मनात आले सुदर्शन ( चक्र ) आणि गरुड ( वाहन ) ह्यांना त्यांच्या शक्तीचा अहंकार झालेला आहे. त्यांना त्यांची चूक समजण्यासाठी त्यांनी एक युक्ती केली . गरुडाला सांगितले कि जा अमुक अमुक ठिकाणी अंजनीपुत्र बसलेले आहेत त्यांना सांग मी बोलावले आहे. गरुडाने आज्ञा प्रमाणम म्हणून लगेच प्रस्थान केले आणि हनुमानाच्या समोर उभे ठाकले . श्री हनुमानाचे प्रचंड तेज पाहून त्यांचे नेत्र दिपून गेले. त्यांनी कृष्णाचा निरोप त्यांना सांगितला आणि म्हणाले कि त्यांनी तुम्हाला बोलावले आहे. तेव्हा हनुमान उत्तरले मी तर एक सामान्य रामभक्त आहे माझ्याकडे त्यांचे असे काय काम असणार आहे ? त्यांनी येण्यास नकार दिला तेव्हा गरुडाने त्यांना दटावत म्हंटले नाही आलात तर मी तुम्हाला बंदी करून घेवून जाईन. हे ऐकल्यावर हनुमान शांत राहिले . मनात रामाचा जप चालू होता त्यांनी समोर असलेल्या गरुडाला आपल्या शेपटीने विळखा घातला आणि गरुडालाच बंदी करून टाकले.
काही वेळाने गरुड परतलेला नाही हे लक्ष्यात आल्यावर कृष्णाने सुदर्शनास बोलावून सांगितले कि हनुमाना कडे जा आणि त्याला सांग रामाने तुला बोलावले आहे . कृष्णाचा निरोप सांगताच हनुमान सद्गदित झाले , प्रत्यक्ष रामाने माझी आठवण काढली आहे हे ऐकून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. परंतु सुदर्षणाचा एकंदरीत अविर्भाव पाहून हनुमानाने त्याला आपले रौद्र रूप दाखवले आणि त्याला चिमटीत पकडून आपल्या दाढेत बंदिस्त केले आणि तात्काळ क्षणाचाही विलंब न करता हनुमान कृष्णासमोर उभे ठाकले आणि नतमस्तक झाले. कृष्णाने रामाचा अवतार घेतला होता त्यामुळे हनुमानाला कृष्णातील फक्त रामच दिसत होता . कृष्णाने त्याला आलिंगन देत म्हंटले गेल्या जन्मी मी तुझा राम असलो तरी ह्या जन्मात मी कृष्ण आहे. हनुमान भारावले आणि म्हणाले जन्मोजन्मीचे हे आपले नाते आहे . आपण कुठल्याही रुपात आलात तरी माझी भक्ती तिळभर सुद्धा कमी होणार नाही . आपण माझी आठवण काढलीत ह्यातच सर्व आले . आपल्याला शतशः प्रणाम. श्रीकृष्ण सुद्धा हनुमानाच्या भक्तीने भारावून गेले . सुदर्शन कुठे आहे हे विचारताच हनुमानाने आपल्या दाढेतून सुदर्शनाला काढून कृष्णासमोर ठेवले. कृष्णाने स्मित केले आणि सुदर्शन सुद्धा काय समजायचे ते समजले.
गरुड परत आल्यावर सुदर्शनाला म्हणाले कि हनुमान हा बलशाली आहे त्याच्यापासून दूर राहा , तो कधीही इथे येवू शकतो. हे ऐकल्यावर सुदर्शनाने हनुमान कृष्णाच्या दर्शनाला येवून गेले सुद्धा हे सांगितले. दोघेही मनोमन वरमले .असामान्य शक्ती बळ असलेल्या हनुमानासमोर आपण किती खुजे आहोत हे समजल्यावर त्यांचा अहंकार भुई सपाट झाला. इतके बळ तेज असूनही हनुमान किती संयमित , निष्ठावान , श्रद्धावान आहेत आणि रामासमोर नतमस्तक आहेत हे पाहून आपल्यातील उणिवांची जाणीव त्यांना झाली .
आपण आपल्या कुठल्याही गुणांचा अहंकार करू नये कारण आपला बाप आपल्या आधीच त्या विधात्याने जन्माला घातलेला असतो. भक्तीचा सुद्धा अहंकार नसावा. निरपेक्ष भाव मनी ठेवून केलेली श्रद्धायुक्त सेवा फळ देतेच . आपण ज्याची भक्ती करतो त्या देवावर आपल्याला फळ कधी द्यायचे ते सर्वस्वी अवलंबून असते . त्यामुळे मी इतके करतो , असे अनुष्ठान केले , इतक्या प्रदक्षिणा घातल्या ह्याची मोजदात करणे भक्ताने सोडून दिले पाहिजे. आपण सेवा करत रहायची तीही अखेरच्या श्वासापर्यंत पुढे आपले जीवन कसे असणार आहे ते सर्वस्वी आपल्या अराध्याच्या हाती आहे.
त्याच्या कामात आपण ढवळा ढवळ करू नये. आपण आपले काम करावे त्याला त्याचे करू द्यावे .
आज हनुमान जयंती . कलियुगात राहू केतू ह्यांनी जग जवळ आणले आहे , तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे पण माणसाला त्याचा अहंकार झालेला आहे. सगळे आहे पण मनाची शांतता कुठेतरी ह्या जीवघेण्या स्पर्धेत हरवत चाललेली आहे . गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही आणि कितीही पैसा मिळवला तरी समाधान नाही .
जीवघेण्या स्पर्धेत आपण अनेकदा आपले कुलाचार , धर्म , रूढी परंपरा विसरून जातो किबहुना त्यांना दुय्यम समजतो . वेळ नाही हि सबब आहे ती बाजूला ठेवून आपल्या पुढील पिढीलाही हा वारसा देणे हे आपले कर्तव्य आहे.
आज “ अजून हवे अजून हवे “ हे त्या मारुतीरायाच्या चरणी समर्पित करूया . खरतर काहीच मागायचे नाही पण अगदी मागायचे झालेच तर “ हनुमाना तुझ्या सारखा निस्सीम भक्त कर “ हे तर आपण नक्कीच मागू शकतो. हनुमानाकडून निस्सीम भक्ती , निखळ प्रेम आणि भक्तीत असणारे सातत्य जर आपण घेतले तर आयुष्य एका वेगळ्याच उंचीवर जाईल ह्यात दुमत नसावे.
ओं शं शनैश्चराय नमः
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment