Wednesday, 30 April 2025

अक्षय नामाचा अक्षय आनंद

 || श्री स्वामी समर्थ ||



माणसाच्या इच्छा म्हणजे अथांग महासागर म्हंटला पाहिजे. कितीही संकटे येवुदेत मृत्यू कुणीही मागणार नाही . मला ह्या संकटातून सोडव म्हणतील म्हणजे पुन्हा जगणे आहेच . माणसाचा सर्वात जास्ती जीव हा त्याच्या स्वतःवर असतो आणि म्हणूनच मनुष्य जन्म दिला आहे तो सार्थकी सुद्धा लावता आला पाहिजे . असंख्य भौतिक सुखे आणि त्यांची तृप्तता , भोग ह्यात प्रपंच जणू हरवल्यासारखा भासतो तर परमार्थाचे काय ? तो तर दूर दुरचीच गोष्ट आहे. 

मनासारखे सर्व काही मिळणे म्हणजे आम्ही सुखी समाधानी असे समीकरण म्हंटले तर सुख सुद्धा दुरापास्तच म्हणावे लागेल आता . रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे जीवन जगणाऱ्या तुम्हा आम्हा भक्तांना अक्षय तृतीय हा दिन म्हणजे वाळवंटात मृगजळ म्हणावे लागेल. 

अक्षय म्हणजे अखंड . आणि इतर काही नाही पण नाम अखंड घेतले तर इतर गोष्टी आपोआपच आपल्या कडे येणार आहेत .मागणे उरणारच नाही पण आजकाल सबब आहे ती वेळ नाही. खरच चांगल्या गोष्टींसाठी आपल्याकडे वेळ नसतोच कधी . नामस्मरणाची लज्जत आणि त्याची अवीट गोडी चाखणे हे सुद्धा शेवटी भाग्याचेच लक्षण आहे आणि त्यासाठी मनाचा निर्धार , दुर्दम्य इच्छा शक्ती आणि संयम हवाच . हा त्रिवेणी संगम असेल तर अक्षय आनंदाच्या परामोच्च शिखरावर आपण पोहोचण्यास वेळ लागणार नाही .

मग त्यासाठी प्रत्यक्ष अक्कलकोट शेगाव ला गेले पाहिजे का? सहज जाता आले तर नक्कीच जायचे शेवटी स्थानाचेही वेगळे असे महत्व शास्त्रात सांगितले आहेच पण एखाद्याला गाडीभाडे परवडले नाही किंवा अन्य कुठल्याही कारणाने जाता आले नाही तर नामस्मरण करायचे नाही का . कि तिथे स्थानावर नाही गेलो तर आपली आपल्या सद्गुरूंशी भेट होणार नाही का? नामस्मरण न करायच्या ह्या सर्व सबबी पळवाटा आहेत . असो .

तिथे असाल तिथे प्रत्येक क्षणी नामस्मरण करा हेच अपेक्षित आहे. श्वास घेतो त्याचसोबत नाम घ्या . नामाचे वेड लागले पाहिजे. नित्याची कर्म करतो त्याचप्रमाणे प्रत्येक क्षणी नाम घेता आले पाहिजे इतक्या आपल्या चित्तवृत्ती नामात एकवटल्या पाहिजेत . उठता बसता नाम , जरी त्याचा अधे मधे विसर पडला तरी पुन्हा नमस्कार करून नाम घेत राहणे.  जमेल तसे पण घ्यायचे हाच आजचा अक्षय संकल्प करुया .

नामाची जादू अफाट आहे , सगळ्या प्रश्नांची ती गुरुकिल्ली आहे , मुक्तीचा महामार्ग आहे तो आणि म्हणूनच आयुष्यात काहीही झाले तरी चालेल पण नामाला पर्याय नाही . पुन्हा मी हे करतो ते करतो ...अजिबात नाही.

आज ह्या अक्षय तृतीयेच्या सुमुहूर्तावर “ मी “ हा आपल्या शब्दकोशातून जणू हद्दपार करण्याचा प्रयत्न करूया आणि उभे आयुष्य आपला प्रपंच सर्व काही त्यांच्या चरणी अर्पण करुया . मी पारायण केले मी हे केले मी महाराजांना चाफा आणला...सुटका करून घेवूया आजच्या सोनियाच्या दिनी ह्या “ मी “ तून .  महाराज माझ्याकडून सेवा करून घेत आहेत हेच वाक्य आता मुखात असुदे उर्वरित आयुष्यात , निदान तसे करण्या वागण्याचा प्रयत्न करुया . सोपे नाही ते कारण हा “ मी “ जन्मल्यापासून आपल्या सोबत आपल्याला घट्ट चिकटून बसलेला आहे. 

वऱ्हाड प्रांतातील आजचा विशेष खास दिवस आहे. संतशिरोमणी गजानन महाराज ह्यांच्या लीलांनी ह्या दिवसाला अनमोल असे महत्व प्राप्त झालेले आहे. आज घरोघरी महाराजांच्या अनमोल रसाळ “ श्री गजानन विजय ग्रंथाचे “ पारायण भक्त करत आहेत .

आपली भक्ती श्रद्धा , गुरूंच्या साठी असणारी तळमळ खरी असेल तर असाल तिथे जेवून प्रत्यक्ष महाराज भक्ताला दर्शन देतील ह्यात शंकाच नाही. दर्शनाची आस , आपल्या भेटीची ओढ जितकी अधिक तितके त्याचे फळ अधिक. महाराजांच्या  कडे काही मागण्यापेक्षा त्यांना मी एक चांगला माणूस कसा होवून दाखवीन , समाजासाठी चांगले काम मी कसे करीन ह्या साठी आज प्रत्येक भक्ताने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. हे सुद्धा सेवेपेक्षा कमी नाही . 

जे काही चांगले काम आणि विचार सुद्धा जसे आजपासून मी लवकर उठीन सकाळी ६ वाजता सूर्याला अर्घ्य घालीन , रोज निदान एक तरी अध्यायाचे वाचन करीन , रोज नित्य नामस्मरण करीन , आपली जी काही उपासना आहे त्यात आपले चित्त एकरूप करण्याचा प्रयत्न करीन निदान इतके केले तरी खूप झाले. हळूहळू आयुष्य बदलू लागेल , अक्षय आनंदाने आयुष्य जगावेसे वाटेल . आजच्या दिवसाला विशेष असे महत्व आहे त्यामुळे आज केलेली कुठलीही सेवा पुण्य पदरात घालील ह्यात दुमत नाही.

तुमच्या आमच्या सर्वांच्याच आयुष्यात जे जे काही आनंद देणारे आहे ते अक्षय राहावे हीच श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


No comments:

Post a Comment