Monday, 21 April 2025

अचूक निर्णय

 || श्री स्वामी समर्थ ||

नागमोडी वळणे घेवून जेव्हा आयुष्य आपल्याला हुलकावण्या देते तेव्हा आपल्याला असंख्य प्रश्न पडतात , अचानक घडणाऱ्या घटना विस्मयचकित करणाऱ्या आणि आयुष्याचा आजवरचा आलेख खाली आणणाऱ्या असतात . अश्यावेळी दुर्लक्षित केलेल्या आकाशातील ह्या लुकलुकणाऱ्या ताराकांचे स्मरण होते आणि आपली पाऊले ज्योतिष जाणकाराकडे अपोआप वळतात . खरतर आपल्याला ज्योतिषाशी काहीही घेणेदेणे नसते , आपला रस असतो तो आपल्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यात . 

आधुनिक आजच्या युगात ज्योतिषाकडे आलेले जातक भले विद्वान असतात . सोशल मिडीया वरील अर्धवट मिळालेले ज्ञानामृत ज्योतिषालाच पाजू पाहतात . असो. माझा राहू इथे आणि मला अमुक ग्रहाची दश सुरु आहे वगैरे वगैरे त्यांचे सांगून झाल्यावर आता बोला काय ते अश्या अविर्भावात असलेल्या जातकाची मनाची केविलवाणी अवस्था लपून राहिल्याशिवाय राहत नाही. पत्रिकेचे वाचन किंवा फलादेश सांगणे सहज सोपे खचितच नाही . ज्योतिष हि एक तपस्या आहे आणि फलादेश सांगताना व्यक्तीला पत्रिकेचे अनेक पेहलू तपासावे लागतात . 

सर्वप्रथम लग्न आणि लग्नेश . त्याची स्थिती भक्कम असायला हवी. लग्न मेष असेल तर पत्रिकेतील मंगळाची स्थिती डावलून चालणार नाही . जातकाचा प्रश्न मुळात नीट समजून घेणे आणि त्याभोवतीच चित्त असणे आवश्यक आहे. एखादा नोकरीचा प्रश्न जातकाने विचारला असता , आपले लक्ष्य हे पत्रिकेतील १ ६ १० भाव , रवी ,आणि प्रामुख्याने दशा अंतर्दशा ह्यावर केंद्रित झाले पाहिजे. उगीचच तुमचे केस किती छान असतील आणि तुम्हाला स्वयपाक किती उत्तम येत असेल ह्यावर वायफळ चर्चा नको . आपल्याला असलेले सगळे ज्योतिष ज्ञान जातक घ्यायला आलेला नाही त्याला त्याच्या प्रश्नाच्या उत्तरात रस आहे इतकेच .  

परदेशगमन पाहण्यासाठी अर्थात ३ ९ १२ त्यात १२ अति महत्वाचे मह तिथे चर , स्थिर , द्विस्वभावी कुठल्या तत्वाची राशी आहे आणि राशीस्वामी कुठे आहे . प्रवासाचा कारक चंद्र आणि दशा महत्वाची .

संतती असेल तर मुळात ७ वे स्थान बलवान हवे. संततीचा कारक गुरु , पंचमेश सुस्थितीत हवा . लग्नेश बलवान हवा कारण मुल त्यालाच होणार आहे म्हणून लग्नेश सुद्धा पाहावा . पंचमाचे पंचम आणि एकंदरीत पंचमेशाच्या अनुषंगाने येणारे पंचम भावाचे सर्व नियम . धन भाव कारण अपत्याच्या आगमनाने कुटुंबात होणार आहे ती एका सदस्याची वाढ . 

सद्य दशा संततीसाठी अनुकूल असेल तर अपत्य प्राप्ती कधी होणार त्यासाठी अनुकूल अंतर दशा पहावी. घर खरेदी साठी चतुर्थ   लाभ , व्यय तर घराच्या विक्रीसाठी दशम , तृतीय लाभ हि स्थाने पहावी लागतील. 

अनेक लोक विचारतात मला शांतता कधी मिळेल ? माझे अखेरचे दिवस कसे जातील , मुले पाहतील ना आमच्याकडे म्हातारपणी . ह्या सर्वासाठी चतुर्थ पाहावे कारण तेच आपले सुखस्थान आहे. हे सगळे सोपस्कार झाले कि  शेवटी गोचर लावायला विसरू नये . 

थोडक्यात काय तर प्रत्येक प्रश्नावरच  आपले लक्ष्य केंद्रित असले पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आपला अभ्यास असेल तर अचूक फलादेश करण्यात सहजता येयील. 

यात्रा ह्या कामासाठी असू शकतील , मौज मजेसाठी आणि धार्मिक सुद्धा असू शकतात . नेहमी अष्टम भाव लागला कि मृत्यू येतो हे डोक्यात धरून ठेवणे चुकीचे आहे. मृत्युत्युल्य कष्ट होतील पण मृत्यू नाही.  जातक अनेकवेळा एकापेक्षा अनेक प्रश्न विचारतात तेव्हा ज्योतिषाची गल्लत होता उपयोगी नाही म्हणून काय पाहायचे ते समजले पाहिजे. समोरच्याला विचारू दे काय ते आपले लक्ष्य प्रश्नावर केंद्रित हवे .

संपूर्ण पत्रिका त्यात लग्नेश , चंद्र रवी ,जन्म नक्षत्र , दशास्वामी त्याचे नक्षत्र हे सर्व विचारात घेवून मुळ प्रश्नाकडे गेले तर फारसा गोंधळ होत नाही . संतती नाही म्हणून एकदम पंचमावर उडी मारली तर उत्तर चुकण्याचा संभाव असतो कारण मुळात त्याचा उगम सप्तमातून होतो आणि हीच गोष्ट प्रत्येक प्रश्नासाठी होवू शकते कारण सर्वप्रथम आपण प्रश्नांच्या मुळाशी जाणे अपेक्षित असते तसे झाले तर प्रश्नाचे उत्तर उलगडते आणि सद्य स्थितीत चालू असलेली महादशा उत्तरापर्यंत पोहोचवते कारण घटना कधी घडणार हा अधिकार दशा स्वामीने राखून ठेवला आहे.  पत्रिकेत कितीही राजयोग असुदेत आणि कितीही ग्रह उच्चीचे असुदेत , दशा स्वामी जर घटनेशी संबंधित भाव देत नसेल तर बाकी गोष्टी फोल आहेत .

सारासार विचार करून तारतम्य , जातकाचे वय आणि प्रश्नाचा गाभा , गोचर लक्ष्यात घेवून केलेले विवेचन हे अचूक उत्तरापर्यंत नक्कीच पोहोचवेल ह्यात शंका नसावी .

सौ. अस्मिता  दीक्षित 

संपर्क : 8104639230   

 


No comments:

Post a Comment