|| श्री स्वामी समर्थ ||
पूर्वीच्या काळी प्रचलित नसणाऱ्या किंवा ऐकिवात सुद्धा नसलेल्या अनेक गोष्टीपैकी एक म्हणजे “ लिव्ह इन रिलेशनशिप “ हा नवा अध्याय आपल्या संस्कृतीत जोमाने फोफावत आहे. आम्ही अमुक अमुक वर्ष लिव्ह इन मध्ये होतो हे सर्रास ऐकायला मिळते . पण आपल्या परंपरा , संस्कृती ह्या गोष्टीना तग धरून देतील का हा प्रश्न आहे.
मुळात हे विचार मनात यायला एकच गोष्ट कारणीभूत आहे ती म्हणजे “ कसलीही जबाबदारी नको “. आरामात राहायचे एकत्र तेही आपल्या इच्छा पूर्तीसाठी पण त्यातून कधीही सटकता येयील असे हे आपले सोय पाहणारे गोड बंधन .
विवाह हि एक जबाबदारी आहे. आपली वंशवेल वाढवणे हा प्रमुख उद्देशाने विवाहसंस्था जन्माला आली . ती नसती तर समाजात अराजकता माजली असती . प्रेम हि एक भावना आहे आणि ती सहवासातून फुलत जाते . एकमेकांसाठी जगणे आणि एकमेकांचे होऊन जगणे ह्यात खरी गम्मत आहे आणि मग आयुष्याचा आनंद , प्रवास सुखकर होतो .
जेव्हा व्यक्ती वैचारिक , आर्थिक , मानसिक , सामाजिक आणि लैंगिक दृष्टीनेही सक्षम होते तेव्हाच पालकांनी त्याचा विवाह करावा . विवाह म्हणजे एक जबाबदारी आहे तीही संपूर्ण आयुष्यभराची . ज्यांना ती पेलवत नाही किंवा पेलावण्याची ताकदच नसते नुसतेच आपले बेफिकीरीने जगायचे ते हा कन्सेप्ट आनंदानी स्वीकारतील. मुळातच ह्यामागे जबाबदारी टाळणे हा हेतू स्पष्ट आहे. आयुष्यभराची साथ आयुष्य समृद्ध करते हे न समजणे हे दुर्दैवच म्हंटले पाहिजे.
पाश्चिमात्य लोक आपल्या चांगल्या गोष्टींचे समर्थन करतात . कर्ज काढून भारतात आपल्या संस्कृतीचा अभ्यास करायला येतात ती संस्कृती आज आपल्यालाच नकोशी झाली आहे त्यातील उदात्त विचारांची बैठक नकोशी झालेली आहे हे आजचे चित्र आहे पण समाजाच्या भविष्यासाठी हे निश्चित पोषक नाही. हि खरी शोकांतिका आहे .
स्वैराचाराला बंधन म्हणूनच विवाह संस्था आहे. पण आजच्या कलियुगात कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. जगायचे तेही फक्त स्वतःपुरते . मुले होणे संसार होणे ह्यात किती प्रेम आहे , मुलांना मोठे होताना पाहणे ह्यात स्वर्गसुख आहे आणि म्हणूनच कुटुंब व्यवस्था जन्माला घातली आहे परमेश्वराने . पण त्याला बगल देवून आपल्याला सर्व सुखे हवी पण जबाबदारी नको म्हणून हि असली थेर आता माणसाला सुचत आहेत . मुक्त विचारसरणी घाला चुलीत , त्याच्या नावावर मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि आधुनिक विचारांचे आम्ही कसे भोक्ते आहोत हे मिरवायचे जे बिन बुडाचे आहे आणि अशोभनीय आहे . भारतीय संस्कृतीची पाळेमुळे घट्ट आहेत आणि त्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला असलाच पाहिजे. भारतीयांच्या मनातील देवांचे , परंपरांचे अधिष्ठान उखडून टाकणे सहज सोपे नाही. आपले वेद , पुराण संस्कृती ह्यावर आपली नितांत श्रद्धा आहे.
आपली एखादी पिढी ह्या पाश्चिमात्य नको त्या गोष्टींचे अनुकरण करू पाहत आहे कारण कसली बंधने नको मुक्त जगायचे आहे. पण हा पायंडा पडू शकणार नाही इतकी आपली संस्कृतीची पाळेमुळे भक्कम आहेत . ह्या कडे वळण्याचा मानसिक कल एखाद्या जातकाचा कसा होतो ह्याचा थोडा अभ्यास करुया .
सर्व सुखाचा आणि विवाहाची परिभाषा शिकवणारा ग्रह शुक्र जेव्हा हर्शल राहू केतू नेप ह्यांनी दुषित होतो आणि त्याच सोबत चंद्र तेव्हा ह्या विचाराना खतपाणी घालतो . मुळातच हर्शल हा रूढी झुगारून देणारा ग्रह आहे . प्रामुख्याने पत्रिकेतील काम त्रिकोण महत्वाचा आहे , सप्तम जे आपला जोडीदार आणि तृतीय हे सप्तम भावाचे म्हणजे विवाहाचे भाग्य दर्शवते . विवाहातून होणारे अनेकविध लाभ हे लाभ भावातून प्रत्ययास येतात . जगावेगळ्या ह्या गोष्टींसाठी सर्वप्रथम स्वतःचे मन आणि बुद्धी ने सहमती दिली पाहिजे म्हणजे जातक स्वतः जेव्हा ह्या विचारांनी प्रेरित होतो म्हणजे लग्न भाव महत्वाचा आहे. पंचम जिथे प्रणय फुलतो आणि अष्टम जिथे खरा शारीरिक संबंध येतो , आता ह्यात आपला धर्म काय सांगतो म्हणून नवम भाव डावलून कसा चालेल. मित्र मैत्रिणी लाभातून म्हणून लाभ भाव नजरेत येतोच.
एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत लागते , पुढाकार घेणे मंगळाचे काम तसेच रिती रिवाज आणि धर्माने सांगितलेल्या गोष्टींचे अनुकरण न करता धर्माच्या विरुद्ध आचरण करणारा राहू सुद्धा पत्रिकेत काम करत असतो . गुरु शनी हेही विचारात घ्यावे लागतात .
अनेकदा सप्तम भाव शनी राहू मंगळ केतू ह्यांनी दुषित होऊन विवाहाची आसक्ती उरत नाही म्हणून मग शोर्टकट म्हणजे लिव्ह इन . पंचम भाव सुस्थितीत असेल तर रोमान्स फुलतो , प्रेम होते पण तरीही बंधन नको असते अश्यावेळी त्या मुक्त स्वरूपाचे प्रेम लिव्ह इन हा पर्याय स्वीकारते .
लिव्ह-इन रिलेशनशिप ही जन्मकुंडलीतील सप्तम , पंचम भाव आणि शुक्र हा राहू केतू ह्यांच्या प्रभावाखाली त्यात धैर्य आणि साहस देणाऱ्या मंगळाच्या प्रभावाखाली दिसते. पारंपरिक विवाहाच्या अडचणी, स्वतंत्र विचार, आणि शारीरिक/मानसिक आकर्षण यांचा मिलाफ असलेली ग्रहस्थिती असल्यास अशी नाती प्रबळ होतात. राहू हा रूढी विरुद्ध वागणारा आणि नेहमीची चौकट तोडून बंधने झुगारून देणारा आहे . त्याचसोबत हर्शल .
शिस्त बंधन कुणालाच नको असते. साधे घरात आल्यावर चपला नीट ठेवणे , घरातील शिस्त वेळच्या वेळी झोप हेही कुणाला नको असते . शारीरिक आकर्षण पण बंधन नको हे समीकरण म्हणजे लिव्ह इन . आपल्याला जे हवे ते मिळवणे पण विवाह टाळून हा सोपा विचार म्हणजे “ लिव्ह इन “ जो आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे.
पाश्चिमात्य कुठल्याही संस्कृतीचे , विचारांचे अनुकरण जरूर करावे पण त्यासाठी आपल्या संस्कृतीचे उल्लंघन होवू नये . नवे विचार रुजवावेत पण जुन्या विचारांना फाट्यावर न मारता . आपल्या घरात दोन तीन पिढ्या असतात . प्र्तायेकाला हे नवीन विचार सहज मानवतील , झेपतील का हा विचार तरुणांनी नक्कीच सर्व प्रथम केला पाहिजे. ज्यांच्या अंगावर खेळून लहानाचे मोठे झालो त्यांनाच अक्कल शिकवायची म्हणजे त्यांना दुक्ख देण्यासारखेच आहे. मुळात कश्याला कुणाचे अनुकरण करायचे ? आहे ते काय वाईट आहे. पिढ्यान पिढ्या जे चालत आहे त्यात कुणाचे नुकसान झाले आहे का? नाही ना. आपल्या संस्कृती आपले हितच पाहणाऱ्या आहेत . उगीच समोरचा करतो म्हणून आपणही करायचे हे अर्थहीन आहे .
विवाह हे एक बंधन आहे आणि ते स्वीकारणे हीच आपली संस्कृती आहे. उठसुठ दुसर्याचे अनुकरण करणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा अपमानच म्हंटला पाहिजे . लोक आपले कुठे अनुकरण करतात , परदेशस्थ लोक त्यांच्या धर्माला धरून असतात मग आपण ह्याच त्यांच्या गुणाचे का नाही अनुकरण करत . भलतेच वागून प्रसिद्धी मिळत नाही आणि सुख तर त्याहून नाही . आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक समाजाची रचना केलेली आहे. काळ कितीही बदलला तरी आपली संस्कृती तीच आहे आणि आपल्या संस्कृतीने जे काही सांगितले आहे ते आपल्या कल्याणासाठीच आहे . आधुनिकतेच्या नावाखाली ते झुगारून देणे म्हणजे शहाणपण नाही . लिव्ह इन हा एक व्यवहार आहे आपल्या नको त्या भोगांच्या तृप्तीसाठी निवडलेला पर्याय. जिथे कुणालाच उत्तर देण्यास आपण बांधील नाही , नाही पटले चला ब्याग भर आणि निघा हे तर भेकडपणाचे लक्षण झाले.
समाजाचे हित जपणे हे आपलेही सर्वांचे कर्तव्य असल्यामुळे ह्या गोष्टीना अजिबात खतपाणी , प्रोत्चाहन न देणे हे समाजातील प्रत्येक घटकाचे कर्तव्य आहे. प्रेमाची भावना अत्यंत नाजूक कोमल आहे . फुलपाखरासारखे प्रेम हे प्रेम नसते ते फक्त वासनेने भरलेले आकर्षण असते. हे प्रेम खरे असूच शकत नाही जे आज हिच्यावर उद्या तिच्यावर होत जाते . खरे प्रेम जबाबदारी कधीही टाळणार नाही . माणूस हा आयुष्यात प्रेमाच्या भावनेचाच भुकेला असतो , कुणीतरी आपले असावे , आपल्याला आपले म्हणावे आणि त्याची साथ आयुष्यभर मिळावी ह्या साठी प्रयत्नशील राहावे पण त्यासाठी लिव्ह इन हा चुकीचा मार्ग स्वीकारू नये. अनेकदा ह्यातून काहीच निष्पन्न होत नाही , आयुष्याची कुटुंबियांची वाताहत तर होतेच पण बदनामीही होते , कारण समाज हे सहज स्वीकारत नाही आणि नेमके हेच आपल्याला समजत नाही . सहमत ??
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230