|| श्री स्वामी समर्थ ||
माणूस काम करत नाही तर त्याचे पोट त्याला काम करायला लावते . वितभर पोटाला भूक लागली कि काहीच सुचत नाही . नैतिक अनैतिक , चांगले वाईट हे सर्व पोट भरल्यावर करायच्या गप्पा आहेत . पण पोटाची भूक माणसाला काहीही करायला भाग पाडते हे आयुष्यातील संवेदनाशील चित्र आहे. माणसाच्या मनात नसतानाही माणूस चोरी करतो , चुकीच्या मार्गाने धन कमावतो ते सर्व काही ह्या दोन घासासाठी ..
पोटात प्रज्वलित झालेला भुकेचा यज्ञ आणि त्याला दोन घास अन्नाची आहुती देण्यासाठी म्हणजेच अन्नधान्य पर्यायाने पैसा मिळवण्यासाठी मनुष्य अविरत कष्ट करतो . जन्मल्यापासून अखेरच्या श्वासापर्यंत त्या दोन घासाची तजवीज करण्यासाठीच उभा जन्म वेचतो . पैशाचे मोल पैसा नसतो तेव्हा खर्या अर्थाने समजते .
आज आपण आपल्या पत्रिकेत असलेल्या “ धन योगा “ संबंधी जाणून घेवूया चर्चा करुया . आपण कुटुंबात जन्म घेतो ते निर्धन किंवा सधन असते जे सर्वस्वी आपल्या प्रारब्धावर अवलंबून असते . आपल्या कर्मांचा आरसा म्हणजेच आपला हा जन्म . देवाने विचारले असते तुला कुठल्या कुटुंबात जन्म हवा तर सगळ्यांनीच अमिताभ बच्चन किंवा अंबानीच्या घराकडे बोट दाखवले असते . असो
पत्रिकेतील द्वितीय भाव आपले कुटुंब आणि कौटुंबिक धन संपत्ती , आर्थिक सुबत्ता दर्शवते. आपले शिक्षण झाल्यावर नोकरी व्यवसाय करून आपणही धन अर्जित करायला लागतो . कष्ट सगळेच करतात पण त्याचा मोबदला वेगवेगळा असतो . त्यासाठी पत्रिकेतील ग्रहयोग आणि पूरक दशाही कारण ठरतात .
पैसा कोण मिळवणार आपण स्वतः म्हणून लग्न भाव , लग्नेश मुळात चांगले हवेत . लग्नातील राहू माणसाला बर्याच अंशी महत्वाकांक्षी करतो. पैसा हा राज मार्गाने मिळाला तर टिकतो आणि फळतो . कुठल्याही कृतीमागे विचार असतो आणि तो करण्यासाठी लागते ती बुद्धी . ती स्थिर असावी ह्यासाठी बुध महत्वाचा , मनाचा कारक चंद्र आणि ऐश्वर्य देणारा सर्व सुखांचा कारक शुक्र हे महत्वाचे ग्रह आहेत . गुरूला विसरून कसे चालेल .
नोकरी कि व्यवसाय ? शेवटी अर्थार्जन महत्वाचे . नोकरी अर्थार्जनात स्थिरता देयील पण व्यवसायात नफा तोटा होणार आणि तो पेलवायची मानसिक कुवत लागते . तसेच कुठला व्यवसाय करावा हेही समजले पाहिजे .
पत्रिकेतील अर्थ त्रिकोण हा २ ६ १० ह्या भावांनी तयार होतो. धन भाव पैसा . ६ वा भाव रोजच्या जीवनात मिळवलेला पैसा आणि १० वा म्हणजे दशम भाव हा नोकरी धंद्यातून पैसा कसा मिळवणार ह्याबद्दल सांगतो . पंचम भाव हा कमी कमी कष्टातील धन जसे शेअर मार्केट सट्टा जुगार , अष्टम स्त्रीधन , वारसा ह्यातून संपत्ती दर्शवतो.
धनेश तृतीयात असेल तर प्रवासातून , लिखाणातून , भावंडांच्या कडून पैसा मिळतो . रवी चंद्र , गुरु रवी , चंद्र गुरु हे योग संपत्ती साठी चांगले असतात . अर्थ त्रिकोणाशी ह्याचा संबंध असेल तर उत्तम धनप्राप्ती होते तसेच हे ग्रह पृथ्वी तत्वाच्या राशीत असतील तर धनाचा संचय होतो . धनेश व्यय भावात किंवा त्रिक भावात असेल तर पैसा टिकणार नाही . धन भावात राहू असेल तर वाम मार्गाने धन अर्चित होते . चंद्र शनी योगावर पैसा टिकतो , हे लोक कमी खर्च करणारे असतात . हा योग अशुभ असेल तर मात्र दारिद्र येते .
गुरु शुक्र लौकिक दृष्टीने पैसा नातेवाईक मित्र , लोकप्रियता मिळवून धन देतील. रवी मंगळ स्वतःच्या कर्तबगारीने , कष्टाने , पैसा मिळवतील. अष्टम भावाशी गुरु चंद्राचा योग आला तर वारसा हक्कानेही संपत्ती मिळते . मंगळावर शनीची दृष्टी धन मिळवण्यास अनंत अडथळे आणते . शनिवर हर्शल ची दृष्टी असेल तर आर्थिक नुकसान विशेषतः शेअर मार्केट मध्ये होते . शनी रिअल इस्टेट मधून तसेच काबाड कष्ट करून पैसा मिळवतो.
शुक्र चंद्राचे शुभ स्थानातील योग अर्थार्जनाला पूरक असतात . शुक्राची मंगळावर अशुभ दृष्टी किंवा मंगळाची शुक्रवार तसेच शुक्र दुषित असेल तर व्यसनांवर पैसा खर्च होतो. अश्या वेळी व्यक्ती उतावळा , पैशाच्या बाबत निष्काळजी होईल.
बुधाकडे संवाद आणि आकलन आहे. लेखन , जाहिरात क्षेत्र , छपाई , भाषणे , प्रवास , कमिशन ची कामे , सरकारी व्याज रोखे ह्यातून जर बुध चांगला असेल तर पैसा मिळेल.
शुक्र शनीचा अशुभ योग पैसा घालवेल . असे अनेकविध ग्रहयोग पैसा मिळवून देणारे आणि पैशाचा ओघ खंडित करणारे सुद्धा आहेत . मुळात धनेश दुषित नसावा . धनेश लाभेश हे स्थिर राशीत असावेत . लग्नेश आणि चंद्र मजबूत हवाच .
पोटाला भूक लागली कि माणूस काम करायला अर्थार्जनासाठी घराबाहेर पडतो आणि धन प्राप्त होते . मिळवलेल्या धनाचा उत्तम विनियोग करणे हे माणसाच्या हाती नक्कीच आहे. आज कुणी एकदा जेवायला घालेल पण कुणी ५ रुपये हातावर ठेवणार नाही . पैसा हे विष आहे शेवटी . संबंध बिघडू शकतात म्हणून शक्यतो नातेसंबंधात पैशाचे व्यवहार नकोत केलेत तर स्वछ्य असावेत तोंडी तर कधीच नको, कागदोपत्री व्यवहार असावेत .
आज व्यक्तीची ओळख हि आर्थिक स्थर काय आहे त्यावरूनच होते . कुठल्या गाडीतून व्यक्ती उतरते आहे , कुठले अत्तर लावले आहे, पेहराव वेशभूषा , परिधान केलेले दागिने ह्यावरून व्यक्तिमत्वाचा निकष लावला जातो . पैसा म्हणजे सबकुछ असणार्या ह्या जगात पत्रिकेत पैशाचा ओघ नसेल तर व्यक्तीला अनेक मानापमान आणि समस्यांना तोंड द्यावे लागते .
आपल्या कुलस्वामिनीची नित्य उपासना , श्री सुक्त पठण , महालक्ष्मी अष्टक हे लाभ करून देयील. आपल्या सद्गुरूंची उपासना जगायला बळ देते . अन्न दान, जल दान सर्वश्रेष्ठ आहे ते करत राहणे .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment