|| श्री स्वामी समर्थ ||
आपण घरात असतो तेव्हा सगळ्या खोल्यातील दिवे पंखे चालू ठेवत नाही. ज्या खोलीत असतो तिथलाच दिवा पंखा चालू असतो , दुसर्या खोलीत जाताना दिवे पंखे बंद करून जातो कारण आता तिथून आपण दुसर्या खोलीत जाणार असतो. ग्रहांचेही अगदी तसेच आहे . सगळे नवग्रह आपल्या आयुष्यात एकाच वेळी काम करत नाहीत किबहुना त्याची फळे एकाच वेळी मिळत नाहीत . एखादी घटना घडवण्याचा हक्क दशा स्वामीकडे असल्यामुळे ज्या ग्रहाची दशा असते त्या ग्रहाची सत्ता आपल्या पत्रिकेवर त्या कालावधीत असते , तसेच त्यातील अंतर्दशा , विदशा ह्या सुद्धा बलवान असतात आणि फलिते देतात .
अपुरा अभ्यास किंवा शास्त्राची अर्धवट माहिती तसेच न समजलेले वाचन ह्यामुळे अनेकदा आपण आपले वाईट करणारे “ पापग्रह “ असतात असा चुकीचा समज करून घेतो . हा समज जनमानसात इतका खोल रुजलेला दिसतो कि काहीही वाईट झाले कि माझी साडेसाती आहे , माझी राहू दशा आहे लगेच सुरु होते .
एखाद्या पत्रिकेत जातक मुळातच घाबरट किंवा कमकुवत आत्मविश्वास नसलेला असेल , एखादी नवीन गोष्ट करण्यासाठी उत्सुक किंवा आत्मबल नसलेला असेल तर अश्यावेळी सर्वप्रथम लग्न लग्नेश आणि चंद्र कमकुवत असतो असे दिसून येते . मग इथे राहू केतू शनी कुठे आले ? येतंय न लक्ष्यात . अनेकदा चोर सोडून संन्यासाला फाशी असाच काहीसा प्रकार घडतो कारण अर्धवट ज्ञान . पत्रिकेत उधळपट्टी करणारे ग्रह योग असतील तर व्यक्ती कायम धन अर्जित करेल पण त्याचा संचय नाही करू शकणार मग दशा कुठलीही असो.
चंद्र शुक्र गुरु हे नैसर्गिक शुभ ग्रह आहेत . पण तेही जर बिघडले तर तेही शनी राहू पेक्षाही वाईट फलित देतात हे लक्ष्यात ठेवले पाहिजे . उदा. चंद्रच पत्रिकेत दुषित किंवा बलवान नसेल तर मन कमकुवत असेल. उदा चंद्र नेप युती किंवा चंद्र हर्शल युती ती मानसिकता बिघडवणारी आहे. पण हा ह्या माणसाचा स्वभाव होईल आणि तोही कायमचा . मग राहू दशा असो अथवा बुध किंवा मंगळ ,व्यक्ती चा चंद्र हर्शल युतीमुळे असलेला विक्षिप्त स्वभाव कमी होणार नाही तो तसाच राहील. कारण तीच ग्रहांची बैठक घेवून जातक जन्माला आलेला आहे.
आजचेच उदा बघा . एका स्त्रीने जिचा घटस्फोट झालेला आहे तिने दुसर्या विवाहाचा प्रश्न केला . मी तिला म्हंटले नाही केले तर अधिक सुखी राहाल . तर म्हणाली मग आधीचा नवरा पुन्हा येयील का माझ्यासोबत. आता काय बोलायचे कळेना . चंद्र किती बिघडला असेल हे ह्या उदा वरून समजेल.
व्ययात मंगळ अनेकदा नुकसान , पैशाचा अपव्यय दर्शवतो . मग अश्यावेळी दशा कुठलीही असो , खर्चिक वृत्ती जातकाची अमुक अमुक ग्रहस्थितीमुळे असते त्याला वाईट दशेची जोड मिळाली तर ती वाढेल कमी होणार नाही .
विवाहा साठी पत्रिका पाहताना मुळात वैवाहिक सौख्य आहे कि नाही ते शुक्रावरून समजते . मग शुक्र कन्या किंवा सिंह राशीत वा नवमांशात असेल , तसेच हर्शल , राहू नेप ह्या ग्रहांच्या सोबत असेल तर वेगळे फलित मिळते. लग्न आणि नवमांश पत्रिकेत शुक्र सिंहेत असेल तर विवाहच होत नाही किंवा झालाच तर टिकत नाही . शुक्र लग्नी असेल तर जातक सुंदर असेल पण त्यासोबत पापग्रह असतील तर त्या पापग्रहांची दृष्टी सप्तम भावावर जावून वैवाहिक सौख्य बिघडवणारा शुक्र तर बिघडेलच पण सप्तम भाव सुद्धा बिघडेल हे लक्ष्यात आले पाहिजे . आता अश्यावेळी दशा कुठली असेल ते महत्वाचे पण फळ फक्त दशाच देत नाही हि अशी मुळात पत्रिकेत असलेली ग्रहस्थिती सुद्धा देते ह्यासाठी हा लेखन प्रपंच .
वैवाहिक सुखाचा शुक्र सौख्य देत नसेल तर कितीही दशा आल्या तरी विवाह सौख्य नाही ते नाहीच कारण शुक्र दुषित असणे हा पत्रिकेतील मोठा दोष आहे .
अनेकदा पत्रिकेत असलेली मुळ स्थिती डावलून आपण दशेला दोषी ठरवतो . दशा ज्या ग्रहाची असेल तो ग्रह त्या दशेत संपूर्णपणे कार्य करणारच पण म्हणून प्रत्येक दशा भीती दडपण न्यूनगंड देयील असे नाही . मूळ पत्रिकेतील चंद्राची स्थिती त्याला कारणीभूत असेल हे लक्ष्यात घेतले पाहिजे .
बाबा नेहमीच रागावतात , फटके मारतात त्यामुळे ते शालेय जीवनात जणू व्हिलन असतात जसे आपले पापग्रह पण अति झाले कि कधीही न ओरडणारी कायम पदराखाली घेणारी आणि माया करणारी आई सुद्धा रौद्र रूप धारण करून मुलाला उपाशी ठेवते जसे आपले शुभग्रह . अनेकदा पापग्रह आयुष्य पुढे नेतात जसे भाग्यातील राहू परदेशी नेण्यास उत्सुक असतो . चांगली नोकरी मिळाली दुबईला तरीही राहू वाईट का?
मूळ ग्रहस्थिती दशेनुसार बदलत नाही . पत्रिकेतील ग्रह आपल्या पूर्व कर्मानुसार फलित प्रदान करणारच . फक्त त्या फलिताचा कालावधी ठरवतो तो दशास्वामी इतकेच .
प्रत्येक वेळा दोष दशेला न देता मूळ ग्रहस्थिती सुद्धा तपासावी लागते तेव्हाच नेमके फलित देणारे ग्रह आरशासारखे स्वछ्य दिसतात .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment