Thursday, 10 August 2023

अष्टम स्थान -मृत्यू आणि मृत्यूसम पीडा

 || श्री स्वामी समर्थ ||

पत्रिकेतील प्रत्येक भाव तितक्याच तोलामोलाचा आहे आणि प्रत्येक भावाकडे विशिष्ठ असे कार्य दिलेले आहे. कुठलाही ग्रह नक्षत्र भाव राशी पूर्णतः चांगली किंवा वाईट नसते . असो. आज अष्टम भाव बघुया थोडक्यात . 

अष्टम भाव म्हणजे “ मृत्यू “ असा अनेकांचा समज असतो पण तसे आहे का तर नाही . मृत्यू आणि मृत्युसम पीडा ह्यात जमीन  आस्मानाचा फरक आहे. आपल्यापैकी सगळ्यांचाच अष्टम भाव हा दशा अंतर्दशा आणि विदशा ह्या स्वरूपात लागतच असतो मग आपण काय लगेच मरणार का? तर नाही. त्यामुळे मृत्यू म्हणजे “ निर्वाण “ ,आणि मृत्युसम पीडा ह्यात असणारा फरक समजून घेतला पाहिजे. अष्टम स्थान हे मृत्युसम पिडा देते , भ्रष्टाचार , वडिलोपार्जित संपत्ती , आपल्या आयुष्यातील गुप्त गोष्टी इथे आहेत. मग ते काहीही असो गुप्त प्रेमप्रकरण किंवा गुप्त आर्थिक व्यवहार . तसेच कालपुरुषाच्या कुंडलीत इथे वृश्चिक रास येते आणि शरीरातील गुप्तांगे इथे येतात जी आपण गुप्त, झाकून ठेवतो . समजतंय का? म्हणून आपल्या गुप्त गोष्टी जगासमोर येणार नाही ह्याची आपण काळजी घेतो . ज्या गोष्टी वाईट किंवा सहज सांगता येत नाहीत त्या सर्व ह्या अष्टम भावात येतात . असो . इथे मृत्यू सुद्धा आहे पण फक्त हे स्थान लागले तर मृत्यू येणार नाही पण मृत्युसम पिडा निश्चित येयील.

मृत्यू , जन्म आणि विवाह हे 3 पत्ते विधात्याने आपल्या हातात ठेवले आहेत . एखाद्या निष्णात अभ्यासू ज्योतिषाला त्याच्या साधनेमुळे एखाद्याचा मृत्यू जरी समजला तरी त्याने तो सांगू नये असे शास्त्र सांगते . आपल्याला मृत्यू कधी येणार ते माहित नाही म्हणूनच आपण आनंदात जगत आहोत .अनेकदा अज्ञानात सुख असते म्हणतात ते हे असे, कश्याला जाणून घ्यायच आहे आपल्याला आपला मृत्यू  ? अहो आजकालच्या जगात अनेक अनेक लोक रोज हजार मरणे मरत जगत आहेत हे येणाऱ्या पत्रीका बघून समजते . असो .

मृत्यू च्या वेळी वेगळी ग्रहस्थिती असते . अश्यावेळी षष्ठ जे आजारपण देते , अष्टम जे मृत्यूतुल्य पिडा देते आणि व्यय जे आपल्या शरीराचा अस्तित्वाचा व्यय करते ,त्याच सोबत अष्टम भावाचे अष्टम म्हणजे तृतीय भाव सुद्धा महत्वाचा असतो आणि अर्थात मारक स्थाने . ह्या सर्व भावांची आणि त्यातील ग्रहांची एकत्रित मोट बांधली जाते , तसेच ह्या भावांच्या दशा अंतर्दशा आणि विदशा आपली अखेर करतात त्यामुळे अष्टम भाव लागला कि मृत्यू हे आता विसरून जा.

शेवटी जन्माला आलेला प्रत्येक जीव आपला प्रवास , आपले इथले कार्य संपले कि जाणार आहे तेव्हा उगीच असल्या प्रश्नांच्या उत्तराचा शोध सुद्धा घ्यायला जाऊ नका. जीवन फार सुंदर आहे. आजचा दिवस आणि आत्ताचा क्षण आपला .पुढचे बघतील स्वामी , द्या त्यांच्यावर सोडून सर्व. आत्ताचा क्षण आनंदाने जगणे हेच केवळ आपल्या हाती आहे . सत्कर्म करा , सगळ्यांना मदत करा , राग रुसवे फुगवे ह्यांनी हाती काहीच लागणार नाही ,जळी स्थळी फक्त आपले महाराज दिसुदेत ...बस इतकं करा पुढचे सर्व सोपे होऊन जायील.

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क – 8104639230


No comments:

Post a Comment