|| श्री स्वामी समर्थ ||
धर्म त्रिकोणातील आणि एकंदरीत पत्रिकेतील सर्वात महत्वाचा भाव म्हणजे प्रथम भाव ज्याला तनु किंवा लग्न स्थान सुद्धा म्हंटले जाते . आपल्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर उदित होणारी राशी ह्या भावाची द्योतक असते. तसे पत्रिकेतील प्रत्येक भावाला अनन्यसाधरण असे महत्व आहे पण लग्नभाव आणि त्यातील ग्रह तसेच त्यावर दृष्टी टाकणारे ग्रह इथूनच अभ्यास सुरु झाला पाहिजे आणि तसा तो झाला नाही तर फलादेश नक्कीच चुकणार . लग्न भाव म्हणजेच तनु स्थान , तनु म्हणजे शरीर आपण स्वतः .हा भाव दर्शवतो तो आपला मेंदू म्हणजेच आपली सोच . ती किती चांगली वाईट त्यावरून आपले आयुष्य असते. दिसणे आणि प्रत्यक्ष असणे ह्यातील फरक सूक्ष्म पणे दर्शवणारा हा भाव आहे. इथे सखोल अभ्यासाची आवश्यकता नक्कीच आहे. ज्याचा इथे अभ्यास कमी पडेल त्याला हि व्यक्तीच समजणार नाही. आपण सर्वच इथे एका विशिष्ठ उद्देशाने आलो आहोत आणि आपले काम झाले कि आपण जाणार आहोत . ते काम कुठले आणि कसे करणार त्याची उकल हा भाव करतो.
लग्न भावापासून सुरु झालेला आपला प्रवास व्यय भावात पूर्ण होतो. लग्न भाव आपले विचार त्याच्या कक्षा दर्शवते. आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण , जीवनातील संकटांवर मात करण्याची त्यांच्याशी दोन हात करण्याची क्षमता आपल्यात आहे कि नाही ? असल्यास किती आहे ? आपले व्यक्तिमत्व त्यातील बारकावे , एखाद्यावर छाप पडण्याची वृत्ती आणि आयुष्य स्वीकारण्याची मानसिकता ह्या सर्वच गोष्टी इथे आहेत . एखाद्या संकटाने गर्भगळीत होऊन आयुष्य संपवून टाकण्याची भाषा करतो कि पुन्हा उभे राहून स्वतःला “ लढ “ म्हणण्याची ताकद आहे हे दर्शवणार्या लग्न भावाची महती आहेच. आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाचा उगम लग्न भावाशीच असतो . कारण तिथे आपण “ स्वतः “ असतो . म्हणूनच हा भाव संघर्षाचा आहे , इथे स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे. स्वतःला जागवण्याची जिद्द , धडपड आहे. लग्न भावात सर्वात महत्वाचा आहे तो मेंदू . आपले विचार आपले व्यक्तिमत्व तयार करत असतात आणि त्याची छाप आपल्या चेहऱ्यावर सुद्धा असतेच . त्यामुळे आपला राग लोभ मत्सर वेदना हाव भाव द्वेष आनंद उत्साह वासना सर्व काही इथे लपून राहत नाही त्या वेळोवेळी प्रगट करणारा हा भाव ज्याला आपल्या अभ्यासात खरतर मेरुमणी म्हंटले पाहिजे . लग्न बलवान असेल तर पत्रिकेचा दर्जा उंचावतो .लग्नेश आणि लग्नातील ग्रह आपली ओळख करून देत असतात . त्याच सोबत लग्न बिंदू सुद्धा महत्वाचा आहे.
एकंदरीत काय तर तनु भाव राजस आहे पण अनेकदा त्याचा अपूर्ण अभ्यास आपल्याला योग्य उत्तराकडे नेऊ शकत नाही.
प्रश्न कुठलाही असो तो कुणाचा आहे? जातकाचा आणि जातक कुठे आहे तर अर्थात “ लग्न भावात “ .
वाहन घ्यायचे आहे , विवाह करायचा आहे , संततीचा प्रश्न आहे, कर्ज घ्यायचे आहे, परदेशी जायचे आहे , व्यथा आहे , वेदना आहेत , उच्च शिक्षण घ्यायचे आहे पण हे सर्व कुणाला ? तर जातकाला त्यामुळे आयुष्यातील कुठल्याही प्रश्नाचा उगम हा प्रथम भावातूंनच होणार म्हणून त्याचा अभ्यास महत्वाचा आहे. एकदा हा भाव समजला कि जातक एखादे काम किंवा एखादी जबाबदारी निभावून नेऊ शकेल , ती क्षमता त्यात आहे का ? हे सहज लक्ष्यात येते .
म्हणूनच लग्न भावाला -प्रथम तुला वंदितो म्हंटले तर वावगे ठरू नये.
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment