Friday, 18 August 2023

जा जी ले तेरी जिंदगी

 || श्री स्वामी समर्थ ||


आज देव आनंद ची गाणी ऐकत होते. त्यातील “ हम है राही प्यार के...” ऐकताना एकदम मस्त वाटत होते . मूड फ्रेश झाला. जुनी गाणी खरच आनंदाचा ठेवा आहेत . अनेकदा समुपदेशन करताना स्वतःला सुद्धा स्ट्रेस जाणवतो. अनेकांचे प्रश्न बरेचदा ते त्यांच्या मनाच्या बैठकीशी निगडीत असतात . त्यांची बैठक सुधारताना आपली मानसिक घडी विस्कटू न देणे हेही एक आव्हान असते . नाही म्हंटले तरी मनाचा स्वीच on आणि off करता येणे प्रत्येक वेळी अवघड असते शेवटी आपण सर्व माणसे आहोत आणि भावनाप्रधान आहोत .


बरेच लोकांचे प्रश्न त्यांच्यासाठी यक्षप्रश्न असतात आणि आयुष्यात मानसिक उलथापालथ करून जातात . मनाचा ब्रेक ज्याला लावता आला त्याने जग जिंकले असे म्हंटले पाहिजे . मन असते ते दिसत नाही पण संपूर्ण शरीरावर आणि आयुष्यावर अधिराज्य गाजवणारे मन फार विचित्र आहे. क्षणात काय करेल आपले आपल्यालाही समजत नाही. त्यावर ताबा मिळवणे कठीण त्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात . मुळात आहे ती परिस्थिती स्वीकारणे ह्यापलीकडे अनेकदा आपल्या हातात काहीच नसते पण ती स्वीकारताना आपली मात्र दमछाक होते.


अनेक पत्रिका बघताना राहूच्या आणि शनीच्या दशेत हि मनाची झालेली दशा प्रकर्षाने जाणवते. मन सैरभैर होणे , निर्णय घेणे अवघड होणे तसेच आपल्याबद्दल जवळच्या लोकात , मित्रात लहान सहान शुल्लक गोष्टींमुळे झालेले गैरसमज आपले भावना विश्व कोलमडून टाकतात ते कायमचेच. आपण ज्यांच्या सोबत लहानाचे मोठे झालो , लहानपणी शाळेत एकमेकांच्या डब्यातील खाल्ले त्यानाही आपले मन समजू नये , त्यांनीही आपल्या बद्दल गैरसमज करून घ्यावेत अशी ग्रह स्थिती निर्माण होणे हे अजब आहे पण हाच तर आहे ग्रहांचा खेळ. हे गैरसमज आपल्या आयुष्यातील शांततेला सुरुंग लावणारे असतात .संथ असणार्या पाण्यात अचानक खडा पडून तरंग उठावेत तसे मनाचे काहीसे होते . 

अनेकदा हि परिस्थिती भीषण स्वरूप धारण करते आणि आपण एकाकी होऊन जातो . राहूच्या दशेत हे अनुभव 100% येतातच कारण राहू हा गैरसमज करण्यात माहीर आहे. मी हे केले नाही मला असे म्हणायचे नव्हते हे कुणाकुणाला सांगणार आपण . अनेकदा आपले मित्र जवळचे लोक आपल्याशी तुटक वागू लागतात , अचानक बोलणे सुद्धा बंद करतात आणि आपल्याला कळतच नाही नेमके झाले तरी काय ??? असो.

ह्या सर्वांवर उत्तम उपाय म्हणजे ह्यातून स्वतःला अलगद बाहेर काढून आपले मन विरक्त करणे . जो आपल्यासोबत असेल तो आपला. बस मध्ये सहप्रवासी कसे त्यांचा स्टोप आला कि उतरून जातात आणि आपणही जातो अगदी तसेच सगळ्यात असून कश्यात नसावे हा मूलमंत्र आयुष्याचा असला पाहिजे आणि आजकालच्या जगात तर पाहिजेच पाहिजे. आता भावना , इमोशन फार दिसत नाहीत . एकमेकांना धरून ठेवणे , त्यासाठी प्रयत्नशील राहणे ह्या भावना आता विरळ होत चालल्या आहेत. भावनाशुन्य व्यक्ती आजूबाजूला दिसतात आणि त्यात मग भावनांना पूर येणारी माणसे सहज वाहून जातात , त्यात आपले माणूस , आपलेपणा , मायेचा ओलावा शोधत राहतात आणि जास्तच दुखी होत जातात.


आजकाल स्वतःला आनंदी ठेवणे म्हणजे मोठे दिव्य आहे. जराजराश्या गोष्टीनी आपण निराश होतो , स्ट्रेस घेतो , ह्या मैत्रिणीचा फोन नाही आला , मला विचारले नाही , हे मला सांगितले नाही इतक्या लहान सहान गोष्टींचा उगीच बाऊ करतो कारण आपले मनाचे बंध कुठेतरी अडकलेले असतात , ज्या क्षणी ह्या सर्वातून आपण स्वतःची सुटका करून घेवू तो खरच सोन्याचा दिवस. एक क्षण असा येतो कि अश्या माणसांचा उबग येतो , ज्यांच्याशिवाय आयुष्य अर्थहीन वाटत होते तीच माणसे नकोशीच वाटायला लागतात . 


मध्यंतरी आमच्या इथे कुणीतरी गेले आणि सगळ्यांना माहित होते पण मला कुणीच नाही सांगितले तेव्हा मला फार वाईट वाटले. कुणाला विचारले कि मला का नाही बोललात तर उत्तर होते “ अग मला वाटले तुला माहित असेल ...” इतकी राजकारणी उत्तरे. असो. पण त्यावर माझ्या मुलाने मला सांगितले अग आई तुला जरी समजले असते तरी असा काय फरक पडणार होता , तू जाणार होतीस का? नाही ना? मग तुला आत्ता समजले आणि मग त्यात काय फरक पडतो . सोड ना. मला त्याचे हे उत्तर आणि स्पष्टीकरण मनापासून पटले. 


आता तर वाटते जितक्या गोष्टी आपल्याला कमी समजतील तितके आपण खुश आणि सुखी. आपण स्वतःचे भावविश्व निर्माण केले पाहिजे ते जमले पाहिजे म्हणजे ते जमवायचे आणि मग त्यात आपण आपली कंपनी एन्जोय करायची . हे एकदा झाले कि सगळच सोपे होऊन जाते. 

मन एकदा निराशेच्या गर्तेत सापडले कि ते पूर्वपदावर आणणे महा कठीण होते . पत्रिकांचा अभ्यास करताना चंद्रावर शनीची राहूची दृष्टी ,चंद्रासोबत होणारे शनी राहू केतू हर्शल नेप ह्यांचे कुयोग माणसाच्या मनाची बैठक पार ढिली करून टाकतात. आपण काही गोष्टी स्वीकारत नाही इथेच चुकते . प्रचंड नामस्मरण आणि योग साधना हा त्यावरील एकमेव उपाय आहे. एखाद्या गोष्टीचा इतकं वीट येतो कि शेवटी काहीच नको वाटते कारण त्या क्षणी आपण सत्य स्वीकारलेले असते आणि एकटे राहायला शिकलेलो असतो.

सगळे क्षणाचे सोबती आहेत , म्हणून फार गुंतणे नकोच . गुंतले कि अपेक्षा वाढतात आणि त्याच पुढे दुक्ख देतात . सर्वात महत्वाचे म्हणजे कुणाच्याही मागे लागणे आणि कुणालाही गरजेपेक्षा अधिक महत्व देणे बंद करा. आपले स्वतःचे महत्व आणि असणे महत्वाचे इतर असले तर आनंद नसले तरी आनंद हे धोरण ठेवा. इतरांना प्रेरणा मिळेल असे जीवन आपले नक्कीच आहे उगीचच आपण त्याचे कडबोळे करून ठेवतो . 

आयुष्य आहे तसे जगत राहणे ...शेवटी जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए... हेच जमले पाहिजे . 

जा जी ले तेरी जिंदगी.... ह्याची खरी सुरवात स्वतःपासून झाली पाहिजे .

सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230




 

 

  


No comments:

Post a Comment