|| श्री स्वामी समर्थ ||
चंद्र हा सर्वाधिक गतीने भ्रमण करणारा ग्रह आहे . आपल्या आयुष्यातील घटना ह्या सर्वस्वी महादशेवर अवलंबून असतात आणि ह्या दशांशी निकटचा संबंध चंद्राचाच असतो. आपली जन्मस्थ असणारी दशा हि आपल्या जन्म नक्षत्रावर असते. जसे चंद्र जर मिथुन राशीत पुनर्वसू नक्षत्रात असेल तर जन्मस्थ दशा हि गुरूची असणार आहे . तदपश्च्यात शनी पुढे बुध अश्याप्रकारे सर्व दशा क्रमाने येत राहतील.
चंद्र ज्या नक्षत्रात त्या ग्रहाची दशा अर्थात त्या ग्रहांनी दर्शवलेले पत्रिकेतील भाव जागृत होतील आणि त्या ग्रहाच्या अमलाखाली आपले जीवन त्या दशाकाळा पुरते असणार आहे . उदा .चंद्र जर मेष राशीत अश्विनी नक्षत्रात असेल तर दशा केतूची असणार आहे . पण चंद्र जर भरणी नक्षत्रात असेल तर दशा केतूची नसून शुक्राची असेल आणि चंद्र कृत्तिका नक्षत्रात असल्यात दशा रवीची असणार आहे. आता त्याहीपलीकडे हे ग्रह आपल्या पत्रिकेत किती बलवान आहेत ह्यावर संपूर्ण दशेचे फळसुद्धा असणार आहे .
म्हणजेच आयुष्य संपूर्णपणे बदलण्याची ताकद ह्या चंद्रात आहे. कफ वृत्ती आणि चंचलता , मनातील सर्व इच्छांचा कारक हे गुण चंद्रप्रधान व्यक्तीत दिसून येतात . चंद्र शुभ असेल तर त्याची दृष्टी सुद्धा सुभत्व निर्माण करेल. अत्यंत मधुर वाणी , आई, निसर्ग , खाद्यपदार्थ , प्रवास , समाज , सामाजिक बांधिलकी , भावना , मनातील विचार ह्यावर चंद्राचे प्रभुत्व निश्चित आहे. त्यामुळे चंद्राच्या दशा ,अंतर दशेत ह्या सर्व गोष्टींची प्रचीती येते .
चंद्र हा सर्वात जलत गतीने जाणारा ग्रह आहे . त्याला सतत बदल हवा असतो , एका जागी थांबणे त्याला पसंत नाही त्यामुळे ह्या दशेत चंद्राच्या गुण धर्माला अनुसरून व्यकी सुद्धा एका जागी असणे पसंत करत नाही जसे वेगवेगळ्या पदार्थांच्या चावी चाखणे म्हणजे जेवणात सतत बदल , प्रवास करणे , नोकरीत ,राहत्या वास्तूत बदल अश्या गोष्टी हमखास घडताना दिसतात.
चंद्र पत्रिकेत पंचम भावात स्थित असेल तर व्यक्तीचे मन हे सदैव त्या भावाने दर्शवलेल्या गोष्टी मध्ये रमलेले किंवा त्याच विचारात असलेले दिसेल. मुलांचे विचार , अध्ययन , कदाचित प्रणय सुद्धा ह्या गोष्टी ह्या भावावरून पाहतो त्यात मन अधिक गुंतेल .एक पत्रिका पहिली त्यात चंद्राची दशा आणि चंद्र पंचम भावाचा अधिपती आणि स्वतः षष्ठ भावात . त्या व्यक्तीने अचानक शेअर मार्केट मध्ये आपला पैसा घातला आणि प्रचंड लाभ सुद्धा घेतला . चंद्र दुषित झाला तर ज्या भावात स्थित आहे त्या भावाने दर्शवलेल्या गोष्टीत न्यूनता आणेल . दशम भावात असेल तर करिअर मध्ये समस्या निर्माण करेल , व्यय भावात चंद्र असेल आणि बिघडला तर झोपेचे बारा वाजवेल , सगळ्या गोष्टीत गुंतून राहील , आयुष्य पुढेच जाणार नाही आणि म्हणून मुक्ती मिळणार नाही .सर्व सोडून द्यायला लागते तरच पुढील मोक्षाचा प्रवास सुकर होतो . व्ययेश चंद्र असेल तर आपला पैसा नको तिथे व्यर्थ खर्च तर होत नाही ना ह्याचे भान असले पाहिजे . दान धर्माचे हे घर आहे पण दान उचित व्यक्तीला केले तर पुण्य लाभेल अन्यस्था सर्वच व्यर्थ आहे. द्वितीय भाव हा संपत्ती आणि कुटुंब दर्शवतो . चंद्र शुभ असेल तर व्यक्तीकडे आर्थिक सुबत्ता आणि कौटुंबिक सुख दोन्ही असेल. चंद्र हा सात्विक आणि नैसर्गिक शुभ ग्रह आहे. त्यामुळे आपण जे अन्न खातो त्याप्रमाणे आपले मनातील विचार सुद्धा असतात हा अभ्यासच विषय आहे . अभ्यास करून पहा.
आयुष्यात आपण केलेली कुठलीही कृती सर्वप्रथम आपल्यावर परिणाम करते मग समोरच्यावर . म्हणूनच प्रत्येक गोष्टीचा मनाशी संबंध आहे आणि मनाचे तेवर सांभाळणे सोपे नाही . अनेक जण विचारतात सर्व आहे पण मनशांती नाही, झोप येत नाही , मन सैरभैर होते , काहीच सुचत नाही कारण चंद्र . पत्रिकेत तुमच्या चंद्र ज्या भावात आहे तिथेच आयुष्यभर तुमचे मन रेंगाळत आहे . तुम्हाला कुणी जबरदस्ती नाही करू शकत , तुमच्या मनाने कौल दिल्याशिवाय हा लेख पण तुम्ही वाचणार नाही . काय पटतय का? तसेच माझ्याही मनाने कौल दिला म्हणून मी आज हा लेख लिहिला.
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment