|| श्री स्वामी समर्थ ||
गेले काही दिवस ठरवून स्वामींचा तारक मंत्र म्हणत होते . आज त्याची सांगता होती. कालपासून तब्येत बरीच नाही . आज चाफ्याची फुले महाराजांना वाहावी असे मनात आले पण आणायला कुणीही नाही , करायचे काय ? असो मनात विचार आला आपण आत्यंतिक ओढीने आणि मनापासून त्यांच्या सेवेत रुजू आहोत हीच त्यांची कृपा . त्यांना जे हवे ते आपल्या कडून करून घेतील . मानसपूजा करून त्यात चाफ्याची फुले महाराजांच्या चरणावर अर्पण करुया . असो. सकाळी पूजा झाली आणि फ्रीज मध्ये ठेवलेला स्टील चा डबा काढला. त्यात मी नेहमी चाफा ठेवते. उघडला त्यात चाफ्याची फुले होती . मला आठवले गेल्या गुरुवारी आणली होती. पण आश्चर्य म्हणजे आजच आणल्यासारखी टवटवीत ताजी होती . फुले पाहून इतका आनंद झाला डोळ्यातून पाणी यायला लागले आणि हात पण थरथरू लागले. फुले ताटात काढून ठेवली आणि मोजली ती बरोबर 11 फुले होती. हा आनंद शब्दात न मांडता येणारा आहे. मला बरे नाही आणि खाली जाता येत नाही पण महाराजांनी मनातली इच्छा पूर्ण केली . त्यांच्याकडे पहिले तेव्हा ते आणि मी काय गप्पा झाल्या ते सांगू नाही शकणार ...गप्पा कसल्या नुसते अश्रूच अश्रू . महाराज आपल्या भक्तांच्या हृदयाच्या समीप असतात अगदी कायम , गरज असते तो त्यांना अंतर्मानापासून हाक मारण्याची . आपल्या जीवनात खूप मोठ्या आनंदाच्या मागे मागे धावायची किबहुना मोठ्या गोष्टीत आनंद मानायची खरच गरज नाही , रोजच्या जीवनातील लहानसहान गोष्टीत सुद्धा ओतप्रोत आनंद दडलेला आहे तोही चिरकाल टिकणारा . आजचा अनुभव मला महाराजांच्या अजूनच समीप घेवून गेला , श्रद्धा अजूनच दृढ झाली . शांत मनाने पूजा केली .वटवृक्षाखाली बसलेल्या महाराजांची मूर्ती माझ्या घरातच आता विराजमान आहे त्याच्यासमोर बसून नामस्मरण करत अक्कलकोट ला जाऊन आले आणि व्रताची सांगता केली . महाराजांना हात जोडले आणि निशब्द झाले.
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment