|| श्री स्वामी समर्थ ||
श्री हनुमान हे श्रीरामाचे परमभक्त होते . रामनामाचा जप हा हनुमानाचा जणू प्राण होता . अखंड नामस्मरण करत त्यांनी आपले सर्वस्व श्रीरामाच्या चरणी अर्पण केले होते . म्हणूनच हनुमान चालीसा म्हणायच्या आधी नेहमीच श्रीरामाचा जप करावा .
एक दिवस हनुमान नामस्मरणात असताना त्यांच्या समोर शनिदेव उभे ठाकले. हनुमानाने त्यांना मनापासून अभिवादन करून येण्याचे कारण विचारले असता शनिदेव म्हणाले मी तुझ्या राशीला आलो आहे आता साडेसात वर्ष तुझी सुटका नाही.
त्यावर हनुमान अत्यंत विनम्रतेने त्यांना म्हणाले कि मी रामभक्त आहे आणि माझ्या रोमा रोमात राम आहेत , माझ्या श्वासात , हृदयाच्या प्रत्येक कोपर्यात आणि रक्ताच्या प्रत्येक थेंबात फक्त राम आणि राम . अखंड शरीर मन ज्या माझ्या श्रीरामाच्या अस्तित्वाने व्यापले आहे त्यामुळे माझ्या शरीरात मी तुम्हाला स्थान देवू शकणार नाही .
शनीमहाराज म्हणतात कि नियतीमुळे कुणीही मोठे नाही आणि प्रत्यक्ष कालपुरुषाने मला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे सर्वाना दंड देण्याचे काम सोपवले आहे ते मी निष्ठेने आणि प्रामाणिक पणे आजवर करत आहे. त्यामुळे तू तुझे काम कर मी माझे असे म्हणून शनी देव हनुमानाच्या डोक्यावरच विराजमान होतात . काही वेळाने हनुमानाला डोक्याला खाज यायला लागते म्हणून जवळच असलेला एक दगड ते शेपटीने उचलून आपल्या डोक्यावर ठेवतात . डोक्यावर आधीच बसलेल्या शनी महाराजांच्या डोक्यावर तो दगड ठेवला गेल्यामुळे शनी महाराज त्या वजनाने अस्वस्थ होतात आणि हनुमानाला त्याबद्दल सांगितल्यावर हनुमान मोठ्या प्रेमाने त्यांना आपण इथून निघून गेलात तर अधिक बरे होईल असे म्हणतात . त्यावर शनी महाराज म्हणतात ते माझ्या हाती नाही . खाज कमी होत नसल्यामुळे हनुमान अजून एक मोठा दगड आधीच्या दगडावर डोक्यावर ठेवतात . शेवटी त्या दगडाचा भार सहन न झाल्यामुळे शनीदेव काकुळतीला येवून म्हणतात कि हनुमाना हे दगड बाजूला कर आणि मला जावूदे .
हनुमान डोक्यावरील दगड बाजूला करून शनीदेवाना मुक्त करतात . पण दगडाचा भार सहन न झाल्यामुळे शनीदेवांचे सर्व अंग दुखायला लागते. शनीदेव हनुमानाला म्हणतात माझे संपूर्ण अंग आखडले आहे तेव्हा मला थोडे तेल आणि तीळ मिळाले तर सर्वांगाला तेलाचे मालिश करीन जेणेकरून माझे अंग दुखायचे कमी होईल.
तेव्हा हनुमान त्यांना सांगतात जो कुणी भक्त तुम्हाला तेल अर्पण करतील तेव्हा तुमचा त्रास कमी होईल. शनिदेव म्हणतात ह्यापुढे मी आपल्याया त्रास देणार नाही . त्यावर हनुमान म्हणतात आपली इच्छा असो अथवा नसो रामाच्या कुठल्याही भक्ताला तुम्ही कधीही त्रास देवू शकणार नाही . अश्या असंख्य पौराणिक कथा आहेत त्यातून आपण नेमका बोध घ्यायचा आहे. हनुमानाची निस्सीम भक्ती आणि रामाचे त्याच्यावर असलेले अपरंपार प्रेम हे शब्दात वर्णन करू शकणार नाही इतके मोठे आहे. तरीही ह्या गोष्टीतून आपण सर्व भक्तांनी काय तो बोध घ्यायचा आहे.
साडेसाती असो अथवा पनवती किंवा शनीची कुठलीही पिडा आपल्याला कुठलाच त्रास देवू शकणार नाही जर आपण हनुमानाचे उपासक , निस्सीम भक्त असू. . हनुमानाची केलेली उपासना आपल्याला यशाच्या शिखरावर नक्कीच घेवून जाते .त्यासाठी हवी मनापासूनची पारदर्शकता , श्रद्धायुक्त अंतकरणापासून केलेली सेवा आयुष्यात कधीही शनीचा त्रास होवू देणार नाही . प्रत्येक उपासनेचे निश्चित असे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही .
जय श्री हनुमान
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment