Monday, 31 March 2025

पवनपुत्र

 || श्री स्वामी समर्थ ||

एकदा मारुतीराया सीता मातेच्या दर्शनाला गेले होते . त्यावेळी त्या आपल्या भांगेत सेंदूर लावताना त्यांनी पहिले . त्यांनी त्याबद्दल विचारले असता माता सीता म्हणाल्या कि हा सेंदूर लावला कि माझ्या पतीचे म्हणजेच रामरायाचे आयुष्यमान वाढते . हे ऐकल्यावर मारुतीरायाना हर्ष झाला आणि त्यांनी आपला सर्व देहावर सेंदुराचे लेपन केले आणि श्री रामाच्या दर्शनाला गेले. 

रामाने मारुतीचे हे नवीन रूप पाहून ह्याबद्दल त्यास विचारले असता मारुतीरायाने सीता माते सोबत झालेला संवाद विस्तृत कथन केला. त्यावर राम मनापासून आनंदित झाले. मारुती रामाचा निस्सीम भक्त होता हे ते मनोमनी जाणत होते पण हि त्यांच्या प्रेमाची उत्कटता  पाहून त्यांनी आपला हस्त त्याच्या डोक्यावर ठेवला आणि आशीर्वाद दिला ,म्हणाले तुझी अंतकरणापासून केलेली सेवा पाहून मी निशब्द झालो आहे. जो कुणी भक्त मंगळवारी मारुतीला शेंदूर अर्पण करेल त्याच्या वर माझी सदैव कृपा राहील .

म्हणूनच साडेसाती असो , शनी दशा असो अथवा नसो मंगळवारी मारुतीला शेंदूर अर्पण करायचे व्रत आजन्म करावे . श्री रामरायाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास ठेवावा .मारुतीच्या पायावर शेंदूर अर्पण करावा ( कुठल्या पायावर ?? असा बालिश प्रश्न नको ) प्रदक्षिणा घालता आली तर उत्तम आणि सरळ घरी यावे.  देवळातून नेहमी घरी यावे .

ह्याचा अनुभव आणि प्रचीती आल्याशिवाय राहत नाही . अनुभवाचे बोल. 

ओं शं शनैश्चराय नमः 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


Sunday, 30 March 2025

एकदा मागे वळून पहा....आम्हा सर्व भक्तांसाठी

 || श्री स्वामी समर्थ ||

कित्येक प्रगट दिन आले आणि गेले आम्ही अहो तिथेच आहोत.

आज स्वामींचा प्रगट दिन.  स्वामी भक्तांसाठी आज दसरा दिवाळी सर्व काही . महाराजांसाठी काय करू आणि काय नको असे सर्वाना झाले आहे. घरोघरी , मठातून उत्सव , नामस्मरण , भजन कीर्तन सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. अनेक नेवैद्य , महाप्रसाद महाराजांसाठी प्रेमाने केले जात आहेत . प्रत्येक क्षणाला प्रचीती देणारे आपले महाराज आज आपल्या घरी येणार आहेत आणि ते कधी येवून गेले ते आपल्याला समजणार सुद्धा आहे बरे ...आपण सर्व लाडके भक्त आहोत पण म्हणतात ना आईलाही कधीतरी आपल्या लाडक्या बाळाला फटका मारावाच लागतो , त्यामागील माझे मुल कुठे चुकू नये हा शुद्ध हेतू असतो .

अगदी त्याचप्रमाणे महाराज पण कधीतरी आपल्याला शिक्षा करतात ते आपल्या भल्यासाठीच . त्यामुळे आज आपण निदान एक गोष्ट तरी ठरवली पाहिजे कि आपल्याकडून अशी कुठलीही कृती होता उपयोगी नाही जी त्यांना अभिप्रेत नाही , त्यांना आवडणार नाही . गेल्या दोन दिवसापूर्वीच महाराजांनी मला माझ्या एका कामासाठी इतकी प्रचंड प्रचीती दिलेली आहे कि शब्द नाहीत. हे तेच आहेत आणि तेच असणार आहेत जे आपल्या सर्व भक्तांच्या मागे खंबीर उभे आहेत . अक्षरशः हात कापत आहेत लिहिताना . ज्या ज्या गोष्टींसाठी मी घाबरते किंवा चिंता करते त्या इतक्या सहज सोप्या करणारे माझे गुरु श्री स्वामी समर्थ ह्यांना माझा सदर प्रणाम .

आज माझे हे सर्व वाचून तेही म्हणतील इतके लिहिते बोलते पण घाबरट नुसती पोरगी हि . असो तुमचा वरदहस्त आहे नाही मी घाबरणार आता महाराज , फार साधे आहोत आम्ही सर्व भक्त आपल्या लीला कळण्याची त्याचे आकलन   होण्याची आमची पात्रता नाही . स्वामी हे नाम उच्चारायला मिळणे आपले आयुष्यात पदार्पण होणे हे आम्हा भक्तांचे परमभाग्य आहे . आयुष्य नागमोडी वळणे घेत असते तेव्हा तुम्हीच आमचा हात घट्ट पकडून ठेवता ह्याची प्रचीती आहे आम्हाला .

दवाखान्यात हव्या असलेल्या रक्तगटाचे रक्त नाही , हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश नाही , विवाह जमत नाही , मुलाच्या शाळेची फी भरायला पैसे नाही , राहायला घर नाही कि खायला भाकर नाही , घरातील समस्या असो अथवा घराबाहेरील महाराज सदैव भक्तांना सांभाळत आहेत . जीवन कसे जगावे ह्यासाठी वेळोवेळी अनेक लीला करून भक्तांना भक्तीचा मार्गच कसा उत्तम आहे ह्याची जाणीव करून देत आहेत . 

परमार्थ करावा पण प्रपंच वेशीला टांगून नाही हि महाराजांची शिकवण आहे. अश्या वेळी आठवते ती खुलभर दुधाची गोष्ट .आपले जीवन महाराजांचे आपल्या आयुष्यात पदार्पण झाले त्याआधी कसे होते ह्याचा विचार केला तर हसू येयील. दिशाहीन आयुष्य मार्गस्थ करणारे आपले स्वामी आज लेकी सुनांना भरभरून आशीर्वाद देणार आहेत , आपल्या नातवंडाना आशीर्वाद देणार आहेत आणि आपल्या संसारावर कृपेचा कटाक्ष टाकणार आहेत . 


आपण आपला संसार संपूर्ण दिनक्रम त्यांच्या चरणी आज वाहून निर्धास्त राहायचे आहे . आपले काम एकच नाम घेत सेवा करणे .सेवा करण्यास सुद्धा त्यांची कृपा लागते . त्यालाही पूर्व सुकृत असावे लागते . आज महाराजांची कृपा होण्यासाठी आपण सुद्धा तसे वागले पाहिजे. प्रत्येकाला अध्यात्माच्या मार्गात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रोजच्या जीवनात खरे अगदी खरे वागले पाहिजे . ज्याने आपल्याला जन्माला घातले आहे त्याच्याच नावाचा वापर करून कुणाला लुबाडले , नको ते राजकारण खेळत राहिले , कुणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले , कुणाची निंदा केली तर मग महाराजांना त्यांचा सोटा आपल्या हाती घ्यावा लागेल आणि पुढे काय होईल त्याची जबाबदारी आपली असेल. 

वाट्टेल तसे वागाल आणि स्वामी स्वामी कराल तर ते त्यांना चालणार नाही. उगीचच शिक्षेस पात्र ठरावे असे वर्तनच मुळात का करावे . महाराजांच्या डोळ्याच्या धाकात आपण असावे हेच आपल्यासाठी उत्तम कारण कलियुगात अनगिणत प्रलोभने आहेत आपण क्षणोक्षणी आपण त्या प्रलोभनाना बळी पडत आहोत . त्यापासून परावृत्त होण्याचा मार्ग म्हणे अखंड नामस्मरण . राहू केतू आहेत तसा पत्रिकेत गुरु हि आहे आणि त्याची साथ असेल तर काहीच अशक्य नाही .

आयुष्यात आलेल्या असंख्य प्रचीती ह्यामुळे आता माझे आयुष्य स्वामीमय झाले आहे. त्यांचे नाम घेण्यासाठीच आपला जन्म आहे हे मी समजून आहे आणि त्या नामाची गोडी वेळोवेळी प्रचीती देवून त्यांनीच लावली आहे . दिवसातील तासंतास आपण सोशल मिडीयावर पडीक असतो. वेळीच सावरुया आणि वेळ निघून जायच्या आत ह्या नामस्मरणाची गोडी चाखूया . आपणच नाही तर आपला परिवार आपल्या आजूबाजूची असंख्य माणसे ह्यात नामाचे वलय आणि त्याची ओळख करून देवूया . आपल्या वास्तुत नामस्मरणाचे कार्यक्रम , आपल्या whatsapp गृप वरती नामस्मरण करून जीवन पुढे नेत राहूया. 

आपल्या जीवनात सद्गुरूंचे पदार्पण होणे आणि त्यांची सेवा करण्याचे अहोभाग्य आपल्याला लाभणे ह्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नाही. मनुष्य जन्म मिळणे कठीण आणि तो सार्थकी लागणे त्याहून कठीण . सेवा करा आणि आपला प्रपंच त्यांच्या चरणी वाहा. मी हे केले मी ते केले मी आज मठात गेले मी प्रसाद केला ..चुकूनही ह्यापुढे ह्याचा उच्चार सुद्धा नको कारण आपल्या ह्या बापाला आपण अंतर्बाह्य कसे आहोत ते माहित आहे . महाराजांची सेवा करायची आहे ना? नक्की ? खरे ना? मग आपली व्यसने , आपल्या चुकीच्या सवयी ? आपल्यातील जे जे चुकीचे आणि वाईट आहे ते ते सर्व काही काही त्यांच्या चरणी समर्पित करुया आणि आयुष्यात पुन्हा आपण तसे पुन्हा वागणार नाही ह्यासाठी वचनबद्ध राहूया . जमणार आहे का आज हे आपल्याला ? जमवायचे आहे. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. मला नैराश्य आले असे सुखासुखी AC लावून म्हणायचे नाही . रस्त्यावर पण लोक आहेत पाण्यासाठी अन्नाच्या एका घासासाठी तडफडत आहेत . चुकीच्या गोष्टीत व्यसनात जाणारा आपल्या पैसा त्या गरिबांच्या मुखीचा घास होवूदे. अन्न दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सरकारला कसा टक्स भरतो तसा अध्यात्मिक टक्स पण भराव लागतो आणि तोही स्वखुशीने.

आपल्या सर्वत्र , चराचरात आपले गुरु आहेत , गुरु हे एक तत्व आहे त्याची नावे अनेक असतील नावात काय आहे शेवटी गुरुतत्व समजले पाहिजे. खडकाळ विहिरीला एका क्षणात जलमय करणाऱ्या आपल्या महाराजांना काय अशक्य आहे पण लोकांनी त्यांना दगड सुद्धा मारले आहेत , त्यांच्या ह्या लीलांचा खोल अर्थ आपल्याला समजेल तो सुदिन म्हणायचं नाहीतर असे कित्येक प्रगट दिन आले आणि गेले आम्ही अहो तिथेच आहोत असे व्ह्यायला नको. 


सतत कुणाचीतरी निर्भत्सना करणे, खुशामती करणे , लाचलुचपत , द्वेष मत्सर करत आपल्याच लोकांना पाण्यात पाहत राहणे ह्याने आपली अधोगतीच होणार आहे. आपल्या अहंकाराच्या टिमक्या वाजवणे बंद करा , क्षणभंगुर अस्तित्व आहे आपले. आपल्या वागण्या बोलणे , चालणे सर्वातील माज आणि मिजास आज कात टाकल्यासारखी समर्पणाची भावना मनात ठेवून सोडून देवूया . संकुचित वृत्ती उपयोगाची नसते खुल्या दिलाने ह्या मोकळ्या आकाशाखाली आनंदाने आपले जीवन व्यतीत करणे हेच साधकाकडून अपेक्षित आहे.  आपल्या अश्या वागण्याने स्वामी सुद्धा एक दिवस आपल्याला सोडून जातील म्हणूनच आज ह्या सर्व गोष्टीना तिलांजली देवूया. 

मी मी मी सोडून देवूया , इथे लाखो लोकांना जेवायला नाही आणि आपण घरातील अन्न , फळे फुकट घालवतो , विचार केला तर रोज अनाठाई कितीतरी पैसा आपला खर्च होत आहे. नुसत्या झोपा काढायच्या व्यायाम नाही समोर दिसेल ते खायचे आणि मग आजारी पडले कि स्वामी स्वामी . अरे बटाटे वाडे खाताना त्यांना विचारले होते का? नाही ना . कारल्याची भाजी नको मटार पनीर लगेच हवे असे आहे आपले. काही नवीन शिकायला नको , सतत दुसरा काय करतो तिथे सगळे लक्ष्य . आयुष्यातील किती वेळ फुकट जातोय आपला त्याचे भान ठेवण्यासाठी हा प्रगट दिन आहे. 


मोहमाया आणि त्याने भ्रमित करणारा राहू त्याच्या विळख्यात आज अखंड जग असताना आपण आपल्याला २४ तास नामस्मरणाची अंघोळ घालायला हवी तर आणि तरच आपला निभाव लागणार आहे . डोळे उघडा आणि ते उघडेच ठेवा . सदैव शत्रुत्व , नीच वृत्ती चालणार नाही . जीवन जगण्याची कला आत्मसात करुया आनंदाने जगा आणि दुसर्यालाही आनंदाने जगू द्या. कुणाच्या दुख्खाला  आणि डोळ्यातील पाण्याला आपण जबाबदार ठरू नये इतकेच पाहिले तर प्रगट दिन खर्या अर्थाने आपल्याला समजला असे म्हणायला हरकत नाही . 

आज महाराज प्रत्येक भक्ताच्या घरी हजेरी लावणार आहेत तीही आपल्या नकळत  , आपण केलेल्या सेवेने प्रसन्न होवून आपल्या सर्वाना आशीर्वाद देणार आहेत . आज त्यांना विनवणी आहे ...महाराज एकदा तरी मागे वळून ह्या लाडक्या लेकीकडे बघा .... डोळ्यातून अश्रू येत आहेत इथेच थांबते....श्री स्वामी समर्थ..

श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या सर्व भक्तांना खूप शुभेछ्या . भक्तांच्या मनातील महाराजांच्या बद्दल असणारी खरी तळमळ , भक्ती वृद्धिंगत व्हावी हीच त्यांचा चरणी प्रार्थना 

तुमच्या असण्या आणि नसण्यातील फरक माझ्या जीवनाने पदोपदी दाखवला आहे आणि ह्या मार्गात मला आणून आपल्या हाती माझा हात देणार्या माझ्या सासूबाई कै. उषाताई ह्यांना हा लेख समर्पित करत आहे.   


सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230





  


Sunday, 23 March 2025

लक्ष्मण रेषा

 || श्री स्वामी समर्थ ||


संसार उभा करायला कष्ट लागतात , रक्त आटवायला लागते आणि तो टिकवण्यासाठी अनेकदा दोन पाऊले मागे यायला लागतात. अनेकदा संशयाची सुई येते आणि  एका क्षणात संसाराची माती होते. संशय किंवा गैरसमज हे असे घातक शस्त्र आहे कि जे जन्मभर जपलेली माणसे , नाती ह्यांच्यातील जपलेले बंध मातीमोल करते तेही क्षणात . 

नाते कुठलेही असो पण ते विश्वासावर असते आणि त्याला जेव्हा तडा जातो तेव्हा व्यक्ती दुखावली जाते. खरतर आपल्याच माणसांपासून एखादी गोष्ट लपवावीशी वाटते तिथेच ते नाते संपलेले असते . मुळात लपवण्यासारखे काहीच असू नये पण माणसाच्या मनाचे इतके कंगोरे आहेत कि ते त्यालाही उमगत नाहीत . असो.

गेल्या आठवड्यात एका मुलाने फोन केला , बोलताना त्याची झालेली हतबल अवस्था जाणवत होती. घरातील वाद असते तिथवर ठीक होते कारण हि वादळे पेल्यातील असतात ती विरूनही जातात . नात्यातील संशय हा सगळी आयुष्याची , संसाराची गणिते चुकवतो. तसेच झाले होते . पत्नीने संशय घेतला तो इथवर कि त्याला नोकरी सोडून घरात बसावे लागले पर्यायाने घर सोडावे लागले . मनाच्या इतक्या ठिकर्या कि मानसोपचार तज्ञाची मदत घ्यावी लागली. कुठलाही खुलासा किंवा स्पष्टीकरण देण्याची वेळ निघून जावी इतक्या गोष्टी पुढे गेल्या होत्या .

आपल्या माणसाबद्दल असलेली आसक्ती म्हणजेच पझेसिव्ह नेस सुद्धा अनेक गोष्टीना कारणीभूत असतो . माझे माणूस माझेच राहिले पाहिजे हा अट्टाहास समोरच्या व्यक्तीला मोकळा श्वास घेवू देत नाही इतका असू नये. एखाद्यावर आपले प्रेम असले तरी त्याला बांधून ठेवता येते का? प्रत्येक नाते वेगळे आणि आपल्या जागी श्रेष्ठ असते. त्याची एकमेकात गल्लत करू नये. 

प्रेयसी हि पत्नी झाली कि सगळेच बदलते , मग तिथे हक्क येतो जो क्षणोक्षणी गाजवायची लहर येते . आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे कितीही ढोल वाजवले तरी त्यात बदल होणार नाही. परमेश्वराने स्त्री आणि पुरुषांना विशिष्ठ पद्धतीने बनवले आहे कस काय ते त्यालाच माहिती. संयम दोघांनीही ठेवायचा असतो अगदी प्रत्येक गोष्टीत पण कधी हाताबाहेर गेले कि मग दोघांच्याही प्रतिक्रिया सारख्याच असतात . 

सध्या शुक्र राहू युती आहे त्यामुळे शुक्रा संबंधीत अनेक वैवाहिक समस्या , गैरसमज करून आणि तो तसाच ठेवणारा राहू सध्या शुक्रा सोबत आहे. अश्या वेळी आपले मन काहीच कुणाचे ऐकायला तयार नसते. व्यक्तीचे बाहेर काही संबंध असू शकतील , नाही आहेतच त्यावर मन शिक्कामोर्तब करते आणि दिवसा गणिक त्यावर थरावर थर चढतात . तन मन धनाने आपल्या माणसाशी असलेली एकरूपता हे तिसरे नाते व्यक्ती स्वीकारू शकत नाही . ह्याचा परिणाम म्हणजे  मने दुभंगतात पुन्हा कधीही न मिळण्यासाठीच जणू .

मुळात अनेकदा पत्रिकेत काही काळ येणाऱ्या अंतर्दशा दशा अशी स्थिती निर्माण करतात कि जन्मोजन्मी साथ देण्याची वचने देणारे ते दोघे एकमेकांची तोंडे सुद्धा बघत नाहीत अशी स्थिती निर्माण होते .

नात्यांना प्रेमाच्या बंधनात जखडून बांधून ठेवले कि त्यातील मोकळेपणा जातो आणि समोरच्याचा श्वास घुसमटायला लागतो. जितके मोकळे ठेवाल तितका विश्वास अधिक . कुणालाही बंधन नको असते , कितीही नाती असली तरी प्रत्येक व्यक्ती हि मुळात स्वतंत्र आहे आणि तिला तसेच राहू दिले तर ती अधिक जवळ येयील आनंद सौख्य प्रेम टिकून राहील आणि आयुष्य जगणेबल होईल.

सतत जोडीदारावर हुकुमत गाजवली तर अनेकदा मग हेच प्रेम व्यक्ती बाहेर शोधू लागते . आज माणसे कामाच्या ठिकाणी घरापेक्षा अधिक वेळ असतात , हा सहवास अनेकांच्या नात्यात घट्ट मैत्री फुलवतो , एकमेकांना मदत होते पण तिथवर काही गोष्टी न थांबता पुढे जातात तेव्हा प्रश्न निर्माण होतात . मन मारून जगणाऱ्या अनेक व्यक्ती कुणाच्या तरी तिसर्या व्यक्तीच्या सहवासात आपले भाव विश्व शोधू लागतात .ह्याला कारणीभूत दोघेही असू शकतात . 

ह्या जातकाचे प्रश्न गंभीर स्वरूप घेवून माझ्यासमोर उभे होते . प्रश्न तात्पुरते असते तर ठीक होते पण ते दूरगामी परिणाम करणारे दिसत होते . त्याने संसार वाचवायचा खूप प्रयत्न केला . खर पाहता सर्व सुरळीत चालू असताना उगीच काहीतरी घडल्याशिवाय संशय येत नाही . अनेक घटनांचा एकत्रित विचार हा संशयाचे मूळ मनात घट्ट करणारा असतो . 

आकर्षण कुठल्याही वयात कुणाही बद्दल वाटू शकते इतके आपले मन वेडे आहे. पण ते आकर्षण अळवा वरचे पाणी असते . आपल्या नात्याला आपल्याला न्याय द्यायचा असेल ते काटेकोर पणे निभवायचे असेल तर हे आकर्षण जवळपास सुद्धा फिरकू देता कामा नये नाहीतर व्यक्ती वाहवत जावू शकते आणि मग संसार पती किंवा पत्नीचे नाते ह्यातील विश्वासाला तडा जातो. 

आपण रोज बदलतो , आपल्या आवडी निवडी सुद्धा बदलत जातात , आपले व्यक्तिमत्व सर्व काही , कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे पण म्हणून आपला संसार उध्वस्त होयील इतके बदल होत गेले तर कठीण होईल. आपल्या नात्याला न्याय देता आला पाहिजे . आपल्या मनातील भावना विखरु नयेत इतकी जाण असलीच पाहिजे आणि मुळात कुठे थांबायचे ते समजले पाहिजे. अनेकदा पत्रिकेतील दशा अंतर्दशा ह्या संसाराला तडा देणाऱ्या , किंवा इतर अनेक संबंधाची वीण घालणाऱ्या असतात . शेवटी आपले मन चंचल आहे पण त्याला काबूत ठेवायला उपासने सारखा उत्तम पर्याय नाही . प्रत्येक वेळी आपल्या मनाचे फुलपाखरू झाले तर संपूर्ण समाज व्यवस्थाच कोलमडून पडेल. 

पत्रिकेतील बुध राहू आणि 5 6 8 12 ह्या स्थानाशी निगडीत दशा तसेच  राहू हर्शल नेप ह्यांचा शुक्र ह्या ग्रहाशी होणार कुयोग आयुष्याला वेगळे वळण देवू शकते . राहू हा मायावी राक्षस कुणाचाच नाही हे लक्ष्यात ठेवा. गैरसमजाचे भूत माणसाच्या डोक्यावर आणि मनावर बसवण्यात त्याचा हात धरणार नाही इतका राहू निष्णात आहे . आपल्या कुलस्वामिनीची आराधना नित्य करणे हेच हाती असते आपल्या. शुक्राचे तांदूळ तूप हि दाने श्रावण मार्गशीर्ष महिन्यात देत  राहिले पाहिजे. 

शुक्र राहू युती हि अनेकदा अनैतिकता दर्शवते पण म्हणून त्यावर शिक्कामोर्तब करू नये . अनेक पत्रिका शुक्र राहू युती दृष्टीयोग दाखवतात पण त्या लोकांचे चरित्र बिघडलेले नसते कारण शुभ ग्रहांची दृष्टी आणि सुस्थितीत असलेला चंद्र. गुरु नेप , शुक्र राहू , शुक्र हर्शल , शुक्र नेप , शुक्र केतू हे युतीयोग संसारिक सुखात कमतरता आणणारे आहेत . शुक्र राहू हा योग फार वेगळा आहे जिथे शुक्राचे अधपतन होते आणि राहू शुक्राला विळखा घालतो . राहू धाडस देतो आता तिथे मंगळ असेल तर बघायलाच नको. 

आज ह्या जातकाला नोकरीच नाही तर घर सोडायला लागले आहे. मनाची अवस्था विकलांग झाली आहे. मुलांची ओढ आहे पण करणार काय ? म्हणूनच कुणाशीही नाते किंवा मैत्री करताना असलेल्या नात्यांना तडा जाणार नाही ह्याची काळजी असली पाहिजे. प्रत्येक नाते अपेक्षांचे ओझे असते आपण सगळ्या पूर्ण करू शकत नाही हे नक्की.

प्रेम ???? आकर्षण ???  काम भावना ??? ह्यातील नक्की काय? हे तपासून बघितले पाहिजे . आजकाल कलियुगात live in मध्ये राहणारी लोक आहेत. आपल्या संस्कृतीत हे कुठेही बसत नाही. आधुनिक जगाचे गुणगान करणारे आपण ह्या आधुनिकतेकडे कल असणार्या हर्शल च्या तडाख्यात आहोत . विवाह संस्था , विवाह , वैय्यक्तिक आयुष्य , पैशाच्या , मोठेपणाच्या मागे धावणारे आपण आता कुठवर धावणार आहोत . भावनेच्या आहारी जाऊन आपल्याच संसाराची होळी करणारे लोक शेवटी आयुष्यात मिळवतात ते फक्त “ शून्य”.  माणसे तर  गमावतात , पर्यायाने  आयुष्यातील आपल्या माणसांचे प्रेम, विश्वास  सुद्धा. क्षणिक सुखासाठी आपण आपला संसार उध्वस्त करणार का? दर दोन दिवसांनी कुणाबद्दल आकर्षण वाटणे हे प्रेम नसून विकृती आहे. हा विषय खूप मोठा आणि गहन आहे. 

अनेकदा प्रेम हक्क गाजवू लागते आणि त्याच क्षणी ते नकोसे वाटू लागते आणि ती व्यक्ती सुद्धा , तू हाच शर्ट घाल , हाच परफुम वापर , असाच बस तिथे जावू नकोस , हेच कर आणि ते करू नकोस ह्यात व्यक्ती मोकळा श्वास घेवू शकत नाही . आपल्या आवडत्या व्यक्तीला पिंजर्यात जखडून ठेवल्याची भावना यावी इतकीही हुकुमत योग्य नाही. विवाह मिलन करताना म्हणूनच फक्त गुण मिलन करू नये कारण ह्या गोष्टी पत्रिकेत असतील तर त्या गुण मिलनावरून कश्या समजणार ?  ग्रहमिलन म्हणूनच फार महत्वाचे आहे. प्रेम हि एक नाजूक कोमल भावना आहे . प्रेम व्यक्तीला जगायला शिकवते . प्रेम आयुष्यातून वजा केले तर जीवन संपलेच पण म्हणून नको त्या व्यक्ती संबंधात गुंतून आहे त्या नात्यांना सुरुंग लावणे कितपत योग्य आहे? 

लक्ष्मण रेषा हि प्रत्येकाला असलीच पाहिजे आणि ती आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला आहेच आहे. मोहाचे क्षण आयुष्यात अनेकदा येतात पण त्यात वाहवत न जाता कुठे थांबायचे ते समजले पाहिजे आणि ते समजले तर मिळवलेला विश्वास नक्कीच कायम राहील , आयुष्य बहरेल आणि प्रेम वृद्धिंगत होईल . प्रेम हि आयुष्य जगवणारी भावना आहे. आपल्या माणसावर इतकेही प्रेम करू नये कि त्याची त्यात घुसमट होईल . इतकीही बंधने घालू नयेत कि त्याला जगणे मुश्कील होईल. आपल्या प्रेमावर आपला स्वतःचा विश्वास हवा . प्रत्येक माणूस व्यक्ती स्वतंत्र आहे आणि स्वतंत्र पणे जगणे हा त्याचा मुलभूत हक्क आहे. त्याला मोकळे पक्षाप्रमाणे मुक्त पणे आसमंतात विहार करू दे तुमचे प्रेम खरे असेल तर कुठेही कितीही उंच भरारी घेतली तरी आपल्याच व्यक्तीकडे तो परत येयील हा विश्वास मनी असावा त्यातच सर्व काही आहे. बंधनात जखडून ठेवलेत तर दुसरीकडे प्रेम शोधू लागतील .

ग.दि.माडगुळकर ह्यांचे एक गीत आठवतेय ...या चिमण्यांनो परत फिरा ...घराकडे आपुल्या..

चिमणे आणि चिमण्यांना घराची ओढ असुदे आणि त्यांना घराकडे परतण्याची आस असुदे असेच घरातील वातावरण आणि एकमेकांतील प्रेम  टिकवणे हि दोघांचीही जबाबदारी आहे. सहमत ?????????

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230




 


 


 




 


Thursday, 20 March 2025

गुरूच्या राशीतील तपोनिष्ठ साधक शनी

 || श्री स्वामी समर्थ ||

गेले कित्येक दिवस सोशल मिडीयावर शनी बदल आणि मीन राशीतील युतीत येणाऱ्या ग्रहांच्या पोस्ट चा जणू महापूर आलेला आहे. अहो ग्रह तारे आहेत ते राशी नक्षत्र बदलत राहणारच कि त्यात काय ? ग्रह बदलला , राशी बदलली कि जगबुडी होत नाही . आपण घरात सुद्धा एका खोलीतून दुसर्या खोलीत जातो तसेच आहे हे. शनी कुंभेत होता आणि मीन राशीत जाणार त्यात आपली झोप कश्याला उडायला पाहिजे समजेना झालय . पुढे अडीच वर्षांनी तो मेष राशीत जायील. प्रत्येक ग्रह त्याच्या भ्रमण कक्षेत राहून पुढे जातच राहणार . ज्योतिष ह्या विषयाकडे घाबरून न बघता सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पहिले तर सुखकर होईल .

आसमंतातील हे सर्व ग्रह मानवी कल्याण साठी आहेत . ते आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला फलित देण्यासाठी बांधील आहेत इतकेच आता वाईट काही झाले किंवा एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली कि त्या ग्रहांचा अगदी समाचार घेणे , त्यांना दुषणे ठेवणे कितपत योग्य आहे ह्याचा जरूर विचार झाला पाहिजे . आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट हि आपल्या पुर्व कर्माचे प्रतिबिंब आहे. जे काही होते आहे त्यात आपण सोडून कुणाचाही हात नाही . आपण केलेले आपल्याकडेच परत येत असते मग चांगले वाईट काहीही असो.

मीन राशीतील शनी हा गुरूच्या राशीतील एक पाहुणा आहे. पाहुण्यांचे आपण स्वागत करतो , तसेच शनी महाराजांचेही दिलखुलास स्वागत झाले पाहिजे , त्याची दशहत असण्याचे काहीच कारण नाही. आपण उन्हाळ्यात साधे कॉटन चे कपडे वापरतो , कोकम सरबत , लिंबू सरबत घेतो , थंडावा निर्माण करण्यासाठी अनेक गोष्टी करतो , पावसाळ्यात छत्री , रेनकोट आणि हिवाळ्यात गरम कपडे . निसर्गातील बदलाचे जसे स्वागत करतो त्याचप्रमाणे बदलणाऱ्या  ग्रहस्थितीचे आपण मनोमनी स्वागत करायला शिकले पाहिजे. 

सोशल मिडिया वरती प्रचंड माहिती आज उपलब्ध आहे आता त्यातील काय घ्यायचे काय सोडायचे ते ज्याचे त्याने ठरवायचे .पण त्याची अनामिक भीती मात्र वाटता उपयोगी नाही. मीन हि मोक्षाची राशी आहे. पहिल्या अकरा राशीतून आपण जे काही जीवनात मिळवले ते सर्व इथेच सोडून मोक्षाला जायचे आहे हे शिकवणारी अथांग महासागरासारखी राशी जिथे आपली पाऊले आहेत आणि ती पाऊले दुसर्या तिसर्या कुणाचीही नसून आपल्या सद्गुरूंची आहेत . सर्व सोडून त्या पाऊलांवर नतमस्तक होणे म्हणजे परम भाग्य .

गुरूचा मान शनीदेव सुद्धा ठेवतात त्यामुळे ह्या राशीत शनी महाराज तितके त्रासदायक होणार नाहीत . कर्म बंधनातून सुटण्याचा मोक्षाचा मार्ग शनिदेव आपल्यासाठी खुला करत आहेत . ज्या लोकांना शुगर चा त्रास आहे त्यांनी आपल्या पायांची सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे. पत्रिकेतील मूळ ग्रहस्थिती आणि दशा योग्य नसेल तर त्रासदायक स्थिती होऊ शकते . आपला आहार विहार रोजची दिनचर्या जपली पाहिजे . समोर दिसेल ते खात सुटायचे आणि मग ग्रहांच्या माथी खापर हे योग्य नाही .

शनी राहू युती हि बांधकाम क्षेत्र आणि जमिनीचे व्यवहार ह्यात फसवणूक , विलंब करणारी आहे . मीन राशीतील शनी आपल्याला योग , मेडीटेशन साठी सकारात्मक उर्जा देणारा आहे. जगभर अध्यात्मिक बैठक , उपासना , जप वाढवण्याकडे लोकांचा कल वाढणार आहे. आज आपण आधुनिक जगतात वावरत आहोत . एक बटण दाबले कि असंख्य गोष्टी समोर उभ्या राहतात . प्रत्येक गोष्ट एका फोनवर होत आहे . जग नुसतेच बदलत नाही तर आधुनिक होत आहे जवळ येत आहे पण हे सर्व होत असताना , माणसा माणसातील भावनिक ओलावा कमी होताना दिसेल .महासागरातील जल म्हणजेच भावना हा शनी शोषून घेत आहे आणि त्यामुळे एकमेकातील संबंध रुक्ष होताना दिसतील. नाती हि प्रेमाच्या नाजूक बंधनात जास्ती खुलतात पण हा बंधच कुठेतरी ठिसूळ होताना आपण बघणार आहोत . प्रत्येक जण आपल्या पुरतेच जगणार आहे ..

देवाचे अस्तीत्व आणि त्याची ओढ , त्यासाठी लागणारा एकांत , समाधी अवस्था ह्यासाठी लागणारे पोषक वातावरण शनी नक्कीच तयार करेल. ह्या सर्वाचा सकारात्मक विचार असा कि आपण सगळे मिळवले पण हे मिळवताना आपण गमावली ती मनाची शांतता .  

आज झोप येत नाही, डॉक्टर कडून गोळ्या घेवून म्हणजेच झोप विकत घ्यावी लागत आहे. मनावरील वाढणारे दडपण , साशंकता , जीवनातील अनिश्चितता , उद्या ची वाटणारी सततची भीती , काळजी आणि एकंदरीत अस्थिर वातावरण आपल्याला जीवनातील लहान सहान आनंदापासून अलिप्त करत आहे. सगळ्यात असूनही वाटणारे भय आणि एकटेपणा आपल्या मनाला खातोय हे चित्र सर्वस्व आहे. 

मीन राशीतील शनी मनाच्या शांततेचा मार्ग दाखवेल. उपासनेचे महत्व पटवून देयील , शेवटी मोक्षाकडे वाटचाल करायचे महत्व आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध हाच शनी करून देयील. शनी विरक्त आहे. भावभावनांच्या खोट्या कल्लोळात आणि मोहपाशातून मुक्त करून आभासी जगाचे महत्व किती क्षणभंगुर आहे हे दाखवून परमेश्वर सानिध्यातील अस्तित्व शांतता प्रदान करणारे आहे आणि नेमके हेच शनीला आपल्याला द्यायचे आहे. आपल्याला सर्व गोष्टींसाठी वेळ आहे कारण भौतिक जगाच्या पलीकडे आपण विचारच करत नाही पण हे तकलादू आहे,पण शाश्वत आहे ते आपले ईश्वरावरील प्रेम त्याची आसक्ती आणि म्हणूनच तोच आपला खरा सोबती आहे ह्याची जाणीव मीन राशीतील शनी करून देणार .

मीन राशी हि राशीचक्रातील अंतिम राशी आहे . हि राशी द्विस्वभावी आणि गुरूच्या अमलाखाली येणारी संवेदनशील राशी आहे. मीन राशीतील अथांग महासागर सर्व गोष्टी साठवू पाहणारा आहे. ह्या राशीत येणारा तपोनिष्ठ शनी जल राशीत काहीतरी खास नक्कीच देयील. सामाजिक अनिश्चितता , शेअर मार्केट मधील उंची तर मंदी (द्विस्वभावी राशी ) शनी हा विलंब दर्शवतो पण संधोधन सुद्धा करवतो. एखादे प्रोडक्ट का विकले जात नाही ? हा संशोधनाचा विषय असतो आणि त्याची कारणमीमांसा करण्यासाठी लागतो तो संयम . सागरी पर्यटन आणि ट्रान्सपोर्ट ह्यात काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील.जगातील युद्धाचा संकेत शनी जेव्हा जेव्हा मीनेत येतो तेव्हा देतो. युद्धजन्य स्थिती हि बाह्य वातावरणच नाही तर मनावर सुद्धा दडपण आणणारी आहे. शनी बदला पाठोपाठ राहू सुद्धा बदल करणार आहे त्यामुळे प्रामुख्याने साथी चे आजार उद्भवतील. मेष राशीत शनी जेव्हा भविष्यात प्रवेश करेल त्यावेळी नवीन जगाची निर्मिती होईल कारण मेष ते मीन हा संपूर्ण प्रवास शनी ने पूर्ण केलेला असेल. वाईट गोष्टीतून चांगलेच व्हावे.

 मीन रास हि गुरुतत्व दर्शवत असल्यामुळे आपले अध्यात्म नव्या उंचीवर नेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. शनी हा कष्ट करणाऱ्या समाजाचे नेतृत्व करतो. नुसते बसून राहाल तर शनीची कृपादृष्टी होणार नाही पण शरीराला कष्ट द्याल , कुठल्याही कामाला कमी न लेखता आणि कुणाचाही उपमर्द , अपमान न करता कामात झोकून दिले तर शनी विशेष फळ देयील हे नक्की . शनीला आळस आवडत नाही , अहंकार तर नाहीच नाही. रोजचा दिवस बदलत जाणारा आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टी मर्यादित राहिले पाहिजे , सगळ्या गोष्टीत अचानक वाढ न होता संथपणे होईल.  

पुढे हा शनी जेव्हा वक्री असेल तेव्हा गुंतवणूक आणि जगातील अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा असेल . सर्वसाधारण जीवन जगणाऱ्या तुम्हा आम्हा लोकांनी आपले जीवन शिस्तीत , साधेपणाने आणि कष्टाने जगावे. मोठेपणाचा आव आणलात तर कठीण होईल सर्व . कुणालाही कमी लेखू नका , गरिबाला हिणवू नका ते शनीला कधीच आवडणार नाही . प्रत्येक गोष्टीत कितीही विलंब झाला तरी धीर सोडायचा नाही आपली उपासना वाढवणे आपल्या हाती आहे. आता आपली वाट लागणार असे फालतू विचार ताबडतोब मनातून तडीपार करा. साधे जीवन आहे आपले काही वाईट होत नाही अर्थात कर्म आणि नियत शुद्ध असेल तर .

सरतेशेवटी एक सांगावेसे वाटते . आपल्या महाराजांनी तारक मंत्र हा मनुष्य जीवनाला एक मोठा आधार दिलेला आहे. स्वामिनी सांगितले आहे का शनी मेष राशीत असेल किंवा कर्केत , वृश्चिकेत असेल तेव्हा ह्या तारक मंत्राचा काहीच उपयोग होणार नाही. तुमचे तुम्ही बघा बरे मी चाललो . असे स्वामी म्हणतील का आपल्याला ? शनीच काय इतर कुठलाही ग्रह कुठेही भ्रमण करत असला तरी प्रत्यक्ष आपले “ स्वामी समर्थ “ आपल्याच सोबत भ्रमण करत आहेत आणि तेही जगाच्या अंतापर्यंत . 

शनी इथे आणि मंगळ इथे म्हणून त्याचे अवडंबर आपणच करतो तेव्हा आपणच आपल्या सद्गुरूंचा किती अपमान करत असतो . अहो जाता येत क्षणोक्षणी घाबरून कसे जगणार आपण . इथे स्वामी स्वामी करायचे जप , पारायणे करायची तीर्थाटन करायचे आणि इथे मंगळ शनीला घाबरायचे. नक्की काय चाललय आपले? सामान्य माणसे आहोत आपण , नारळ भाजी महाग झाली आपले बजेट कोसळते . एक एक गोष्ट विकत घ्यायला किती जीवाचा आटापिटा करतो किती महिने पैसे जमवतो . इतके साधे सुधे जीवन जगणारे आपण अहो कश्याला ते शनीदेव आपल्याला त्रास देतील. 

हो आता प्रत्येक गोष्ट लगेच किंवा आपल्याला हवीतशी नाही होणार पण जे होते आहे ते त्यांच्या इच्छेने असा विचार केला तर आयुष्य बदलून जायील आपले. सारखे मी मी मी चा पाढा वाचणारे आपण कधीतरी म्हणतो का? महाराजांनी माझ्याकडून उपासना करवून घेतली. मुळात उपासना जपजाप्य ह्याचे आयुष्यातील महत्वच आपल्याला समजले नाही आणि ते आपल्याला समजावे म्हणूनच शनी आहे. सुख दुक्ख हा जीवनाचा एक भाग आहे. निसर्ग जिथे सतत बदलत असतो तिथे आपले जीवन ते काय .

कधी जेवणात मीठ नसले कि मिठाची किंमत समजते तसेच दुक्ख असले कि सुखाची लज्जत समजते. वाईट काळात महाराजांची आठवण येते , अध्यात्म जीवन जगवते हेच खरे . एखाद्या राशीत ५-६ ग्रह आले , बर मग ? आपण नाही का मैत्रिणी मित्र जमतो भिशीला अगदी तसेच हि ग्रहांची अंगत पंगत आहे असे समजा. एकमेकांशी गळा भेट करतील आणि जातील आपापल्या मार्गाने पुढे . कोटी किलोमीटर उंच त्या आकाशात भेटणार ते तेही काही काळासाठी त्यांची भीती इथे पृथ्वीवर कश्यासाठी ?? का? काही वाईट केलय का तुम्ही कुणाचे? मन खातय का? पैसे  लुबाडले आहेत का? कुणाला फसवले आहे का? निरपधार लोकांना शिक्षा केली आहे का? एखाद्याच्या अश्रुना तुम्ही कारण आहात का? असाल तर माफी मागा आणि जी काही शिक्षा देतील ती निमूटपणे भोगून मार्गस्थ व्हा आणि नसेलच काही केले तर मग घाबरण्याचा प्रश्नच नाही. 

गत जन्मातील पाप पुण्याचा हिशोब आपल्याला न समजणारा आहे पण ह्या जन्मातील ठाऊक आहे ना ? त्रयस्थाच्या दृष्टीने आपल्याच आयुष्याकडे बघा , आपल्या कर्मांकडे बघा , आपली उत्तरे तिथेच आहेत आणि मिळतील. 

शनीची दाने , जप , हनुमान चालीसा , मारुती स्तोत्र म्हणा पण मुख्य म्हणजे “ मी” ला तिलांजली द्या . मीच काय तो हुशार शहाणा हा अहंकार सोडून द्या . प्रत्येक जण आपापली शिक्षा भोगत आहे तुम्ही काही करायला जावू नका.

माणसातील देवाला ओळखा आणि गरज असेल त्याला जमेल तशी मदत करा . कुणाला हिणवू नका आणि कुठे मी पणाचे झेंडे तर नकोच नको.  आपल्या शरीरातील मुख्य अवयव “ जिव्हा “ शब्दांचा वापर योग्य करा . ग्रहांची ताकद ओळखा पण त्याच सोबत आपण केलेल्या उपासनेवर आपल्या गुरूंवरील विश्वास तिळमात्र कमी होता उपयोगी नाही. 

आपण कसे आपल्या मुलांच्या वाढदिवसाला त्यांच्या आवडीचे पदार्थ करतो , अगदी तसेच शनी महाराजांना आवडेल असे व्यक्तिमत्व घडवले , विनम्र राहिलो तर कश्याला ते तुम्हाला त्रास देतील. सतत वैतागून , चिंता करून त्रस्त होवून पोतभर आजार होतील पण प्रश्न सुटणार नाहीत . सगळे छान छान गोड गोड कसे होईल नेहमी . शनी चा मुख्य नियम आणि दागिना म्हणजे “ संयम “ . हा संयम शिकवण्यासाठीच शनी आहे आपल्या जीवनात . 

धीर धरा , गोष्टी घडायच्या तेव्हा बरोबर घडणार आहेत हा विश्वास ठेवा .आपण करत असलेल्या उपसनांचे ढोल वाजवू नका त्या जितक्या गुप्त तितके फळ अधिक . महासागराच्या राशीतील हा शनी तुम्हा आम्हा सर्वाना जगणे आणि जगवणे शिकवणार , आपले आयुष्य अधिकच परिपूर्ण आणि समृद्ध करणार त्याचे स्वागत करुया . आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार म्हणजे “ गुरु “ त्यांचे अस्तित्व आपल्या आयुष्यात असताना भीती कसली .The Most Powerful Star in Our Life “बृहस्पती “. मीन ह्या गुरूच्या राशीतील तपस्वी शनी जो आपल्याला परमार्थाची गोडी लावणारा आणि वाढवणारा आहे . अश्या ह्या शनी महाराजांना माझा साष्टांग नमस्कार .

ओम शं शनैश्चराय नमः

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230






Friday, 14 March 2025

तुला नाही देत जा....( शनी हेच आपले गुरुकुल )

 || श्री स्वामी समर्थ ||


काहीही झाले तरी “ तुला नाही देणार ...जा “ असे म्हणवून प्रत्येक गोष्टीत आपल्याला रडवतो , वाट बघायला लावतो आणि आपल्याला संयम शिकवतो तो शनी आणि असे म्हंटल्यावर आपण थैमान घालतो , सैरभैर होतो तो काळ म्हणजे साडेसाती किंवा शनी महादशा . त्याचे ऐकले तर दशा सुकर जाईल नाहीतर दशा जीवनाची दिशा बदलून दैन्य अवस्था करेल. 

पैसा फेको ...कि सगळे विकत घेता येत पण देव आणि त्याचे प्रेम नाही. शनी महाराजांचे , आपल्या कुलस्वामिनीचे मन चांगली कर्म करून जिंकायला लागते , त्यांचा आशीर्वाद सहज पणे मिळत नाही त्यासाठी प्राण पणाला लावून त्यांची आराधना करावी लागते , तन मन धन त्यांना अर्पण करावे लागते , त्या देवतेशी एकरूप होवून जगावे लागते तर कुठे काहीतरी जीवनाची गाडी हलते .

सारखे काय मागत राहायचे . हे दे ते दे कधी संपणार आपल्या मागण्या ?? तो देणार आहे हा विश्वास मनात अभंग हवा आणि घेण्यासाठी संयम . हा संयम म्हणजेच शनी . सर्जरी करताना दोन सुया टोचल्या आपल्याला कि कुणाला काय काय बोललो आहोत , कसे दुसर्यांचे अपमान केले आहेत , कुणाचे पैसे दिले नाहीत सगळे आठवते आणि मग देव देव करायला लागतो , माफीनामे लिहितो ...काहीही उपयोग नाही त्याचा . मुळातच हे कर्म केलेच का? करताना नाही आठवला का देव. विचार करा ....आणि इतरानाही विचार करायला प्रवृत्त करा.

माणूस असो किंवा ग्रह मनासारखे झाले नाही कि थैमान घालायचे हा आपला मुलभूत स्वभाव आहे ज्याला शनी खो घालतो आणि म्हणतो देणारच नाही जा बस बोंबलत. पण हाच शनी जर काबाड कष्ट केलेत , संयमाने वागलात , माणसातील देव ओळखून माणुसकीने वागलात , पाठीचा कणा लवचीत ठेवलात म्हणजेच नतमस्तक झालात आणि सर्वात मुख्य मी मी मी चा पाढा सोसून साधनेत जीवन व्यतीत केलेत , चतुर्थ श्रेणीला मदत केली , धान्य , शिधा रोजच्या गरजेच्या वस्तू देवून एखाद्याच्या संसाराला मदतीचा हात पुढे केलात आणि मी केले मी दिले ह्याची वाच्यताहि नाही केली तर तो त्याच्याकडे मागायची वेळ आणतच नाही. छप्पर फाडके मिलेगा ..हे नक्की.

आपल्याला आज सगळे इंस्तंट हवे असते . पण ते आपले झाले. इंस्तंट देव कुठून आणणार ? तो त्याला हवे तेव्हाच देणार म्हणून संयम हवा. भौतिक सुखासाठी आसुसलेला माणूस देवाकडे धाव घ्यायला जरा उशीरच करतो कारण त्याचे महत्व दुक्ख गळ्याशी आल्याशिवाय कळत नाही. 

आपल्याला लहानपणापासून “ कराग्रे वसते लक्ष्मी ...” , “ गुरुब्रम्हा गुरुर्विष्णु ..” , ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ...”, ह्या सारखे श्लोक शिकवून आयुष्याला वळण देण्याचा प्रयत्न केला तो उगीच नाही . आपल्याला दिलेल्या दोन हातानी अपिरीमित कष्ट करावेत , चोरी करू नये आणि तशी बुद्धीही होवू नये ह्यासाठी परमार्थ आवश्यक आहे जीवनात . कुठल्या वाटेने जायचे ते साधने शिवाय कळत नाही . वाट चुकलेल्या वाटसरूला मार्ग दाखवण्याचे काम शेवटी त्यालाच करावे लागते .महाराजांना उसाने मारणाऱ्या पाटील मंडळीना समोर बसवून त्याच उसाचा रस चरख्या शिवाय हाताने पिळून काढून दिला तेव्हा त्यांच्या दैवी शक्तीची प्रचीती त्यांना ह्याच देही ह्याच डोळा आली आणि ते महाराजांच्या समोर नतमस्तक झाले. उगीच नाही पाटील वंशावर महाराजांचा वरदहस्त .

येत्या चैत्र गुढी पाडव्याला , हिंदूंच्या नव वर्षाच्या दिवशीच शनी महाराज आपला कुंभ राशीतील मुक्काम हलवून मीन राशीत आपले बस्तान ठोकणार आहेत . गुरूच्या राशीत शनी . साधना , परमार्थ , योग ह्यासाठी उत्तम. शनी काय करेल तिथे जावून ते करो आपण त्याच्यासाठी काय काय करू शकतो ते करुया. शनी कुठल्याही राशीत असला तरी आपण आपले कर्म शुद्ध सात्विक ठेवूया .

“ विनम्रता “ हा दागिना फार कमी लोकांकडे असतो इतका तो अनमोल आहे. शनीला तोच प्रिय आहे. जमणार आहे का आपल्याला विनम्र होण्यास. छे छे काहीतरीच . तोंडाचा पट्टा चालवणे , समोरच्या शाब्दिक चकमकी करून दुखावणे हे केल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. तू कसा मूर्ख आणि मी किती शहाणा  हे आपल्या वाचेने आणि देहबोलीतून जोवर वारंवार प्रगट होत नाही तोवर दिवस जात नाही आमचा. कुणाला नामोहरम करणे , त्याच्या अपयशामुळे मन सुखावणे , सततचा मत्सर , द्वेष ह्यातच जन्म जाणार आहे का आमचा ? मग शनी ला दोष देण्यात काय अर्थ आहे. तुमचे कर्म तुमच्या हाती आहे. शनी ला कष्टकरी जनता आवडते म्हणून चतुर्थ श्रेणीचे प्रतिनिधित्व तो करतो, एखादा गरीब मजूर त्याच्या झोपडीत चार घास खावून कधी उपाशीपोटी पडल्या पडल्या झोपतो , त्याला डास चावत नाहीत ना त्याच्याकडे AC असतो. आम्ही AC लावून झोपतो पण तरीही आम्हाला झोपेच्या गोळ्या घ्यायला लागतात . पैसा सहज मिळतो , शांत झोप ती चांगल्या कर्माने मिळवावी लागते .अहो वर जाताना कुठे ती मनावरची जड जड ओझी घेवून जाणार , टाकून द्या ती इथेच आत्ताच अगदी ह्याच क्षणी . मनाने सुद्धा कुणाचे वाईट चिंतू नये अशी महाराजांची शिकवण आहे आपल्याला ती विसरायची नाही. 

पंचम भाव म्हणजे आपले पूर्व कर्म आणि नवम म्हणजे भाग्य जे पुढील जन्मीचे कर्म असणार आहे. आजचे नवम ते पुढील पंचम येतंय का लक्ष्यात ? 

आपली कुलस्वामिनी , इष्टगुरु  आणि त्याच सोबत शनी महाराज ह्यांची नित्य उपासना आयुष्यातील कठीण काळ सुद्धा पार करेल. अन्न दान हे सर्व श्रेष्ठ दान आहे पण त्याचे अवडंबर नको , मी केले मी केले सोडून द्या तिथेच आपण अडकतो आणि मोक्ष बाजूलाच राहतो . त्याने सेवेची संधी दिली मी त्याच्यासमोर नतमस्तक आहे आणि दिलेल्या संधीचे सोने करीन  ह्याकडे मनाचा कल असला पाहिजे. 

साडेसाती , शनी दशा हे आपले गुरुकुल आहे. त्याचा त्रास कधी होईल जेव्हा आपली कर्म शुद्ध नसतील तेव्हा . अन्यथा शनी मित्र आहे तुमचा , बेस्ट बडी. जे जे हृदयाशी कवटाळून ठेवलं ते तो काढून तुम्हाला सर्व बंधनातून मुक्त करतो . म्हणूनच अनेकदा साडेसाती च्या काळात आपल्या डोक्यावरचे मातृ पितृ छत्र हरवते . चोवीस तास दिले आहेत देवाने , कुठे फालतू गोष्टीमध्ये अडकता . वेळ कुठे कसा घालवायचा हे गणित आपले आपल्यापाशी आहे. 

Choice is yours.... बरोबर ना? क्षणाचे आयुष्य आपले. सगळ्यांची तिकिटे काढली आहेत फक्त कधी जाणार ते माहित नाही, प्रत्येक क्षण परिपूर्ण जगा , आनंद घ्या आणि आनंद द्या . कश्याला कुत्सित बोलायचे , सतत टोमणे मारायचे....हेच सर्व परत शंबर पट अधिक होऊन येणार तुमच्याकडे .कुणाचा केलेला द्वेष त्याचे रुपांतर मोठ मोठ्या जागीच खिळवून ठेवणाऱ्या आजारपणा त होते ह्याची कल्पना तरी आहे का? 

शनीचे मन जिंकणे कठीण पण अशक्य नाही . तो अनेक संधी आपल्याला देत आहे ज्या आपल्याला आपल्या खोट्या अहंकारामुळे दिसत नाहीत . लहान लहान गोष्टीतील आनंद पण आपण गमावतो आहोत ते पोकळ बडेजाव केल्यामुळे.  आहात कोण तुम्ही ???? सतत आपला वरच्या पट्टीतील आवाज ? क्षणात बंद करतील ते आवाज लक्ष्यात असुदे. पैशाची घमेंड , शिक्षण , पैसा , मोठी घरे , ऐश्वर्य हे शेवटी त्यांनी दिले आहे आणि दिले तसे काढूनही घेतील. आणि घेतात , आपल्या चुका समजायला . माणूस अक्षरश एकटा राहतो कारण सर्व सुखाचे आगारु मनुष्य आहे आणि दुख्खात फक्त परमेश्वर . तोच आपला सोबती असतो आपल्या पडत्या काळात .

अहंकार यायला काहीही चालते आजकाल आपल्याला. त्यांच्या दृष्टीतून काहीच सुटत नाही आणि मग भोग आपल्या कर्माची फळे . सगळा माज साडेसातीत उतरतो , जे आवडते ते आपल्यापासून दूर होते , एकटे राहतो आपण मनाने आणि शरीरानेही तेव्हा उपरती होते पण वेळ निघून गेलेली असते. एकटेपणा आला कि आपण आपल्याशीच संवाद साधतो आणि तो आयुष्यातील सगळ्यात खरा संवाद असतो. आपलाच आपल्याशी केलेला. १६ आणे खरा . सोबतीचे महाव , माणसांचे महत्व शनी शिकवतो . एकटेपणा बोचतो कारण मनुष्य समाजप्रिय आहे एकता राहू शकत नाही . एकांत असेल तेव्हा मन शांत होते आणि स्वतःच्या चुका समजतात त्या स्वीकारताही येतात .स्वीकारल्यात तर शनीची कृपा होते नाहीतर आहेच मग पुढे भयाण भकास आयुष्य . मिळवलेले सर्व ओंजळीतून निघून जाणे म्हणजे शनी . 

शनी विलंबाचा कारक आहे . मृत्यू सुद्धा विलंबाने येतो , एका जागेवर खंगत ठेवतो , मृत्यू समोरच्याच्या डोळ्यात दिसतो पण येत नाही हि अवस्था कठीण असते. भूगर्भा खाली शनी आहे. तसेच कमरेखालील शरीराचा भाग विकलांग होणे , अर्धांगवायू , परालीसीस , गुडघे दुखी , संधिवात , हाडांची दुखणी , कोड , कफ , छातीत पाणी होणे ह्या सर्व गोष्टी शनीकडे आहेत . त्याच्या शिक्षा कठोर आहेत , जागेवर बसवून ठेवेल , हालचाल सुद्धा करू देणार नाही मग काय कराल ? आयुष्यभराचा धडा शिकवणाऱ्या शिक्षा करणारा हा न्यायाधीश आहे आणि त्याचा धाक आपल्याला असायलाच हवा. 

मीन राशीतील येणारा शनी काय फळे देयील ? ह्यासाठी आधी स्वतःच्या पत्रिकेतील शनी कुठे कसा किती अंशावर कुठल्या नक्षत्रात आहे ते पाहायला पाहिजे. मूळ शनीवरून होणार गोचर शनीचे भ्रमण हे संघर्ष देते असा अनुभव आहे.  हा काय सांगतो आणि तो काय सांगतो ह्यात वेळ वाया न घालावता मनापासून शनी च्या सेवेत दाखल व्हा , हनुमान चालीसा रोज कमीत कमी ७ वेळा म्हणा ...निश्चित फरक पडेल. पण म्हणणार कोण ? ज्यांना फटके खायचे नाहीत किंवा निदान त्याची तीव्रता कमी व्हायला हवी आहे ते आज पासून म्हणतील इतर ...कालाय तस्मै नमः 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 

 

   


समांतर रेषा

 || श्री स्वामी समर्थ ||

उंची पेहराव , साजेसे दागदागिने , आकर्षक आमंत्रण पत्रिका , देवदर्शने , संगीत , डोळे दिपवणारा माहोल , मेहेंदी , प्री वेडिंग शूट अश्या दिव्य भव्य आकर्षक लग्न सोहळ्याची सध्या प्रथा आहे. आयुष्यात मिळवलेली सगळी पुंजी आणि प्रतिष्ठा पणाला लावणारे विवाह सोहळे थाटात पार पाडतात. कालांतराने संसार सुरु होतो आणि सप्तम भाव कार्यान्वित होतो. एकमेकांना शपथा , आणा भाका देणारे ते दोघे वास्तवात येतात . ३०-३२-३५ गुण जुळवलेल्या त्या दोघांच्या पत्रिका विवाह झाल्यावर का जुळत नाहीत हाच मोठा प्रश्न आहे. 

परवाच एक पत्रिका पाहिली. होळीचा शुभ पवित्र सण आणि अश्यावेळी अश्या पत्रिका आल्या कि मन उद्विग्न होते. मुलगी फोनवर इतकी संभ्रमित होती , अचानक आलेल्या ह्या आयुष्यातील नव्या वळणावर भांबावली होती. तिशीचा उंबरा नुकताच ओलांडलेला आणि पुढे अखंड आयुष्य ..विचार , मानसिकता बिघडत चाललेली होती. जिथे दोघांची मन च जवळ येत नव्हती तिथे समागम तरी कसा होणार ?


पत्रिका दाखवल्या नव्हत्या का ? त्यावर दाखवल्या होत्या अमुक अमुक गुण जुळत आहेत हे समजले तेव्हा पुढे बोलणी झाली आणि विवाह ठरला झाला सुद्धा . मग आज हि स्थिती का? अनेकदा पत्रिकेचा अभ्यास व्यवस्थित कुणा जाणकारा  कडून करून घ्यावा हा विचार सुद्धा मनाला शिवत नाही. इतके गुण जुळत आहेत . दोघे एकमेकांना साजेसे( सर्वार्थाने अनुरूप नाही ) आहेत असे बघून विवाह केला जातो . प्रत्यक्ष आयुष्य जगताना राजकुमार असणारा आपला जोडीदार आपल्याला किंमत देत नाही , आपल्यावर हुकुमत गाजवतो , घरातील मंडळी अंतर ठेवून वागतात , घरातील आर्थिक बाबी समजू देत नाहीत , कसलेच कौतुक नाही अश्या वातावरणात कसे बरे मन रमेल त्या नव्या नवरीचे. 

जिथे अंगाखांद्यावर वाढलो अश्या सर्वाना सोडून एका परक्या माणसासाठी घर सोडून जायचे हे दिव्य आहे आणि ते प्रत्येक मुलगी करत असते. आई वडिलांची ती सुखी राहावी ह्यासाठी धडपड चालू असते.  पुढे मग सारिपाट मांडण्याच्या आधी फिस्कटला तर अश्या वेळी त्यांनी काय करावे? स्वतःला आणि तिलाही कसा आधार द्यावा ? 

समाज आता प्रगत आहे , आपण सर्व आता शिकलेल्या आधुनिक प्रगत जगताचा एक भाग आहोत . आता सासू सुना मैत्रिणी असतात एकत्र राहतात नव्हे नांदतात , विचार बदलत आहेत , नवीन विचारांचे स्वागत जुनी पिढी करताना दिसते , साड्या जावून ड्रेस , आधुनिक पद्धतीचे पेहराव आले. आई वडील आता पूर्वीसारखे नाहीत , मुलांच्या सुनांच्या नवीन विचारांचे स्वागत करताना दिसत आहेत . माझे तेच खरे हा दृष्टीकोन आता राहिलेला नाही .अगदी डोहाळे जेवणे  , लग्नाचे वाढदिवस सुद्धा हॉटेल मध्ये करताना दिसतात . असो . पण तरीही काही ठिकाणी , काही कुटुंबातून सगळे बदलले तरी काही बाबतीत माणसाचे मन आणि दृष्टीकोन अजूनही पुरता बदलेला दिसत नाही . 

नवीन सुनबाई ना नवीन घर आपले वाटावे ह्यासाठी तिने आणि मुख्य म्हणजे मुलाच्या घरातील  सर्वांनी सारखेच योगदान दिले पाहिजे असे माझे मत आहे. वर्ष लागेल तिला घरात रुळायला . पण ह्यात सर्वात नाजूक बंधन ज्याच्याशी आहे त्यानेच जर विचित्र वागायला सुरवात केली तर स्वप्ने फुलायच्या आधीच विखुरली जातील . खरा सोबती आणि हक्काचा माणूस तर आपला जोडीदार आणि तिथेच भ्रमनिरास झाला तर त्या  मुलीने करायचे तरी काय ? हि गोष्ट मुलाच्याही बाबत होवू शकते नाही असे नाही .

नवीन नाते हे अनेक अपेक्षा घेवून येते आणि विवाह पश्च्यात असणारा सुरवातीचा काळ तर कसोटीचा असतोच असतो . गेली २५-२८ वर्ष असणार्या सवयी जायला थोडा अवधी लागणार आणि तो एकमेकांना द्यायला पुरेसा वेळ लागणार हे ओघानेच आले.

सुरवातीला अनेक जोडप्यात सर्व नीट असते आणि मग अचानक घडी विस्कटायला सुरवात होते ह्याचे कारण बदलत जाणार्या दशा आणि अंतर्दशा. म्हणूनच गुण मिलन करताना ह्या सर्व बाबी तपासल्या पाहिजे . आजकाल २५ वर्ष विवाहाला झालेली असूनही घटस्फोट घेणारी जोडपी दिसतात . प्रत्येक वेळी आमटी  भाजी छान होणार नाही कधीतरी मीठ तिखट कमी अधिक होणार त्याही वेळा आपल्या पत्नीला सांभाळून घेता आले पाहिजे. एकमेकांनी एकमेकांना आणि आदर प्रेम दिले पाहिजे आणि सन्मान करायला शिकले पाहिजे, आर्थिक स्थिती सुद्धा बदलत जाणार पण कशीही असली तरी आपली मानसिकता बदलू न देणे हेच खरे प्रेम आहे. प्रेम असते ते टिकून राहणे आणि दिवसागणिक ते वृद्धिंगत होणे म्हणजेच संसार .

अनेकदा लग्नात फसवणूक होते , दिसते तसे अजिबात नसते हे संसार सुरु झाला कि समजते आणि त्यातील सर्वात मुख्य कारण शारीरिक सुखातील कमतरता असू शकते . दोघांच्या विचारात साधर्म्य नसते म्हणून गुण मिलन आणि ग्रहमिलन हा खेळ नाही . त्याचा अभ्यास असायला लागतो . पहिल्या वर्षभरात सुनेला डोक्यावर बसवून तिचे गुण गान करायला न थकणारी  सासरची मंडळी वर्षभरानंतर त्याच सुनेचे उणेदुणे कसे काढू शकतात ?

एखादा  प्रेम विवाह असला तरी त्या दोघांनी आपल्या पत्रिका आणि भविष्य समजून घ्यावे हा विचार मी नेहमीच मांडत आले आहे . आपली होणारी पत्नी तिचा स्वभाव इतर अनेक गोष्टी ह्या शास्त्राच्या माध्यमातून डोळसपणे पाहिल्या तर अधिकस्य अधिकम फलं . त्याने अपाय तर निश्चित होणार नाही .

पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटते फक्त गुण जुळले म्हणून विवाह जुळला आणि पारही पडला असे न करता थोडे थांबा ग्रहमिलन न करता पुढे जाणे हा त्यांच्या नात्यातील भविष्यातील मोठा धोका आहे . 


आपल्या पत्रिकेतील जन्मस्थ ग्रह हे कधीच बदलत नाहीत . ते काहीतरी सांगत असतात , आपल्याला सूचना देत मार्गदर्शन करत असतात . मुळात ते आपले वाईट करायला पत्रिकेत बसले नाहीत निदान इतका तरी विश्वास आपला हवा. हे महान शास्त्र आहे, थोतांड नक्कीच नाही त्यामुळे त्याचे अध्ययन सखोल करणे आवश्यक आहे . 

विवाह हा आयुष्यातील महत्वाचा टर्न आहे आणि त्यामुळे जे काही करायचे ते विचारपूर्वक नाहीतर दोघांचेही आयुष्य एकमेकांना कधीही न भेटणाऱ्या दोन समांतर रेषांसारखे होईल . सहमत ?????

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

 

 









Monday, 10 March 2025

संकेत

 || श्री स्वामी समर्थ ||


परमेश्वरी शक्ती अगाध आहे आणि ती आपल्याला वेळोवेळी अनेक संकेत देत असते . पण आपण आपल्यातच इतके गुंग मश्गुल असतो कि ह्या संकेतांची पुसटशी कल्पना सुद्धा आपल्याला येत नाही . निसर्ग सुद्धा आपल्याला पाऊस यायच्या पूर्वी संकेत देत असतो तेव्हा सोसाट्याचे वारे वाहायला लागतात , मोठमोठे वृक्ष सुद्धा वार्याने हलू लागतात आणि आभाळ भरून येते , काळोखी येते तेव्हा पाऊस येणार हे आपण अगदी सहज बोलून जातो .

आपण जर कान नाक डोळे उघडे ठेवले तर पदोपदी आपल्याला ईश्वर देत असलेल्या संकेताची क्षणात जाणीव होईल आणि आपले जीवन सुकर होईल. आपल्या आत्मशक्तीमुळे आणि गुरुकृपेने आपल्याला ते ओळखता येतात . प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावायला आपण शिकतो. 

आजचेच उदा . काल मी श्री गुरुचरित्राचा नववा अध्याय स्वामी प्रगट दिनापर्यंत वाचायचे ठरवले आणि घराची बेल वाजली . आमच्या घरात काम करणारी मुलगी शेवग्याच्या शेंगांचा जणू भाराच घेवून आली . तिच्या घराजवळ असलेल्या शेवग्याला भरपूर शेंगा आल्या होत्या त्या घेऊन आली. हा संकेत माझ्या मनाला स्पर्शून गेला आणि मन आनंदून गेले. आपल्या घरी कधी शुभ कार्य ठरत असेल तेव्हा सनईचे किंवा मंगल सूर कानावर पडणे हा शुभ संकेत आहे. 

वरून एखादी वस्तू खाली पडणे जसे स्वयपाकघरातील साणशी ,लाटणे किंवा वरच्या घरातून खाली आलेली जळमटे , केसांचे गुंते काहीही असो आणि अश्यावेळी शेअर विकत घेणार असाल तर थांबा कारण तो नक्कीच कोसळणार आहे. आपण परदेशी जाण्यासाठी टूर बघत आहोत आणि आकाशातून एखादे विमान गेले तर नक्कीच आपली टूर होणार ह्यात शंका नाही.

कुत्र्याचे , मांजराचे रडणे, रुग्ण वाहिका दिसणे किंवा त्याच्या सायरन चा आवाज येणे अश्यावेळी मनात उगीच चलबिचल होते. त्याच्या आसपास कुणी आजारी असेल तर त्या व्यक्तीसंबंधी अनेकदा नको ती बातमी कानावर पडते . देवावर वाहिलेले फुल अचानक खाली पडणे हे त्यावेळी आपल्या मनात असलेल्या गोष्टीसाठी संकेत देणारे असते . घरी कुठल्याही व्रताच्या दिवशी न बोलावलेली सवाष्ण आली तर हा शुभ संकेत आहे .

देवळाच्या बाहेरील आपली चप्पल गेली तर वाईट वाटायला नको हा शुभ संकेत आहे , आपली पिडा गेली . एकदा मी विवाहासाठी गुणआणि ग्रह मिलन करायला सुरवात करणार इतक्यात ओळखीतील व्यक्तींनी त्यांच्या मुलाची विवाह ठरल्याची आमंत्रण पत्रिका पाठवली आणि मी मनात समजले. मी पाहत असलेल्या त्या दोघांच्या सुद्धा पत्रिका उत्तम जुळत होत्या आणि नजीकच्या काळात विवाह संपन्न झाला. अश्या गोष्टी मनाला आनंद देतात .

एखाद्या कुटुंबात बेबनाव झाला आणि नाती अगदी तुटायला आल्याची बातमी फोनवर ऐकत असू आणि कपबशी फुटली तर तो संकेत निश्चितपणे शुभ नाही . काचेला गेलेला तडा हा नात्यात पडलेली दरी दर्शवतो .अश्या वेळी त्या कुटुंबात मनोमिलन होणे कठीण हाच संकेत असतो . 

आपण आपल्या श्वासाकडे जसे अजिबात लक्ष देत नाही त्याचप्रमाणे आपला आतला आवाज सुद्धा आपल्याला काहीतरी सांगत असतो. ज्योतिष विद्या हे एक शास्त्र आहे पण ज्योतिष सांगताना सुद्धा आपल्याला आपली उपासना उपयोगी येते. अनेकदा ग्रहदशा , शुक्र , गोचर सर्व व्यवस्थित असताना व्यक्तीचा विवाह लांबणीवर पडेल किंवा विवाहाचा योग नाही असे मनात येत राहते आणि तसे घडते सुद्धा . पेपर मधील एखादी बातमी किंवा बस रिक्षा ट्रक वर लिहिलेली एखादी ओळ आपल्या प्रश्नाचे उत्तर असू शकते . आता एखादा डॉक्टर दिसला किंवा आपल्याला इमारतीच्या लिफ्ट मध्ये भेटला तर लगेच आपणच आता आजारी पडणार का असा त्याचा अर्थ किंवा संकेत घेवू नका . मिळालेले संकेत चांगले कि वाईट आणि नक्की कश्यासाठी आहेत ते आपल्याला समजते त्यासाठी दांडगी उपासना हवी. ते ओळखण्यासाठी नामस्मरण आणि सद्गुरूंचा आशीर्वाद सुद्धा लागतोच . बघा नामस्मरणाचे किती फायदे आहेत , आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळायला लागतात .

जसजशी आपली उपासना वाढत जाते तसतसे आपण आणि महाराज एकरूप होतो आणि मग आपला हा आतला आवाज अधिकाधिक जागृत होत जातो. जीवनातील ह्या सर्व संकेतांचा आपण योग्य वापर केला तर आपल्यासोबत आपण इतरांचे आयुष्य सुद्धा समृद्ध करू शकतो म्हणूनच आज पासून आयुष्यात आजूबाजूला घडणाऱ्या घटना , आवाज , संवाद ह्यावर लक्ष ठेवले तर त्यातील संकेत हळूहळू समजू लागतील आणि ते नक्की कुणासाठी आहेत कुठे वापरायचे आहेत तेही ज्ञात होत जायील. 

परमेश्वर आपल्या समोर येत नाही पण उपासना , निसर्गाचे संकेत , आपला so called सिक्स सेन्स ह्या अश्या अनेक माध्यमातून तो आपल्याला मार्ग दाखवत असतो . आपल्या संवेदना जागृत ठेवल्या तर ते आपल्याला सहज समजतात .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230








Thursday, 6 March 2025

ग्रह आणि आपली दिनचर्या

 || श्री स्वामी समर्थ ||



जातक पत्रिका दाखवायच्या आधीच पहिला प्रश्न विचारतात “ उपाय “ सांगाल ना? माझ्या मते ग्रहांचे उपाय म्हणजे “ स्वतः मध्ये बदल “. आपली रोजची दिनचर्या बदलली तर अनेक गोष्टी मार्गस्थ होतात . शनी चांगली फळे द्यायला हवा असेल तर भरपूर चालणे , व्यायाम करणे आवश्यक नाही अत्यावश्यक आहे. आता पांघरून घेऊन झोपून राहिलात तर कसा शनी मदत करणार तुम्हाला कारण त्याला व्यायाम करणारी कष्ट करणारी लोक आवडतात . 

शुक्र चांगला करायचा आहे ? आपल्या जीवनातील सर्व स्त्रीवर्गाचा आदर करायला शिका मग ती आई , बायको , बहिण वाहिनी किंवा अन्य कुणीही असो . घर आणि स्वतः सुद्धा स्वछ्य राहा . नीटनेटके राहायला पैसे पडत नाही, जमेल तसा साज शृंगार करा . घर व्यवस्थित ठेवा , दारात रांगोळी काढा , स्वयपाकघर व्यवस्थित तर पदार्थ करायला सुद्धा छान प्रसन्न वाटते आणि पदार्थ होतातही चांगले. बुध बिघडला असेल तर वचावचा सतत बोलत राहिले तर काय होईल. वाणीवर संयम ठेवायला उत्तम उपाय योग साधना. सतत खात राहिलो वेळी अवेळी तर गुरु त्रास देयील आणि शरीराचे वजन वाढले कि पर्यायाने अनेक आजार निर्माण होतील . वायफळ बडबड आणि खाबु गिरी ह्यावर ताबा मिळवायचा असेल तर सर्वात आधी मनावर ताबा मिळवला पाहिजे . दुर्दम्य इच्छाशक्ती हवी . त्यासाठी शरीराला आणि मनाला साधनेची गरज आहे . प्रत्येक ग्रहाची एक खासियान आहे ती ओळखून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर ग्रह आपल्याला नक्कीच अनुकूल होईल . नवग्रहांचे बीजमंत्र आहेत , ग्रहांची दाने पंचांगात दिलेली आहेत , अन्न दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. एखाद्या भुकेल्या व्यक्तीच्या पोटात लागलेल्या भुकेच्या होमाला अन्नाचा घास भारावून शांत करणे ह्यासारखे पुण्य ते काय ? 

माझ्यामुळेच हे जग आणि सर्व काही चालू आहे हा भ्रम सोडून द्या. तुम्ही जन्माला यायच्या आधीही हे जग होते आणि तुमच्या नंतर सुद्धा असणार आहे तेव्हा जमिनीवरून चालायला शिका , सारखी कुणाची तरी उणीदुणी काढण्यापेक्षा प्रत्येकाचा आदर करा , मन ठेवायचा नसेल तर निदान अपमान तरी करू नका. शनी महाराजांना ते नक्कीच आवडेल.

चांगल्या ज्ञानी , विचारांनी परिपक्व लोकात ( ह्याचा अर्थ श्रीमंत असा नाही ) मिसळा. सामाजिक कार्यात भाग घ्या . आपल्या मिळकतीतील काही भाग ( दोन वेळा हॉटेल मध्ये कमी जावून ) गरजू व्यक्तींसाठी खर्च करा . भरपूर वाचनाने गुरु चांगला होईल आणि उत्तम कर्म शनीला आवडतील.  

आपल्याला नेहमीच 80% मिळत नाहीत . एखादी वाईट संगत  लागली कि मार्क कमी होतात अगदी तसेच एखादा ग्रह शत्रू ग्रहासोबत किंवा शत्रू राशीत कशी चांगली फळे देयील ? तो स्वतःच्या राशीत म्हणजेच स्वतःच्या राज्यात किंवा मित्राच्या घरीच सुखावेल. त्यामुळे आपल्या रोज च्या जीवनातील लहान सहान गोष्टीत केलेले बदल हे ग्रहांना सुद्धा सुखावतील आणि ते चांगली फळे देण्यास प्रवृत्त होतील .

आपल्या शास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत .रामरक्षा , श्रीसूक्त , पौराणिक ग्रंथ जसे गजानन विजय , गुरु लीलामृत , हनुमान चालीसा , नवग्रह मंत्र ह्या सर्वांनी आपला Aura स्वछ्य होतोच पण मनाची ताकद वाढते , लढण्यासाठी आणि जगण्यासाठी उमेद वाढते . पण करणार कोण ? आम्ही डोळे मिटले कि ती देवताच समोर येवून उभी राहिली पाहिजे इतके इंस्तंट हवे आहे सर्व आपल्याला. नामस्मरण आणि त्यात असलेले सातत्य ह्याला मनोनिग्रह लागतो , सातत्य ठेवणे सोपे नाही . मनावर संयम अपोआप येतो जर ह्या सर्व साधना मनापासून केल्या तर . इच्छाशक्ती वाढते . आपले गुरु आणि आपण इतर काहीही ना दिसते न रुचते . पण करणार कोण ? 

उपाय सांगा ....सांगितले आता पुढे काय ??????????? काही नाही . काही नाही कसे ? मग नवीन ज्योतिषी मग अजून पुढे तिसरा कुणीतरी . मागील पानावरून पुढे चालू . सर्व ज्ञान आहे , सर्व माहित आहे . ज्याचे चांगले होणार असेल त्याला स्वतःची जीवनशैली बदलायची बुद्धी होईल अन्यथा मनुष्य त्याच गर्तेत अडकत जायील. मार्ग दाखवला तरी त्यावर चालायची बुद्धी झाली पाहिजे. 

पुढील दोन महिने रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी स्थिती आहे. जग वेगाने पुढे जात आहे . अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रात अनेक नवनवीन कायदे येत आहेत त्यामुळे तेथील भारतीयांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. संपूर्ण जगात रोजचे जीवन आणि त्याला लागणारा पैसा ह्याचे गणित रोज बदलत आहे. हे बदलते चित्र झेपवणे हा मोठा चलेंग आहे.  जीवनातील सुख सोयी वाढल्या तरी संघर्ष सुद्धा गती घेत आहे आणि आपले आयुष्य अस्थिर करत आहे. 

हे सर्व वाढत जाणार , सोन्याचे भाव कमी होणे अशक्य मग सामान्य माणसाने श्वास घ्यायचा नाही का? नक्कीच घ्यायचा आणि तोही आनंदाने त्यासाठी तनमन धन एकत्र करून सातत्याने , निष्ठेने आपल्या सद्गुरूंची उपासना , दानधर्म , प्रामाणिक वागणे बोलणे , वेळोवेळी गरजू व्यक्तींना मदत करणे , पैशाचा योग्य विनियोग केला तर जीवन सुकर होईल आणि मग कितीही चांगली वाईट ग्रहस्थिती आली तरी त्यातून आपण तरुन जावू .  

पाच पंचवीस देवळात जायचे पण विश्वास कुणावर नाही . कटू सत्य आहे ते . मुळात आपलाच आपल्यावर आणि आपण करत असलेल्या साधनेवर विश्वास नाही . स्वामींची ताकद ओळखा . स्वामी स्वामी करत बसायचे आणि रडत बसायचे हा त्यांचा अपमान आहे . होणार सर्व नीट करणार ते हा विश्वास पाहिजे मनात . जरा दुक्ख सहन होत नाही आपल्याला . एक माळ केली कि समोर स्वामिनी हात जोडून उभे राहिले पाहिजे कि काय ? इतके सोपे नाही . भोग आहेत ते भोगून मुक्त व्हायचे आहे . पण त्यासाठी उपासना , जपजाप्य आणि सर्वात मुख्य सद्गुरू उपासना जी सर्वश्रेष्ठ आहे. उन्हाळा पावसाळा हा आयुष्याचा भाग आहे . वाईट काळात मनाची ताकद वाढते ती आपण केलेल्या उपासनेने . वाईट काळ आला कि जप वाढवा ...त्यानेच मन शांत राहील आणि मग सुचेल चांगले .  

जगाला सुधारवायला संत बसले आहेत त्याची काळजी आपल्याला नको. आपण आपले आयुष्य कसे पुढे जाता येयील ते बघुया .सुगीचे दिवस येणार आणि आपले महाराजाच ते आणणार...पण त्या आधी आपण आपल्याकडे त्रयस्त नजरेने बघुया . सर्वात आधी मी जप केला मी प्रदक्षिणा घातल्या मी मी मी हा मी बंद झाला पाहिजे कायमचा. महाराजांची कृपा आहे म्हणून सर्व आहे हा भाव मनात ठेवून जी उपासना करू ती आपण आणि महाराज ह्याशिवाय तिसर्याला समजली नाही पाहिजे. त्या उपसानेचाही आपल्याला अहंकार आलेला आहे. कुणी कितीही म्हणा हेच सत्य आहे आणि तेच महाराजांना आवडत नाही . अहो मनुष्य स्वार्थी आहे त्यात तुम्ही आम्ही सर्व आलो कि. आपल्याला सतत काहीतरी हवे आहे अगदी शेवटचा क्षण सुद्धा सुखात म्हणून आपण देव देव करतो. आपली कामे झाली कि देव चांगला आणि नाही कि लगेच तो बदलायचा तरी नाहीतर त्याच्या नावाने शिमगा करायला आपण मोकळे. 

स्वतःची दिनचर्या , जीवनशैली बदलणे हाच प्रत्येक ग्रह चांगला करण्याचा उपाय आहे. 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230




Monday, 3 March 2025

गुण मिलन पुरेसे आहे का?

|| श्री स्वामी समर्थ ||



विवाह जुळवताना “ गुण मिलन “ हि पहिली पायरी आहे . गुण मिलन करणे आवश्यक आहे परंतु फक्त गुण जुळले म्हणून विवाह करावा असे मात्र नाही. गुण मिलनात अनेक गोष्टींचा उलगडा होत नाही त्या साठी आपल्याला ग्रहमिलन करावे लागते . दोघांच्याही पत्रिका व्यवस्थित अभ्यासून त्यांचे एकमेकांशी जुळणारे विचार , आर्थिक स्थैर्य , वैवाहिक आयुष्य , वैवाहिक समाधान , आयुष्य मर्यादा , जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण , कौटुंबिक सौख्य , विवाह टिकवण्यासाठी असलेले प्रत्येकाचे योगदान , तशी मानसिकता ,संतती सौख्य अश्या अनेक गोष्टींचा परामर्श ग्रह मिलन करून समजतो जो गुण मिलनात होत नाही 

म्हणूनच गुण मिलन आणि ग्रह मिलन करून एकत्रित अभ्यास तुम्हाला आलेले स्थळ योग्य आहे ना? ह्या विचार पर्यंत नेते. इतर हि काही गोष्टी आहेत जसे “ गोत्र “ . सगोत्र विवाह करू नये अर्थात त्यासाठी शास्त्रात अनेक गोष्टी सुचवल्या आहेत अनेक नियम दिलेले आहेत . 

गुण मिलन आणि ग्रहमिलन हे व्यवस्थित केले तर पुढे मनोमिलन होण्यास वेळ लागणार नाही . एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती दोन्ही पत्रिकात असेल तर जीवनात कितीही चढ उतार आले तरी काही समस्या येणार नाहीत . तू तू मै मै होणार नाही . एखादी मुलगी आपल्या कुटुंबात रममाण होईल कि नाही हे गुण मिलन करून समजत नाही म्हणून ग्रह मिलन म्हणजेच पत्रिकेचा सखोल अभ्यास आवश्यक आहे.  गुण मिलन सुद्धा महत्वाचे आहे पण ती फक्त पहिली पायरी आहे हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे.


वैवाहिक सुखाचा कारक शुक्र , लग्नेश किती बलवान आहे , कुटुंब भाव आणि पंचम जो संतती सौख्याचा आहे प्रणयाचा आहे त्याचे बलाबल काय आहे हे फक्त गुण मिलन करून समजणार नाही . आरे ला कारे करणे म्हणजे संसार नाही . आपले मत असलेच पाहिजे नाहीतर आपली केरसुणी करून कोपर्यात ठेवतील पण प्रत्येक वेळी आपल्याच मनासारखे झाले पाहिजे हा अट्टाहास नको , अश्याने संसार होत नाही , ह्या सर्वाची उकल ग्रह मिलन करताना होते जाते .

वैवाहिक सुखाचा कारक शुक्र बिघडला असेल किंवा सौख्य प्रदान न करणाऱ्या नक्षत्रात असेल तर हे गुण मिलन करून समजणार नाही . दशा हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. विवाह , संतती , आरोग्य , परदेशगमन , वाहन सौख्य ह्या सर्व गोष्टी ठरवतात त्या दशा . दशा स्वामीचा “ ग्रीन सिग्नल “ असल्याशिवाय कितीही डोके आपटले तरी वरील गोष्टींची प्राप्ती होणे कठीण आहे. म्हणून विवाहाला पूरक दशा आहे का ? आणि असल्यास विवाह हि घटना कधी घडेल हे काढता येते जे अर्थात गुण मिलन करून समजत नाही. अश्या अनेक गोष्टी ह्या फक्त ग्रह मिलन करून समजतात त्याचा उलगडा होतो म्हणून गुण आणि ग्रह मिलन हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत आणि दोन्ही तितक्याच महत्वाच्या आहेत . गुण जमणे म्हणजे विवाह करावा असे नाही असे असते तर गुण जुळले म्हणून विवाह केलेले कोर्टाच्या पायर्या चढले नसते .

अनेकदा २७ किंवा ३२ गुण जुळतात म्हणून विवाह होतो आणि मग पुढे सगळेच बिनसत जाते  . पत्रिका वरवर पाहू नका , अनेक प्रश्न जातकाने ज्योतिषा लाही विचारून सर्व शंकांचे समाधान करून घ्यावे. ज्योतिषाने सुद्धा जीवनातील अडथळे , दोघांचे स्वभाव ह्याचे विश्लेषण करावे . उगीच कुणाच्या तरी गुड बुक मध्ये राहण्यासाठी खरे लपवून ठेवू नये. स्पष्ट सल्ला द्यावा जेणेकरून समोरच्या माणसाची मनाची तयारी होईल. तुझी बायको मस्त पैशाची उधळपट्टी करणार आहे रे बाबा हे स्पष्ट सांगावे कारण तिच्या हाती पैसा टिकणे कठीण . शास्त्र जनमानसाच्या कल्याणासाठीच आहे . गुण मिलन आणि ग्रह मिलन ह्याचे एकत्रित महत्व आहे आणि त्याचे महत्व समजावे ह्या साठी हा लेखन प्रपंच .

सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230




अध्यात्म – आशेचा एक किरण

 || श्री स्वामी समर्थ ||


मनुष्य खूप मिसाज करतो ..हो हो करतोच . आपण खूप शहाणे आणि आपण सर्व काही करू शकतो अश्या खोट्या भ्रमात आयुष्यभर मस्तीत जगतो . पण एक मस्तक आणि दोन हस्तक त्याला शेवटी त्या शक्तीसमोर जोडायलाच लागतात . त्याच अस्तित्व मान्य करण्याशिवाय गत्यंतर नसते अशी स्थिती तोच निर्माण करतो. 

आपण इतकी प्रगती केली पण अजून आपल्याला रक्त तयार करता येत नाही , पाऊस पाडता येत नाही आणि थांबवता हि येत नाही . जन्म मृत्यू काहीच आपल्या हातात नाही कारण सर्वात महत्वाचे पत्ते त्याने त्याच्या हातात ठेवले आहेत . तेही आपल्याला दिले असते तर ??? ते नसताना इतका अहंकार आहे आपल्याला मग सर्वच शक्य झाले असते तर बघायलाच नको होते . ते होवू नये , आपल्या जीवनाला जसे मृत्यूचे बंधन किंवा सीमारेषा म्हणा हवे तर आहे तशी आपल्या कृती विचार वागणे ह्या सर्वाला वेळोवेळी तो बंधने घालत असतो , आपल्याला मार्ग दाखवत असतो .

महाराजांचे अस्तित्व मान्य करणे ह्यातच आपले हित आहे. तेच करते आणि करवते आहेत . ज्योतिष शास्त्राला आणि ते कथन करणाऱ्या ज्योतिषाला सुद्धा मर्यादा आहेत . ज्योतिष सांगणाऱ्या व्यक्तीची स्वतःची उपासना किती खोल दांडगी आहे त्यावर सुद्धा त्याचे फलित सर्वार्थाने अवलंबून आहे. 

अध्यात्म हे आयुष्याला आकार देते . सामान्य माणसाच्या अवकलनाच्या बाहेर असलेल्या गोष्टींची उत्तरे अध्यात्म देते . आपल्याला  न सुटलेल्या कोड्यांचे उत्तर “ नामस्मरण “ आहे ह्यात दुमत नसावे. दिवसागणिक नामस्मरण वाढले पाहिजे. सात्विक समाधानाचा स्त्रोत नामातच आहे . मी मी म्हणणारया आपल्या सारख्यांचे अस्तित्व किती क्षणभंगुर आहे हे अध्यात्म दर्शवते. त्याच्या इच्छेशिवाय पान काय सृष्टीतील एकही गोष्ट घडू शकत नाही. 

ह्या चांद तारकांच्या वर संतांची अगाध सत्ता आहे . आपल्या कर्माप्रमाणे आपला हा जन्म आणि आपले भोग आहेत ज्यात ते दखल देणार नाहीत पण जीवनाला अध्यात्माची जोड असेल तर अनेक कठीण प्रसंग किती सुलभ होतात हे अध्यात्म शिकवते. ज्योतिष खगोल शास्त्र विज्ञान सर्व आपापल्या जागी कितीही योग्य असले तरी जीवन जगायला पुढे पाऊल टाकायला लागतो तो विश्वास आणि तो आपल्याला आपले सद्गुरू पाठीशी असतील तर आणि तरच मिळू शकतो. मला कुणी तरी सांभाळत आहे, माझ्या पाठीशी कुणीतरी खंबीर उभे आहे हि भावना जीवन जगायला पुरेशी आहे.  ऊन पावसात , जीवनाच्या चढ उतरत कश्यातही एका समृद्ध जीवनाकडे मी वाटचाल करणार हा विश्वास देणारे आपले महाराज त्यांच्या चरणी मी नतमस्तक आहे. मला तर नेहमी वाटते माझ्या पत्रिकेतील १२ घरात गुरूच आहेत आणि तेच माझे जीवन पुढे नेत आहेत इतके पावलो पावली अनुभव त्यांनी मला दिले आहेत .

महाराजांच्या शिवाय जीवन शून्य आहे. अध्यात्म जीवनात आशेचा किरण घेऊन येते आणि मी ते प्रत्येक क्षणी अनुभवले आहे . अध्यात्म जगायला निमित्त होते आणि तेच जगवते ह्याचा पदोपदी अनुभव घेतला आहे. माझा देवावर विश्वास नाही हे म्हणण्यापेक्षा महाराजांचे अस्तित्व मान्य करण्यात शहाणपण आहे. अध्यात्म जगवते , जगण्याची उमेद देते , संकटांशी दोन हात करण्याचे बळ देते आणि मनाला उभारी सुद्धा देते . उमीद पे दुनिया कायम है ह्याची प्रचीती देतेच देते ह्यात दुमत नसावे. 

महाराजांचे अनुभव आले कि जो साक्षात्कार होतो तो लक्ष लक्ष दिव्यांनी आपले जीवन उजळून टाकतो . उद्या काहीतरी चांगले घडणार आहे ह्या आशेवर मनुष्य जीवन व्यतीत करतो . सदैव तुमचे चिंतन राहो आणि आमरण वारी घडो हि खुणगाठ प्रत्येकाने आपल्या हृदयाशी बांधून ठेवली पाहिजे आणि त्याचा विसरही पडता नये . 

जसजशी भक्ती वाढते जशी अध्यात्माची गोडी वाढते , प्रचीती मिळाली कि जगण्याची उमेद वाढते . जीवनात आनंद निर्माण होतो आणि सद्गुरुचरणी नतमस्तक होतो. आपण सेवेकरी आहोत त्यामुळे सेवा करत राहणे हेच आपल्या हाती आहे त्याचे फळ कधी केव्हा आणि कसे द्यायचे ते ठरवण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही. आपण कोण ते ठरवणारे ? तो अधिकार सर्वस्वी त्यांचा आहे. खरतर काहीतरी हवे आहे म्हणून नाम घेणे हेही उचित नाही. मान्य आहे मनुष्याला प्रपंचात सतत अडचणी संकटे येत असतात आणि अश्यावेळी तो आपल्या गुरूंच्याच कडे धाव घेणार त्यांचाच आधार वाटणार . पण प्रत्येक वेळी काहीतरी हवे तेव्हा त्यांची आठवण होणे किंवा भौतिक सुखाच्या लालसेने भक्ती करणे हे उचित नाही. आपण जसा श्वास घेतो त्याचप्रमाणे मनापासून त्यांची सेवा करत राहावे हे उत्तम मग अडचणी असो अथवा नसो.

येत्या काही महिन्यातील ग्रहस्थिती आपली परीक्षा पाहणारी , मानसिकता बिघडवणारी , खर्या खोट्याची परीक्षा करायला लावणारी . मनात संभ्रम निर्माण करणारी , असुरक्षित  भावना मनात निर्माण करणारी , शाश्वत जीवनशैली बिघडवणारी , शांत पाण्याच्या डोहात खडा टाकून मानसिक आंदोलने तयार करणारी असणार आहे. मग अश्या वेळी उगीच मन सैरभैर करून इथे तिथे धाव घेण्यापेक्षा देवासमोर दिवा लावून रोज शांतपणे आपली ठराविक उपासना जसे कुन्जीका स्तोत्र , हनुमान चालीसा, श्री सुक्त , श्री गजानन विजय ह्यासारखे पौराणिक ग्रंथांचे नित्य पठण करत राहणे योग्य त्यामुळे मनाची एकाग्र शांत होण्यास आणि आपल्याकडून विचारपूर्वक कृती घडण्यास मदत होईल. पुढील दोन महिने मोठे निर्णय टाळावेत अगदी विवाह सुद्धा . शक्र वक्री अस्त अश्या वेगवेगळ्या स्थितीतून जाणार आहे त्याच सोबत मार्च अखेरीस होणारा मोठा बदल म्हणजे शनीचे मीन राशीत होणारे पदार्पण . असो .

आज सोशल मिडीयाचा प्रचंड पगडा जनमानसावर आहे . सोशल मिडिया म्हणजेच राहू . येतंय न लक्ष्यात . अफवा , निसर्गातील बदल , माणसा माणसातील नातीगोती , व्यवहार , शेअर मार्केट , रोजचे व्यवहार सर्व गोष्टींवर परिणाम करणारी ग्रहस्थिती आहे. प्रत्येक पत्रिकेनुसार ती वेगवेगळी असणार आहे तेव्हा माझ्या षष्ठात शनी राहू युती होत आहे हे असले प्रश्न कृपया कुणालाही न विचारता , कारण आपले अगाध पण अर्धवट ज्ञान आपलीच मानसिकता खराब करू शकेल. हि ग्रहस्थिती वाईट च परिणाम करेल असेही नाही , कुणाला यश तर अपयश हे ज्याची त्याची पत्रिका आणि त्याची चालू असलेली दशा आणि मूळ ग्रहस्थिती ह्यावर सुद्धा निर्भर आहे. 

भित्यापाठी ब्रम्हराक्षस.. तेव्हा सगळ्यात आधी आपल्या सद्गुरूंच्या वरचा विश्वास क्षणभर सुद्धा कमी होवू न देता नामस्मरण आराधना उपासना चालू ठेवायची . अनेक वेळा वेगवेगळी ग्रहस्थिती येते म्हणून काय आपण जीवन जगायचे सोडून देणार का .रोज हजार जप करता  दुप्पट करा , अधिकाधिक करा . शेवटी एकच ग्रहांना त्यांचे काम करुदे आपण आपले रोजचे नित्यकर्म करू ...सहमत ??

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


  

    


Sunday, 2 March 2025

बदल हा स्वागतार्ह

 || श्री स्वामी समर्थ ||


निसर्ग सुद्धा सतत बदलत असतो तिथे मानवी जीवन ते काय . प्रत्येक गोष्टीतील बदल हा अपरिहार्य आहे आणि तो जितका लवकर आपण स्वीकारू तितके आपले आयुष्य सुखकर होईल. कधी आपल्या लहानपणीचे किंवा लग्नातील फोटो पहिले तर काय दिसून येते ? बदल. प्रत्येक वेळी आपल्यात झालेला बदल अनुभवा जसे देह , मन , मानसिकता सर्व काही बदलत जाते . पटतंय का?

माणसाचे मन हे फार विचित्र आहे. अनेकदा ते जर आणि तर ह्या दोन शब्दात अडकून राहते . मी तिथे असते तर आणि मी तेव्हा हे केले असते वगैरे आपण सतत बोलत राहतो . पण तुम्ही नव्हता ना तिथे ? कारण तुम्ही तिथे तेव्हा नसणे हेच तुमचे प्राक्तन होते. एखादी गोष्ट घडणार असते आणि ती घडते आपल्याला फक्त त्याचा स्वीकार करता आला पाहिजे. अनेकदा आपल्या जवळची व्यक्ती जाते तेव्हा आपण तिथे नसतो पण काही क्षणांपूर्वी मात्र तिथे असतो. त्या व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला तेव्हा तिथे आपले नसणे हेच आपले प्राक्तन आहे त्याला कुणीही काहीही करू शकत नाही. उत्तम ड्रायव्हर पण एखाद्या वेळी पेट्रोल पंपाच्या जवळ त्याची गाडी असते आणि स्फोट होतो. त्याला काहीही उपाय नाही. 

आपल्या आयुष्यातील घटना आणि आयुष्यात येणारी माणसे ह्यात अनेकदा सुसंगती असते. आपण देणेकरी आहोत आणि घेणेकरी सुद्धा . गेल्या अनेक जन्माचा हिशोब असतो आपल्यासमोर आणि तो आपला आपणच करायचा असतो. 

गेल्या काही दिवसातील अनेक लोकांच्या अनेक गोष्टी ऐकून पाहून असे वाटायला लागले आहे प्राप्त परिस्थितीनुसार आता माणसाने एकटे जगायला शिकले पाहिजे . एकटेपणाचे गाणे किती दिवस गाणार आपण ? ते बंद केले तर आरोग्य सुधारेल आपले. सतत बरोबर कुणी हवे हे कश्याला? बघा एक प्रयोग करून....स्वतःला भरपूर कामात व्यस्त ठेवा, आवश्यक असल्याशिवाय कुणाला फोन मेसेज करू नका. “ तू मला मेसेज करत नाहीस , फोन सुद्धा करत नाहीस “ हे वाक्य समोरच्याने सुद्धा म्हणावे कि कधी आपल्याला असे नाही का वाटत . आपण एकटेपणाला घाबरतो किंवा एकटे जगता च येत नाही असा भ्रम आहे आपला. एकटे असतो तेव्हा स्वतःशीच संवाद साधतो आणि तो खरा असतो. आपल्या मनातील व्यथा , शल्य आनंद नेहमी दुसर्याला सांगितला की साजरा होतो असे सूत्र नाही कधीतरी तो स्वतःशी सुद्धा व्यक्त झाला पाहिजे . अवास्तव काळजी करू नका आणि नको तो गुंता वाढवू नका. ह्या न संपणाऱ्या गुंत्यातून मनाचे आजार निर्माण होत आहेत आणि त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 

उठसुठ whatsapp कश्याला ? आपल्याला जे माहित असायला पाहिजे ते देव आपल्या पर्यंत कुठल्या न कुठल्या माध्यमातून नक्की पोहोचवेल ह्यावर विश्वास ठेवा. सगळी कडची सगळी माहिती घेवून आपण करणार तरी काय त्याचे ? मग सगळे मला समजले पाहिजे हा अट्टाहास का?  आजकाल बुद्धी शाबूत असणे आवश्यक वाटते. अत्याधुनिक युगात अनेक माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे त्याचा कसा वापर करून घ्यायचा ते आपल्यावर आहे . सुख वेचावे लागते , अनेक सुखाचे क्षण येतात आणि जातात आपण ते उपभोगू शकत नाही अनुभवू शकत नाही कारण आपला अहंकार.  जे आहे त्याची किंमत नाही आणि नाही त्याच्या पाठी पळत राहणे हा मनुष्य स्वभाव आहे. आजकाल कुणी गेले तर समाचाराला  सुद्धा लोक जात नाहीत .मेसेज करतात ‘ RIP ‘ . अरे काय चाललाय ? कधी मेसेज करायचा कधी प्रत्यक्ष भेट आवश्यक आणि कधी पाठीवरून मायेने केलेला स्पर्श अति आवश्यक हे जणू कळेना झाले आहे आपल्याला. 

मला खूप राग आलाय ..हो का????? मग ठेवा तो तुमच्याजवळ , कुणाला पडलेली नाही तुमची त्यामुळे स्वतःचेच महत्व वाढवून घेवू नका त्यामुळे अधिक एकटे पडल्यासारखे होईल. मेंदूतील कचरा फेकून द्या आणि नवा जमाही करू नका. तुमच्या असण्या आणि नसण्याने कुणाला काडीचाही फरक पडणार नाही त्यामुळे उगीचच राग लोभ मत्सर द्वेष ह्याचे अवास्तव अवडंबर माजवू नका. सतत कुणाला पाण्यात पाहून मिळणार काय ? त्याला काहीतरी मिळाले आहे जे तुमच्याकडे नाही आहे म्हणून वाटणारा हा द्वेष  मत्सर आणि हे कटू सत्य आहे , खरे आहे. पण  मग ते मिळवण्याची धडपड कष्ट घ्या कि त्याचा द्वेष कसला करता . दुसर्याचा जेव्हा आपण मत्सर करतो तेव्हा आपल्यातील खोट , अपूर्णता ह्यावर आपणच शिक्कामोर्तब करतो.  

आज संपूर्ण जग बदलत आहे , विचारधारा सुद्धा बदलत आहे, विवाहाचे वय ९ पासून आता ७० पर्यंत गेले आहे. अनेक संस्था पुढे येवून वृद्धांच्या समस्या सोडवताना त्यांना आयुष्याचा सोबती शोधण्यासाठीही तत्परतेने कार्य करत आहेत. हा बदल आणि असे अनेक बदल स्वागतार्ह आहेत . 

विवाह सोहळा आणि त्याचे स्वरूप , देणी घेणी , मानपानाच्या याद्या ह्यांचे स्वरूप बदलत आहे , प्रत्येक सण समारंभ वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात . पेहराव बदलत आहेत , इतकेच काय तर वातावरण सुद्धा बदलत आहे. अवकाळी पडलेला पाऊस सुद्धा आपण स्वीकारतो कि. निसर्ग सुद्धा वेगळ्या वाटेने जात आहे तिथे तुम्ही आम्ही काय .

शास्त्राचा अभ्यास करताना ह्या गोष्टी सतत जाणवतात . ग्रह सुद्धा बदलत असतात , एका राशीत फार वेळ झाला कि त्यांना जणू कंटाळा येत असावा . ग्रहांची बैठक , राशी संगत बदलते . अनेकदा मित्र ग्रहासोबत तर अनेकदा शत्रू ग्रहासोबत सुद्धा त्यांना राहावे लागते  , मग मनात असो अथवा नसो. आपल्यालाही नको असलेले पाहुणे आले तरी त्यांना चहा पाणी करावे लागते तसेच आहे. जुने कपडे देवून नवीन घेतो आपण . घरातील अनेक वस्तू नव्याने येतात , अगदी घरे सुद्धा बदलतो , आयुष्यात माणसे सुद्धा येत जात असतात . रोजच्या जीवनात जिभेचे चोचले पुरवताना वेगवेगळे खाद्य पदार्थ , ते बनवण्याच्या निरनिराळ्या पद्धती ह्यात सुद्धा बदल होत जातो , नवीन शेजारी येतात , कधी कट्टी बट्टी होते . आपल्या dp सुद्धा आपण बदलतो .

झाडे सुद्धा कात टाकतात पुन्हा मोहोर येतो , बहरतात नव्याने जगू लागतात . हे सर्व पाहताना असे वाटते जीवन सुद्धा शाश्वत नाही सतत बदलते आणि त्या बदलासोबत आपणही बदलत जातो अगदी प्रत्येक पावलावर . मित्र नव्याने भेटत जातात . घरातील व्यक्ती त्यांची वेळ झाली कि पुढील प्रवासाला निघून जातात तर कुठे नवीन जीव जन्माला येतो . एकाला निरोप तर दुसर्याचे स्वागत करावे लागते .

सगळ्यात शेवटी आपले शरीर सुद्धा वस्त्राप्रमाणे बदलावे लागते .आत्मा नवीन देह धारण करतो ...

बदल बदल आणि बदल... म्हणूनच कुणावर रागावू नये , मत्सर द्वेष काहीच धरू नये कारण काहीच शाश्वत नाही सतत बदलत जाणार आहे कारण बदल हा अपरिहार्य आहे आणि  तोच सृष्टीचा नियम आहे. आत्ताचा क्षण अनुभवणे हेच जीवन आहे. 

सौ. अस्मिता  दीक्षित 

संपर्क : 8104639230










Saturday, 1 March 2025

जादू तेरी नजर

 || श्री स्वामी समर्थ ||


प्रणयाचा प्रतिक मानला गेलेला रसिक ग्रह  शुक्र ज्याला आपण सर्व सुखाचा स्त्रोत मानतो तो सध्या मीन राशीत उच्चीची वस्त्रे परिधान करून स्थानबद्ध आहे पण त्याचसोबत इतर ग्रहांची मांदियाळी सुद्धा आहे. त्यातील प्रमुख 

ग्रह “ राहू “. राहु ला कुणाशीही देणे घेणे नाही . राहू ज्या ग्रहासोबत असेल त्याच्या गुणांना मोठे करत असतो किंवा त्याला प्रोत्साहित करत असतो . थोडक्यात राहू “ Amplifier “ सारखे काम करतो . शुक्र राहू युती हि नैतिकतेची सर्व बंधने झुगारून देणारी असल्यामुळे त्याचा अभ्यास स्मुक्ष पणे करणे आवश्यक आहे. शास्त्राचा अभ्यास परिपूर्ण आणि सखोल असायला हवा . नाहीतर एखाद्या सज्जन व्यक्तीला अनैतिक ठरवण्याचे पाप नव्हे अक्षम्य गुन्हा घडायला नको. 

अभ्यासकांनी ह्या प्रश्नांचा अभ्यास आपल्या पुरताच मर्यादित ठेवला पाहिजे. एकदा एका जातकाने आपला पती अनैतिक वागत आहे का ?? हा प्रश्न मला विचारला होता . दोघांच्या पत्रीका अभ्यासल्यावर विचारणारी व्यक्तीच दोषी आहे हे लक्ष्यात आले. असो. ह्याबद्दल मौन पाळणे उत्तम असते आपण शास्त्राचे अभ्यासक आहोत, शेवटी न्यायदेवता आहे ती योग्य न्याय करेल.

“ आई मी ह्याच मुलीशी किंवा मुलाशी लग्न करणार “ हे सांगणाऱ्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत शुक्र कुठेतरी active झालेला असतो आणि पंचमाचे वारे वाहू लागलेले असतात . प्रेम हि निस्सीम भावना आहे. जगातील सगळ्यात कोमल भावना म्हणजे “ प्रेम “ . प्रत्येक व्यक्ती प्रेमाचा भुकेला असतो . पण प्रेम हे सहज होते केले जाते , ओरबाडून घेतलेले किंवा करायला लागणारे प्रेम हे प्रेम नसते. प्रेम हे निस्पृहपणे केले पाहिजे, अपेक्षां विरहित असले पाहिजे. मुळात प्रेमाचा अर्थ समजणे सोपे नाही . आपल्याला एखाद्याबद्दल वाटणारे प्रेम हे वरवरचे आहे , शारीरिक आकर्षण आहे , कि मनाच्या गाभ्यातून सहजतेने उलगडत जाणारे आहे हे आधी समजले पाहिजे कारण ह्या सर्व भावनात आपण नेहमीच गल्लत करतो. खरे प्रेम हे अपेक्षांच्या ओझ्याखाली दडणार नाही ते धबधब्यासारखे असते ..प्रेम करत राहावे ...देत राहावे पण जेव्हा तिथे अपेक्षा येतात तेव्हा मग तू तू मै मै सुरु होते. जितक्या वेगाने गोष्टी जवळ येतात तितक्याच वेगाने त्या जातात हा सृष्टीचा नियम आहे. 

शुक्राचे भ्रमण हे मीन राशीत पुढे काही काळअसणार आहे त्यात शुक्र काही काळ अस्तंगत आणि वक्री सुद्धा असणार आहे . शुक्रा सोबत असणारा हा राहू आपल्याला मोहात फसवू शकतो , अनैकतेकडे नेऊ शकतो , संभ्रमित करू शकतो  त्यामुळे आपल्या भावनांवर आपल्याला विजय मिळवायचा आहे. जेव्हा जेव्हा कठीण किंवा आपल्यासमोर अनेक कोडी टाकणारी ग्रहस्थिती येते तेव्हा आपले नामस्मरण वाढवावे हे माझे मत आहे आपले गुरु आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतात , प्रलोभनांपासून वंचित करतात . 

आपल्यावर रोखलेली नजर आपल्याला अगदी “ जादुई “ वाटते पण त्याचे परिणाम आपले आयुष्य उध्वस्त करणार तर नाही हे नक्कीच अश्या युती असणार्या काळात करावे. 


मध्यंतरी माझ्याकडे एका मुलीने तिची आणि तिला ज्याच्याशी विवाह करायचा आहे त्याची पत्रिका दिली. तिच्या पेक्षा वयाने लहान असणार्या आणि बोली भाषा , देश वेश जातपात सर्व सर्व काही भिन्न असणारा हा मुलगा तिला भावला होता. पंचमाची फळे तिला मिळाली पण पुढे काय ? विवाह झाला कि सप्तम बोलायला लागेल आणि ते फारसे चांगले  दिसत नव्हते. माझ्या साठी तो हे करेल आणि ते करेल ह्या फसव्या कल्पनातून बाहेर यायला तिला अथक प्रयत्न करायला लागणार नव्हते. मुळात हे प्रेम अळवावरील पानाचा थेंब होता जो कालांतराने ओघळून जाणार होता .

प्रेम एकदाच होते , पुन्हा पुन्हा होत नसते .कदाचित कलियुगात प्रेमाच्या व्याख्या बदलल्या असतीलही . पण अश्या अनेक वेळा केलेल्या प्रेमात ती नजाकत कुठून असणार . 

काही काळ प्रेमात मनसोक्त विहार करणारया त्या दोघांचे चित्र खरा संसार सुरु झाला कि वेगळेच बघायला मिळते ते कसे ? तर मुळात ते प्रेम नसतेच तो आभास असतो , त्यावेळी मनाला पडलेली भुरळ असते जी क्षणिक असते आणि मग एकमेकांना बोल लावत एकमेकांच्या चुका काढत आयुष्य काढायला लागते.


प्रेम म्हणजे पंचम भाव पण त्याची परिणीती सप्तमात होते . पंचम बिघडले तर सप्तम कसे सुखाचे होईल ? प्रेम आणि आकर्षण ह्यात गल्लत होते तेव्हा आयुष्य मातीमोल होते . आपला एक निर्णय हे नक्कीच करू शकतो म्हणून अश्या युती असतात तेव्हा स्वतःला सांभाळणे म्हणजेच मन ताब्यात ठेवणे , मन म्हणेल तसे नाही तर आपल्याला योग्य वाटेल तसे मनाला वागू देणे जमले पाहिजे त्यासाठी रोजच्या उपासना मदत करतात .

राहू हा फसवा ग्रह आहे . शुक्र सोबत असेल तर फसवे प्रेम करेल . जे हवे ते मिळाले कि हेच प्रेम रंगहीन होईल .

बुधासोबत असेल तर खोटी कागदपत्रे , सह्या करेल , अफवा पसरतील , बुध वाचेचा कारक असल्यामुळे सर्रास खोटे बोलणे , बुध म्हणजे हात त्यामुळे हातचलाखी करून चोर्या करणे अश्या असंख्य गोष्टी राहूच्या अधिपत्या खाली येतात.

प्रेमाचे रंग हे “ त्याच्या शिवाय मी जगू शकत नाही “ म्हणताना , हे शुक्र राहू चे परिणाम तर नाहीत ना ह्याची खात्री करून घ्या .क्षणात फसवणारा राहू शुक्रासोबत आहे तेव्हा कुठल्याही भूलथापा , आकर्षण , प्रलोभने ह्यात आपण अडकत तर नाही ना ह्याची प्रत्येक क्षणी खात्री करून घ्या कारण वास्तव काहीतरी वेगळे असू शकते .

जादुई प्रेम हे आकर्षण असते असे प्रेम संसार करू शकत नाही कारण मुळातच ते परिपक्व नसते. 

मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही हे म्हणण्यापेक्षा मी परमेश्वरा शिवाय राहू शकत नाही म्हणत त्याची भक्ती केली तर आयुष्यात तुम्हाला निखळ , अस्सल शंभर नंबरी सोन्यासारखे खरे प्रेम नक्कीच लाभेल आणि परमेश्वरच योग्य वेळी ते तुम्हाला बहाल करेल ह्यात शंकाच नाही .

राहू हा संमोहित , भ्रमित करणारा आपली मती गोठवणारा मायावी राक्षस आहे. आपल्याला काही समजायच्या आत तो आपल्याला फसवून निघून जातो इतकी प्रचंड ताकद आणि वेग त्याच्याकडे आहे. राहूच्या नक्षत्रावर म्हणूनच खरेदी करायची नसते . कुठलाच व्यवहार राहूच्या नक्षत्रावर करू नये .  आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत डोळसपणा हवा . डोळ्यावर झापडे लावली तर अपिरीमित नुकसान होईल. कागदपत्रे पुन्हा पुन्हा तपासा. कुणावरही आंधळा विश्वास आयुष्याची होळी करेल . , कुठलेही निर्णय पुढील दोन महिने टाळावेत .

ह्या विश्वात प्रेमाशिवाय कुणीही जगू शकणार नाही , आयुष्यातून प्रेम वजा केले तर आयुष्य निरस होयील. निखळ , निस्वार्थी कसलीही अभिलाषा नसणारे प्रेम लाभणे हे नशिबात असावे लागते . तुम्हा आम्हा सर्वाना अश्या शाश्वत प्रेमाची अनुभूती मिळो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना .

प्रत्येक ग्रहाचे असंख्य कंगोरे आहेत . प्रत्येक राशीत , भावात आणि ग्रहासोबत त्याचे फळ बदलत असते. राहू कलियुगाचा राजा आहे. आधुनिक इंटरनेट युगात राहु मुळे आपला वावर आहे . त्याचे फायदेही आहेत आणि तोटेही पण आज आयुष्यातील प्रेमाचा त्याच्या बहराचा विचार राहु असेल तर वेगळा करायला लागतो . सामान्य माणूस हा चौकटीबद्ध आयुष्य जगत असतो आणि  कुठेही आपली फसवणूक होवू नये ह्यासाठी हा लेखन प्रपंच . 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230