Thursday, 6 March 2025

ग्रह आणि आपली दिनचर्या

 || श्री स्वामी समर्थ ||



जातक पत्रिका दाखवायच्या आधीच पहिला प्रश्न विचारतात “ उपाय “ सांगाल ना? माझ्या मते ग्रहांचे उपाय म्हणजे “ स्वतः मध्ये बदल “. आपली रोजची दिनचर्या बदलली तर अनेक गोष्टी मार्गस्थ होतात . शनी चांगली फळे द्यायला हवा असेल तर भरपूर चालणे , व्यायाम करणे आवश्यक नाही अत्यावश्यक आहे. आता पांघरून घेऊन झोपून राहिलात तर कसा शनी मदत करणार तुम्हाला कारण त्याला व्यायाम करणारी कष्ट करणारी लोक आवडतात . 

शुक्र चांगला करायचा आहे ? आपल्या जीवनातील सर्व स्त्रीवर्गाचा आदर करायला शिका मग ती आई , बायको , बहिण वाहिनी किंवा अन्य कुणीही असो . घर आणि स्वतः सुद्धा स्वछ्य राहा . नीटनेटके राहायला पैसे पडत नाही, जमेल तसा साज शृंगार करा . घर व्यवस्थित ठेवा , दारात रांगोळी काढा , स्वयपाकघर व्यवस्थित तर पदार्थ करायला सुद्धा छान प्रसन्न वाटते आणि पदार्थ होतातही चांगले. बुध बिघडला असेल तर वचावचा सतत बोलत राहिले तर काय होईल. वाणीवर संयम ठेवायला उत्तम उपाय योग साधना. सतत खात राहिलो वेळी अवेळी तर गुरु त्रास देयील आणि शरीराचे वजन वाढले कि पर्यायाने अनेक आजार निर्माण होतील . वायफळ बडबड आणि खाबु गिरी ह्यावर ताबा मिळवायचा असेल तर सर्वात आधी मनावर ताबा मिळवला पाहिजे . दुर्दम्य इच्छाशक्ती हवी . त्यासाठी शरीराला आणि मनाला साधनेची गरज आहे . प्रत्येक ग्रहाची एक खासियान आहे ती ओळखून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर ग्रह आपल्याला नक्कीच अनुकूल होईल . नवग्रहांचे बीजमंत्र आहेत , ग्रहांची दाने पंचांगात दिलेली आहेत , अन्न दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. एखाद्या भुकेल्या व्यक्तीच्या पोटात लागलेल्या भुकेच्या होमाला अन्नाचा घास भारावून शांत करणे ह्यासारखे पुण्य ते काय ? 

माझ्यामुळेच हे जग आणि सर्व काही चालू आहे हा भ्रम सोडून द्या. तुम्ही जन्माला यायच्या आधीही हे जग होते आणि तुमच्या नंतर सुद्धा असणार आहे तेव्हा जमिनीवरून चालायला शिका , सारखी कुणाची तरी उणीदुणी काढण्यापेक्षा प्रत्येकाचा आदर करा , मन ठेवायचा नसेल तर निदान अपमान तरी करू नका. शनी महाराजांना ते नक्कीच आवडेल.

चांगल्या ज्ञानी , विचारांनी परिपक्व लोकात ( ह्याचा अर्थ श्रीमंत असा नाही ) मिसळा. सामाजिक कार्यात भाग घ्या . आपल्या मिळकतीतील काही भाग ( दोन वेळा हॉटेल मध्ये कमी जावून ) गरजू व्यक्तींसाठी खर्च करा . भरपूर वाचनाने गुरु चांगला होईल आणि उत्तम कर्म शनीला आवडतील.  

आपल्याला नेहमीच 80% मिळत नाहीत . एखादी वाईट संगत  लागली कि मार्क कमी होतात अगदी तसेच एखादा ग्रह शत्रू ग्रहासोबत किंवा शत्रू राशीत कशी चांगली फळे देयील ? तो स्वतःच्या राशीत म्हणजेच स्वतःच्या राज्यात किंवा मित्राच्या घरीच सुखावेल. त्यामुळे आपल्या रोज च्या जीवनातील लहान सहान गोष्टीत केलेले बदल हे ग्रहांना सुद्धा सुखावतील आणि ते चांगली फळे देण्यास प्रवृत्त होतील .

आपल्या शास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत .रामरक्षा , श्रीसूक्त , पौराणिक ग्रंथ जसे गजानन विजय , गुरु लीलामृत , हनुमान चालीसा , नवग्रह मंत्र ह्या सर्वांनी आपला Aura स्वछ्य होतोच पण मनाची ताकद वाढते , लढण्यासाठी आणि जगण्यासाठी उमेद वाढते . पण करणार कोण ? आम्ही डोळे मिटले कि ती देवताच समोर येवून उभी राहिली पाहिजे इतके इंस्तंट हवे आहे सर्व आपल्याला. नामस्मरण आणि त्यात असलेले सातत्य ह्याला मनोनिग्रह लागतो , सातत्य ठेवणे सोपे नाही . मनावर संयम अपोआप येतो जर ह्या सर्व साधना मनापासून केल्या तर . इच्छाशक्ती वाढते . आपले गुरु आणि आपण इतर काहीही ना दिसते न रुचते . पण करणार कोण ? 

उपाय सांगा ....सांगितले आता पुढे काय ??????????? काही नाही . काही नाही कसे ? मग नवीन ज्योतिषी मग अजून पुढे तिसरा कुणीतरी . मागील पानावरून पुढे चालू . सर्व ज्ञान आहे , सर्व माहित आहे . ज्याचे चांगले होणार असेल त्याला स्वतःची जीवनशैली बदलायची बुद्धी होईल अन्यथा मनुष्य त्याच गर्तेत अडकत जायील. मार्ग दाखवला तरी त्यावर चालायची बुद्धी झाली पाहिजे. 

पुढील दोन महिने रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी स्थिती आहे. जग वेगाने पुढे जात आहे . अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रात अनेक नवनवीन कायदे येत आहेत त्यामुळे तेथील भारतीयांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. संपूर्ण जगात रोजचे जीवन आणि त्याला लागणारा पैसा ह्याचे गणित रोज बदलत आहे. हे बदलते चित्र झेपवणे हा मोठा चलेंग आहे.  जीवनातील सुख सोयी वाढल्या तरी संघर्ष सुद्धा गती घेत आहे आणि आपले आयुष्य अस्थिर करत आहे. 

हे सर्व वाढत जाणार , सोन्याचे भाव कमी होणे अशक्य मग सामान्य माणसाने श्वास घ्यायचा नाही का? नक्कीच घ्यायचा आणि तोही आनंदाने त्यासाठी तनमन धन एकत्र करून सातत्याने , निष्ठेने आपल्या सद्गुरूंची उपासना , दानधर्म , प्रामाणिक वागणे बोलणे , वेळोवेळी गरजू व्यक्तींना मदत करणे , पैशाचा योग्य विनियोग केला तर जीवन सुकर होईल आणि मग कितीही चांगली वाईट ग्रहस्थिती आली तरी त्यातून आपण तरुन जावू .  

पाच पंचवीस देवळात जायचे पण विश्वास कुणावर नाही . कटू सत्य आहे ते . मुळात आपलाच आपल्यावर आणि आपण करत असलेल्या साधनेवर विश्वास नाही . स्वामींची ताकद ओळखा . स्वामी स्वामी करत बसायचे आणि रडत बसायचे हा त्यांचा अपमान आहे . होणार सर्व नीट करणार ते हा विश्वास पाहिजे मनात . जरा दुक्ख सहन होत नाही आपल्याला . एक माळ केली कि समोर स्वामिनी हात जोडून उभे राहिले पाहिजे कि काय ? इतके सोपे नाही . भोग आहेत ते भोगून मुक्त व्हायचे आहे . पण त्यासाठी उपासना , जपजाप्य आणि सर्वात मुख्य सद्गुरू उपासना जी सर्वश्रेष्ठ आहे. उन्हाळा पावसाळा हा आयुष्याचा भाग आहे . वाईट काळात मनाची ताकद वाढते ती आपण केलेल्या उपासनेने . वाईट काळ आला कि जप वाढवा ...त्यानेच मन शांत राहील आणि मग सुचेल चांगले .  

जगाला सुधारवायला संत बसले आहेत त्याची काळजी आपल्याला नको. आपण आपले आयुष्य कसे पुढे जाता येयील ते बघुया .सुगीचे दिवस येणार आणि आपले महाराजाच ते आणणार...पण त्या आधी आपण आपल्याकडे त्रयस्त नजरेने बघुया . सर्वात आधी मी जप केला मी प्रदक्षिणा घातल्या मी मी मी हा मी बंद झाला पाहिजे कायमचा. महाराजांची कृपा आहे म्हणून सर्व आहे हा भाव मनात ठेवून जी उपासना करू ती आपण आणि महाराज ह्याशिवाय तिसर्याला समजली नाही पाहिजे. त्या उपसानेचाही आपल्याला अहंकार आलेला आहे. कुणी कितीही म्हणा हेच सत्य आहे आणि तेच महाराजांना आवडत नाही . अहो मनुष्य स्वार्थी आहे त्यात तुम्ही आम्ही सर्व आलो कि. आपल्याला सतत काहीतरी हवे आहे अगदी शेवटचा क्षण सुद्धा सुखात म्हणून आपण देव देव करतो. आपली कामे झाली कि देव चांगला आणि नाही कि लगेच तो बदलायचा तरी नाहीतर त्याच्या नावाने शिमगा करायला आपण मोकळे. 

स्वतःची दिनचर्या , जीवनशैली बदलणे हाच प्रत्येक ग्रह चांगला करण्याचा उपाय आहे. 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230




No comments:

Post a Comment