Friday, 14 March 2025

समांतर रेषा

 || श्री स्वामी समर्थ ||

उंची पेहराव , साजेसे दागदागिने , आकर्षक आमंत्रण पत्रिका , देवदर्शने , संगीत , डोळे दिपवणारा माहोल , मेहेंदी , प्री वेडिंग शूट अश्या दिव्य भव्य आकर्षक लग्न सोहळ्याची सध्या प्रथा आहे. आयुष्यात मिळवलेली सगळी पुंजी आणि प्रतिष्ठा पणाला लावणारे विवाह सोहळे थाटात पार पाडतात. कालांतराने संसार सुरु होतो आणि सप्तम भाव कार्यान्वित होतो. एकमेकांना शपथा , आणा भाका देणारे ते दोघे वास्तवात येतात . ३०-३२-३५ गुण जुळवलेल्या त्या दोघांच्या पत्रिका विवाह झाल्यावर का जुळत नाहीत हाच मोठा प्रश्न आहे. 

परवाच एक पत्रिका पाहिली. होळीचा शुभ पवित्र सण आणि अश्यावेळी अश्या पत्रिका आल्या कि मन उद्विग्न होते. मुलगी फोनवर इतकी संभ्रमित होती , अचानक आलेल्या ह्या आयुष्यातील नव्या वळणावर भांबावली होती. तिशीचा उंबरा नुकताच ओलांडलेला आणि पुढे अखंड आयुष्य ..विचार , मानसिकता बिघडत चाललेली होती. जिथे दोघांची मन च जवळ येत नव्हती तिथे समागम तरी कसा होणार ?


पत्रिका दाखवल्या नव्हत्या का ? त्यावर दाखवल्या होत्या अमुक अमुक गुण जुळत आहेत हे समजले तेव्हा पुढे बोलणी झाली आणि विवाह ठरला झाला सुद्धा . मग आज हि स्थिती का? अनेकदा पत्रिकेचा अभ्यास व्यवस्थित कुणा जाणकारा  कडून करून घ्यावा हा विचार सुद्धा मनाला शिवत नाही. इतके गुण जुळत आहेत . दोघे एकमेकांना साजेसे( सर्वार्थाने अनुरूप नाही ) आहेत असे बघून विवाह केला जातो . प्रत्यक्ष आयुष्य जगताना राजकुमार असणारा आपला जोडीदार आपल्याला किंमत देत नाही , आपल्यावर हुकुमत गाजवतो , घरातील मंडळी अंतर ठेवून वागतात , घरातील आर्थिक बाबी समजू देत नाहीत , कसलेच कौतुक नाही अश्या वातावरणात कसे बरे मन रमेल त्या नव्या नवरीचे. 

जिथे अंगाखांद्यावर वाढलो अश्या सर्वाना सोडून एका परक्या माणसासाठी घर सोडून जायचे हे दिव्य आहे आणि ते प्रत्येक मुलगी करत असते. आई वडिलांची ती सुखी राहावी ह्यासाठी धडपड चालू असते.  पुढे मग सारिपाट मांडण्याच्या आधी फिस्कटला तर अश्या वेळी त्यांनी काय करावे? स्वतःला आणि तिलाही कसा आधार द्यावा ? 

समाज आता प्रगत आहे , आपण सर्व आता शिकलेल्या आधुनिक प्रगत जगताचा एक भाग आहोत . आता सासू सुना मैत्रिणी असतात एकत्र राहतात नव्हे नांदतात , विचार बदलत आहेत , नवीन विचारांचे स्वागत जुनी पिढी करताना दिसते , साड्या जावून ड्रेस , आधुनिक पद्धतीचे पेहराव आले. आई वडील आता पूर्वीसारखे नाहीत , मुलांच्या सुनांच्या नवीन विचारांचे स्वागत करताना दिसत आहेत . माझे तेच खरे हा दृष्टीकोन आता राहिलेला नाही .अगदी डोहाळे जेवणे  , लग्नाचे वाढदिवस सुद्धा हॉटेल मध्ये करताना दिसतात . असो . पण तरीही काही ठिकाणी , काही कुटुंबातून सगळे बदलले तरी काही बाबतीत माणसाचे मन आणि दृष्टीकोन अजूनही पुरता बदलेला दिसत नाही . 

नवीन सुनबाई ना नवीन घर आपले वाटावे ह्यासाठी तिने आणि मुख्य म्हणजे मुलाच्या घरातील  सर्वांनी सारखेच योगदान दिले पाहिजे असे माझे मत आहे. वर्ष लागेल तिला घरात रुळायला . पण ह्यात सर्वात नाजूक बंधन ज्याच्याशी आहे त्यानेच जर विचित्र वागायला सुरवात केली तर स्वप्ने फुलायच्या आधीच विखुरली जातील . खरा सोबती आणि हक्काचा माणूस तर आपला जोडीदार आणि तिथेच भ्रमनिरास झाला तर त्या  मुलीने करायचे तरी काय ? हि गोष्ट मुलाच्याही बाबत होवू शकते नाही असे नाही .

नवीन नाते हे अनेक अपेक्षा घेवून येते आणि विवाह पश्च्यात असणारा सुरवातीचा काळ तर कसोटीचा असतोच असतो . गेली २५-२८ वर्ष असणार्या सवयी जायला थोडा अवधी लागणार आणि तो एकमेकांना द्यायला पुरेसा वेळ लागणार हे ओघानेच आले.

सुरवातीला अनेक जोडप्यात सर्व नीट असते आणि मग अचानक घडी विस्कटायला सुरवात होते ह्याचे कारण बदलत जाणार्या दशा आणि अंतर्दशा. म्हणूनच गुण मिलन करताना ह्या सर्व बाबी तपासल्या पाहिजे . आजकाल २५ वर्ष विवाहाला झालेली असूनही घटस्फोट घेणारी जोडपी दिसतात . प्रत्येक वेळी आमटी  भाजी छान होणार नाही कधीतरी मीठ तिखट कमी अधिक होणार त्याही वेळा आपल्या पत्नीला सांभाळून घेता आले पाहिजे. एकमेकांनी एकमेकांना आणि आदर प्रेम दिले पाहिजे आणि सन्मान करायला शिकले पाहिजे, आर्थिक स्थिती सुद्धा बदलत जाणार पण कशीही असली तरी आपली मानसिकता बदलू न देणे हेच खरे प्रेम आहे. प्रेम असते ते टिकून राहणे आणि दिवसागणिक ते वृद्धिंगत होणे म्हणजेच संसार .

अनेकदा लग्नात फसवणूक होते , दिसते तसे अजिबात नसते हे संसार सुरु झाला कि समजते आणि त्यातील सर्वात मुख्य कारण शारीरिक सुखातील कमतरता असू शकते . दोघांच्या विचारात साधर्म्य नसते म्हणून गुण मिलन आणि ग्रहमिलन हा खेळ नाही . त्याचा अभ्यास असायला लागतो . पहिल्या वर्षभरात सुनेला डोक्यावर बसवून तिचे गुण गान करायला न थकणारी  सासरची मंडळी वर्षभरानंतर त्याच सुनेचे उणेदुणे कसे काढू शकतात ?

एखादा  प्रेम विवाह असला तरी त्या दोघांनी आपल्या पत्रिका आणि भविष्य समजून घ्यावे हा विचार मी नेहमीच मांडत आले आहे . आपली होणारी पत्नी तिचा स्वभाव इतर अनेक गोष्टी ह्या शास्त्राच्या माध्यमातून डोळसपणे पाहिल्या तर अधिकस्य अधिकम फलं . त्याने अपाय तर निश्चित होणार नाही .

पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटते फक्त गुण जुळले म्हणून विवाह जुळला आणि पारही पडला असे न करता थोडे थांबा ग्रहमिलन न करता पुढे जाणे हा त्यांच्या नात्यातील भविष्यातील मोठा धोका आहे . 


आपल्या पत्रिकेतील जन्मस्थ ग्रह हे कधीच बदलत नाहीत . ते काहीतरी सांगत असतात , आपल्याला सूचना देत मार्गदर्शन करत असतात . मुळात ते आपले वाईट करायला पत्रिकेत बसले नाहीत निदान इतका तरी विश्वास आपला हवा. हे महान शास्त्र आहे, थोतांड नक्कीच नाही त्यामुळे त्याचे अध्ययन सखोल करणे आवश्यक आहे . 

विवाह हा आयुष्यातील महत्वाचा टर्न आहे आणि त्यामुळे जे काही करायचे ते विचारपूर्वक नाहीतर दोघांचेही आयुष्य एकमेकांना कधीही न भेटणाऱ्या दोन समांतर रेषांसारखे होईल . सहमत ?????

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

 

 









No comments:

Post a Comment