Monday, 10 March 2025

संकेत

 || श्री स्वामी समर्थ ||


परमेश्वरी शक्ती अगाध आहे आणि ती आपल्याला वेळोवेळी अनेक संकेत देत असते . पण आपण आपल्यातच इतके गुंग मश्गुल असतो कि ह्या संकेतांची पुसटशी कल्पना सुद्धा आपल्याला येत नाही . निसर्ग सुद्धा आपल्याला पाऊस यायच्या पूर्वी संकेत देत असतो तेव्हा सोसाट्याचे वारे वाहायला लागतात , मोठमोठे वृक्ष सुद्धा वार्याने हलू लागतात आणि आभाळ भरून येते , काळोखी येते तेव्हा पाऊस येणार हे आपण अगदी सहज बोलून जातो .

आपण जर कान नाक डोळे उघडे ठेवले तर पदोपदी आपल्याला ईश्वर देत असलेल्या संकेताची क्षणात जाणीव होईल आणि आपले जीवन सुकर होईल. आपल्या आत्मशक्तीमुळे आणि गुरुकृपेने आपल्याला ते ओळखता येतात . प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावायला आपण शिकतो. 

आजचेच उदा . काल मी श्री गुरुचरित्राचा नववा अध्याय स्वामी प्रगट दिनापर्यंत वाचायचे ठरवले आणि घराची बेल वाजली . आमच्या घरात काम करणारी मुलगी शेवग्याच्या शेंगांचा जणू भाराच घेवून आली . तिच्या घराजवळ असलेल्या शेवग्याला भरपूर शेंगा आल्या होत्या त्या घेऊन आली. हा संकेत माझ्या मनाला स्पर्शून गेला आणि मन आनंदून गेले. आपल्या घरी कधी शुभ कार्य ठरत असेल तेव्हा सनईचे किंवा मंगल सूर कानावर पडणे हा शुभ संकेत आहे. 

वरून एखादी वस्तू खाली पडणे जसे स्वयपाकघरातील साणशी ,लाटणे किंवा वरच्या घरातून खाली आलेली जळमटे , केसांचे गुंते काहीही असो आणि अश्यावेळी शेअर विकत घेणार असाल तर थांबा कारण तो नक्कीच कोसळणार आहे. आपण परदेशी जाण्यासाठी टूर बघत आहोत आणि आकाशातून एखादे विमान गेले तर नक्कीच आपली टूर होणार ह्यात शंका नाही.

कुत्र्याचे , मांजराचे रडणे, रुग्ण वाहिका दिसणे किंवा त्याच्या सायरन चा आवाज येणे अश्यावेळी मनात उगीच चलबिचल होते. त्याच्या आसपास कुणी आजारी असेल तर त्या व्यक्तीसंबंधी अनेकदा नको ती बातमी कानावर पडते . देवावर वाहिलेले फुल अचानक खाली पडणे हे त्यावेळी आपल्या मनात असलेल्या गोष्टीसाठी संकेत देणारे असते . घरी कुठल्याही व्रताच्या दिवशी न बोलावलेली सवाष्ण आली तर हा शुभ संकेत आहे .

देवळाच्या बाहेरील आपली चप्पल गेली तर वाईट वाटायला नको हा शुभ संकेत आहे , आपली पिडा गेली . एकदा मी विवाहासाठी गुणआणि ग्रह मिलन करायला सुरवात करणार इतक्यात ओळखीतील व्यक्तींनी त्यांच्या मुलाची विवाह ठरल्याची आमंत्रण पत्रिका पाठवली आणि मी मनात समजले. मी पाहत असलेल्या त्या दोघांच्या सुद्धा पत्रिका उत्तम जुळत होत्या आणि नजीकच्या काळात विवाह संपन्न झाला. अश्या गोष्टी मनाला आनंद देतात .

एखाद्या कुटुंबात बेबनाव झाला आणि नाती अगदी तुटायला आल्याची बातमी फोनवर ऐकत असू आणि कपबशी फुटली तर तो संकेत निश्चितपणे शुभ नाही . काचेला गेलेला तडा हा नात्यात पडलेली दरी दर्शवतो .अश्या वेळी त्या कुटुंबात मनोमिलन होणे कठीण हाच संकेत असतो . 

आपण आपल्या श्वासाकडे जसे अजिबात लक्ष देत नाही त्याचप्रमाणे आपला आतला आवाज सुद्धा आपल्याला काहीतरी सांगत असतो. ज्योतिष विद्या हे एक शास्त्र आहे पण ज्योतिष सांगताना सुद्धा आपल्याला आपली उपासना उपयोगी येते. अनेकदा ग्रहदशा , शुक्र , गोचर सर्व व्यवस्थित असताना व्यक्तीचा विवाह लांबणीवर पडेल किंवा विवाहाचा योग नाही असे मनात येत राहते आणि तसे घडते सुद्धा . पेपर मधील एखादी बातमी किंवा बस रिक्षा ट्रक वर लिहिलेली एखादी ओळ आपल्या प्रश्नाचे उत्तर असू शकते . आता एखादा डॉक्टर दिसला किंवा आपल्याला इमारतीच्या लिफ्ट मध्ये भेटला तर लगेच आपणच आता आजारी पडणार का असा त्याचा अर्थ किंवा संकेत घेवू नका . मिळालेले संकेत चांगले कि वाईट आणि नक्की कश्यासाठी आहेत ते आपल्याला समजते त्यासाठी दांडगी उपासना हवी. ते ओळखण्यासाठी नामस्मरण आणि सद्गुरूंचा आशीर्वाद सुद्धा लागतोच . बघा नामस्मरणाचे किती फायदे आहेत , आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळायला लागतात .

जसजशी आपली उपासना वाढत जाते तसतसे आपण आणि महाराज एकरूप होतो आणि मग आपला हा आतला आवाज अधिकाधिक जागृत होत जातो. जीवनातील ह्या सर्व संकेतांचा आपण योग्य वापर केला तर आपल्यासोबत आपण इतरांचे आयुष्य सुद्धा समृद्ध करू शकतो म्हणूनच आज पासून आयुष्यात आजूबाजूला घडणाऱ्या घटना , आवाज , संवाद ह्यावर लक्ष ठेवले तर त्यातील संकेत हळूहळू समजू लागतील आणि ते नक्की कुणासाठी आहेत कुठे वापरायचे आहेत तेही ज्ञात होत जायील. 

परमेश्वर आपल्या समोर येत नाही पण उपासना , निसर्गाचे संकेत , आपला so called सिक्स सेन्स ह्या अश्या अनेक माध्यमातून तो आपल्याला मार्ग दाखवत असतो . आपल्या संवेदना जागृत ठेवल्या तर ते आपल्याला सहज समजतात .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230








No comments:

Post a Comment