Sunday, 2 March 2025

बदल हा स्वागतार्ह

 || श्री स्वामी समर्थ ||


निसर्ग सुद्धा सतत बदलत असतो तिथे मानवी जीवन ते काय . प्रत्येक गोष्टीतील बदल हा अपरिहार्य आहे आणि तो जितका लवकर आपण स्वीकारू तितके आपले आयुष्य सुखकर होईल. कधी आपल्या लहानपणीचे किंवा लग्नातील फोटो पहिले तर काय दिसून येते ? बदल. प्रत्येक वेळी आपल्यात झालेला बदल अनुभवा जसे देह , मन , मानसिकता सर्व काही बदलत जाते . पटतंय का?

माणसाचे मन हे फार विचित्र आहे. अनेकदा ते जर आणि तर ह्या दोन शब्दात अडकून राहते . मी तिथे असते तर आणि मी तेव्हा हे केले असते वगैरे आपण सतत बोलत राहतो . पण तुम्ही नव्हता ना तिथे ? कारण तुम्ही तिथे तेव्हा नसणे हेच तुमचे प्राक्तन होते. एखादी गोष्ट घडणार असते आणि ती घडते आपल्याला फक्त त्याचा स्वीकार करता आला पाहिजे. अनेकदा आपल्या जवळची व्यक्ती जाते तेव्हा आपण तिथे नसतो पण काही क्षणांपूर्वी मात्र तिथे असतो. त्या व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला तेव्हा तिथे आपले नसणे हेच आपले प्राक्तन आहे त्याला कुणीही काहीही करू शकत नाही. उत्तम ड्रायव्हर पण एखाद्या वेळी पेट्रोल पंपाच्या जवळ त्याची गाडी असते आणि स्फोट होतो. त्याला काहीही उपाय नाही. 

आपल्या आयुष्यातील घटना आणि आयुष्यात येणारी माणसे ह्यात अनेकदा सुसंगती असते. आपण देणेकरी आहोत आणि घेणेकरी सुद्धा . गेल्या अनेक जन्माचा हिशोब असतो आपल्यासमोर आणि तो आपला आपणच करायचा असतो. 

गेल्या काही दिवसातील अनेक लोकांच्या अनेक गोष्टी ऐकून पाहून असे वाटायला लागले आहे प्राप्त परिस्थितीनुसार आता माणसाने एकटे जगायला शिकले पाहिजे . एकटेपणाचे गाणे किती दिवस गाणार आपण ? ते बंद केले तर आरोग्य सुधारेल आपले. सतत बरोबर कुणी हवे हे कश्याला? बघा एक प्रयोग करून....स्वतःला भरपूर कामात व्यस्त ठेवा, आवश्यक असल्याशिवाय कुणाला फोन मेसेज करू नका. “ तू मला मेसेज करत नाहीस , फोन सुद्धा करत नाहीस “ हे वाक्य समोरच्याने सुद्धा म्हणावे कि कधी आपल्याला असे नाही का वाटत . आपण एकटेपणाला घाबरतो किंवा एकटे जगता च येत नाही असा भ्रम आहे आपला. एकटे असतो तेव्हा स्वतःशीच संवाद साधतो आणि तो खरा असतो. आपल्या मनातील व्यथा , शल्य आनंद नेहमी दुसर्याला सांगितला की साजरा होतो असे सूत्र नाही कधीतरी तो स्वतःशी सुद्धा व्यक्त झाला पाहिजे . अवास्तव काळजी करू नका आणि नको तो गुंता वाढवू नका. ह्या न संपणाऱ्या गुंत्यातून मनाचे आजार निर्माण होत आहेत आणि त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 

उठसुठ whatsapp कश्याला ? आपल्याला जे माहित असायला पाहिजे ते देव आपल्या पर्यंत कुठल्या न कुठल्या माध्यमातून नक्की पोहोचवेल ह्यावर विश्वास ठेवा. सगळी कडची सगळी माहिती घेवून आपण करणार तरी काय त्याचे ? मग सगळे मला समजले पाहिजे हा अट्टाहास का?  आजकाल बुद्धी शाबूत असणे आवश्यक वाटते. अत्याधुनिक युगात अनेक माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे त्याचा कसा वापर करून घ्यायचा ते आपल्यावर आहे . सुख वेचावे लागते , अनेक सुखाचे क्षण येतात आणि जातात आपण ते उपभोगू शकत नाही अनुभवू शकत नाही कारण आपला अहंकार.  जे आहे त्याची किंमत नाही आणि नाही त्याच्या पाठी पळत राहणे हा मनुष्य स्वभाव आहे. आजकाल कुणी गेले तर समाचाराला  सुद्धा लोक जात नाहीत .मेसेज करतात ‘ RIP ‘ . अरे काय चाललाय ? कधी मेसेज करायचा कधी प्रत्यक्ष भेट आवश्यक आणि कधी पाठीवरून मायेने केलेला स्पर्श अति आवश्यक हे जणू कळेना झाले आहे आपल्याला. 

मला खूप राग आलाय ..हो का????? मग ठेवा तो तुमच्याजवळ , कुणाला पडलेली नाही तुमची त्यामुळे स्वतःचेच महत्व वाढवून घेवू नका त्यामुळे अधिक एकटे पडल्यासारखे होईल. मेंदूतील कचरा फेकून द्या आणि नवा जमाही करू नका. तुमच्या असण्या आणि नसण्याने कुणाला काडीचाही फरक पडणार नाही त्यामुळे उगीचच राग लोभ मत्सर द्वेष ह्याचे अवास्तव अवडंबर माजवू नका. सतत कुणाला पाण्यात पाहून मिळणार काय ? त्याला काहीतरी मिळाले आहे जे तुमच्याकडे नाही आहे म्हणून वाटणारा हा द्वेष  मत्सर आणि हे कटू सत्य आहे , खरे आहे. पण  मग ते मिळवण्याची धडपड कष्ट घ्या कि त्याचा द्वेष कसला करता . दुसर्याचा जेव्हा आपण मत्सर करतो तेव्हा आपल्यातील खोट , अपूर्णता ह्यावर आपणच शिक्कामोर्तब करतो.  

आज संपूर्ण जग बदलत आहे , विचारधारा सुद्धा बदलत आहे, विवाहाचे वय ९ पासून आता ७० पर्यंत गेले आहे. अनेक संस्था पुढे येवून वृद्धांच्या समस्या सोडवताना त्यांना आयुष्याचा सोबती शोधण्यासाठीही तत्परतेने कार्य करत आहेत. हा बदल आणि असे अनेक बदल स्वागतार्ह आहेत . 

विवाह सोहळा आणि त्याचे स्वरूप , देणी घेणी , मानपानाच्या याद्या ह्यांचे स्वरूप बदलत आहे , प्रत्येक सण समारंभ वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात . पेहराव बदलत आहेत , इतकेच काय तर वातावरण सुद्धा बदलत आहे. अवकाळी पडलेला पाऊस सुद्धा आपण स्वीकारतो कि. निसर्ग सुद्धा वेगळ्या वाटेने जात आहे तिथे तुम्ही आम्ही काय .

शास्त्राचा अभ्यास करताना ह्या गोष्टी सतत जाणवतात . ग्रह सुद्धा बदलत असतात , एका राशीत फार वेळ झाला कि त्यांना जणू कंटाळा येत असावा . ग्रहांची बैठक , राशी संगत बदलते . अनेकदा मित्र ग्रहासोबत तर अनेकदा शत्रू ग्रहासोबत सुद्धा त्यांना राहावे लागते  , मग मनात असो अथवा नसो. आपल्यालाही नको असलेले पाहुणे आले तरी त्यांना चहा पाणी करावे लागते तसेच आहे. जुने कपडे देवून नवीन घेतो आपण . घरातील अनेक वस्तू नव्याने येतात , अगदी घरे सुद्धा बदलतो , आयुष्यात माणसे सुद्धा येत जात असतात . रोजच्या जीवनात जिभेचे चोचले पुरवताना वेगवेगळे खाद्य पदार्थ , ते बनवण्याच्या निरनिराळ्या पद्धती ह्यात सुद्धा बदल होत जातो , नवीन शेजारी येतात , कधी कट्टी बट्टी होते . आपल्या dp सुद्धा आपण बदलतो .

झाडे सुद्धा कात टाकतात पुन्हा मोहोर येतो , बहरतात नव्याने जगू लागतात . हे सर्व पाहताना असे वाटते जीवन सुद्धा शाश्वत नाही सतत बदलते आणि त्या बदलासोबत आपणही बदलत जातो अगदी प्रत्येक पावलावर . मित्र नव्याने भेटत जातात . घरातील व्यक्ती त्यांची वेळ झाली कि पुढील प्रवासाला निघून जातात तर कुठे नवीन जीव जन्माला येतो . एकाला निरोप तर दुसर्याचे स्वागत करावे लागते .

सगळ्यात शेवटी आपले शरीर सुद्धा वस्त्राप्रमाणे बदलावे लागते .आत्मा नवीन देह धारण करतो ...

बदल बदल आणि बदल... म्हणूनच कुणावर रागावू नये , मत्सर द्वेष काहीच धरू नये कारण काहीच शाश्वत नाही सतत बदलत जाणार आहे कारण बदल हा अपरिहार्य आहे आणि  तोच सृष्टीचा नियम आहे. आत्ताचा क्षण अनुभवणे हेच जीवन आहे. 

सौ. अस्मिता  दीक्षित 

संपर्क : 8104639230










No comments:

Post a Comment