|| श्री स्वामी समर्थ ||
संसार उभा करायला कष्ट लागतात , रक्त आटवायला लागते आणि तो टिकवण्यासाठी अनेकदा दोन पाऊले मागे यायला लागतात. अनेकदा संशयाची सुई येते आणि एका क्षणात संसाराची माती होते. संशय किंवा गैरसमज हे असे घातक शस्त्र आहे कि जे जन्मभर जपलेली माणसे , नाती ह्यांच्यातील जपलेले बंध मातीमोल करते तेही क्षणात .
नाते कुठलेही असो पण ते विश्वासावर असते आणि त्याला जेव्हा तडा जातो तेव्हा व्यक्ती दुखावली जाते. खरतर आपल्याच माणसांपासून एखादी गोष्ट लपवावीशी वाटते तिथेच ते नाते संपलेले असते . मुळात लपवण्यासारखे काहीच असू नये पण माणसाच्या मनाचे इतके कंगोरे आहेत कि ते त्यालाही उमगत नाहीत . असो.
गेल्या आठवड्यात एका मुलाने फोन केला , बोलताना त्याची झालेली हतबल अवस्था जाणवत होती. घरातील वाद असते तिथवर ठीक होते कारण हि वादळे पेल्यातील असतात ती विरूनही जातात . नात्यातील संशय हा सगळी आयुष्याची , संसाराची गणिते चुकवतो. तसेच झाले होते . पत्नीने संशय घेतला तो इथवर कि त्याला नोकरी सोडून घरात बसावे लागले पर्यायाने घर सोडावे लागले . मनाच्या इतक्या ठिकर्या कि मानसोपचार तज्ञाची मदत घ्यावी लागली. कुठलाही खुलासा किंवा स्पष्टीकरण देण्याची वेळ निघून जावी इतक्या गोष्टी पुढे गेल्या होत्या .
आपल्या माणसाबद्दल असलेली आसक्ती म्हणजेच पझेसिव्ह नेस सुद्धा अनेक गोष्टीना कारणीभूत असतो . माझे माणूस माझेच राहिले पाहिजे हा अट्टाहास समोरच्या व्यक्तीला मोकळा श्वास घेवू देत नाही इतका असू नये. एखाद्यावर आपले प्रेम असले तरी त्याला बांधून ठेवता येते का? प्रत्येक नाते वेगळे आणि आपल्या जागी श्रेष्ठ असते. त्याची एकमेकात गल्लत करू नये.
प्रेयसी हि पत्नी झाली कि सगळेच बदलते , मग तिथे हक्क येतो जो क्षणोक्षणी गाजवायची लहर येते . आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे कितीही ढोल वाजवले तरी त्यात बदल होणार नाही. परमेश्वराने स्त्री आणि पुरुषांना विशिष्ठ पद्धतीने बनवले आहे कस काय ते त्यालाच माहिती. संयम दोघांनीही ठेवायचा असतो अगदी प्रत्येक गोष्टीत पण कधी हाताबाहेर गेले कि मग दोघांच्याही प्रतिक्रिया सारख्याच असतात .
सध्या शुक्र राहू युती आहे त्यामुळे शुक्रा संबंधीत अनेक वैवाहिक समस्या , गैरसमज करून आणि तो तसाच ठेवणारा राहू सध्या शुक्रा सोबत आहे. अश्या वेळी आपले मन काहीच कुणाचे ऐकायला तयार नसते. व्यक्तीचे बाहेर काही संबंध असू शकतील , नाही आहेतच त्यावर मन शिक्कामोर्तब करते आणि दिवसा गणिक त्यावर थरावर थर चढतात . तन मन धनाने आपल्या माणसाशी असलेली एकरूपता हे तिसरे नाते व्यक्ती स्वीकारू शकत नाही . ह्याचा परिणाम म्हणजे मने दुभंगतात पुन्हा कधीही न मिळण्यासाठीच जणू .
मुळात अनेकदा पत्रिकेत काही काळ येणाऱ्या अंतर्दशा दशा अशी स्थिती निर्माण करतात कि जन्मोजन्मी साथ देण्याची वचने देणारे ते दोघे एकमेकांची तोंडे सुद्धा बघत नाहीत अशी स्थिती निर्माण होते .
नात्यांना प्रेमाच्या बंधनात जखडून बांधून ठेवले कि त्यातील मोकळेपणा जातो आणि समोरच्याचा श्वास घुसमटायला लागतो. जितके मोकळे ठेवाल तितका विश्वास अधिक . कुणालाही बंधन नको असते , कितीही नाती असली तरी प्रत्येक व्यक्ती हि मुळात स्वतंत्र आहे आणि तिला तसेच राहू दिले तर ती अधिक जवळ येयील आनंद सौख्य प्रेम टिकून राहील आणि आयुष्य जगणेबल होईल.
सतत जोडीदारावर हुकुमत गाजवली तर अनेकदा मग हेच प्रेम व्यक्ती बाहेर शोधू लागते . आज माणसे कामाच्या ठिकाणी घरापेक्षा अधिक वेळ असतात , हा सहवास अनेकांच्या नात्यात घट्ट मैत्री फुलवतो , एकमेकांना मदत होते पण तिथवर काही गोष्टी न थांबता पुढे जातात तेव्हा प्रश्न निर्माण होतात . मन मारून जगणाऱ्या अनेक व्यक्ती कुणाच्या तरी तिसर्या व्यक्तीच्या सहवासात आपले भाव विश्व शोधू लागतात .ह्याला कारणीभूत दोघेही असू शकतात .
ह्या जातकाचे प्रश्न गंभीर स्वरूप घेवून माझ्यासमोर उभे होते . प्रश्न तात्पुरते असते तर ठीक होते पण ते दूरगामी परिणाम करणारे दिसत होते . त्याने संसार वाचवायचा खूप प्रयत्न केला . खर पाहता सर्व सुरळीत चालू असताना उगीच काहीतरी घडल्याशिवाय संशय येत नाही . अनेक घटनांचा एकत्रित विचार हा संशयाचे मूळ मनात घट्ट करणारा असतो .
आकर्षण कुठल्याही वयात कुणाही बद्दल वाटू शकते इतके आपले मन वेडे आहे. पण ते आकर्षण अळवा वरचे पाणी असते . आपल्या नात्याला आपल्याला न्याय द्यायचा असेल ते काटेकोर पणे निभवायचे असेल तर हे आकर्षण जवळपास सुद्धा फिरकू देता कामा नये नाहीतर व्यक्ती वाहवत जावू शकते आणि मग संसार पती किंवा पत्नीचे नाते ह्यातील विश्वासाला तडा जातो.
आपण रोज बदलतो , आपल्या आवडी निवडी सुद्धा बदलत जातात , आपले व्यक्तिमत्व सर्व काही , कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे पण म्हणून आपला संसार उध्वस्त होयील इतके बदल होत गेले तर कठीण होईल. आपल्या नात्याला न्याय देता आला पाहिजे . आपल्या मनातील भावना विखरु नयेत इतकी जाण असलीच पाहिजे आणि मुळात कुठे थांबायचे ते समजले पाहिजे. अनेकदा पत्रिकेतील दशा अंतर्दशा ह्या संसाराला तडा देणाऱ्या , किंवा इतर अनेक संबंधाची वीण घालणाऱ्या असतात . शेवटी आपले मन चंचल आहे पण त्याला काबूत ठेवायला उपासने सारखा उत्तम पर्याय नाही . प्रत्येक वेळी आपल्या मनाचे फुलपाखरू झाले तर संपूर्ण समाज व्यवस्थाच कोलमडून पडेल.
पत्रिकेतील बुध राहू आणि 5 6 8 12 ह्या स्थानाशी निगडीत दशा तसेच राहू हर्शल नेप ह्यांचा शुक्र ह्या ग्रहाशी होणार कुयोग आयुष्याला वेगळे वळण देवू शकते . राहू हा मायावी राक्षस कुणाचाच नाही हे लक्ष्यात ठेवा. गैरसमजाचे भूत माणसाच्या डोक्यावर आणि मनावर बसवण्यात त्याचा हात धरणार नाही इतका राहू निष्णात आहे . आपल्या कुलस्वामिनीची आराधना नित्य करणे हेच हाती असते आपल्या. शुक्राचे तांदूळ तूप हि दाने श्रावण मार्गशीर्ष महिन्यात देत राहिले पाहिजे.
शुक्र राहू युती हि अनेकदा अनैतिकता दर्शवते पण म्हणून त्यावर शिक्कामोर्तब करू नये . अनेक पत्रिका शुक्र राहू युती दृष्टीयोग दाखवतात पण त्या लोकांचे चरित्र बिघडलेले नसते कारण शुभ ग्रहांची दृष्टी आणि सुस्थितीत असलेला चंद्र. गुरु नेप , शुक्र राहू , शुक्र हर्शल , शुक्र नेप , शुक्र केतू हे युतीयोग संसारिक सुखात कमतरता आणणारे आहेत . शुक्र राहू हा योग फार वेगळा आहे जिथे शुक्राचे अधपतन होते आणि राहू शुक्राला विळखा घालतो . राहू धाडस देतो आता तिथे मंगळ असेल तर बघायलाच नको.
आज ह्या जातकाला नोकरीच नाही तर घर सोडायला लागले आहे. मनाची अवस्था विकलांग झाली आहे. मुलांची ओढ आहे पण करणार काय ? म्हणूनच कुणाशीही नाते किंवा मैत्री करताना असलेल्या नात्यांना तडा जाणार नाही ह्याची काळजी असली पाहिजे. प्रत्येक नाते अपेक्षांचे ओझे असते आपण सगळ्या पूर्ण करू शकत नाही हे नक्की.
प्रेम ???? आकर्षण ??? काम भावना ??? ह्यातील नक्की काय? हे तपासून बघितले पाहिजे . आजकाल कलियुगात live in मध्ये राहणारी लोक आहेत. आपल्या संस्कृतीत हे कुठेही बसत नाही. आधुनिक जगाचे गुणगान करणारे आपण ह्या आधुनिकतेकडे कल असणार्या हर्शल च्या तडाख्यात आहोत . विवाह संस्था , विवाह , वैय्यक्तिक आयुष्य , पैशाच्या , मोठेपणाच्या मागे धावणारे आपण आता कुठवर धावणार आहोत . भावनेच्या आहारी जाऊन आपल्याच संसाराची होळी करणारे लोक शेवटी आयुष्यात मिळवतात ते फक्त “ शून्य”. माणसे तर गमावतात , पर्यायाने आयुष्यातील आपल्या माणसांचे प्रेम, विश्वास सुद्धा. क्षणिक सुखासाठी आपण आपला संसार उध्वस्त करणार का? दर दोन दिवसांनी कुणाबद्दल आकर्षण वाटणे हे प्रेम नसून विकृती आहे. हा विषय खूप मोठा आणि गहन आहे.
अनेकदा प्रेम हक्क गाजवू लागते आणि त्याच क्षणी ते नकोसे वाटू लागते आणि ती व्यक्ती सुद्धा , तू हाच शर्ट घाल , हाच परफुम वापर , असाच बस तिथे जावू नकोस , हेच कर आणि ते करू नकोस ह्यात व्यक्ती मोकळा श्वास घेवू शकत नाही . आपल्या आवडत्या व्यक्तीला पिंजर्यात जखडून ठेवल्याची भावना यावी इतकीही हुकुमत योग्य नाही. विवाह मिलन करताना म्हणूनच फक्त गुण मिलन करू नये कारण ह्या गोष्टी पत्रिकेत असतील तर त्या गुण मिलनावरून कश्या समजणार ? ग्रहमिलन म्हणूनच फार महत्वाचे आहे. प्रेम हि एक नाजूक कोमल भावना आहे . प्रेम व्यक्तीला जगायला शिकवते . प्रेम आयुष्यातून वजा केले तर जीवन संपलेच पण म्हणून नको त्या व्यक्ती संबंधात गुंतून आहे त्या नात्यांना सुरुंग लावणे कितपत योग्य आहे?
लक्ष्मण रेषा हि प्रत्येकाला असलीच पाहिजे आणि ती आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला आहेच आहे. मोहाचे क्षण आयुष्यात अनेकदा येतात पण त्यात वाहवत न जाता कुठे थांबायचे ते समजले पाहिजे आणि ते समजले तर मिळवलेला विश्वास नक्कीच कायम राहील , आयुष्य बहरेल आणि प्रेम वृद्धिंगत होईल . प्रेम हि आयुष्य जगवणारी भावना आहे. आपल्या माणसावर इतकेही प्रेम करू नये कि त्याची त्यात घुसमट होईल . इतकीही बंधने घालू नयेत कि त्याला जगणे मुश्कील होईल. आपल्या प्रेमावर आपला स्वतःचा विश्वास हवा . प्रत्येक माणूस व्यक्ती स्वतंत्र आहे आणि स्वतंत्र पणे जगणे हा त्याचा मुलभूत हक्क आहे. त्याला मोकळे पक्षाप्रमाणे मुक्त पणे आसमंतात विहार करू दे तुमचे प्रेम खरे असेल तर कुठेही कितीही उंच भरारी घेतली तरी आपल्याच व्यक्तीकडे तो परत येयील हा विश्वास मनी असावा त्यातच सर्व काही आहे. बंधनात जखडून ठेवलेत तर दुसरीकडे प्रेम शोधू लागतील .
ग.दि.माडगुळकर ह्यांचे एक गीत आठवतेय ...या चिमण्यांनो परत फिरा ...घराकडे आपुल्या..
चिमणे आणि चिमण्यांना घराची ओढ असुदे आणि त्यांना घराकडे परतण्याची आस असुदे असेच घरातील वातावरण आणि एकमेकांतील प्रेम टिकवणे हि दोघांचीही जबाबदारी आहे. सहमत ?????????
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment