|| श्री स्वामी समर्थ ||
प्रणयाचा प्रतिक मानला गेलेला रसिक ग्रह शुक्र ज्याला आपण सर्व सुखाचा स्त्रोत मानतो तो सध्या मीन राशीत उच्चीची वस्त्रे परिधान करून स्थानबद्ध आहे पण त्याचसोबत इतर ग्रहांची मांदियाळी सुद्धा आहे. त्यातील प्रमुख
ग्रह “ राहू “. राहु ला कुणाशीही देणे घेणे नाही . राहू ज्या ग्रहासोबत असेल त्याच्या गुणांना मोठे करत असतो किंवा त्याला प्रोत्साहित करत असतो . थोडक्यात राहू “ Amplifier “ सारखे काम करतो . शुक्र राहू युती हि नैतिकतेची सर्व बंधने झुगारून देणारी असल्यामुळे त्याचा अभ्यास स्मुक्ष पणे करणे आवश्यक आहे. शास्त्राचा अभ्यास परिपूर्ण आणि सखोल असायला हवा . नाहीतर एखाद्या सज्जन व्यक्तीला अनैतिक ठरवण्याचे पाप नव्हे अक्षम्य गुन्हा घडायला नको.
अभ्यासकांनी ह्या प्रश्नांचा अभ्यास आपल्या पुरताच मर्यादित ठेवला पाहिजे. एकदा एका जातकाने आपला पती अनैतिक वागत आहे का ?? हा प्रश्न मला विचारला होता . दोघांच्या पत्रीका अभ्यासल्यावर विचारणारी व्यक्तीच दोषी आहे हे लक्ष्यात आले. असो. ह्याबद्दल मौन पाळणे उत्तम असते आपण शास्त्राचे अभ्यासक आहोत, शेवटी न्यायदेवता आहे ती योग्य न्याय करेल.
“ आई मी ह्याच मुलीशी किंवा मुलाशी लग्न करणार “ हे सांगणाऱ्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत शुक्र कुठेतरी active झालेला असतो आणि पंचमाचे वारे वाहू लागलेले असतात . प्रेम हि निस्सीम भावना आहे. जगातील सगळ्यात कोमल भावना म्हणजे “ प्रेम “ . प्रत्येक व्यक्ती प्रेमाचा भुकेला असतो . पण प्रेम हे सहज होते केले जाते , ओरबाडून घेतलेले किंवा करायला लागणारे प्रेम हे प्रेम नसते. प्रेम हे निस्पृहपणे केले पाहिजे, अपेक्षां विरहित असले पाहिजे. मुळात प्रेमाचा अर्थ समजणे सोपे नाही . आपल्याला एखाद्याबद्दल वाटणारे प्रेम हे वरवरचे आहे , शारीरिक आकर्षण आहे , कि मनाच्या गाभ्यातून सहजतेने उलगडत जाणारे आहे हे आधी समजले पाहिजे कारण ह्या सर्व भावनात आपण नेहमीच गल्लत करतो. खरे प्रेम हे अपेक्षांच्या ओझ्याखाली दडणार नाही ते धबधब्यासारखे असते ..प्रेम करत राहावे ...देत राहावे पण जेव्हा तिथे अपेक्षा येतात तेव्हा मग तू तू मै मै सुरु होते. जितक्या वेगाने गोष्टी जवळ येतात तितक्याच वेगाने त्या जातात हा सृष्टीचा नियम आहे.
शुक्राचे भ्रमण हे मीन राशीत पुढे काही काळअसणार आहे त्यात शुक्र काही काळ अस्तंगत आणि वक्री सुद्धा असणार आहे . शुक्रा सोबत असणारा हा राहू आपल्याला मोहात फसवू शकतो , अनैकतेकडे नेऊ शकतो , संभ्रमित करू शकतो त्यामुळे आपल्या भावनांवर आपल्याला विजय मिळवायचा आहे. जेव्हा जेव्हा कठीण किंवा आपल्यासमोर अनेक कोडी टाकणारी ग्रहस्थिती येते तेव्हा आपले नामस्मरण वाढवावे हे माझे मत आहे आपले गुरु आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतात , प्रलोभनांपासून वंचित करतात .
आपल्यावर रोखलेली नजर आपल्याला अगदी “ जादुई “ वाटते पण त्याचे परिणाम आपले आयुष्य उध्वस्त करणार तर नाही हे नक्कीच अश्या युती असणार्या काळात करावे.
मध्यंतरी माझ्याकडे एका मुलीने तिची आणि तिला ज्याच्याशी विवाह करायचा आहे त्याची पत्रिका दिली. तिच्या पेक्षा वयाने लहान असणार्या आणि बोली भाषा , देश वेश जातपात सर्व सर्व काही भिन्न असणारा हा मुलगा तिला भावला होता. पंचमाची फळे तिला मिळाली पण पुढे काय ? विवाह झाला कि सप्तम बोलायला लागेल आणि ते फारसे चांगले दिसत नव्हते. माझ्या साठी तो हे करेल आणि ते करेल ह्या फसव्या कल्पनातून बाहेर यायला तिला अथक प्रयत्न करायला लागणार नव्हते. मुळात हे प्रेम अळवावरील पानाचा थेंब होता जो कालांतराने ओघळून जाणार होता .
प्रेम एकदाच होते , पुन्हा पुन्हा होत नसते .कदाचित कलियुगात प्रेमाच्या व्याख्या बदलल्या असतीलही . पण अश्या अनेक वेळा केलेल्या प्रेमात ती नजाकत कुठून असणार .
काही काळ प्रेमात मनसोक्त विहार करणारया त्या दोघांचे चित्र खरा संसार सुरु झाला कि वेगळेच बघायला मिळते ते कसे ? तर मुळात ते प्रेम नसतेच तो आभास असतो , त्यावेळी मनाला पडलेली भुरळ असते जी क्षणिक असते आणि मग एकमेकांना बोल लावत एकमेकांच्या चुका काढत आयुष्य काढायला लागते.
प्रेम म्हणजे पंचम भाव पण त्याची परिणीती सप्तमात होते . पंचम बिघडले तर सप्तम कसे सुखाचे होईल ? प्रेम आणि आकर्षण ह्यात गल्लत होते तेव्हा आयुष्य मातीमोल होते . आपला एक निर्णय हे नक्कीच करू शकतो म्हणून अश्या युती असतात तेव्हा स्वतःला सांभाळणे म्हणजेच मन ताब्यात ठेवणे , मन म्हणेल तसे नाही तर आपल्याला योग्य वाटेल तसे मनाला वागू देणे जमले पाहिजे त्यासाठी रोजच्या उपासना मदत करतात .
राहू हा फसवा ग्रह आहे . शुक्र सोबत असेल तर फसवे प्रेम करेल . जे हवे ते मिळाले कि हेच प्रेम रंगहीन होईल .
बुधासोबत असेल तर खोटी कागदपत्रे , सह्या करेल , अफवा पसरतील , बुध वाचेचा कारक असल्यामुळे सर्रास खोटे बोलणे , बुध म्हणजे हात त्यामुळे हातचलाखी करून चोर्या करणे अश्या असंख्य गोष्टी राहूच्या अधिपत्या खाली येतात.
प्रेमाचे रंग हे “ त्याच्या शिवाय मी जगू शकत नाही “ म्हणताना , हे शुक्र राहू चे परिणाम तर नाहीत ना ह्याची खात्री करून घ्या .क्षणात फसवणारा राहू शुक्रासोबत आहे तेव्हा कुठल्याही भूलथापा , आकर्षण , प्रलोभने ह्यात आपण अडकत तर नाही ना ह्याची प्रत्येक क्षणी खात्री करून घ्या कारण वास्तव काहीतरी वेगळे असू शकते .
जादुई प्रेम हे आकर्षण असते असे प्रेम संसार करू शकत नाही कारण मुळातच ते परिपक्व नसते.
मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही हे म्हणण्यापेक्षा मी परमेश्वरा शिवाय राहू शकत नाही म्हणत त्याची भक्ती केली तर आयुष्यात तुम्हाला निखळ , अस्सल शंभर नंबरी सोन्यासारखे खरे प्रेम नक्कीच लाभेल आणि परमेश्वरच योग्य वेळी ते तुम्हाला बहाल करेल ह्यात शंकाच नाही .
राहू हा संमोहित , भ्रमित करणारा आपली मती गोठवणारा मायावी राक्षस आहे. आपल्याला काही समजायच्या आत तो आपल्याला फसवून निघून जातो इतकी प्रचंड ताकद आणि वेग त्याच्याकडे आहे. राहूच्या नक्षत्रावर म्हणूनच खरेदी करायची नसते . कुठलाच व्यवहार राहूच्या नक्षत्रावर करू नये . आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत डोळसपणा हवा . डोळ्यावर झापडे लावली तर अपिरीमित नुकसान होईल. कागदपत्रे पुन्हा पुन्हा तपासा. कुणावरही आंधळा विश्वास आयुष्याची होळी करेल . , कुठलेही निर्णय पुढील दोन महिने टाळावेत .
ह्या विश्वात प्रेमाशिवाय कुणीही जगू शकणार नाही , आयुष्यातून प्रेम वजा केले तर आयुष्य निरस होयील. निखळ , निस्वार्थी कसलीही अभिलाषा नसणारे प्रेम लाभणे हे नशिबात असावे लागते . तुम्हा आम्हा सर्वाना अश्या शाश्वत प्रेमाची अनुभूती मिळो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना .
प्रत्येक ग्रहाचे असंख्य कंगोरे आहेत . प्रत्येक राशीत , भावात आणि ग्रहासोबत त्याचे फळ बदलत असते. राहू कलियुगाचा राजा आहे. आधुनिक इंटरनेट युगात राहु मुळे आपला वावर आहे . त्याचे फायदेही आहेत आणि तोटेही पण आज आयुष्यातील प्रेमाचा त्याच्या बहराचा विचार राहु असेल तर वेगळा करायला लागतो . सामान्य माणूस हा चौकटीबद्ध आयुष्य जगत असतो आणि कुठेही आपली फसवणूक होवू नये ह्यासाठी हा लेखन प्रपंच .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment