|| श्री स्वामी समर्थ ||
विचारातून होते आजारांची निर्मिती . मला कसलेही टेन्शन नाही स्ट्रेस नाही असे कितीही म्हंटले तरी ते असतेच. हा न दिसणारा स्ट्रेस अनेक मोठ्या आजारांची नांदी करतो. मी किती सुखी आहे हा मुखवटा घालून जगण्याची धडपड प्रत्येकात दिसते. आजची बदललेली जीवनशैली , आहार ह्या गोष्टी आजारांना कारणीभूत आहेत . आज फक्त वयातीत लोकांत नाही तर अगदी लहान वयातील तरुणाई मध्ये सुद्धा प्रचंड स्ट्रेस आहे आणि त्यातून असमाधान , उदासीनता , एकटेपणा , एकलेपणा , मानसिक अनारोग्य अश्यासारख्या गोष्टी फोफावत आहेत . कुणाकडे मन मोकळे करावे हेच समजत नाही कारण कुणी आपले वाटावे हा विश्वासच कुणाबद्दल मनात नाही . नात्यातील दिवसागणिक वाढत जाणारी दरी प्रत्येकाला मी आणि माझे कुटुंब ह्या कोषातच अडकवत आहे . एकमेकांची सुख दुखे वाटून घेण्याचा काळ मागे सरत आहे आणि त्यामुळे मनाच्या आजारांची समस्याही वाढत आहे. मन स्थिर नसेल कि त्याचा परिणाम आरोग्यावर झाला नाही तरच नवल.
पूर्वीच्या काळी लोक शारीरिक कष्ट खूप करत असत . रोज नियमित व्यायाम , धावणे चालणे , घरातील कामे जसे अगदी जात्यावर दळण , घरातील अनेक कष्टाची कामे स्त्रिया स्वतः करत त्यामुळे त्यांचे शरीर आजारांना थाराच देत नसे. आजकाल सकाळी लवकर न उठणे हे सुद्धा अनेकांना भूषणाव वाटावे अशी स्थिती आहे. जगाचा चालक मालक पालक सूर्य असा आळशी झाला आणि वेळेवर आलाच नाही तर ? अवकाशातील ग्रह तारे आपल्या दैनंदिन आयुष्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहेत . विचार करण्यासारखी गोष्ट आहे . सूर्योदय येण्याच्या आधी चरचर सृष्टी त्याच्या स्वागताला तयार असते आणि आपण ? सकाळचा सूर्यप्रकाश किती महत्वाचा असतो ह्यावर भाषण द्यायचे पण उठायचे मात्र नाही हे सत्य आहे.
पूर्वीच्या काळी मधुमेह , थायरोईड , B12 ची कमतरता हे ऐकायलाही मिळत नव्हते कारण योग्य आहार आणि चौकटीतील दैनंदिनी ., भरपूर आणि शांत झोप , माणसामाणसातील प्रेम , व्यायाम , सुधृड शरीरयष्टी आणि उत्तम पचनसंस्था . आजकाल कधीही उठा , पोट भरून घेण्याच्या नावावर समोर येईल ते पोटात ढकला . पण ह्या सर्वांचा दूरगामी परिणाम तब्येती आपल्याही नकळत होत असतो .
बदललेल्या जीवनशैलीत अपुरी झोप , रात्री झोप येत नाही म्हणून मोबाईल वरती सर्फिंग करत राहणे जो मेंदूच्या आजारांचा धोका वाढवतो , दृष्टीवर परिणाम करवतो , अति विचार मनाला सैरभैर करतात . रात्री झोपताना १० मिनिटे मेडीटेशन केले तर आपण सोशल मिडीयावर नाही म्हणून मुंबई पुणे बंद नाही होणार .
आज आपण हृदया संबंधी आजारांची ज्योतिष शास्त्रीय कारणे बघुया . एखाद्या गोष्टीची चिंता मागे लागणे म्हणजे विचारांचा ( toxic ) गुंता मनात असणे. मन म्हणजे चंद्र आणि चंद्र प्रामुख्याने दुषित झाला तर मन सैरभैर होते . चंद्र शनी युती , चंद्र राहू /केतू युती त्रासदायक . अनेक वेळा गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत आणि मग संताप चिडचिड , अपेक्षाभंग ह्यामुळे मन उदास निराश होते . आरोग्याचा विचार आपण रवी ह्या ग्रहावरून करतो. काल पुरुषाच्या कुंडलीत पंचम भावात रवीची सिंह राशी येते त्यावरून आपण आपले मन हृदय बघतो . चतुर्थ भावावरूनही अनेक जण हृदय बघतात .
शरीरातील रक्ताभिसरण हे प्रामुख्याने शनी आणि रवी ह्यांच्याकडे आहे . पत्रिकेतील शनी मंगळाचा कुयोग तसेच दृष्टी संबंध बायपास ची स्थिती निर्माण करू शकतो त्याला पूरक गोचर भ्रमण आणि दशा असेल तर शक्यता बळावते . गोचर राहू केतू ह्यांचाही विचार करावा लागतो .
शनी हा आकुंचन आणि प्रसरण करणारा आहे . आपले हृदय सुद्धा आकुंचन प्रसरण ह्या क्रिया सातत्याने करत असते . रक्तामध्ये ब्लॉक म्हणजे अडथळा निर्माण झाला तर रक्ताचा प्रवाह विस्कळीत होतो आणि हृदयविकार होण्याचा धोका वाढतो. मनस्ताप देणारे किंवा मृत्यू सम पिडा देणारे अष्टम भाव ( शस्त्रक्रिया )आणि १२ वा भाव ( दवाखाना , वैद्यकीय उपचार ) , दुषित शनी रवी जर पत्रिकेत असतील आणि ६ १२ च्या दशा अंतर्दशा असतील तर बायपास करण्यास पूरक ग्रहस्थिती समजावी . शस्त्रक्रिया म्हणजे मंगळ आलाच . चंद्र हा मनावर आणि पर्यायाने आरोग्यावर परिणाम करतो म्हणून बायपास शस्त्रक्रियेच्या दिवशी चंद्र हा स्थिर तत्वाच्या राशीत असावा.
प्रामुख्याने शनीचे कार्य हे हृदयाच्या झडपांची उघडझाप करण्याचे आहे. तिथे शनी बिघडला तर नलीकांच्या मध्ये अडथळे निर्माण होतात. शनी हा प्रत्येक गोष्टीत विलंब करणारा ग्रह आहे त्यामुळे शनीमुळे झालेले आजार हे दीर्घकालीन असतात . शनीचा प्रभाव सूर्य त्याचसोबत ४ ५ आणि रोगांचा भाव ६ वा तपासावा लागतो .
शनीची दशा असेल आणि शनीचा संबंध ५ ,६ व्या भावाशी असेल तसेच शनी सिंह नवमांशात असेल तरीही हृदयासंबंधी विकार होण्याची शक्यता असते. तापट व्यक्तींच्याही पेक्षा वरून शांत दिसणाऱ्या व्यक्ती जास्त प्रमाणात ह्या विकारांना आजारी पडतात . वरवर शांत असतात पण अंतर्मनात खळबळ असते . म्हणून धबधब्यासारखे माणसाने मोकळ्या मनाने बोलले पाहिजे . वृश्चिक राशीतील बुध हा व्यक्तीला मूक अबोल करतो त्यांच्या मनात विचारांचे द्वंद्व सतत चालू असते आणि त्यात ते कुणाला बोलून मोकळेही होत नाहीत . गमतीने त्यांना आपण आतल्या गाठीचे म्हणतो पण त्यांच्यातील हा दोष अनेक विकारांना प्रेरित करतो. अष्टम भावातील शनी , मंगळाचे गोचर महत्वाचे किंवा मूळ पत्रिकेतील शनी मंगळ कुयोग दुष्टीयोग त्रासदायक होतोच . शनी दशा , अष्टम भावातील शनी तसेच राहू दशा आणि शनी मंगळ राहू चा पंचम भावाशी असलेला संबंध .
थोडक्यात पत्रिकेतील शनी राहूचा रविशी कुयोग , साडेसाती अष्टम शनी , मंगळ,. ४ ५ ६ ८ १२ भाव दुषित , ८ १२ भावाची दशा किंवा शनी दशा आणि शनीचा चंद्राशी संबंध “ बायपास “ सारखे मोठे आजार देवू शकतो .
उपासना : मन मोकळे जग , सात्विक आहार , झोप पूर्ण घ्या आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कटपुतली बाहुलीसारखे कुणाच्यातरी दडपणाखाली जगू नका . मोकळ्या आकाशाखाली मस्त जगा . आदित्य हृदय स्तोत्र , हनुमान चालीसा , शनीचा बीजमंत्र , सकाळी सूर्याला अर्घ्य घालणे आणि योग मेडीटेशन ह्यामुळे आपल्या पत्रिकेतील ग्रहांना बळ मिळेल.
ज्योतिष शास्त्राला कुणी कितीही नावे ठेवली तरी नित्य सूर्योदय होतोच आणि सृष्टीच्या अंतापर्यंत होतच राहणार . म्हणूनच आपली पत्रिका काही प्रमाणात आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे अगदी सर्वार्थाने .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230