Wednesday, 7 January 2026

स्मर्तगामी

 || श्री स्वामी समर्थ ||


अनेकदा आपले मन वैफल्य ग्रस्त होते , निराश होते तर कधी फुलपाखरासारखे इथून तिथे आनंदाने नाचत असते . मनाच्या अवस्थेवर आपण विहार करत जीवन जगत असतो . हि मनाची अवस्था फक्त एकाच ठिकाणी स्थिर होते आणि ते म्हणजे आपल्या गुरूंच्या चरणाशी आणि म्हणूनच आपल्या गुरूंच्या चरणाशी क्षणभर विसावा मिळण्यासाठी त्यांच्या चरणाशी जागा मिळण्यासाठी त्यांचे अखंड स्मरण करत राहावे लागते .

एकही क्षण त्यांच्या स्मरणाशिवाय गेला तर तो वायाच गेला असे समजावे. स्मर्तगामी ह्याचा अर्थच मुळी ज्याचे स्मरण केल्यावर इतर सर्व गोष्टींचे विस्मरण होते असा आहे . इतर गोष्टींचे विस्मरण झाले कि अपोआप त्यांचेच स्मरण होते . त्यामुळे अखंड नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करत राहणे  म्हणजेच प्रपंच करून पारमार्थिक जीवन जगण्यासारखे आहे .

उद्या दत्त जयंती आहे . उद्यापासून सगळ्याचे विस्मरण करण्याचा मनापासून प्रयत्न करून फक्त त्यांचे स्मरण करत राहण्याचा दृढ निश्चय करुया . जीवनाचा खरा अर्थ आणि आपल्या जन्माचे आणि जगण्याचे प्रयोजन त्यांनाच माहित आहे आणि ते आपल्याला कळते जेव्हा त्यांचे चरणाशी जाण्याची बुद्धी होते.

नुसते शरीराने रांगेत उभे राहणे आणि चाफा वाहणे म्हणजे दत्त जयंती नाही तर चांगले मनात विचार रुजवणे , ते जागृत ठेवून त्यात इतरानाही समाविष्ट करून घेणे हेच ह्या दिवसाचे गमक आहे.

त्यांच्यात एकरूप होण्यासाठी मनापासून प्रयत्न करुया . तारक मंत्र , नाम ह्या सर्वातून त्यांच्या सहवासात राहणे हेच जीवन आहे आणि ते समजते जेव्हा दुक्ख गळ्याशी येतात . किती दिवस सुखी असल्याचा मुखवटा घालून फिरणार आपण . किती दिवस मत्सर , सुडाच्या भूमिकेतून इतरांना त्रास देणार आपण , विचार करा . जानराव देशमुखाला  महाराजांच्या चरणाला स्पर्श कलेल्या  पाण्याने जीवन लाभले ते आपल्याला का नाही तारणार . ते आपलेच तर आहेत .

हम गया नाही जिंदा है, मी गेलो ऐसे मानू नका , भक्तीत अंतर करू नका हे वचन भक्तांना देणारे आपले महाराज आजही ह्या क्षणी आपल्या अवती भवतीच आहेत . त्यांना ओळखण्याची ताकद देते ते नामस्मरण , म्हणूनच नामाचे महत्व आहे.

जगातील प्रारब्धातील सर्व द्क्खाची होळी करणारे, सगळ्या व्याधी , निराशा , त्रास सगळ्याचे विस्मरण व्हावे आणि चित्त त्यांच्या चरणाशी एकरूप व्हावे ह्यासाठी प्रयत्नशील राहूया .प्रचंड ताकद नामात आहे.

उद्यापासून जीवन त्यांना समर्पित करून त्यांच्या इच्छेत आपली इच्छा विलीन करून , त्यांच्यावर सर्व भर सोपवून निर्धास्त राहूया . महाराज आपले वाईट करतील का? विचारा प्रश्न आपल्याच मनाला , बघा काय उत्तर मिळते आहे ते. आले ना चेहऱ्यावर हसू ?

प्रचीती विना भक्ती नाही आणि भक्ती केल्याशिवाय प्रचीती मिळणार नाही. सोळा आणे खरी भक्ती त्यांना अपेक्षित आहे . ती केली तर जीवनात आनंदाचा मळा ते फुलवल्याशिवाय राहणार नाहीत .

कुठलीही शंका नको आणि भय तर त्याहून नको. ते आहेत आणि ते आहेतच . महाराज आजपासून मला सर्व गोष्टींचे विस्मरण होवूदे आणि तुमच्याच नामस्मरणात जीवन व्यतीत होवूदे हेच मागणे आहे.

सर्वाना दत्त जयंतीच्या मनापासून शुभेछ्या .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment