Wednesday, 7 January 2026

पुर्णत्वाकडे नेणारा प्रवास

 || श्री स्वामी समर्थ ||


आजकाल जातक पत्रिका मार्गदर्शनासाठी आले कि पहिली ५-६ वाक्ये ऐकून ज्योतिष शास्त्राच्या क्लास ला गेल्या सारखे वाटते . माझे अमुक लग्न आहे , माझा शनी इथे , मंगळ नीच आहे, माझी चंद्र दशा आहे. मनात येते इतके अनुभव संपन्न असल्यावर ज्योतिषाकडे जायची गरजच काय . आणि मग तसे विचारले कि मग म्हणतात नाही कुठेतरी काही वाचण्यात येते वगैरे वगैरे मला थोडेसे ज्ञान आहे. आणि हे “ थोडेसे “ च आपली वाट लावते .

कुठल्याही गोष्टीत आज पाहिले तर सगळे अर्धवट अर्धवट आहे आपले . कुठलाही विषय संपूर्ण अभ्यासलेला नाही आणि मग अर्धवट काहीतरी ऐकून बोलून तशी मनोधारणा करून घ्यायची . कुठेतरी काहीतरी अफवा ऐकून एखाद्या व्यक्तीबद्दल सुद्धा मते बनवणे किंवा बनवून देणे घातक आहे. रोजच्या जीवनातील अत्यंत साध्या गोष्टी झाडांना कुठेतरी वाचून ऐकून खते आणून घालणे , आज जाहिरातींचे युग आहे त्यामुळे अनेक गोष्टी ह्या पुरेशी माहिती न घेताच आणल्या जातात. जसे वेगवेगळे मसाले , केसांचे तेल आणि बरेच काही . 

प्रत्येक गोष्टीत आपण संशोधन करायची आवश्यकता नाही आणि ते होणेही नाही पण ज्या रोजच्या जीवनातील निगडीत गोष्टी आहेत त्या तर पूर्ण माहिती असल्याच पाहिजेत . कुणीतरी काहीतरी सांगतो म्हणून आपण माणसे सुद्धा चांगली वाईट किंवा खूप चांगली खूप वाईट अशी ठरवतो ज्याने आपलेच नुकसान होते. इतरांच्या पापात आपल्याही नकळत आपण सहभागी होत जातो . आपण स्वतःच्या अनुभवावरून ह्या गोष्टी ठरवल्या पाहिजेत. 

ज्ञान हे परिपूर्ण असावे मग ते कुठल्याही गोष्टीतील असो. सोशल मिडिया प्रगत आहे पण त्यातील प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी आहे का? काहीतरी व्यायाम प्रकार पाहून ते १०० वेळा केले तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा होवू शकतात . आपला आहार , व्यायाम अन्य गोष्टी आपल्या शरीर प्रकृतीप्रमाणे ठरत असतात . आपण किती चालू शकतो काय पचवू शकतो हे आपले आपल्यालाच माहित असते .

असो सांगायचे तात्पर्य असे कि अर्धवट ज्ञान घातक असते. मला तर वाटते अध्यात्म , नामस्मरण हे महत्वाचे आहे . नाम हे रोजच्या जीवनातील अंग असलेच पाहिजे कारण नाम आपल्याला घडवत असते. आपण तरी स्वतःला पूर्ण कुठे  समजले आहोत ? विचारा प्रश्न स्वतःलाच बघा काय उत्तर मिळते . आपले सद्गुरू , इष्ट काहीच समजले नाही आपल्याला . 

रोज महाराजांना खंडीभर फुले अर्पण करतो , पूजा अर्चना , प्रसाद कश्याचीही कमतरता नसते पण त्यांनी सांगितलेली जीवनातील सूत्रे ? त्याचा अभ्यास अपुरा आहे आपला . कितीवेळा आपण दुसर्याला आपल्या शब्दांनी , कृतीने दुखावतो . समोरच्याने आपल्यासाठी काय केले आहे हे क्षणात विसरतो .विचार करा आपणही आपल्या गुरूंच्या साठी जे काही केले आहे ती भक्ती गुरुही विसरले तर आपले काय होयील ?? कारण त्यांच्याच मुळे तर आपले अस्तित्व , जीवन आहे आणि त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालणे हेच आपल्या जीवनाचे प्रथम उद्दिष्ट आहे. ह्या सगळ्याचे  पूर्णतः अवलंबन खरच करतो का आपण ???? उत्तर नाही असेच आहे. 

आपण स्वतःशी नाही खोटे बोलू शकत हे नक्की. अध्यात्मात सांगितल्याप्रमाणे जीवनाची सूत्रे आणि आपले जीवन ह्याचा काडीचाही संबंध नसतो म्हणूनच आपल्याला अजून पुर्णत्वाकडे जाण्याचा प्रवास करायचा आहे जो अनंत आहे. 

षडरिपूना सोडणे इतके सोपे असते तर अजून काय हवे होते . गुलाबजाम समोर ठेवले तर मी खाणार नाही असे ठरवून बघा . लगेच खाणार आपण . ना मनावर ताबा न कृतीवर . सगळेच अपूर्ण आहे.

आपल्या घरातील सगळ्यांची मने कुठे समजतात आपल्याला तर इतरांची समजतील . कुठलाही विषय असो अथवा व्यक्ती आपल्याला असलेली माहिती अर्धवट , अपूर्ण कित्येकदा चुकीची असते आणि त्यावर आपण आपली मते बनवून त्या व्यक्तीबद्दल मनोधारणा करून घेणे तर अजूनच घातक असू शकते. 

मनाची अस्थिरता , कमकुवत स्थिती ह्या वरून समजते . आपला स्वतःचा सखोल अभ्यास हवा मग वस्तू असो अथवा व्यक्ती , आणि तो असेल तर आपला दृष्टीकोन योग्य होण्यास मदत होते .कुणीतरी काहीतरी सांगते म्हणून जेव्हा आपण कुठलीही गोष्ट किंवा मत बनवतो तेव्हा आपण स्वतःच्या कमकुवत अस्थिर मनाचे प्रदर्शन मांडत असतो.

नामस्मरणाचा पाऊस पाडून सुद्धा आपली मनोवृत्ती चंचल का असते ? चिंता का करतो आपण ? आपल्या गुरूंच्या वरती विश्वास का डळमळीत होतो ? कि तो कधी नव्हताच ? त्यांचे अस्तित्व मान्य केले आहे ना आपण ? मग तरीही शंका कुशंका का भेडसावत आहेत आपल्या मनाला ? एखादी गोष्ट होणार का नाही हा संदेह मनात का असतो ? का नाही आपण हो हे नक्की होणारच असे म्हणत ? जर आणि तर मध्ये आयुष्य जाणार का आपले ?

मोह सुटत नाही आणि द्वेष मत्सर ह्या भावना जात नाही. मिळणार काय पण हे करून ? ह्या सर्वाचे प्रतिबिंब म्हणजे आपली प्रकृती जी मग पुढे ढासळत जाते .

आज आपली शरीरसंपदा जपण्यासाठी सात्विक विचार आणि कुठल्याही चुकीच्या विचारांपासून दूर राहण्याची गरज आहे. आजारांचे मूळ विचारात आहे .मी कालपासून आज पुढे कसे आयुष्य नेत आहे हे पाहिले तरी खूप आहे. शेजारी कुठली भाजी केली आहे आणि कुणाचे लग्न ठरले का , नोकरी मिळाली नाही म्हणून अमुक तमुक आजकाल घरातच असतो ह्या बातम्या माहिती करून घेण्याची मनोवृत्ती सोडली नाही तर आपली अधोगती होणार हे नक्की. 

जीवन क्षणभंगुर आहे. दिवसातील २४ तास ह्याच जीवनाचा स्वर्ग करण्यासाठी ईश्वराने दिले आहेत . आपल्या मनातील दुषित विचारांना तिलांजली देण्यासाठी प्रचंड वाचन आणि नामस्मरणाची आवश्यकता आहे. वेळच वेळ आहे आपल्याकडे आणि तो नको त्या गोष्टीत जात आहे. 

मला किती गोष्टींची पूर्ण माहिती आहे? स्वतः तसेच घरातील आणि नित्य व्यवहारातील किती माणसे पूर्णपणे समजली आहेत आपल्याला ? विचारा प्रश्न स्वतःलाच . उभा जन्म गेला तरी आपले गुरु सुद्धा आपल्याला समजत नाहीत , ते समजले तर भक्ती ला आपण करत असलेल्या सेवेला चार चांद लागतील . सहमत ..


तुमच्या आमच्या ह्या पूर्णत्वाकडे नेणाऱ्या प्रवासासाठी शुभेछ्या . भेटत राहू ह्या प्रवासात अधून मधून .

अपूर्णत्वाकडून  पुर्णत्वाकडे आपले आपल्यालाच जायचे आहे त्यासाठी प्रयत्नशील राहूया .


श्री स्वामी समर्थ 


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment